व्याकरणाच्या भीतीनं भाषानिर्मिती थंडावली!

नागराज मंजुळे. ‘पिस्तुल्या’, ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’सारखे चित्रपट देणारे मनस्वी दिग्दर्शक, कलाकार. अत्यंत मनापासून व थेट बोलत समोरच्यांची मनं जिंकून घेणारं अवलिया व्यक्तिमत्त्व.
Nagraj Manjule
Nagraj ManjuleSakal
Summary

नागराज मंजुळे. ‘पिस्तुल्या’, ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’सारखे चित्रपट देणारे मनस्वी दिग्दर्शक, कलाकार. अत्यंत मनापासून व थेट बोलत समोरच्यांची मनं जिंकून घेणारं अवलिया व्यक्तिमत्त्व.

नागराज मंजुळे. ‘पिस्तुल्या’, ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’सारखे चित्रपट देणारे मनस्वी दिग्दर्शक, कलाकार. अत्यंत मनापासून व थेट बोलत समोरच्यांची मनं जिंकून घेणारं अवलिया व्यक्तिमत्त्व. ‘सकाळ’शी बोलताना आपलं बालपण, करिअर, जातिव्यवस्था, आरक्षण, माणूसपण, भाषा आदी विषयांवर नागराज अगदी थेट व्यक्त झाले. त्यांच्या चित्रपटातील पात्र ग्रामीण भाषेत बोलत असताना त्याच्या गाण्यात मात्र भावगीतच कसं येतं, हेही त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं आणि व्याकरणामुळं भाषा कशी मरते, हेही सोदाहरण स्पष्ट केलं. नागराज मंजुळे यांची ही सविस्तर मुलाखत...

झुंडला समाधानकारक प्रतिसाद

प्रश्‍न - ‘झुंड’ला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळाला?

नागराज मंजुळे - मला ‘झुंड’ ‘ओटीटी’वर प्रदर्शित करायचा नव्हता म्हणून मी वाट पाहिली.‘झुंड’च्या प्रोमोशनसाठी आमच्या हातात अगदीच कमी वेळ होता. मात्र, लोकांच्या प्रतिसादाबद्दल मी समाधानी आहे. चित्रपट पाहिलेल्या माझ्या संपर्कातील सर्वच जण मला मेसेज करत आहेत. चित्रपट लोकांना आवडतो आहे. आणखी चांगला प्रतिसाद अपेक्षित असेल. अर्थात, हा ‘सैराट’ नाही, याचीही कल्पना आहे. मी ‘बॉक्स ऑफिस’ डोळ्यासमोर ठेऊन मी चित्रपट काढत नाही आणि काढणारही नाही.

पारंपरिक क्रीडा सिनेमांना छेद देणारा : झुंड

प्रश्‍न - ‘झुंड’नं स्पोर्ट्स सिनेमाचे क्लिशे (क्रीडा सिनेमांचे पारंपरिक प्रघात) तोडले असं वाटतं का? नॉन ॲक्टर्सला तुम्ही सिनेमात घेण्यामागची भूमिका काय?

- ‘झुंड’ खेळावरील चित्रपट नाही. हरणं-जिकणं हा खूप नंतरचा मुद्दा आहे, सहभागी होणंच खूप महत्त्वाचं असतं. हे चित्रपटाप्रमाणंच अभिनयालाही लागू होतं. ‘झुंड’मधील ही मुलं खूपच गुणवान आहेत, मात्र त्यांच्या या गुणांना दिशा नव्हती. या मुलांना तुम्ही दूर ठेऊ शकत नाहीत. त्यामुळं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच या मुलांनाही मी संधी दिली. मलाही लहानपणी आपण खूप चांगले ॲक्टर आहोत, असं वाटायचं पण संधी कशी मिळेल हे माहिती नव्हतं. या मुलांमध्ये मी मलाच शोधतो. सगळ्यांनाच संधी मिळायला हवी असं मला वाटतं. स्पर्धा करण्यासाठी सगळ्यांना, स्त्री-पुरुषांनाही एकाच पातळीवर आणून मगच स्पर्धा झाली पाहिजे. तेव्हाच खरं टॅलेंट कुठं आहे, हे समजेल. संधी देणं हेच खरं आरक्षण, असं मला वाटतं.

बेवसिरीज करण्याची तुमची योजना आहे का?

चांगली कथा मिळाल्यास नक्कीच करेल, करायचीच नाही असं ठरवलेलं नाही. ‘वैकुंठ’ नावाची सिरीज मी केली होती. त्यात दिग्दर्शन व भूमिकाही मीच साकारली होती.

मराठी सिनेमा आणि व्यावसायिकता

प्रश्‍न - मराठीत चांगले स्क्रिप्ट आणि कंटेंट मिळत नाही व त्यामुळं मराठी चित्रपट मागं पडतो, असं वाटतं का?

- आपला कंटेंट खूप चांगला आहे, मात्र आपले चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरत नाहीत. तमीळ आणि तेलगूप्रमाणं मराठी चित्रपटही गल्ला जमवू शकतात. ‘पावनखिंड’सारख्या चित्रपटानं ते दाखवूनही दिलं आहे. आपल्यात क्षमता आहे. निर्माते व प्रेक्षकांच्या एकमेकांवरील विश्‍वासातूनच हे साध्य होऊ शकतं. ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’नं कोट्यवधी रुपये कमावून मार्ग दाखवून दिला आहे. मराठी चित्रपट आशय सोडत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरीही तर्कहीन, केवळ मनोरंजन करणारे चित्रपट काढून पैसा कमावायला हरकत नसावी.

टीव्हीसाठी काही नवे प्रोजेक्ट आहेत का?

‘कौन बनेगा करोडपती’सारखा कार्यक्रम मला झेपला नाही. माझ्या मनस्वीपणामुळं टीव्हीसारखं माध्यम मला मानवणारं नाही.

समाजमाध्यमांवरची चित्रपट चर्चा

प्रश्‍न - ‘झुंड’बद्दल सोशल मीडियावर जातीय संघर्षाबद्दल सुरू झालेल्या चर्चा तुम्हाला अपेक्षित होत्या का?

- मला या चर्चा अजिबात अपेक्षित नव्हत्या. काही लोकांनी चित्रपट न पाहता मतं व्यक्त केली आहेत. हे टाळायला हवं. ''झुंड''बद्दल म्हणाल तर फेक अकाउंटवरून होणाऱ्या टीकेची मी फार काळजी करीत नाही. पण सोशल मीडियाचा दुरुपयोग ही आपल्या सर्वांसाठीच समस्या आहे. मला प्रत्यक्ष बोलावून कोणी तू जातीयवादी आहेत, असं म्हटल्यास मला काळजी वाटेल, मात्र सोशल मीडियावर सर्वच अदृश्‍य पद्धतीनं घडतंय. त्यामुळं त्याची काळजी करण्याची गरज वाटत नाही. कधी वाटतं मनोरंजनात्मक चित्रपट काढावेत पैसे मिळवावेत, लोकांना उगाच या वास्तववादी प्रश्‍नात टाकू नये. मात्र, सोशल मीडियावरील चर्चांना महत्त्व न देता मी असे चित्रपट काढतच राहणार आहे. माझ्या मते, जातीविषयी बोलणं आणि जातियवाद करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जात विषय मांडला नाही पण गुपचूप जात पाळली तर लोक काहीच म्हणत नाहीत, मात्र त्यावर चर्चा घडवून आणल्या व ‘याचं काय करायचं,’ असा प्रश्न विचारल्यावर लोक तुम्हाला जातीयवादी ठरवतात.

सगळ्यांना बोलायची संधी सोशल मीडियानं दिली. लोक बोलायला लागले आहेत. आता स्त्रियांनीही बोलायला हवं. स्त्रियांचे प्रश्‍न मांडणारे सिनेमे तुलनेनं कमी आहेत. देशात सर्व जाती, धर्म आपले प्रश्‍न घेऊन उभे राहतात, मात्र स्त्री स्वतः स्त्री म्हणून उभीच राहात नाही. या चित्रपटांतून जे प्रश्‍न मांडले, त्यामुळं आपण अस्वस्थ आहोत. पण, हे प्रश्‍न हिमनगाचं टोक आहेत. ‘डोईवरचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी,’ असं बहिणाबाई सांगून गेल्या आहेत. ही इच्छा तेव्हापासूनची आहे, मात्र ती दाबून ठेवली गेली आहे.

प्रश्‍न - ‘काश्‍मीर फाईल्स’च्या प्रोपोगंडाकडं तुम्ही कशाप्रकारे बघता?

- मी ‘काश्‍मीर फाईल्स’ पाहिलेला नाही. दुःख, अन्यायाची गोष्ट सांगत कोणी असल्यास त्यात हरकत काहीच नाही. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अन्यायाची गोष्ट मांडली आहे. हा प्रोपोगंडा आहे का, हे समाज म्हणून समाजानंच ठरवावं, मी बोलून काहीच होणार नाही. दुर्दैवानं, समाजाला दिशा देणारं, योग्य काय आहे हे सांगणारं कोणी नाही, ही समस्या आहे. सांगणाऱ्याला तळमळ नाही आणि ऐकणाऱ्याला कदर नाही, अशी आजची स्थिती आहे. मी जगात राहताना कन्फ्युज झालो आहे. या परिस्थितीत माध्यमांनी सजग राहणं आणि दिशादर्शकाचं काम करणं खूपच गरजेचं आहे.

प्रश्‍न - समाज प्रतिक्रियावादी झालाय असं वाटतं का?

- माणूस सोशल मीडियावर बोलतच बसलाय. तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया ठोकून देता आणि त्यावर इतर व्यक्त होत राहतात. लोक शिव्याही देतात आणि कौतुकही करतात, मात्र या दोन्ही गोष्टी घरी घेऊन जाण्याची गरज नाही. त्यातून केवळ संसार तुटतील.

प्रश्‍न. - ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’मध्ये तुम्ही समाजाला आरसा दाखवला. तुम्हाला हेच अपेक्षित होतं का आणि याची बीजं तुमच्या बालपणात आहेत का?

- मी भोगलं वेगळं, पण माझ्या जाणीवा वेगळ्याच आहेत. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकहितवादी यांचं साहित्य वाचायला लागल्यानंतर मला बोलावसं वाटायला लागलं. मी सिनेमाच्या माध्यमातून ते व्यक्त करायला सुरवात केली. माझ्यातल्या जाणिवेचं एक्स्‍प्रेशन (सादरीकरण) म्हणजे माझा चित्रपट आहे. जाणीव होणं, ही व्यवस्थाच घोटाळेबाज आहे हे समजणं आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं हे आपण थोरांकडून शिकतो. पण अलीकडे आपण थोरांनाच जातीत वाटून टाकलंय. ‘तू ठरावीक जातीचा आहेस, त्याबद्दलच बोल,’ असंही मला अनेकदा सुनावण्यात आलं. माझ्या मते, हे अत्यंत चुकीचं आहे. स्त्री-पुरुष फरक आपण समजू शकतो, मात्र जात लांबून कशी ओळखणार? जात ही आपल्या समाजाला झालेली भूतबाधाच आहे.

प्रश्‍न - देशभरात माणूस म्हणून जगताना जाणवणाऱ्या अस्वस्थेविषयी काय सांगाल?

- सर्वमान्य असणं हा एकप्रकारचा बनाव असतो. तुमचे कोणाशीतरी मतभेद होतातच. कोणीतरी वेगळं बोललं पाहिजे. मला ‘पिस्तुल्या’नंतर लक्षात आलं, की मी एकटाच विरोधात बोलतोय. मात्र चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आत्मविश्वास आला. मग मी जाणीवपूर्वक बोलू लागलो. मी वडार समाजाचा आहे, हेही सांगू लागलो. पण त्यानंतरच्या प्रतिक्रियांमुळे मीच नैराश्‍यात गेलो. ‘पिस्तुल्या’ हा तुझा स्वतःचा अनुभव असल्याचं सांगायला नको होतं, असंही मित्र म्हणू लागले. हेच सांगायचं नाही म्हटल्यावर मला काही बोलताच आलं नसतं. दुसऱ्याच्या गोष्टी वाचून चित्रपट करायचं किंवा इतरांचे अनुभव मांडायचे नाहीत, हे मी त्यावेळीच ठरवून टाकलं. त्यामुळं मी इथपर्यंत आलो. माझंच विश्‍व मी चित्रपटातून नीटपणे मांडू शकतो. कलाकार म्हणून मला बळजबरी जाणवत नाही, पण माणूस म्हणून जाणवते. माझे सगळ्या जातीचे मित्र आहेत. मी जातीविषयी बोलतो कारण आपण त्याचीच फळं भोगतो आहोत, असं माझं मत आहे.

प्रश्‍न - परदेशात फिरताना तिथं समाजात काय चांगल्या आणि वाईट गोष्टी दिसतात?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळं मला भगवान बुद्धाची ओळख झाली. पण, बुद्ध फक्त समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेपुरताच समोर आला. त्यापुढं बुद्ध खूपच विस्तृत, सखोल आहे. तो तुमच्या समृद्धीसाठी, सुख-शांतीसाठी उपयोगी आहे. परदेशातील अडचणी खूप वेगळ्या आहेत, त्या माणूसपणाच्या पातळीवरच्याच आहेत. दुःख, भेदभाव आणि अडचणी कधीच संपणार नाहीत, मात्र त्यातही आपण किती आनंदी राहू शकतो हे महत्त्वाचं आहे. अमेरिकेत भिकारी नसतील असं मला वाटायचं. मात्र, रात्री उशिरा रस्त्यात एकानं भीक मागितली. चौकशी केल्यावर तो स्वेच्छेनं भिकारी झाल्याचं समजलं. त्याला अमली पदार्थांचं व्यसन होतं, पुनर्वसन केंद्रात रहायला नको म्हणून त्यानं रस्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती नाही. आपली व्यवस्था ठराविक गटांना वंचित होण्यासाठी भाग पडते. हा मोठा फरक आहे.

प्रश्‍न - तुमच्या व्यक्तिमत्त्व गूढ आहे. तुमची बोलतानाची आणि कविता करतानाची भाषा वेगळी कशी?

- कविता किंवा भाषणातील भाषा शुद्ध असावी अशा समजातून मी कविता लिहिल्या. ‘फॅण्ड्री’सारख्या चित्रपटातही माझं पात्र गावठी भाषा बोलतं, मात्र गाणं सुरू झालं की भावगीत! ही चूक लक्षात आल्यावर मी कविता लिहिणंच सोडलंय! नामदेव ढसाळांची कविता व त्यातील भाषा मला उशिराने गवसली, अन्यथा मी माझ्याच भाषेत कविता लिहिल्या असत्या. नंतर मी भीती टाकून दिली आणि माझ्या भाषेत भाषणं करू लागलो. कुठलीही भाषा अशुद्ध नसते, हे तत्त्व मला पटतं. भाषेचा हेतूच संवाद साधणं आहे. व्याकरणाच्या धास्तीनं भाषानिर्मिती प्रक्रियाच थंडावली आहे. मी परदेशात दोन-चार तास सहज इंग्रजीत बोलतो, कारण त्यांना भाषा नव्हे, तर माझं मत समजावून घ्यायचं असतं. माणूस संवाद साधण्याऐवजी भाषेतच अडकल्यानं समस्या निर्माण झाली आहे. गावातली भाषा खरंच सुंदर आहे. पण शहरात भाषा प्रवाही राहत नाही. मराठीत माणूसही अनेकदा मराठी माणसाशी इंग्रजीत बोलतो व त्यामुळंच इम्‍प्रेशन पडतं असं लोकांना वाटतं. त्यामुळं अनौपचारिक भाषा बोलणंच आवश्‍यक आहे.

प्रश्‍न - मराठीत अलीकडे चांगलं दलित साहित्य निर्माण होत नाही, गेल्या पंधरा वर्षात ही परिस्थिती निर्माण झाल्याचं जाणवतं का?

- आता किती जण आणि काय लिहितात याबद्दल मला फार माहिती नाही, मात्र तुलनेनं सर्वांचंच वाचन कमी झालं आहे. समाज माध्यमांतून व्यक्त होतांना प्रत्येक गोष्टीवर लोकं केवळ प्रतिक्रिया देतात. या प्रतिक्रियावादातून सकस काही निर्माण होत नाही. पूर्वीच्या काळी लेखकांचे लेखन हा केवळ तात्कालिक प्रतिक्रिया नव्हत्या, तर तो हुंकार होता. त्यामुळं ते साहित्य आजही वाचलं जातं. त्यांनी मांडलेल्या दुःखाबद्दल सहानुभूती निर्माण होते. सोशल मीडियावर व्यक्त होण्यातून भावना बोथट झाल्या असाव्यात.

तुमचे चित्रपट पाहणारा प्रेक्षक मध्यमवर्गीय आहे व तुमचा चित्रपट त्याला कायम टोचणी लावतो. तुमचा उद्देश असाच असतो का?

- आपल्यातच काहीतरी अवगुण असतात. टोचणी भल्यासाठी लागत असेल तर चांगलंच आहे. ‘फॅण्‍ड्री’च्या वेळी लोकांनी मला सांगितलं, ‘जब्यानं दगड मारला आणि तो मला लागला.’ एकानं सांगितलं, ‘फॅण्‍ड्रीतलं हे डुक्कर आम्ही अनेकदा पाहिलंय व त्याला मारणाऱ्याला आम्हाला राग यायचा. पण चित्रपट पाहिल्यावर आम्हाला कळालं की डुकरापेक्षा पकडणाऱ्याचा त्रास अधिक तीव्र आहे आणि तो चित्रपटानं दाखवला.’ आपल्याकडं प्राणीप्रेम आहे, पण माणसावर प्रेम नाही. माझ्या चित्रपटातून हेच जाणवलं असेल, तर ही टोचणी ही योग्यच आहे.

तुमचा आगामी चित्रपट शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बेतला आहे, तो कधी प्रदर्शित होईल?

- गेली दोन वर्षं कोरोनामुळं वाया गेली व आता चित्रपटाचं काम सुरू झालं आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. महाराजांचं व्यक्तिमत्त्व सर्वसमावेशक आहे. त्यांना समाजातील सर्व जाती-धर्मांतून मान्यता मिळाली आहे. आपण महाराजांच्या पुण्याईवरच जगतो आहोत. हा चित्रपट तीन भागांत व बहुभाषिक आहे.

अमिताभ बच्चन प्रमोशनमध्ये सहभागी झाले नाहीत.

- अमिताभ कोरोनानंतरच्या काळात प्रोमोशनमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात प्रोमोशन केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com