आरोग्यसंपन्न भारत

Vegetable
Vegetable

माझे मत - निर्मला महाजन
आपल्या प्रत्येकाचे आरोग्यसंपन्न होण्याचे स्वप्न हवे, ध्येय हवे व उत्कट इच्छाही हवी. आजच्या डाएटिंगच्या, फॅशनच्या विश्वात हे जरा विचित्रच नव्हे, तर चुकीचे वाटले तरीही सर्वांनी भरपूर खायला हवे! लहान-मोठ्यांनी जमेल तसे दूध प्यावे, ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी ते औषध म्हणून प्यावे. तरच पचनशक्ती वाढेल. आजारपणाला, अशक्तपणाला लढा द्यायची ताकद अंगी येईल. रोगराई दूर पळेल, नवा जोम, नवा आत्मविश्वास मिळेल. वजन वाढले आहे, पोट सुटले आहे या भीतीपोटी अगदी कमी खायचे व परिणाम म्हणून अशक्तपणाला सामोरे जायचे हे निश्चितपणे चुकीचे आहे.

पोटभर खायचे व ठरवून! वेळ मिळेल तेव्हा पुरेसा व्यायाम, प्राणायाम करायचा. चालायचा सराव ठेवायचा म्हणजे वजन, पोट आटोक्यात राहील. त्याचबरोबर शरीरयष्टीही आकर्षक, रुबाबदार राहील.

आजकाल लहान लहान मुलांनाही चष्मा लागतो, हे पाहून खूप वाईट वाटते. बरीचशी मुले एकतर काटकुळी किंवा लठ्ठ असतात. गाल वर आलेले, अंगापिंडाने भरलेले, तेजस्वी अशी मुले का नाही दिसत बरे? सर्वसाधारणपणे बऱ्याच घरांमध्ये - हे नको खाऊ सर्दी होईल, ते नको खाऊ खोकला येईल, असे विचार दिसतात. लहान मुलांना येता-जाता खायला दाणे, चणे, लाह्या, दाण्याची चिक्की, खारीक खोबऱ्याचे तुकडे द्यायला हवेत. शक्य असेल तर रात्री बदाम भिजत घालून ते सकाळी खायला द्यावेत किंवा थोडी हरभराडाळ व शेंगदाणे रात्री भिजत टाकून सकाळी खायला द्यावेत.

डायनिंग टेबलावर फ्लॉवरपॉट ठेवण्यापेक्षा हंगामात मिळत असलेले गाजर, काकडी, टोमॅटो, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, कणसे भाजून वा उकडून खायला द्या. फ्रिजमध्ये झाकून ठेवलेल्या खाऊपेक्षा मुलांच्या नजरेसमोर असे खाऊ ठेवले तर मुले ते आवडीने येता-जाता खातात. त्यांच्या हे अंगीही लागेल.

तरुण मंडळींचे स्वतःच्या आहाराकडे नको तितके दुर्लक्ष होते. ‘चमचाभर साजूक तूप? नको-नको वजन वाढेल हो!’, ‘एखादा लाडू, पेढा? अजिबात नको! डाएटिंग आहे ना.’

ज्या वयात तब्येती ठणठणीत ठेवायच्या असतात त्या वयात डाएटिंगच्या नावाखाली नको-नको म्हणून वजन वाढू नये याची (नको तेवढी) काळजी घेतली जाते, पण योग्य तो व भरपूर व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष होते. तरुण वय हे खाण्यापिण्याचे, मेहनतीचे वय असते- अनेक बंधने घालून, जिभेवर व मनावर संयम लादून, अशक्तपणा, अनारोग्य पदरी घेण्यात काय शहाणपण आहे? मग चाळिशीची जरा कुठे चाहूल लागते न लागते तोच पाय दुखतात, कंबर दुखते, चष्मा लागतो, अशक्तपणाची, आजारपणाचीही चाहूल लागते.

डाएटिंग म्हणजे आपल्या मुलाबाळांना, तरुण व प्रौढ पिढीला मिळालेला शाप आहे, असे म्हणायला हरकत नसावी. पुरेसे खाल्ले तर वजन योग्य प्रमाणात वाढते तसेच शरीर सशक्त होते. प्रतिकारशक्तीदेखील वाढते. फक्त निग्रहाने जमेल तेवढे जास्तीत जास्त चालणे, योग्य तो पण नियमित व्यायाम केल्यानेही वजन प्रमाणात व शरीरयष्टी आकर्षक राहू शकते. चालणे, पळणे तसेच टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या सहजपणे जमणाऱ्या खेळांचेही अवलंबन करू शकतो. यामुळे चांगली भूक लागतेच, त्याचबरोबर पचनशक्तीही सुधारते. याप्रमाणे जीवनशैली आचरल्यास सर्वांगीण शारीरिक सौख्यारोग्य सहज मिळू शकते. शिवाय आरोग्यपूर्ण खाण्यापिण्याबरोबरच जीवन आनंदी, समाधानीही होऊ शकते. उत्तम आरोग्य ही सुखी जीवनासाठी एक प्रकारे मौल्यवानच नव्हे तर अत्यावश्यक ठेवच आहे.

आपल्या व्यवसायाची, आर्थिक बाबींवर आपण ध्यान देतो, काळजी घेतो तेवढीच किंवा त्याहूनही अधिक काळजी आपण आपल्या आरोग्याची घेणे महत्त्वाचे आहे. असे झाले तरच ‘आरोग्यम् धनसंपदा’ याचा खरा अर्थ आपल्याला कळला असे म्हणणे उचित होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com