पेच शिवसेनेचा, पण विजय कुणाचा ?

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 14 मे 2018

आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे.

आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे.

राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार वर्षांच्या अवकाशानंतर ते साधले आहे. अकाली निधन झालेले खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव "मातोश्री'वर दाखल करीत सामना सेनास्टाइलने होणार याची चुणूक शिवसेनेने दाखवली आहे. वनगा ही निवडणूक जिंकतील काय ते आज सांगता येणार नाही, पण आपण युतीत राहून उपद्रवमूल्य सिद्ध करीत राहू, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे. जेमतेम काही महिन्यांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक भाजपला तितकीशी सोपी नसेल अशी भाकिते केली जात असतानाच शिवसेनेने ही पळवापळवीची मर्दुमकी दाखवली आहे. आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला प्रथमच जाणवले असणार. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याच्या मानसिकतेत असताना बेरजेच्या राजकारणाशिवाय पर्याय नसल्याची जाणीव शिवसेनेला कशी नसणार ? 2014 मध्ये भाजपला विधानसभेसाठी स्वबळावर लढण्यासाठी प्रेरित करणारे अध्यक्ष अमित शहा बंगळूरमध्ये शिवसेनेसमवेत निवडणुकीला सामोरे जाण्याची वक्‍तव्ये करीत असताना, शिवसेनेने "आम्हाला गृहित धरू नका' अशी जाणीव प्रथमच रडीच्या डावाऐवजी चढाईने दिली आहे.

भारतीय समाजात वंशवादाला अतिरिक्‍त महत्त्व. त्यामुळे अकाली निधन झालेल्या नेत्याच्या कुटुंबात कुणी कर्तृत्ववान आहे काय हा प्रश्‍न गैरलागू होतो. आदिवासी खात्याचा कारभार हाताळताना वादग्रस्त झालेल्या विष्णू सवरांना पोटनिवडणुकीत उतरवून दिल्लीत पाठवण्याचा भाजपचा मनसुबा अचूक हेरत शिवसेनेने वनगा कुटुंबाशी सलगी वाढवली आणि मुंबईपासून केवळ काही किलोमीटरवरील पालघरच्या आदिवासी भागात संघपरिवाराच्या मुशीत वाढलेल्या वनगांचे चिरंजीव "मातोश्री'वर शिवबंधनात अडकल्याची दृश्‍ये थेट प्रक्षेपित केली. शिवसेनेचे नेते कौतुकाने स्वत:चीच पाठ थोपटत आता सांगतात की भाजपसाठी ही "ब्रेकिंग न्यूज' होती. सत्ता, संघटना, निर्णयप्रक्रिया एकाच माणसाच्या ताकदीवर चालत असल्याने किंवा तशी ती चालवली जात असल्याने असे घडले काय ? भाजप त्यावर खचितच चिंतन करेल, पण दिवंगत नेत्याचे कुटुंब, मित्र आणि शत्रू अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या पक्षाने पळवले. अशी पळवापळवी युतीधर्मात भलेही बसत नसेल, पण प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर शिवसेनेची पोलादी पकड आहे. त्यामुळे तेथील सुभेदार हे कर्तृत्व गाजवू शकला हे उघड आहे. भाजपच्या गाफीलपणाला लागलेल्या या फळाची चव शिवसेनेला खरेच चाखता येईल ? "शिवसेनेचे विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे काय करत होते याची माहिती आम्हाला होती, आम्ही गाफील नव्हतो,' असे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय सांगतात.

खरे खोटे माहीत नाही, पण शिवसेनेला सतत सांभाळून घेणाऱ्या, त्यासाठी चार वर्षांपूर्वी प्रतिकूल असलेल्या केंद्रीय नेतृत्वाला अनुकूल करून घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच राजेंद्र गावीत यांना कॉंग्रेसमधून पळवून आणले अन्‌ शिवसेनेच्या वनगांसमोर उभे केले. पक्षबांधिलकी, आदर्शवाद असे शब्द हद्दपार झालेल्या राजकारणात "पार्टी विथ डिफरन्स' मूल्ये सोडूनच वागते. उमेदवार तर आयात केला, आता त्याला निवडून आणणे फारसे संघटनात्मक बळ नसलेल्या पालघरात फडणवीस यांच्यासमोरचे आव्हान आहे. शिवसेनेवरील प्रेमही सोपे नव्हते, आता तर युद्धच आहे. शक्‍य असतानाही मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन न करणाऱ्या, मनसेतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांना आपल्यात सामावून न घेता सुखाने शिवसेनेकडे जाऊ देणाऱ्या भाजपला ही आगळिक जिव्हारी लागली आहे. अर्थात ही "लव्ह- हेट रिलेशनशिप' भविष्यातही युतीच्या बऱ्याच परीक्षा पाहील. प्राप्त राजकीय परिस्थितीत हिंदुत्ववादी मतांची बेरीज आवश्‍यक असल्याने वनगांनी, खरे तर शिवसेनेने माघार घ्यावी, पुनर्वसन करू असे प्रस्तावही पाठवले जात आहेत. वेगळे राहून चालणार नाही हे भाजपला जसे कळते आहे, तसे ते शिवसेनेलाही कळत असणारच. एकत्र असण्याची किंमत मोठी असेल हे शिवसेना सांगते आहे काय? नागपुरात उद्धव ठाकरेंचा दौरा हा याच डावपेचांचा भाग असणार. अस्मितेचे फुत्कार काढताना जिंकणे आवश्‍यक असते हे शिवसेना खचितच जाणत असणार. त्यामुळे सामना झालाच तर पालघरातील शिंदेशाहीच्या चाली शिवसेनेसाठी जीवनमरणाच्या असणार. वनगांचा घरोबा लक्षात न आलेली यंत्रणा आता चूक करणार नाही.
चार वर्षांपूर्वी भाजपच्या आकड्यांना मान्यता दिली असती तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. (शहांनी दुसरी शक्‍कल लढवून युती केली नसतीच.) पण वेडात दौडून नंतर बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी 63 संख्येसह सरकारमध्ये सामील होत शिवसेना तहात हरली. आमदारांच्या रेट्यामुळे पर्याय नसेलही. सत्तेत वाटेकरी असणारी शिवसेना "ऍन्टी इनकम्बन्सी'तून कशी सुटणार ? पालघरमुळे दोन ठिकाणच्या विधान परिषद निवडणुका शिवसेनेने स्वत:च आव्हान करून ठेवल्या आहेत. कर्नाटकाचे निकाल 2019 च्या "महाभारता'ची दिशा ठरवतील. कदाचित समसमान जागावाटपाचे नवे युतीसूत्र पुढे येईल. "राजाप्रमाणे वागवा' असे सांगण्याची क्षमता शिवसेनेला पालघर निकालातून मिळवावी लागेल.

भंडाऱ्याची पोटनिवडणूक मात्र अचानक साधी झाली आहे. बंडाची ललकारी देणारे नाना पटोले थंडोबा होत विधानसभा लढणार असावेत. प्रफुल्लभाई, वर्षाभाभी पटेल यांच्याऐवजी "राष्ट्रवादी'ने मधुकर कुकडे यांना रिंगणात उतरवले आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने शंकेचे कारण नाही. पण फडणवीस यांना "योगी आदित्यनाथ' होण्यापासून वाचवणारी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrunalini Naniwadekar writes about Shiv Sena BJP clash