स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

यक्षप्रश्‍न
प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः ६५८ / मूल्य ः ५०० रुपये

यक्षप्रश्‍न
प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः ६५८ / मूल्य ः ५०० रुपये
महाभारत हा असा ग्रंथ आहे, की कितीही विवेचन केलं तरी आणखी काही प्रश्‍न उरतातच. डॉ. शांता नाईक यांनीही या ग्रंथाकडं स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहून काही प्रश्‍न विचारले आहेत, चर्चा केली आहे. शकुंतला, रेणुका, अंबा, अंबिका, अंबालिका, दमयंती, देवयानी, गांधारी, कुंती अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यांतल्या घटनांचा डॉ. नाईक परामर्श घेतला आहे. या स्त्रियांच्या कथांतून वात्सल्य, मातृत्व, कोमलता अशा गुणाचं उदात्तीकरण करून स्त्रियांना शिक्षणापासून आणि समाजाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं, असा एक दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे. या स्त्रियांच्या मनात एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या अधिकारांचा, स्वातंत्र्याचा विचार आलाच नसेल का, अशा दृष्टिकोनांतून त्यांनी या स्त्रियांच्या कथांची मांडणी केली आहे.

---

एखादं चांगलं स्थळ आहे का हो?
प्रकाशक ः विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२०२६११५७) / पृष्ठं ः १६८/ मूल्य ः २५० रुपये
‘अरेंज्ड मॅरेज’ म्हणजे ठरवून लग्न करणं हा भाग खरंतर अतिशय अडचणीचा, त्रासाचा. मीती श्रॉफ-शाह यांनी याच विषयावर खुसखुशीत शैलीत मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण केलं आहे. स्वतःचे अनुभव आणि वेगवेगळे किस्सेही त्यांनी ओघात मांडले आहेत. स्थळासाठी ‘बायोडेटा’ कसा लिहायचा, एकमेकांविषयी कसं बोलायचं, पहिल्या भेटीत कोणतं भान राखायचं, कोणते प्रश्‍न विचारायचे, सौजन्य कसं राखायचं, नकार कसा द्यायचा, निरीक्षण कसं करायचं, पत्रिकांचं किंवा ज्योतिषाचं प्रकरण कसं हाताळायचं, निर्णय कसा घ्यायचा अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. आश्‍लेषा गोरे यांनी अनुवाद केला आहे.

----

श्रीकृष्णोपनिषद
प्रकाशक ः श्री बालनाथ प्रकाशन, तळेगाव दाभाडे, जि. पुणे (९१६७०६४९६१) / पृष्ठं ः १८४/ मूल्य ः १५० रुपये
कमलाकर मेंडकी यांनी भगवद्‌गीतेचं सहज, सोपं आणि प्रवाही रूपांतर केलं आहे. मूळ अर्थ कायम ठेवण्याबरोबरच त्यातली गेयताही कायम राहील, याची काळजी मेंडकी यांनी घेतली आहे. मूळ तत्त्वज्ञान योग्यपणे समजावं यासाठी नेमक्‍या आणि सोप्या शब्दांचा वापर त्यांनी केला आहे

----

काहूर
प्रकाशक ः मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं ः २१६/ मूल्य ः २५० रुपये
सुखाच्या शोधात वणवण करत राहणाऱ्या वाइल्ड लू या आदिवासी जमातीतल्या वा गा नावाच्या मुलीची ही कहाणी. ती जंगली समाजातून दूर फेकली जाते, तारुण्यात अवहेलना आणि विश्‍वासघात तिला सहन करावे लागतात. तरीही ती लढत राहते. ‘द रोड टू वाँटिंग’ या कादंबरीत वेंडी लॉ-योन यांनी वा गाची ही कहाणी लिहिली आहे. तिचं हे मराठी रूपांतर चित्रा वाळिंबे यांनी केलं आहे.

-----

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन व कार्यपद्धती
प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः २२४/ मूल्य ः ३०० रुपये
सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन ही अतिशय जिकिरीची गोष्ट असते. अनेक नियम त्यासाठी पाळावे लागतात आणि प्रत्यक्ष काम करणारे लोक त्यांचे इतर व्याप सांभाळून ते काम करत असतात. त्यामुळं त्यांना प्रत्येक नियमांची माहिती असतेच असं नाही. नंदकुमार रेगे यांनी या पुस्तकात त्या व्यवस्थापनाशी संबंधित सगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे. आधीच्या नियमांबरोबरच सहकार कायद्यात झालेल्या नवीन बदलांचाही ऊहापोह रेगे यांनी केला आहे. 
----

ज्ञानामृत सागर, सुखी जीवनाचे ज्ञानामृत
प्रकाशक ः प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे (९७६४४८७२७२) / पृष्ठं ः १२०, १३५ (अनुक्रमे) / मूल्य ः १०० रुपये (प्रत्येकी)
रामचंद्र महाराज लोंढे यांनी वेगवेगळ्या विषयांवरील मौलिक विचार या पुस्तकांत एकत्र केले आहेत. संतसाहित्य, आध्यात्मिक, उपदेशपर ग्रंथ यांतले विचार त्यांनी सोप्या शब्दांत मांडले आहेत. उपकार, ज्ञान, स्वावलंबन, पवित्र वाणी, स्वच्छता, गर्व, शांतता अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी या दोन्ही पुस्तकांत विवेचन केलं आहे. अगदी सोप्या शब्दांत सहजपणे केलेलं हे भाष्य जीवन सुखी करण्यासाठी मदत करेल.

-----

संस्कारकथा
प्रकाशक ः सुयोग प्रकाशन, पुणे (९८२२८७३६६१) / पृष्ठं ः ५६ (प्रत्येकी)/ मूल्य ः ६० रुपये (प्रत्येकी)
जीवनाचं नैतिक बळ वाढण्यासाठी महनीय व्यक्तींच्या आयुष्यातले प्रसंग उपयोगी पडतात. अशाच काही प्रसंगांच्या संस्कारकथा डॉ. प्रभाकर चौधरी यांनी लिहिल्या आहेत. सॉक्रेटिस यांच्यापासून बेंजामिन फ्रॅंकलिन यांच्यापर्यंत आणि गौतम बुद्ध यांच्यापासून गुरू नानकदेव यांच्यापर्यंत अनेकांच्या आयुष्यातले प्रसंग डॉ. चौधरी यांनी बोधरूपानं सांगितले आहेत. लहान मुलांबरोबर इतरांनीही वाचाव्यात अशा या संस्कारकथा आहेत. तीन भागांत त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

----

अमरशेखांच्या कवितेतील तत्त्वचिंतन
प्रकाशक ः मानसगंध प्रकाशन, पुणे (०२०-२४३७५४५४) / पृष्ठं ः १९२/ मूल्य ः २०० रुपये
शाहीर अमरशेख यांची कविता म्हणजे अनेक पैलूंनी फुललेली. क्रांतीची ठिणगी पेटवणारी आणि जीवनावर भाष्यही करणारी. डॉ. माधव पोतदार यांनी या कवितेतल्या तत्त्वचिंतनाचं रसग्रहण केलं आहे. परतत्त्व, तेजतत्त्व, सौंदर्यतत्त्व, समतातत्त्व, गीतातत्त्व, विज्ञानतत्त्व अशा वेगवेगळ्या तत्त्वांचा आधार घेऊन त्यांच्या आधारे डॉ. पोतदार यांनी अमरशेख यांच्या कवितेचं सौंदर्य उलगडून दाखवलं आहे. डॉ. पोतदार यांनी अमरशेख यांच्या कवितांवर यापूर्वी लिहिलेल्या काही पुस्तकांच्या प्रस्तावनादेखील प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

----

तीन त्रिक दहा
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं ः २००/ मूल्य ः २०४ रुपये
उत्पल वनिता बाबुराव यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा हा संग्रह. काहीतरी सांगण्याच्या अनिवार ऊर्मीतून आलेलं त्यांचं हे लेखन. बहुतेक लेख संमिश्र स्वरूपाचे आहेत. कुठं त्यांच्या मनातल्या कलहाचं, विचारप्रक्रियेचं प्रकटन, कुठं विसंगती टिपण्याचा किंवा काही मुद्‌द्‌यांबाबत मार्ग सांगण्याचा प्रयत्न, तर कुठं विनोदी मांडणी असं या लेखनाचं स्वरूप आहे. ‘कलाः एक अकलात्मक चिंतन’, ‘मॅनहोलमधले काही प्रश्‍न’, ‘असलेपण-नसलेपण’, ‘कविता बिविता करणं वगैरे’ आदी शीर्षकांच्या लेखांचा पुस्तकात समावेश आहे. 
----

साभार पोच

  शोध गुरूंचा/ गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र / लेखक ः माधव घाटे (८९७५४३७२००)/ वेदांतश्री प्रकाशन, पुणे (०२०-२४४७८०८०) / पृष्ठं ः १६० / मूल्य ः १२५ रुपये
  शब्दवैभव / निवडक कवींच्या कवितांचा संग्रह / संपादक ः डॉ. जया कदम, प्रा. हनुमंत माने / स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं ः १७६ / मूल्य ः २०० रुपये
  विदेशी कथा/ लहान मुलांसाठीच्या कथांचा संग्रह / लेखिका ः विनिता ऐनापुरे/ सुयोग प्रकाशन, पुणे (०२०-२४४९५५८४) / पृष्ठं ः ४८ / मूल्य ः ५०  रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new book