‘मिस्टर’ शेफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

...आणि मटण उडालं भुर्रर्र

...आणि मटण उडालं भुर्रर्र
एप्रिल महिन्याचे दिवस होते. शाळेची वार्षिक परीक्षा नुकतीच संपून उन्हाळ्याची सुटी सुरू झाली होती. आता या सुटीत करायचं काय, असा यक्षप्रश्‍न माझ्यापुढं होता. म्हणून मी आईला विचारलं. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘मी तुला स्वयंपाक कसा करायचा हे शिकवते. तुला ते आयुष्यभर उपयोगी पडेल आणि कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.’’ मला तिचा सल्ला एकदम आवडला आणि मीसुद्धा मनावर घेतलं. अशा तऱ्हेनं माझा स्वयंपाकाचा ‘श्रीगणेशा’ झाला. प्रथम तिनं मला चहा कसा करायचा हे सांगितलं. पाणी किती घ्यायचं, साखर किती टाकायची, चहाची पावडर किती टाकायची आणि शेवटी दूध किती टाकायचं या गोष्टी तिनं समजावून सांगितल्या. त्याप्रमाणं मी चहा केला आणि तो सर्वांना पसंत पडला. आपण मोठी बाजी मारली, असा आनंद मला झाला आणि स्वयंपाक ही अगदी सोपी गोष्ट आहे, असं मला वाटलं. परंतु, आई म्हणाली, ‘‘अजून पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत.’’ त्यानंतर तिनं मला पोळी कशी करायची, हे सांगितलं. पीठ मळून त्याचे गोळे करून मी पोळपाट घेऊन पोळी करायला घेतली. अर्धा तास झाला- एक तास झाला तरीदेखील पोळी काही गोल होत नव्हती. सगळ्या देशांचे ‘नकाशे’ घडत होते; पण पोळी काही गोल व्हायचं नाव घेईना. मी फारच निराश झालो. शेवटी आई स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, ‘‘अजून एक पण पोळी नाही झाली?’’ तेव्हा मी तिला पोळपाटाकडे बोट दाखवून वेगवेगळ्या देशांचे ‘नकाशे’ दाखवले. ते बघून तिलासुद्धा हसू आले. परंतु तिनं मला धीर दिला. मग मी तिला विचारून आणि तिच्या देखरेखीखाली पोळी केली आणि त्यात पूर्ण यशस्वी झालो. ‘‘आपण आपलं मन जेवढं त्या पदार्थात घालू तेवढा तो पदार्थ रुचकर होतो,’’ हा मंत्र आईनं दिला.

असंच एकदा आमच्याकडं पाहुणे येणार होते, म्हणून मी मटण घेऊन आलो. आईला म्हटलं, ‘‘तू मसाल्याची तयारी कर. तोपर्यंत मी मटण कूकरमध्ये शिजवून घेतो. त्याप्रमाणं मी मटण धुवून कूकरमध्ये शिजायला ठेवलं. या सर्व गोंधळात मी कूकरचं झाकण लावायला विसरलो. कूकर गॅसवर ठेवला आणि झाकण नुसतंच त्याच्यावर ठेवलं. थोड्या वेळानं मोठा आवाज झाला आणि झाकण वर उडालं. त्याचबरोबर आतलं मटणसुद्धा वर उडालं आणि छताला चिकटलं. आई धावतच स्वयंपाकघरात आली. माझी तर पार बोबडीच वळली होती. एव्हाना पाहुणे घरी आले होते. आईनं वेळ मारून नेली आणि मला हॉटेलमधून तीन-चार प्लेट मटण घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणं हॉटेलातून मटण आणलं आणि पाहुण्यांना खूश केलं.  
- शेखर प्रधान, पुणे

-------------------------------------------------------------------------------------------
‘मॅगी’चा फसलेला प्रयोग

लहानपणी माझी आई आजारी असायची, त्यामुळं लहानपणापासून मी डाळीची खिचडी, वरण-भात, बटाट्याची भाजी, ब्रेड-बटर, चटणी वगैरे गोष्टी शिकवले होते. लग्न झाल्यावर पत्नीसुद्धा शिक्षिका असल्यामुळे मला स्वयंपाकात लुडबूड करायची सवयच लागली होती.
सध्या मी सत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. एकदा मी माझा नातू अमोघसाठी ‘मॅगी-मसाला’ बनवायचं नक्की केलं. माझी पत्नी अनुराधा पण मला म्हणाली, ‘‘तुम्हाला फार हौस आहे ना, आज नातवाला तुम्हीच बनवून द्या मॅगी!’’ मी तिला म्हणालो, ‘‘हा तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. बस, दोन मिनिटांत तयार करतो.’’ पण गॅसवर दुसऱ्या बाजूला मी फोडणीचे मुरमुरे टाकले होते. दोन्ही बाजूला लक्ष ठेवावं लागत होतं. ‘मॅगी’त पाणी जरा जास्तच टाकल्यामुळं ‘मॅगी मसाल्या’चा रस्सा फिक्का झाला आणि ‘मॅगी’ जास्त वेळ ठेवल्यामुळं ती ‘ओव्हर-कूक’ झाली आणि नातवाचीही बडबड सुरू झाली! मॅगी चक्क फसली. एवढ्यात माझी सून राजश्री आली. तिनं अमोघला लगेचच मॅगी बनवून दिली. शेवटी माझी ‘ओव्हर-कूक मॅगी’ मलाच खावी लागली. सौभाग्यवतींचा ओरडा खावा लागला तो वेगळाच. त्या दिवसापासून मी शिकलो- एका वेळेस केवळ एकच पदार्थ करायला हवा! नव्या वर्षातला हा फसलेला प्रयोग मला कायमचा लक्षात राहिला आणि एक तिखट आठवणही मनात कोरली गेली...
- अविनाश खरे, पुणे.

-------------------------------------------------------------------------------------------
गुलाबजामचा ‘दगड’

पत्नीचा वाढदिवस नुकताच झाला. दर वर्षी तिला साडी घेतो; पण बरोबर जात नाही. साडी फायनल करताना आमचं एकमत होत नाही. संघर्ष नको म्हणून बरोबर जाणंच टाळतो.
पत्नी मैत्रिणीला घेऊन लक्ष्मी रोडवर गेली. घरात मी आणि मुलगाच (वय १६) राहिलो. पत्नीला आल्यावर ‘सरप्राईज’ द्यायचं म्हणून ‘गुलाबजाम’ तयार करण्याचा बेत आखला. मी तिला ‘गुलाबजाम’ करताना पाहिलं होतं. घरात गुलाबजामचं ‘इस्टंट पीठ’ होतंच. परात घेतली. पिठात दूध घालून मळून कणीक केली. कणकेचे छोटे-छोटे गोळे केले. गोळ्यात खडीसाखरेचे तुकडे टाकून पुन्हा गोळे बंद केले. तळहातावर तूप लावून गोळे फिटवून मऊ केले. कढईमध्ये तेल घालून उकळले आणि गोळे तळून घेतले.
दरम्यान, मुलानं साखरेचा पाक केला होता. पाकात हे गोळे टाकले आणि एका पातेल्यात साठवले. थोड्याच वेळात पत्नी आली. ‘‘अय्या छान! बघू काय केलं ते?’’ तिनं पातेलं उघडलं. पळी घालून गुलाबजाम बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गोळे पाकात रूतून आणि आमच्यावर रुसून बसले होते.
आम्ही गरम गोळे, गरम साखरेच्या पाकात टाकल्यामुळे त्याचा दगड झाला होता. आमचं ‘सरप्राईज’ आमच्या अंगाशी आलं होतं.
- शिवलिंग राजमाने, पुणे

Web Title: mr shef article in saptarang