टेनिसमधलं ‘महाराष्ट्र’पर्व (मुकुंद पोतदार)

टेनिसमधलं ‘महाराष्ट्र’पर्व (मुकुंद पोतदार)

गेली २१ वर्षं चेन्नईत होत असलेली एटीपी टेनिस स्पर्धा यंदा ‘महाराष्ट्र ओपन’ नावानं नुकतीच पुण्यात झाली. पहिलंच वर्ष असूनही उत्तम संयोजनामुळं महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं. ‘केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धे’पाठोपाठ ‘महाराष्ट्र ओपन’मुळं पुण्याचीही वेगळी ओळख टेनिसच्या विश्‍वात निर्माण होईल. खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेविषयी...

मी जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी झालो आहे. स्पर्धेचं पहिलं वर्ष असतं, तेव्हा संयोजनात काही गोष्टी पुढं-मागं होतातच; पण ‘महाराष्ट्र ओपन’ टेनिस स्पर्धा त्यास अपवाद ठरली. पहिलं वर्ष असूनही फार सुरेख संयोजन आहे.
- जिल्स सिमॉन, फ्रान्सचा टेनिसपटू (बक्षीस समारंभातलं मनोगत)

मी दुसऱ्याच फेरीचा सामना खेळलो, तरीही स्टेडियममधील प्रेक्षकांची संख्या चांगली होती. त्यांचा प्रतिसादही छान होता. चेन्नईतल्या स्पर्धेसाठी गेली काही वर्षं प्रेक्षकांना आकर्षित करणं अवघड जात होतं. पुण्यातील हवासुद्धा दमट नाही, वाऱ्याचासुद्धा फारसा त्रास नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास मोसमाची सुरवात करण्यासाठी ही चांगली स्पर्धा आहे.
- मरिन चिलीच, क्रोएशियाचा ग्रॅंड स्लॅम विजेता टेनिसपटू (विजयी सलामीनंतर पत्रकार परिषदेतलं भाष्य)

भारतात क्रिकेट वगळता इतर खेळांमधल्या, जागतिक कीर्तीच्या क्रीडापटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांचं आयोजन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यातही वरिष्ठ गटाच्या अशा काही स्पर्धा भारतात होत असल्या, तरी त्याचं आयोजन महाराष्ट्रात होतंच असं नाही. अशा स्थितीत पहिलं वर्ष दिल्लीत आणि मग २१ वर्षं चेन्नईत झालेली एटीपी स्पर्धा ‘महाराष्ट्र ओपन’ नावानं पुण्यात होणं हा ‘माइलस्टोन’ मानावा लागेल. या स्पर्धेतला अग्रमानांकित चिलीच आणि विजेता ठरलेला सिमॉन यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या संयोजनक्षमतेसाठी प्रमाणपत्रच ठरतात.

प्रेक्षकांचा मुद्दा
कोणत्याही स्पर्धेचं यश मायबाप सरकार अर्थात प्रेक्षकांवर अवलंबून असते. कोलकत्यामधलं इडन गार्डन्स असो, किंवा कुस्तीचं खासबागेतलं मैदान, किती दर्दी प्रेक्षक गर्दी करतात त्याला महत्त्व असतं. असे जाणकार प्रेक्षक वातावरणनिर्मिती करतात. चेन्नईत एकवेळ स्पेनचे रॅफेल नदाल, कार्लोस मोया, अर्जेंटिनाचा डेव्हिड नॅल्बॅंडीयन, स्टॅन वॉव्रींका असे टॉप स्टार खेळले; पण इतकी मोठी परंपरा असूनही चेन्नईतला प्रतिसाद अलीकडं रोडावू लागला. अशा स्थितीत पुण्यात पदार्पणात स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद सहभागी खेळाडू; तसंच पदाधिकाऱ्यांना थक्क करणारा ठरला. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन, तर उपांत्य फेरीत चिलीच यांनी पराभवानंतरही व्यक्त केलेली प्रतिक्रिया आवर्जून सांगावी लागेल. साधारणपणे पराभवानंतर खेळाडू निराश झालेले असतात आणि आपली रॅकेट किटबॅगेत टाकून त्यांना लॉकर रूममध्ये लवकरात लवकर परत जायचं असतं. बरेच पराभूत खेळाडू तिथून थेट पुढील स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळावर रवाना होतात. अँडरसन आणि चिलीचनं मात्र रॅकेट उंचावून अभिवादन करत प्रेक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी केवळ उपचार म्हणून नव्हे, तर अगदी मनापासून हे केलं.

पदार्पणात ऋणानुबंध
प्रेक्षकांच्याच अनुषंगानं आणखी एक मुद्दा मांडावा लागेल. सिमॉनला गेल्या मोसमात एकही जेतेपद मिळवता आलं नव्हतं. त्यानं यशाचा दुष्काळ या स्पर्धेत संपवला. साहजिकच ही स्पर्धा त्याच्यासाठी संस्मरणीय ठरेल यात शंका नाही; पण सिमॉनची प्रतिक्रिया खूप काही सांगणारी आहे. तो म्हणाला ः ‘‘इथं खेळताना मला छान वाटत होतं- कारण माझा खेळ छान होत होता. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना माझा खेळ छान वाटत होता आणि त्यामुळं मला छान वाटत होते. पहिल्या फेरीपासून माझी अशीच भावना झाली.’’

कोणत्याही खेळातल्या कोणत्याही स्पर्धेला स्थिरावण्यास वेळ लागतो. पहिलं वर्ष प्रयोग करण्यात आणि चुकांची दुरुस्ती करण्यातच जातं. अशा वेळी चॅंपियनला ही स्पर्धा ‘क्‍लिक’ होणं महत्त्वाचं ठरतं. चेन्नईची स्पर्धा स्पेनचा फ्रेंच ओपन विजेता कार्लोस मोया याला अशीच क्‍लिक झाली. मोया अनेक वेळा स्पर्धेत सहभागी झाला. त्याच्यामुळं स्पेनचे अनेक खेळाडू चेन्नई ओपनकडे आकर्षित होत होते. आता कदाचित ‘महाराष्ट्र ओपन’ आणि फ्रेंच टेनिसपटूंमध्ये असं नातं निर्माण होऊ शकेल- कारण बेनॉईट पैरेला वाइल्ड कार्ड मिळालं, तर सिमॉननं दुहेरीत देशबांधव पिएर-ह्युजेस हर्बर्ट याच्या साथीत अंतिम फेरी गाठली. हर्बर्ट हा डेव्हिस करंडकविजेत्या फ्रेंच संघातला दुहेरीचा खेळाडू आहे. तो चेन्नईत एकदा सहभागी झाला. आता पुण्याला दरवर्षी येऊ, असं त्यानं संयोजकांना कळवलं आहे.

‘चॅलेंजर’मुळं पाया
पुण्यात ‘केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धे’च्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय टेनिसला चालना मिळाली. त्यामुळं प्रेक्षकांना टॉप हंड्रेडमधल्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळाली.

संयोजनक्षमता अधोरेखित
महाराष्ट्राची कल्पक संयोजनक्षमता डेव्हिस करंडकामुळं अधोरेखित झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीला आयटीएफचा (आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ) खास पुरस्कार मिळाला.

या स्पर्धेला महाराष्ट्र सरकारचं पाठबळ लाभलं होतं. ते किती महत्त्वाचं ठरलं याविषयी स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितलं ः ‘‘प्रवीण दराडे, प्रवीणसिंह परदेशी, संजय दराडे यांचा उल्लेख मी ‘थ्री मस्केटियर्स’ असाच करीन. आम्हाला यजमानपद मिळालं, तेव्हा मुंबई-पुणे प्रवासव्यवस्था हाच सर्वांत कळीचा मुद्दा होता; पण खेळाडूंसाठी फास्ट-ट्रॅक इमिग्रेशनपासून आम्ही खूप काही सरकारच्या सहभागामुळं सुरळीतपणे करू शकलो. इमिग्रेशन लवकर झाल्यानंतर कारमध्ये बसताच अनेक खेळाडूंनी फोन करून माझे आभार मानले. मी दराडे यांच्यासह गेल्या वर्षी योगायोगानं दुबई ओपन स्पर्धा पाहिली. त्यावेळी आपल्याकडं असं काही करायचा संकल्प सोडला. आणखी एक योगायोग झाला. चेन्नई ओपन संयोजकांसमोर पेच निर्माण झाल्याचं आम्हाला कळलं. त्यानंतर आम्ही तातडीनं हालचाली केल्या. ही स्पर्धा भारताबाहेर गेली असती, तर त्यात चेन्नईचं नव्हे, तर देशाचं नुकसान झालं असतं. शेवटी ही दक्षिण आशियातली एकमेव एटीपी स्पर्धा आहे. साहजिकच ती आपल्याकडंच कायम ठेवणं महत्त्वाचं होतं. यात सरकारचा सहभाग मोलाचा ठरला. अमेरिकन ओपन उपविजेता केव्हिन अँडरसन आणि सिमॉन हे टेनिसपटूंच्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत. त्या दोघांनी संयोजनाविषयी चांगलीच प्रतिक्रिया व्यक्त केली.’’

इतकं सुरेख संयोजन होण्यात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आवश्‍यक होता. संयोजनाशी संबंधित प्रत्येक जण कोर्टवर जाऊन हौस-छंद म्हणून टेनिस खेळणारा आहे आणि हे आम्ही एटीपी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं एमएसएलटीएचे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी आवर्जून नमूद केलं.

खेळाडू केंद्रस्थान
ही स्पर्धा राज्यातल्या आणि देशातल्या खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवूनच घेतल्याचं दराडे यांनी नमूद केलं. ते म्हणाले ः ‘‘गतविजेता स्पेनचा रॉबर्टो बॉटिस्टा आगुट, फ्रान्सचे सिमॉन, बेनॉईट असे खेळाडू त्यांच्या देशाच्या डेव्हिस करंडक संघातसुद्धा नाहीत. यावरून टेनिसपटूंचा पाया किती व्यापक आहे हे स्पष्ट होते. आपल्याला हेच महाराष्ट्रात करायचं आहे. त्यासाठीच आम्ही ॲकॅडमी सुरू करीत आहोत.’’
ॲकॅडमी हे या स्पर्धेचं फलित असल्याचं दराडे यांनी बक्षीस समारंभात सांगितलं. त्यामुळंच ही स्पर्धा टेनिसच्याच नव्हे, तर राज्याच्या क्रीडा क्षेत्रातला मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com