तमाशा

‘अरे, काय हा तमाशा चालवला आहेस ? बंद करा, बंद करा, हा तमाशा उमप !’’ काय चाललंय? थोडं दचकलात ना? नाही नाही... तसं काहीच नाही, मी फक्त एक उदाहरण दिलं, ‘तमाशा’ या शब्दाबद्दल.
vithabai narayangaonkar
vithabai narayangaonkarsakal
Summary

‘अरे, काय हा तमाशा चालवला आहेस ? बंद करा, बंद करा, हा तमाशा उमप !’’ काय चाललंय? थोडं दचकलात ना? नाही नाही... तसं काहीच नाही, मी फक्त एक उदाहरण दिलं, ‘तमाशा’ या शब्दाबद्दल.

- नंदेश उमप saptrang@esakal.com

‘अरे, काय हा तमाशा चालवला आहेस ? बंद करा, बंद करा, हा तमाशा उमप !’’ काय चाललंय? थोडं दचकलात ना? नाही नाही... तसं काहीच नाही, मी फक्त एक उदाहरण दिलं, ‘तमाशा’ या शब्दाबद्दल. आपण सगळे आपल्या आजूबाजूला अनेक तमाशे पाहत असतो; पण तो वेगळा आणि मी जो सांगणार आहे तो वेगळा तमाशा... तसा तमाशा हा फार मोठा गहन विषय... मी इतिहास वगैरे काही सांगणार नाही, तर माझ्या वाचनात आलेली माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करावा आणि माझ्यासारख्या माझ्या अनेक मित्रमंडळीं, वाचकांपर्यंत कुठलीही अतिशयोक्ती न करता तमाशा हा लोकरंजन प्रकार पोहोचवावा एवढंच. आता तमाशा असा शब्द आपण ऐकला आहे, नव्हे तर आपण बऱ्याचदा बोललोदेखील आहोत. मंडळी तमाशा या शब्दाऐवजी ‘खेळ’ हा शब्द पूर्वी वापरत असत. उदा. दशावताराचा खेळ, निरनिराळ्या सोंगांचा खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कसरतीचे खेळ... तमाशा या शब्दाला महाराष्ट्रात एक सांगीतिक, सांस्कृतिक बैठक आहे. अहो तमाशा हा फक्त एक शब्द नसून, तमाशा हा एक लोकरंगभूमीवरचा शुद्ध रंजनकलाप्रकार आहे.

आजही विदर्भामध्ये तमाशाला ‘खडीगंमत’ म्हणतात. बाराव्या शतकापासून तमाशा ही संज्ञा प्रचलित झाली असावी. तमाशा हा शब्द ऐतिहासिक लेखनात आढळतो तो असा, ‘सारासरी बार कवाइतीस आरंभ झाल्यापासून पाच घटकांपर्यंत तमाशा झाला’, ‘मोठा तमाशाने चालून आले’... इत्यादी. यावरून तमाशा शब्दाचे एक गंमत, खेळ, मनोरंजक दृश्य, करमणुकीचा देखावा... इत्यादी अर्थ आढळतात. आता तमाशा हा शब्द कुठून आला; कसा, केव्हा आला, हे जरी ठामपणे सांगता येत नाही, तरी या प्रकाराची जडणघडण कशी झाली, तर तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे; म्हणजे (प्रेक्षणीय दृश्य). अ. ह. जोशींचं अनुमान ग्राह्य मानता येतं की, तो अरबीमधून फारशीत दहाव्या शतकापूर्वी आलेला असावा... अरबीतून फारशीत, फारशीतून मराठीत आलेला तमाशा; मराठीत केव्हा आला, या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल.

प्रा. काळे म्हणतात, ‘‘संत ज्ञानदेव आणि त्यांचे समकालीन निवृत्ती, सोपान ते चांगदेव इत्यादी संतांच्या वाङ्‌मयात तमाशा शब्द कुठेही सापडत नाही; परंतु संत एकनाथ महाराजांच्या (इ.स. १५३३ ते १५९०) बाजेगारी भारुडात आहे.’’

‘दुनिया मे बडा बडा तमासां बडे बडे हुंन्नर लगे.’

तमाशा शब्दाचा ‘तमासां’... असा उल्लेख आढळतो; परंतु त्यांची भारूड रचना तमाशावर सापडत नाही. तमाशा कला प्रकार पेशवाईत १७८३ पासून आलेला असावा. ज्या परकीयांनी तमाशा हा फक्त शब्द दिला, मूलतः तमाशासारखा कुठलाही कलाप्रकार त्यांचा नाही, निर्मिती ही फक्त मराठी तमाशानेच केली... बादशाही वैभवाबरोबर एक चैनीचा, त्यांच्या श्रमपरिहाराचा मनोरंजनात्मक प्रकार अस्तित्वात आला, त्याचंच अनुकरण मराठी लोकांनी केलं, असं स्वीकारणं बरोबर ठरणार नाही, असं अ. ह. जोशी म्हणतात.

मंडळी, पेशवाईच्या १७६६ ते १७६८/६९ च्या अस्सल रोजकिर्दीतील नोंदीत शाहीर आणि नाच्यापोऱ्या यांचे उल्लेख आढळतात, त्या कलाप्रकारास तमाशा नसून खेळ म्हटलेलं दिसतं. तमाशाकलेस तमाशा नामाभिधान इ.स. १७८३ मध्ये झालं असावं. तमाशा कलाप्रकाराच्या जन्मकालाबाबत विद्वानांमध्ये, तमाशा मुसलमानी अमदानीत, उत्तर पेशवाईत, सतराव्या शतकाच्या शेवटी व अठराव्या शतकाच्या आरंभी जन्माला आला असावा, असे तीन मतप्रवाह आढळतात. महाराष्ट्रात अनेक कला होत्या आणि आजही आहेत, त्यातील एक म्हणजे तमाशा. रंजकतेने नटलेला, विविधरंगी भरलेला, गण-गवळण-लावणी-वगनाट्याच्या रंगतदार कलात्मक आविष्काराने सजलेला, असं म्हणता येईल. आता हा तमाशा निर्माण कसा झाला, कुठल्या लोककला प्रकारातून आला, तर रंगनाथ दंडवते यांच्या मतानुसार तमाशाची परंपरा ‘गोंधळ’ या विधिनाट्यातून विकसित झाली.

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मते गोंधळ्यांनी जेव्हा तमाशा स्वीकारला, तेव्हा गोंधळ प्रकारातील नाट्यात्मकतेचा उपयोग करून घेतला. गोंधळात गण, कथा, प्रश्न विचारून केलेली विनोदनिर्मिती; हास्य निर्माण करणारे एक पात्र यांमधील तमाशाच्या घडणीत वाटा आहे असं दिसतं... गद्यात्मक - पद्यात्मक विनोद, यात राजा-राणीचं कथानक आलं आहे आणि तमाशात ‘वगनाट्य’.. विधीनाट्यातील, नाट्याविष्काराच्या मुळाशी असणारी धर्मभावना तमाशात मुळीच नसते. मंडळी पूर्वीचा तमाशा हा भेदिक विषयांवरच आधारलेला असायचा. काही तमासगीर ‘कलगीवाले’, तर काही ‘तुरेवाले’ असत.

पौराणिकतेवर आधारित भेदिक गण, गवळण, लावणी यांच्या रचना, लिखाण केलेलं आजही आढळतं. उदाहरणार्थ - हा भेदिक गण, जो शिवा-संभा तमासगीर त्यांच्या तमाशात म्हणत असत...

‘गणपती मंगलमूर्ती नमन करतो आता,

चौदा विद्येचा तू दाता,

सरळ सोंड एकदंता...

चौदा विद्येचा तू गणपती जी जी....

चौसष्ट कला मती द्यावी

मला गायाला जी जी....’

आता भेदिक लावणी कशी,

‘ऐक पंडिता तुला सांगतो

शिवशक्तीचे एक जुळे,

वेगळे करती ते नर जाती

नरकामध्ये त्याची कुळे.... जी जी....’

एवढंच नव्हे, तर पौराणिक अख्यान, कलगी-तुऱ्याची आध्यात्मिक गायकी हे भेदिक लावण्यांचं बहरलेलं स्वरूप कालांतराने लौकिकतेकडे झुकलेलं पाहायला मिळतं, असं साहित्यिक सांगतात... तमाशा शुद्ध रंजनप्रधान रंगभूमीचा प्रकार असला तरी, पुढे शाहिरांनादेखील लोकाभिरुची लक्षात घेऊन मनोरंजनपर प्रबोधन करावं लागलं, आपल्या सादरीकरणामध्ये बदल करावे लागले.

तमाशाचे अनेकविध कलाप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते प्रकार असे की, संगीत बारीचा तमाशा, ढोलकीचा तमाशा, खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडीगंमत असे अनेक प्रकार तमाशाचे आहेत. तमाशा ही कला आपल्या महाराष्ट्रात ताकदीने पुढे नेणारे प्रख्यात विरू/सातू तमासगीर. वगसम्राट उमाजी बापू सावळजकर, शाहीर भाऊ फक्कड, शाहीर पठ्ठे बापूराव, शिवा/संभा, तमाशासम्राट तात्यासाहेब सावळजकर, तमासगीर विठाबाई मांग नारायणगावकर, तमासगीर गुणा कागलकर, काळू-बाळूचा तमाशा ते आजचे रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर असे अनेक शाहीर, तमासगीर, कलावंत ज्यांनी आपल्या अथक परिश्रमाने कष्टाने ही कला जोपासली, जगवली आणि वाढवली आणि आजही टिकवत आहेत.

ही बहुजनांची कला पुढे जगमान्य झाली.. मंडळी ‘तम’ म्हणजे अंधार आणि ‘आशा’ म्हणजे विश्वास, असा ‘तमाशा’ असा अर्थ आपण लावू शकतो. समाजातील निराशा दूर करणारा, निराशेच्या अंधकारातून सूर्यप्रकाश दाखवणारा तमाशा आज दिशाहीन झाल्याचं दिसतं. तमाशानं महाराष्ट्रात आशावाद जागविला; पण गेली दोन वर्षं कोरोनामुळे लोककलावंत, लावणी, तमाशा कलावंतांच्या आयुष्याचा तमाशा झालाय, तो बघवत नाही... त्यांना सहकार्य देण्याची गरज आहे, लोकाश्रयाची गरज आहे; पण कलावंतांची दखल घेणार कोण? पुन्हा तमाशा बहरावा, संस्कृती टिकावी, माणूस जगावा... अहो माणूस जगला तर कला जगेल आणि कला जगली तर खऱ्या अर्थाने संस्कृती टिकेल. तमाशाला नावलौकिक मिळावा, ही तमाशाकला माझ्या मते सातासमुद्रापार कशी घेऊन जाता येईल याकडे सरकारनं लक्ष घालायला हवं. नव्या पिढीने तमाशा करायला हवा आणि तमाशा जगवायला हवा, त्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की, आपल्या आजूबाजूला असलेले तमाशे, तमाशा कलावंत, लोककलावंत यांना सहकार्याचा हात द्यावा, आर्थिक पाठबळ द्यावं... प्रख्यात तमासगीर ‘विठाबाई मांग नारायणगावकर’ यांच्या १९व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि इथंच थांबतो.

(सदराचे लेखक स्वतः शाहीर आणि लोककलावंत आहेत. )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com