नजरा शेजारी राज्याच्या निकालाकडे

Gujrat assembly election
Gujrat assembly election

गुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक गेली, ती महाराष्ट्रात का आली नाही यावर प्रचंड चर्चा झडे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने जाहीरपणे कडाकडा बोटे मोडून झाल्यावर राजकारणी खाजगीत मोदी अजब रसायन असल्याची कबुली देत. आता मोदी नसलेल्या गुजरातेत निवडणुका झाल्या आहेत. सोमवारी निकालही जाहीर होणार आहेत.ते महाराष्ट्राच्या राजकारणावर खचितच परिणाम करणार आहेत. आज सेत्त त सहभागी असलेल्या शिवसेनेशी भाजपचे संबंध कसे असतील याचा फैसलाही गुजरातचे निकाल करणार आहेत. पाऊस तेथे पडला तरी छत्र्या येथेही उघडल्या जाणार आहेत. कशा या विषयीच्या या शक्‍यता नवी समीकरणे समोर आणणाऱ्या आहेत.

भारतीय जनता पक्षाची गुजरात ही प्रयोगशाळा आहे. मोदींनी राजकीय चातुर्याचा उपयोग करीत बांधलेल्या गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही अशी शक्‍यता तेथे प्रत्यक्ष पहाणीसाठी गेलेले पत्रकार व्यक्‍त करतात. तर मतदानोत्तर चाचण्या पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल असे एकमुखाने सांगतात. पंतप्रधान मोदींची ,त्यांचे विश्‍वासू सहकारी असलेल्या अध्यक्ष अमित शहांची ही कसोटी आहे. मावळलेल्या गुजरात विधानसभेत भाजपच्या 116 जागा आहेत. त्या पेक्षा एकही जागा कमी होणे हा भाजपचा, आक्रमकतेचे राजकारण करणाऱ्या मोदी शहांच्या जोडगोळीचा एका अर्थाने पराभव असेल. 22 वर्षांच्या सत्तेविषयी नाराजी निर्माण होणे स्वाभाविक असते.पण गुजरात ही मोदींची प्रयोगशाळा आणि कर्मभूमी असलेल्या गुजरातसाठी हा नियम लागू करता येणार नाही. मोदी म्हणजे विजय हे समीकरण दृढ झाले आहे ते त्यांनी गुजरातेत सातत्याने मिळवलेल्या विस्मयजनक यशामुळे. तेथे भाजपला निसटते बहुमत मिळून चालणार नाही. ऍन्टी इन्क म्बन्सी वातावरणाचा लाभ कॉंग्रेसला झाला अन भाजपच्या जागा कमी झाल्या तर फडणवीस यांच्या सरकारवर होणारे प्रहार वाढतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आजवरची निराशा त्यागून तरतरीत कामगिरीचे प्रयत्न चालवले आहेतच, गुजरातेत भाजपच्या जागा घसरल्या तर या दोन्ही पक्षांना बळ येईल. काँग्रेस हा या देशाच्या राजकारणाचा अगदी कालपरवापर्यंतचा मुख्य स्वर.

भाजपच्या पिछेहाटीला त्याच राज्यात प्रारंभ झाला तर राहुल यांच्या राज्याभिषेकाच्या पर्वावर झालेला शकुन असेल. विरोधक पुन्हा नव्याने स्वत:ला जोखू लागतील अन मोदी यांचे अत्यंत आवडते मानले जाणाऱ्या फडणवीसांपुढे आव्हाने उभी राहतील. आपण विजयाच्या पर्जन्यछायेत येवू शकतो असा साक्षात्कार गुजरातनिकालांनी भाजपविरोधी कौल दिला तर काँग्रेसला होईल. गुजरातने गेल्या विधानसभा निवडणुकीत 116 जागा भाजपच्या पारडयात टाकल्या. काँग्रेस आणि भाजप यांच्या मताच्या टक्‍केवारीत 20 ते 22 टक्‍क्‍यांचा फरक आहे. काँग्रेस संघटनेत प्राण फुंकत स्वत:ची प्रतिमा बदलण्याची कामगिरी राहुल गांधी यांनी बजावली आहे. त्याचे फळ यदाकदाचित मिळालेच तर महाराष्ट्रात काँग्रेस सक्रीय होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसला समवेत घेण्याचा कॉंग्रेसचा मनोदय दिसतो. त्यामुळे या दोन्ही पक्षांवर निकाल बाळसे चढवतील. गुजरातेत भाजपची कामगिरी ढासळली तर शिवसेनेला कमालीची उभारी येईल. सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहुर्त एक वर्षानंतरचा आहे असे आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी कमालीचे प्रतिकूल असले तर शिवसेनेला सरकारला जय महाराष्ट्र करण्याच्या मुहुर्ताची गरज भासणार नाही. 160 जागा जिंकण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सेना सज्ज होईल.गुजरात म्हणजे मोदी हे समीकरण, ते अवतारी पुरूष आहेत असे भासवले जाते. त्यामुळे त्यांना अधिक जागा जिंकाव्याच लागतील.त्यामुळे गेल्या विधानसभेत जिंकलेल्या 116 पेक्षा भाजपला किमान एक जागा जास्त मिळवावी लागेल. तो जनतेच्या दृष्टीने खरा विजय असेल. प्रत्यक्षात खरेच असे झाले किंवा भाजपने त्यांच्या योजनेनुसार नाही 150 पण 135 जागा जिंकल्या तरी चित्र कसे असेल ? 

भाजप त्या स्थितीत अत्यंत आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकेल. भाजपवरचा अमराठी प्रभाव वाढेल. (गुजराती असे वाचावे.) मुंबईच्या विकासात उत्तरभारतीयांचे योगदान मोठे आहे असे जाहीरपणे नमूद करत फडणवीस यांनी मराठी अस्मितेऐवजी आपण सबगोलंकारी समीकरणांना मह्त्व देतो हे दाखवून दिले आहेच. भाजपला सतत हिणावणाऱ्या, सामनातून दररोज टिकेचे विष ओकणाऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी खरेच भाजप नारायण राणेंना मंत्रीपदाची शपथ देईल? राणे यांना आघाडीचा सहयोगी सदस्य करताना जे आश्‍वासन दिले असेल ते पाळावे लागेलच. राणे यांचा रूदबा ,दरारा तसेच आक्रमकतेची कल्पना असली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांना राणेंना कधीतरी मोठे पद दयावे लागेलच. अशा परिस्थितीत शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असे सांगितले जाते.शिवसेना प्रत्यक्षात असा निर्णय घेईल काय? उत्तर कठिण असले तरी भाजपला विजयाचा विश्‍वास असेल तर सहकाऱ्याला त्रास देण्याचे प्रयत्न सुरू होतील. सेनेने बाहेर पडायचे ठरवले तर खरेच सरकार पडेल की अल्पमतातले सरकार म्हणून चालवले जाईल.

गुजरातचे निकाल उत्तुंग यश देणारे असतील तर महाराष्ट्रात विधानसभा विसर्जित करून पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्‍यता काही नोकरशहा व्यक्‍त करीत आहेत.जे होईल ते बघायचे. निकाल काहीही लागला तरी त्याचे परिणाम होतीलहे निश्‍चित.गुजरातेत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाची प्रतीके वापरण्यास प्रारंभ केला.त्यांच्या मंदिरपर्यटनाचे वेड सध्या भलतेच चर्चेत आहे.राहुल यांचा राज्याभिषेक निकालानंतर लगेचच होणार आहे.यापुढेही ते निधर्मी राजकारणाऐवजी हिंदुत्ववादाची कास धरतील काय ? गुजरात निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी असंतोष लक्षात आला, कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या तीन तरूणांच्या सभा गर्दी खेचणाऱ्या ठरल्या.प्रखर विरोधी पक्ष नसल्याने गुजरातेत तरुण तुर्कांनी ते अवकाश मिळवले. कॉंग्रेसचा उदय होणार नसेल तर नवी पिढी नव्या पर्यायांच्या शोधात अशाच तत्कालीक नेतृत्वाच्या मागे जाईल काय ? महाराष्ट्रात हे स्थान शिवसेना मिळवू शकेल किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसही.बेरोजगार तरुणांच्या भावना तीव्रतर आहेत. शेतीअर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेले हे तरुण जीवंत बॉम्ब आहेत. हार्दिक, अल्पेश ते जाणत असतील नसतील, मोदी राहुल फडणवीस शरद पवार अशा सर्वच महत्वाच्या नेत्यांनी ते समजून घेणे आवश्‍यक आहे. तरूणांच्या देशातले हे डेमोग्राफीक ऍडव्हान्टेज राज्यकर्त्याना मॅनेज करता आले नाही तर डिसऍडव्हान्टेज नाहीतर डिझास्टर ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com