नऊ अंकाची किमया

डॉ. अनुपमा साठे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवरात्रीचे नऊ दिवस फार उत्साहाचे असतात. रोज नवीन रंगाच्या साड्या, गरबा, व्रत उपवास व पूजा, सर्व वातावरण चैतन्यमय झालेलं असतं. पण, हे नवरात्रीचे दिवस नऊच का?

नवरात्रीचे नऊ दिवस फार उत्साहाचे असतात. रोज नवीन रंगाच्या साड्या, गरबा, व्रत उपवास व पूजा, सर्व वातावरण चैतन्यमय झालेलं असतं. पण, हे नवरात्रीचे दिवस नऊच का?

एकपासून नऊपर्यंत या अंकापैकी नऊ हा अंक सर्वश्रेष्ठ मानला जातो. कितीही मोठी संख्या असली तरी तिच्या अंकांची बेरीज नऊपेक्षा कमीच असते. उदाहरणार्थ 6578. या अंकाची फोड केली तर 6+5+7+8=26. 2+6=8. जर संख्येत इतर कोणताच अंक नसेल तर तिची बेरीज नऊ येईल. 9999=36=9. अशा रीतीने नऊ हा अंक पूर्णपणे निर्विकार आहे. एकपासून आठपर्यंत कुठल्याही अंकाचा असा स्वभाव नाही. नऊने भाग जाणाऱ्या कोणत्याही संख्येची बेरीज नऊच असते. ही संख्या पूर्ण संख्या असून तिला ब्रह्मसंख्या म्हणतात.

हिंदू संस्कृतीत नऊ तत्त्वांना महत्त्व आहे- पृथ्वी, आकाश, वायू, आप, तेज, मन, बुद्धी, अहंकार व चित्त. तसेच आपल्याग्रह मालिकेत नऊ ग्रह आहेत. रत्ने पण नऊ प्रकारची सांगितली गेली आहेत (नवरत्न) मोती, पोवळा, हिरा, गोमेद, वैडूर्य (लसण्या), पुष्कराज, पाचू, माणिक व नीलम.
अकबर या मोगल सम्राटाच्या दरबारातील नवरत्ने पण प्रसिद्ध आहेत.
पौराणिक कालगणनेनुसार चार युगांचा कालावधी-
सत्‌ युग 1,440,000, वर्षे, बेरीज 9
त्रेता युग 1,080,000 वर्षे, बेरीज 9
द्वापर युग 720,000 वर्षे, बेरीज 9
कलियुग 360,000 वर्षे, बेरीज 9
योगशास्त्राप्रमाणे मानवी शरीराला नऊद्वारे असल्याची सांगितली आहेत. पैकी दोन नाकपुड्या, दोन कान, दोन डोळे, मुख, मूत्रद्वार व गुदद्वार.
नाट्यशास्त्रात किंवा साहित्यात नऊ प्रकारच्या भावनांचं वर्णन आहे. (नवरस). शृंगार, हास्य, करुण, रौद्र, अद्भुत, भयानक, बिभत्स व शांत.
भक्तीचे पण नऊ प्रकार आहेत :- श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चना, वंदना, दास्य, सख्य व आत्म निवेदन.
भागवत पुराणात शरीराच्या नऊ अवस्था सांगितल्या आहेत :-
निषेकगर्भजन्मानि बाल्यकौमार यौवनम।
वयोमध्यं जरा मृत्युरित्यवस्थास्तनोर्नव ×
मातेचा उदरात रेतो रूप (निषेक), गर्भ, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू.
गर्भाला पण मातेच्या उदरात पूर्ण वाढ व्हायला नऊ महिने हवे असतात.

नऊ हा अंक श्रीशक्तीचे प्रतीक आहे. म्हणून नवरात्र, नवदुर्गा इत्यादी प्रकारे श्रीशक्तीच्या उपासनेचे महत्त्व आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ अवतारांचे वर्णन केल्या जाते.
प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्‌ ×
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीतिच । सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्‌ ×
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना: ×
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदात्री. नऊ दिवस देवीच्या या नऊ रूपांची साधना केली जाते.

तर "नऊ' या संख्येचं एवढं महत्त्व असताना आपल्याही जीवनात नऊ गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

1. शारीरिक स्वास्थ्य :- "शरीरस्य खलु सर्व साधनम.' शरीर जर स्वस्थ असलं तरच संसारातल्या सुखांचा उपभोग घेता येतो. जे काही कर्म करायचे आहे त्यासाठी आपलं शरीर हेच माध्यम आहे. म्हणून शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे आपलं कर्तव्य आहे.
2. मानसिक स्वास्थ्य :- हिंदीत एक म्हण आहे- "मन है चंगा तो कठौती में गंगा.' अर्थात मनात शुद्ध भाव असेल तर जवळ असलेल्या पात्रातलं पाणीसुद्धा गंगाजला एवढंच पवित्र असतं. मन:स्वास्थ्य नसलं तर पायी लोळण घालत असलेलं सुखसुद्धा आनंद देऊ शकत नाही.
3. आहार :- संतुलित आहार शारीरिक एवं मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. अन्न हे शरीराच्या वाढीसाठी व झीज भरून आणण्यासाठी आवश्‍यक आहे. अत्यल्प आहार शरीराची प्रतिकार शक्ती कमी करतो व अत्याधिक आहार तर प्रत्यक्ष रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पोषणाच्या संपूर्ण घटकाने युक्त, संतुलित व नियमित आहार शरीराला ऊर्जा प्रदान करतो व दैनंदिन व्यवहारासाठी सज्ज ठेवतो.
4. व्यायाम :- शरीराच्या सर्व अवयवांना चालना दिली तर ते व्यवस्थित काम करतात. नियमित व्यायाम केल्याने फक्त स्नायूच बळकट होत नाही, तर हृदय फुप्फुसे इत्यादी पण स्वस्थ राहतात. उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे रोग नियमित व्यायामाने आटोक्‍यात ठेवता येतात.
5. छंद :- जसा शरीरासाठी व्यायाम आवश्‍यक तसेच मेंदूला पण चालना देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विविध छंद जोपासणे उत्तम. कुणाला वाचनाची आवड असते तर कुणाला बागकामाची. कुणी सतार वाजवतं तर कुणाला गाणी ऐकायची हौस असते. छंद कुठलाही असो त्यानिमित्ताने स्वत:ला वेळ दिला जातो व मन ताजंतवानं राहतं.
6. प्रार्थना/ध्यान :- एकाग्र मनाने थोड्यावेळ का असेना ध्यान किंवा चिंतन केलं तर मनाला ऊर्जा मिळते व आपलं काम, मग ते कुठलंही असो, जास्त चांगल्या रीतीने करता येत. सगळ्या यशस्वी लोकांचा दिनक्रम बघितला तर लक्षात येतं की रोज ते ध्यान करण्यासाठी थोडा वेळ वेगळा ठेवतात. संपूर्ण चित्ताने प्रार्थना केली तरी तोच परिणाम होतो, परंतु प्रार्थनेत मन एकाग्र झालं पाहिजे.
7. परिवार :- आपण जन्माला आलो ते आपल्या आईवडिलांमुळे. ते आपले प्रथम दैवत.
पितृमातृसमं लोके नास्त्यन्यद्दैवतं परम्‌ ।
ज्यांनी आपल्याला बोट धरून मोठं केलं, त्याची सेवा करणे फक्त आपला धर्मंच नाही, तर त्यात परम आनंद आहे. भाऊ, बहीण व इतर नातेवाईक सर्वांशी मिळून मिसळून राहिल्याने सुख दुःखाच्या प्रसंगी एकमेकाची सोबत होते.
8.मित्र :- मित्र-मैत्रिणी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपले आईवडील, नातेवाईक आपण निवडू शकत नाही. परंतु, मित्र-मैत्रिणी आपल्या आवडीचे असावे. मनातल्या गोष्टी सांगायला हक्काचे मित्र-मैत्रिणीच असतात. मनातला ताणतणाव दूर करून चांगले सल्ले मित्रांकडूनच मिळतात. चांगली मैत्री आयुष्यभर जपावी.
9.श्रद्धा :- जगण्यावरती श्रद्धा असली तर जीवन खूप आनंदी आहे. प्रकृती, निसर्ग, आपल्या मनातले विचार प्रतिबिंबित करतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर वाईटातही चांगलं बघता येतं. सुख छोट्या गोष्टींमधेच लपलेलं असतं, फक्त ते आपल्याला बघता यायला हवं.

तर या नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांच्या आगमनासोबतच आपल्याही जीवनात या नऊ घटकांचा समावेश करून परिपूर्ण उत्सव साजरा करू या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nau ankanchi kimaya