सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारं तिरुवन्नमलई (मृणाल पवार)

mrunal pawar
mrunal pawar

कामानिमित्त किंवा ठरवून आपण एखाद्या ठिकाणी जातो. धकाधकीच्या जगण्यात विश्रांती म्हणूनही निसर्गरम्य ठिकाण गाठतो. प्रेरणादायी ऊर्जेची ओढ या भटकंतीमागं असते. चेन्नईतल्या तिरुवन्नमलई इथं अशी ऊर्जा गवसते. इथली अनुभूती मनाला अंतर्बाह्य सकारात्मकता देणारी ठरते.

शास्त्रीय नृत्यसादरीकरणाच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी चेन्नईला जाणं झालं. कार्यक्रमात "शिववंदना' सादरीकरणातून आत्मिक आनंद मिळालाच होता; परंतु मैत्रिणींच्या आग्रहावरून चेन्नईपासून साधारणपणे 200 किलोमीटरवर असणाऱ्या तिरुवन्नमलई इथं जाण्याचं ऐनवेळी ठरलं. जवळपास साडेतीन तासांचा प्रवास करून आम्ही तिथं पोचलो आणि मूळ ठिकाणापासून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असणारा भव्य अरुणाचल डोंगर नजरेस पडला. जसजसे आम्ही डोंगराजवळ जात होतो, तसतशी अचानकपणानं मनातही एक ऊर्जा प्रेरित झाल्याचा अनुभव येऊ लागला आणि सुरू झाला श्रद्धेनं काठोकाठ भरलेल्या भक्तिमय, आध्यात्मिक वातावरणातला प्रवास.

"तमिळनाडू राज्यातलं तीर्थक्षेत्र' अशी तिरुवन्नमलई शहराची ओळख. भगवान शंकरांच्या मंदिरासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध. शहरात प्रवेशतानाच अरुणाचल डोंगराची भव्यता लक्ष वेधून घेते.

त्या डोंगराकडं नजर जाताच नकळत सकारात्मकतेची लहर मनात उमटायला सुरवात होते आणि ती उत्तरोत्तर वाढत जात असल्याचा अनुभव येतो. तिरुवन्नमलईच्या निसर्गसमृद्ध परिसरात किती तरी आश्रम आहेत. या परिसरात हॉटेल्स आणि तीही व्यावसायिक हॉटेल्स अभावानंच दिसतात. मात्र, विविध आश्रमांची मांदियाळी इथं आढळून येते. कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीप्रमाणंच इथं आश्रमांची "स्पिरिच्युअल व्हॅली'च जणू आहे. गुरू रमणमहर्षी यांचा इथला भव्य आश्रम एकदा तरी पाहायला हवा. भाविकांनी आणि विशेषत: परदेशी भाविकांनी सतत गजबजलेला हा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

या शहरात स्वागताला असतात ती भल्या मोठ्या शेतात बांधलेली टुमदार घरं किंवा गेस्ट हाउसेस. आम्ही गेस्ट हाऊसचाच पर्याय निवडला. प्रत्येक घरासमोर वैशिष्ट्यपूर्ण दगडांभोवती काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधत होती. आजूबाजूला आध्यात्मिक वातावरण आणि त्या अध्यात्माचं, श्रद्धेचं केंद्रस्थान असणारा अरुणाचल डोंगर अशी इथली भौतिक आणि नैसर्गिक रचना आहे.

विदेशी भाविकांची समर्पण भावना
तिरुवन्नमलई तीर्थस्थळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं भाविकच मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहेत. परदेशी भाविक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी मुक्कामी असल्याचा अंदाज इथं फोल ठरतो. कारण, परदेशी नागरिकांची अनेक कुटुंबं वर्षानुवर्षं इथं वास्तव्य करत आहेत. बहुतांश परदेशी नागरिकांची दुसरी पिढी इथं शिक्षण घेत आहे आणि तेही चक्क तमीळ भाषेत. देशभरातले श्रद्धाळू इथं येतातच; परंतु परदेशी नागरिक पारंपरिक तमिळी वेशभूषेत अगदी सहज वावरताना दिसतात. एवढंच नव्हे तर, स्वतःच्या मातृभाषेप्रमाणंच तमीळ भाषेतही अगदी सफाईदारपणे संवाद साधतात.

"अध्यात्माची आवड, रमणमहर्षींच्या विचारांची ओढ म्हणूनच या तीर्थस्थळाला भेट दिली. ऊर्जेची अनुभूती देणाऱ्या या परिसरानं कधी आपलंसं केलं हे कळलंच नाही,' असं दशकभराहून अधिक काळ स्थायिक असणारे परदेशी भाविक समर्पणभावनेनं सांगतात. फ्रान्स, जर्मनी, स्वीडनचे नागरिक इथं संख्येनं अधिक आहेत. पैशाशिवाय ते इथं राहतात, हे विशेष. एका फ्रेंच साधूशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं ः "पैशाशिवाय कसं जगावं हे इथं शिकलो. वस्तूची, कामाची देवाणघेवाण करून जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गरजा पूर्ण करतो.'' एखाद्याच्या घरी त्याला हवी असणारी मदत करायची आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून नाष्टा किंवा जेवण घ्यायचं. बस्सं...असं अगदी साधं राहणीमान त्यांनी स्वीकारलं आहे.

ऊर्जेचं केंद्रस्थान
आत्मविश्‍वास वाढवणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा "अरुणाचल डोंगर' हे इथलं महत्त्वाचं श्रद्धास्थान. अशा परिसराभोवती अनेक आख्यायिका गुंफलेल्या असतात. अरुणाचल डोंगर म्हणजे शिवाचं धड आणि कैलास हे शिवाचं मस्तक, अशीही एक आख्यायिका आहे. इथं मोठ्या संख्येनं असलेले श्रद्धाळू आणि त्यांच्यातला भक्तिभाव यामागं शिवभक्तीचा भावही कारणीभूत असावा. या डोंगराला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा इथं रूढ आहे. जवळपास 14 किलोमीटरची प्रदक्षिणा पूर्ण करायला सामान्य माणसाला साधारणतः तीन ते साडेतीन तास लागतात; परंतु इथं राहणारे देश-विदेशातले भाविक रोज अशा कित्येक प्रदक्षिणा घालतात. आध्यात्मिकतेचं केंद्र असणाऱ्या या डोंगराला प्रदक्षिणा पूर्ण करताना मीदेखील आजूबाजूच्या ऊर्जेचा आपल्यावर होणारा विलक्षण अनुभव घेतला. या डोंगरावर रात्रभर एक दिवा तेवत असतो. रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणाऱ्या असंख्य ताऱ्यांच्या साक्षीनं हा डोंगर नजरेस पडतो, तेव्हा तो एका तेजस्वी शक्तीप्रमाणे भासतो आणि त्याची अनुभूतीही नकळतपणानं येते. दिवाळीला, पौर्णिमेला इथं भाविकांची प्रचंड गर्दी असते. डोंगराभोवती वावरताना ऊर्जेची कंपनं (व्हायब्रेशन्स) जाणवतात. त्यात भर पडते ती डोंगराभोवती असणाऱ्या ध्यानधारणा केंद्राची (मेडिटेशन सेंटर) आणि आध्यात्मिक केंद्रांची. देशभरातल्या तीर्थस्थळांचा परिसर व्यावसायिकतेनं गजबजलेला नेहमीच दिसतो; परंतु तिरुवन्नमलईमध्ये मात्र अशी गजबजलेली व्यावसायिकता शोधूनही सापडत नाही. या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वोत्तम. या कालावधीत जगभरातले भाविक इथं येतात. आपल्याला मिळणारा आत्मिक आनंद दुसऱ्यालाही दिला पाहिजे, या समर्पणभावनेचं अनोखं दर्शनही या ठिकाणी होतं.

खाद्यसंस्कृती
एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर एरवी आपण तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखण्याला प्राधान्य देतो. मात्र, इथं स्थानिक खाद्यपदार्थांची अनोखी चव चाखायला मिळते. तमिळनाडूमधलं गावरान जेवण हे इथलं वैशिष्ट्यं. आजूबाजूच्या शेतातल्या भाजीपाल्यापासून बनवलेल्या जेवणाची चवच न्यारी. जागोजागी फिल्टर कॉफी, सेंद्रिय भाज्यांपासून बनवलेलं जेवण इथं मिळतं. जेवणातले खास प्रकार म्हणजे प्राण्यांच्या कष्टाविना बनवलेले खाद्यपदार्थ. त्याची दालनं इथं आहेत. कोणत्याही प्राण्याला कष्ट देऊन मिळवलेलं अन्न न खाण्याची प्रथा इथं आहे. या प्रकारच्या जेवणामध्ये अगदी दुग्धजन्य पदार्थही वर्ज्य आहेत. रोजच्या जगण्यात कमीत कमी गरजा, हे इथलं जीवनमान. ते मनाला भावतं. परदेशी भाविकांसह देशातले दाक्षिणात्य भाविक इथं मोठ्या संख्येनं येतात. सातत्यानं जाणवणाऱ्या सकारात्मक ऊर्जेत अधिक भर पडते ती माणसाला मानसिकदृष्ट्या अधिकाधिक समृद्ध करणाऱ्या साउंड हीलिंग, म्युझिक थेरपी अशा उपचारपद्धतींची. या परिसरात अभिनव उपचारपद्धतीद्वारे भाविकांच्या मनःशांतीसाठी प्रयत्न केले जातात.

तिरुवन्नमलईचा आणि अरुणाचल डोंगराचा निरोप घेताना मन अवघडतं. काही केल्या पाय निघत नाही. एवढं मात्र निश्‍चित की आजूबाजूला असणाऱ्या प्रसन्न वातावरणामुळं तेजस्वी ज्योत मनात उजळलेली असते आणि या ज्योतीची अनुभूती मनाला होत राहते. ती मनाला आकार देते. त्यासाठी एकदा तरी तिरुवन्नमलईला जायलाच हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com