पश्‍चिमेकडचं माध्यमभान (अनीश प्रभुणे)

पश्‍चिमेकडचं माध्यमभान (अनीश प्रभुणे)

अमेरिकेतल्या माध्यमव्यवस्थेचं चित्रण करणारी आणि त्यावर विशिष्ट भाष्य करणारी ‘द न्यूजरूम’ ही मालिका खूप वादग्रस्त आणि चर्चेची ठरली. अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्यांचं काम कसं चालतं याचा आरसा असलेल्या आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मोकळेपणानं भाष्य करणाऱ्या या मालिकेविषयी....

‘‘अमेरिका हा जगातील सर्वश्रेष्ठ देश अजिबात नाही! एके काळी होता.... आपण तत्त्वांसाठी आणि मुद्द्यांवर भांडलो, गुद्द्यांवर नाही. एके काळी आपण गरिबीवर हल्ला करत असू, गरिबांवर नाही,’’ असं म्हणत विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना तीन मिनिटांचं कडकडीत लेक्‍चर देत मालिकेच्या पहिल्याच भागात, आपला नायक विल मॅकअव्हॉय (जेफ डॅनियल्स), पहिल्याच सीनमधून मालिकेचा ‘टोन’ आणि मुद्दा मांडून जातो. 

एचबीओ वाहिनीवर २०१२ ते २०१४ दरम्यान तीन सीझन्स आणि एकूण २५ भागांत प्रक्षेपित झालेली, ‘द न्यूजरूम’ ही मालिका म्हणजे अलीकडच्या काळातली सर्वाधिक वादग्रस्त आणि समीक्षक-प्रेक्षक यांचं ध्रुवीकरण करणारी मालिका ठरली. ॲरोन सॉर्किनसारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून साकार झालेली ही मालिका एसीएन नावाच्या एका काल्पनिक वृत्तवाहिनीचं आणि तिथं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचं चित्रण करते. अमेरिकेच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यामध्ये घडणारी ही मालिका, वृत्तमाध्यमांच्या सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेच वैचारिक आयाम तयार करते. विल मॅकअव्हॉय हा ‘न्यूज नाइट’ नावाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा संपादक आणि सादरकर्ता आहे. वर उल्लेख केलेल्या ‘लेक्‍चर’नंतर त्याचं काम आणि त्याचा कार्यक्रम यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उभं राहतं. अशातच विलचा जुना मित्र आणि वृत्तवाहिनीचा अध्यक्ष चार्ली स्किनर (सॅम वॉटरसन), विलच्या मनाविरुद्ध जाऊन मॅकेंझी मॅकहेल (एमिली मॉर्टिमर) या तडफदार आणि कार्यक्षम निर्मातीवर कार्यक्रमाची धुरा सोपवतो. पहिल्या भागातल्या या घटनांवरून सुरवात करून ‘द न्यूजरूम’ अमेरिकेच्या तत्कालीन इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना आणि त्यांचं बातम्यांमध्ये दिसलेलं स्वरूप कसं तयार होतं हे दाखवत राहते. पुढं तीन सीझन्समध्ये, मालिका आपल्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अनेक मुद्द्यांवर सखोल माहिती देत राहते. बातमी दिली जाते, त्यामागं घडणाऱ्या नाट्यमयतेची ओळख करून देण्यात मालिका यशस्वी होते.

‘ऑक्‍युपाय वॉल स्ट्रीट’, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, बराक ओबामा यांची फेरनिवडणूक याचबरोबर तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर मोकळ्या मनानं भाष्य करून, प्रसंगी ओरखडे काढणारी मालिका म्हणून या मालिकेकडं पाहिलं जातं. जेफ डॅनियल्स, सॅम वॉटरसन, एमिली मॉर्टिमर यांच्या बरोबरीनंच जॉन गॅलाघर ज्युनिअर, देव पटेल, ॲलिसन पिल, ऑलिव्हीया मन यांच्यासारख्या नव्या दमाच्या आणि जेन फोंडासारख्या बुजुर्ग कलाकारांच्या समर्थ अभिनयानं ‘द न्यूजरूम’मधले अनेक प्रसंग आपल्या मनावर विशेष ठसा उमटवून जातात. सॉर्किनसारखा कर्ताकरविता जेव्हा अभ्यासपूर्ण नजरेनं प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटना उत्तम नाट्यमायतेनं आपल्यासमोर मांडतो, तेव्हा ते प्रसंग अनेकदा आपल्या मनातल्या कोपऱ्याला हात घालतात. आपल्या मनातल्या आदर्शवादास स्पर्श करून जाणारे प्रसंग आपण पडद्यावर पाहतो, तेव्हा कदाचित आपल्या मनातही हा कल्लोळ जरूर उमटतो ः ‘कदाचित हे खरं असतं तर? जग किती बदललं असतं!’ 

अशी सक्षम आणि संघर्षमय पात्रं आणि परिस्थितीचा सखोल अभ्यास ही सॉर्किनच्या लिखाणाची कायमच असलेली वैशिष्ट्यं होय. अनेकविध विषयांवर लीलया लिहिणं आणि त्याबद्दल अनेक पुरस्कारांचा आणि कौतुकाचा मानकरी ठरणं हे त्याच्यासाठी नवीन नाही. ही मालिका मात्र, सॉर्किनच्या कारकिर्दीतसुद्धा सर्वांत वादग्रस्त म्हणावी अशीच होय. सॉर्किन हा स्वतः उदारमतवादी असल्यानं, अनेक विषयांवरचं त्याचं भाष्य हे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा अथवा डेमोक्रॅटिक पक्ष यांचा छुपा प्रचार किंवा रिपब्लिकन पार्टीवर उघड चिखलफेक, त्याचबरोबर मोठ्या उद्योजकांची आणि उद्योगांची नीतिमत्ता कमीच असल्याचा आव आणणं अशा अनेक मुद्द्यांमुळं ही मालिका सतत चर्चेत राहिली. वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या कामाचं अवास्तव चित्रण, कारण नसताना घेतलेली नैतिक भूमिका, बातमी कशी द्यावी अथवा त्याची नीतिमत्ता कशी असावी आणि आजकाल हे कसं हरवत चाललं आहे, अशा अर्थाचं भाष्य प्रत्यक्षातल्या अनेक वाहिन्यांना अर्थातच खटकलं आणि त्यांनी ‘हा कोण टिकोजीराव आम्हाला शहाणपण शिकवणारा?’ अशी भूमिकाही घेतली. अर्थात काही मुलाखतींमध्ये सॉर्किननं याला नकार दिला असला, तरीही मालिका संपल्यावर ‘कदाचित मी जरा जास्तच बोललो असेन,’ असे बचावात्मक विधानही केलं.

मात्र, या सर्वांपेक्षा महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जनसामान्यांचा असलेला विश्वास ही मालिका पुनरुज्जीवित करते. प्रत्यक्षात यामधलं काहीसुद्धा घडत नसताना, एखाद्या पत्रकाराच्या किंवा बातमीच्या स्वरुपात तरी आशेचा किरण सापडेल ही आशा पल्लवित ठेवते. कुणी निंदा अथवा कुणी वंदा; पण ‘द न्यूजरूम’नं वृत्तवाहिन्या, त्यांचं काम आणि त्याचा परिणाम समर्थपणे मांडला आणि त्याचबरोबर त्याबद्दल चर्चा घडवून आणली, हेच या मालिकेचं खरं यश. ‘हॉटस्टार’वर ही मालिका भारतीय प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com