हे सेटल्ड होणं म्हणजे, काय रे भाऊ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

माझे मत - मेघना कुलकर्णी-रानडे
पूर्वीच्या मानानं आजकालच्या गोष्टी, नाती सगळं कसं अवघड होऊन बसलंय. कोण, कधी, काय, विचार करेल आणि काय निर्णय घेऊन मोकळं होईल, याचा काही नेमच राहिला नाही. आपल्या आईवडिलांच्या वेळी सगळे कसं चौकटीबद्ध आयुष्य जगत होते. योग्य ते शिक्षण घेतलं की, त्याच क्षेत्रात नोकरी करायची. नोकरीत चांगला स्थिरावला/स्थिरावली असं घरातल्यांना वाटायचं तेव्हा कांदे-पोहे कार्यक्रमांचं वेळापत्रक आखण्यात यायचं. मग सर्वानुमते खास करून दोन्ही घरातले ज्येष्ठ, जिला/ज्याला ग्रीन सिग्नल देतील, तिच्याशी/त्याच्याशी सात जन्मांची गाठ बांधायची! 

‘कोणी पाहिलंय पुढचा जन्म असतो तरी का,’ असे सो कॉल्ड प्रॅक्टिकल विचार बोलून दाखवायची तर तेव्हा चोरीच होती. हा साता जन्माचा रथ पेलता पेलता वर्ष व्हायचा अवकाश की, ‘पाळणा कधी हालणार? आमचे आता दिवसच किती राहिलेत, एकदा नातवंडाचं तोंड पाहिलं की आम्ही माना टाकायला मोकळे!’ हे घराच्यांचं म्हणणं मनावर घेत या संसाराच्या सारिपाटावर इवल्याशा पावलांचे आगमन व्हायचं आणि मग अखेर, ‘आपलं मूल एकदाचं मार्गी लागलं, अहो आमचा/आमची लेक आता सेटल्ड झाला/झाली बरं का!’ अशी दवंडी पेटवत घरातले नातेवाइकांना, शेजारपाजाऱ्यांना अगदी अभिमानाने ही गोष्ट सांगत. ही रितीभातीची चौकट गेल्या कित्येक वर्षांपासून सगळीकडे सुखानं नांदत होती.

एक दिवस अचानक या साठा उत्तराच्या सुफल संपूर्ण कहाणीवर ‘मानसिक समाधान’ नावाच्या संस्कृतीने गारुड घातलं आणि नातं, शिक्षण, करिअर या सगळ्याची समीकरणंच काय तर ‘सेटल्ड’ होण्याची व्याख्याच या संस्कृतीनं पुरती बदलवून टाकली. ज्यातून आपल्याला मानसिक समाधान मिळतं, जे काम केल्यावर खरा आनंद होतो ते काम करावं असा या ‘मानसिक समाधाना’ मागचा साधा, सरळ हेतू आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. आपण जे शिकलोय, त्यातच पुढे करिअर करावं ही परंपरा असली तरी बऱ्याच वेळा काही जणांना त्यांच्या अनुभवांमुळं, उपजतच असणाऱ्या कलागुणांमुळं, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या प्रभावापुढं म्हणा, आपल्याला ज्यातून खरा आनंद मिळतो ती ही गोष्ट नक्कीच नाही, याची उशिरा जाणीव होते. मग सुरू होतो गोंधळलेल्या मनःस्थितीचा खेळ! 

मग अशा वेळी समाजाच्या साच्यात बसवलेल्या रितींप्रमाणे त्यानं/तिनं नाही वागलं तर सेटल्ड झालेचं नाहीत असंस समजायचं का? खरंतर असं म्हणता येणार नाही. कारण प्रत्येकाची सेटल्ड होण्याची व्याख्या आता काळानुरूप बदलत आहे. कोणाला आपलं घर विकत घेण्यापेक्षा अख्ख्या जगाची सफर करण्यात सेटलमेंट वाटते, तर कोणाला एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी महिन्याला मीटर पाडणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये पैसे लावण्यात स्थिरता जाणवते... या आणि अशा अनेक गोष्टी आज ‘आपलं तर एकदम सॉर्टेड... सेट आहे मित्रा, म्हटलं तर विषय कट,’ याच व्याख्येत मोडतात. 

आजकाल जिथं पाहावं तिथं सगळ्यांना स्वतंत्र, स्वतःचं असं छोटं का असेना काहीतरी नवीन सुरवात करण्यात उत्साह दिसतो. ‘मला ना, एकदम भारी, युनिक, क्रिएटिव्ह स्टार्टअप टाकायचयं. पण माझ्या घरच्यांना हे समजतचं नाहीये यार,’ असं सांगत अनेक जण आपल्या आईवडिलांना मित्रमैत्रिणींसमोर व्हिलन बनवू पाहतात. 

मात्र, इथं आईवडिलांची तुमच्या कल्पनेचे पंख छाटून टाकण्याची मुळीच इच्छा नसते. ते उलट तुम्ही खरचं ती नवीन जबाबदारी पेलू शकाल का, जो निर्णय घ्याल तो तडीस न्याल का, मुख्य म्हणजे तुमच्या निर्णयाचे सर्व फायदे-तोटे यांना सामोरं जायला तुम्ही खरंच तेवढे सक्षम आहात का या विचारांनी अस्वस्थ होतात. समाजानं आखून दिलेली चौकट आज आपलं लेकरू मोडून प्रवाहाविरुद्ध जाऊ पाहत आहे, यामुळं आईवडिलांची काळजी तर निश्चितच वाढते. पण तुमच्यात तो आत्मविश्वास जाणवला, जिद्द दिसली, तुमची कष्ट करण्याची इच्छा दिसली तर या चौकटी बाहेरच्या विचारांचं, या असामान्य संधीचं तुम्ही सोनं करावं म्हणून तुमचे आईवडील अक्षरशः एखाद्या विशाल पहाडाप्रमाणं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. कारण त्यांची जी संधी हुकली ती तुमची हुकू नये, त्यांना करता आल्या नाहीत त्या गोष्टी तुम्हाला करायला मिळाव्यात हा निर्मळ उद्देश यामागं आहे.

अशी संधी आयुष्यात प्रत्येकानं स्वतःला एकदातरी नक्कीच द्यावी. कारण प्रत्येकाची आनंदी आयुष्य जगण्याची, मनःशांती मिळवण्याची संकल्पना वेगळी आहे. प्रत्येकाचे मानसिक समाधान मिळवण्याचे परिमाण वेगळे आहेत. कारण दरवेळी सगळ्या गोष्टींचा आनंद हा पैशात मोजता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My opinion meghana kulkarni ranade maitrin supplement sakal pune today