अग्निसुरक्षेची कवचकुंडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Brigade
अग्निसुरक्षेची कवचकुंडले

अग्निसुरक्षेची कवचकुंडले

- एम. व्ही. देशमुख, माजी संचालक, अग्निशमन दल

गेल्या आठवड्यात दिल्लीत एका इमारतीला आग लागून २६ जणांचा मृत्यू झाला. अलिकडे दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, बंगळूर या मोठ्या शहरांत आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या आगी का लागताहेत, आग विझवण्यापेक्षा मुळात आग लागूच नये याबद्दल काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजे, नागरिकांची काय जबाबदारी आहे, सुरक्षा संस्कृतीचा आपल्याकडे अभाव आहे का, छोट्या-छोट्या गोष्टी पाळल्या तर आग टळू शकते का, यावर फोकस...

इमारतीत आग लागू नये, लागली तर ती पसरू नये, यासाठी नगर नियोजन चांगल्या प्रकारे होण्याची गरज असते. नगरविकास नियोजनात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज या पायाभूत सुविधेसोबत इमारत बांधताना राष्ट्रीय बांधकाम नियमावली पाळणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय बांधकाम नियमावलीच्या खंड चार आणि खंड तीनमधील नियमांची पायमल्ली मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होते.

राष्ट्रीय बांधकाम संहिता शिफारस करणारी आहे, त्यात मार्गदर्शक तत्त्व सुचवले आहे. हे बंधनकारक नसले तरी देशातील सर्व तज्ज्ञांनी विचारांती हे मार्गदर्शक नियम तयार केले आहेत. ते पाळले गेले पाहिजे. राज्यानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात किमान बदल नक्कीच होऊ शकतात. या निमयांची पायमल्ली केल्यास त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

अरुंद रस्ते बंब पोहोचणार कसे?

आज आग लागल्यास अरुंद रस्त्यांमुळे फायर ब्रिगेडचे बंब तिथे पोहोचू शकत नाहीत. बंब पोहोचले तरी इमारतीच्या भोवती सहा मीटर, नऊ, १२ मीटर, १६ मीटर एवढी मोकळी जागा ठेवायला पाहिजे. मात्र मुंबईत दीड ते तीन मीटरच्या स्पेसवर ७० मीटरच्या उंच इमारती उभ्या राहतात.

1) आग लागल्यानंतर इमारतीतील राहिवासी कमीत कमी वेळेत बाहेर येणे महत्त्वाचे आहे. मालमत्तेपेक्षा जीव वाचवण्याला पहिले प्राधान्य असते. इमारतीच्या उंचीप्रमाणे, क्षेत्रफळानुसार किती जिने पाहिजे, त्याची रुंदी किती असावी, बांधकाम नियमावलीत यासंदर्भात तरतुदी कमी आहेत. त्या दुरुस्त करण्याची गरज आहे.

2) इमारतीत कुठेही आग लागली तर ते सर्वांना कळायला पाहिजे. इमारतीतील डिटेक्शन यंत्रणा त्यासाठी कार्यक्षम पाहिजे. पहिले डिटेक्शन, मग सप्रेशन असे म्हटले जाते. उंच इमारती, औद्योगिक, इस्पितळाच्या इमारती स्प्रिंकल यंत्रणा (फवारा) इमारतीच्या कानाकोपऱ्यात असाव्यात. त्यामुळे अगदी छोटी आग लागली, तर मिनिटाला ७० लिटर पाण्याचा फवारा या स्प्रिंकलर्समधून सुरू होतो. त्यामुळे छोटी आग तिथेच विझून जाईल.

3) आपल्याकडे इमारतीत डिटेक्शन यंत्रणा लावतात, मात्र त्या सुरू नसतात. इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या लावल्या जात नाहीत. स्प्रिंकलर्स यंत्रणांची लोकांना अडचण होते. अनेकांचा घराचा शो बिघडतो, अशी तक्रार असते. जगभरातील नागरिकांना या यंत्रणेचा त्रास होत नाही. ऑटोमॅटिक डिटेक्शन यंत्रणा लावल्यास लोकांना धोक्याची घंटा येते. कारण आगीपेक्षा धुराने लोक जास्त मरतात. प्रत्येक इमारतीत फायर इस्टिग्यूशर यंत्रणा असतात. मात्र आगीच्या वेळी अनेकांना त्याचा वापर करता येत नाही. ते शिकून घेतल्यास प्राथमिक स्वरूपाची आग कुणीही विझवू शकतो. पुढील आगीचे धोके टळू शकतात.

सजावटीचा सोस टाळा

घराची सजावट करण्याकडे आपले खूप लक्ष असते. पडदे, फर्निशिंगचे साहित्य सिंथेटिक फोम फायबरने बनलेले असते. मोठ्या आवडीने आपण ते खरेदी करतो. मात्र या वस्तू लवकर पेटतात आणि त्यापासून निघणारा धूर अत्यंत विषारी असतो. त्यामुळे शक्य असल्यास अग्निरोधक मटेरीयल असणाऱ्या वस्तू वापरायला हव्यात.

शॉर्ट सर्किट टाळा

  • जुन्या इमारती ज्या वेळी बांधल्या गेल्या त्यावेळी घराघरांत गिझर, एसी, वॉशिंग मशीन नव्हत्या. इमारतीचे विद्युतीकरण करताना या उपकरणांचा विचार केला नाही. त्यामुळे इमारतीची मूळ विद्युत क्षमता न वाढवता, ही उपकरणे बसवली जातात. परिणामी इलेक्ट्रिक लोड वाढला. हा लोड सहन करण्याची क्षमता त्या वायर, केबलची नसते. परिणामी शॉर्ट सर्किट होतात.

  • नव्या इमारतीत विद्युत दाबाचे मोजमाप होत नाही. सर्किट ब्रेकर बरोबर आहे का, हे तपासले जात नाही. कारण ते योग्य असल्यास शॉर्ट सर्किट होऊन ट्रीप होईल. शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र विद्युतीकरणही तेवढेच महत्त्वाचे आहे.

  • विद्युत पुरवठ्याशिवाय आपला विकास होऊ शकला नसता, हे आपण मान्य केलेच पाहिजे. अपघात होऊ नयेत म्हणून आपण घरातील विद्युत यंत्रणा सक्षम आहेत का, त्या वेळोवेळी तपासल्या पाहिजे.

या नव्या यंत्रणांची गरज

फायर प्रिवेन्शन ब्युरो : आज अग्निशमन दलावर कामाचा खूप ताण आहे. त्यामुळे स्वतंत्र अग्निप्रतिबंधक विंग तयार करणे आवश्यक आहे. याचे काम आग विझवणे नव्हे तर आग लागूच नये यासाठी उपाययोजना करण्याचे आहे. जगभरात न्यू यॉर्क, लंडन शहराच्या अग्निशमन विभागात असे दोन विभाग असतात. ते असल्यास जबाबदारी निश्चित करता येईल.

फायर फॉरेन्सिक लॅब : प्रत्येक आगीच्या घटनेचे सविस्तर विश्लेषण करण्यासाठी फायर फॉरेन्सिक यंत्रणा अजून उभ्या झाल्या नाहीत. सध्या क्राईमसाठी प्रयोगशाळा आहे. मात्र आगीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध नाही. ती झाल्यास आग कुठे लागली, कुठून सुरू झाली, कार्बनचे प्रमाण कुठे जास्त होते याचे विश्लेषण योग्य पद्धतीने झाल्यास त्यात सुधारणा करता येईल.

कायद्याचा धाक आवश्‍यक

सध्या अग्निशमन दलातील संख्याबळ बघता, सर्वच इमारतींचे निरीक्षण करणे कठीण आहे. मात्र वर्षातून अचानक दहा टक्के इमारतींचे निरीक्षण करावे. तिथे अग्निशमन यंत्रणेत त्रुटी आढळल्यास सदर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. सहा महिन्यांची शिक्षा झाली तर त्यातून एक भीती निर्माण होऊन समाजासाठी तो धडा होईल.

चलता है ॲटिट्यूड थांबवा

परदेशात नागरिकांच्या रक्तातच सुरक्षेची संस्कृती आहे. नियमांचे पालन करतात. अंमलबजावणी करणारे नियमाकडे दुर्लक्ष करत नाहीत. तिकडे चलता है ॲटिट्यूड चालत नाही. तुमची यंत्रणा वेळेवर सुरू झाली नाही तरी विम्याची रक्कम कापली जाते. दुसऱ्यांदा विमा काढायला गेला तर प्रीमियमची रक्कम जास्त भरावी लागते.

सुरक्षेकडे दुर्लक्ष...

लोक कोट्यवधी रुपये मोजून फ्लॅट घेतात. तिथे सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत, याकडे लक्ष नसते. स्विमिंग पूल, क्लब वगैरे सुविधा आहे का, हे बघितले जाते. आग लागली तर मी सुरक्षित बाहेर पडू शकतो का, मोकळी जागा आहे का, हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. अंतर्गत सजावटीच्या कामात कोट्यवधी रुपये खर्च करतो.

मॉक ड्रीलकडे दुर्लक्ष नको

मॉक ड्रील म्हणजे मूर्खपणा, व्यर्थ काम असे आपण त्याकडे बघतो. मात्र प्रत्यक्षात आग लागल्यावर साधे फायर इस्टिग्यूशर चालवता येत नाही. त्यामुळे मॉक ड्रील वर्षातून दोनदा करावे. आपण शिकलो की दुसऱ्यालाही ते शिकवावे.

प्रत्येकाच्या घरात एक रिकामी खोली असते. त्यात आपण वाटेल ते पडीक साहित्य साचवून ठेवतो. आगीत या वस्तू जळाल्यास त्यापासून मोठी उष्णता निर्माण होते. त्याला फायर लोड असे म्हटले जाते. त्यामुळे गरज असेल तेवढ्याच वस्तू ठेवा. घरामध्ये रिनोवेशनचे काम नेहमी होत असते. त्यासाठी प्लायवूड, फ्लॅश डोअर, विंडो पॅन या वस्तूंची निर्मिती करताना मानक ब्युरो आहेत. त्या मापदंडानुसार या वस्तूचे उत्पादन करणे बंधनकारक असते. मात्र प्रत्यक्षात ही उत्पादने आग प्रतिबंधासाठी सक्षम आहेत का, नसल्यास त्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपनीला घ्यावी लागेल.

Web Title: Mv Deshmukh Writes Fire Security Equipments Fire Brigade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top