स्पॅनिशमधलं समकालीन साहित्य : स्त्रियांची आत्मकथनं, शहरी जीवनातलं वास्तव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spanish

स्पेनमधील चार महत्त्वाच्या भाषा म्हणजे कास्तिलिअन, कातालान, गॅलिशिअन आणि बास्क. सोबतच्या नकाशावरून त्यांच्याविषयी कल्पना येईल.

स्पॅनिशमधलं समकालीन साहित्य : स्त्रियांची आत्मकथनं, शहरी जीवनातलं वास्तव

- नीना गोडबोले ninagodbole@yahoo.com

स्पेनमधील चार महत्त्वाच्या भाषा म्हणजे कास्तिलिअन, कातालान, गॅलिशिअन आणि बास्क. सोबतच्या नकाशावरून त्यांच्याविषयी कल्पना येईल. स्पेनच्या ‘कास्तिलिअन’ या अधिकृत भाषेचा उल्लेख ‘स्पॅनिश भाषा’ असा केला जातो. स्पॅनिश भाषेच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा : स्पॅनिश ही वीसपेक्षा अधिक देशांची अधिकृत भाषा आहे. ती अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचीही कामकाजाची भाषा आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचाही समावेश होतो. जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा कोणती हे ठरवताना दोन निकष वापरले जातात : अमुक एक भाषा ‘किती जण बोलतात’ आणि ती ‘किती ठिकाणी बोलली जाते.’ आज जगभर इंग्लिश बोलणारे ३६ कोटी लोक आहेत, तर ४५ कोटी लोक स्पॅनिश भाषा बोलतात. साडेसात कोटी लोकांची स्पॅनिश ही दुय्यम भाषा आहे. युरोपमध्ये एक देश, उत्तर अमेरिकेत एक देश, मध्य अमेरिकेत सहा देश, कॅरेबियन द्वीपसमूहात तीन देश, दक्षिण अमेरिकेत नऊ देश, तर आफ्रिका खंडात एक देश एवढी व्याप्ती आहे जगभरात स्पॅनिशभाषकांची. या लेखातून फक्त स्पेन देशातील साहित्यनिर्मितीचा परामर्श घेतला आहे. लेखाच्या दुसऱ्या भागात दक्षिण अमेरिकेत निर्माण झालेल्या स्पॅनिश भाषेतील साहित्याबद्दल जाणून घेऊ या.

सध्याच्या काळात स्पेनमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध झालेलं साहित्य आपलं स्थान निर्माण करताना दिसतं. त्यापैकी बास्क भाषेतील लेखकांचं साहित्य इंग्लिशमध्ये अनुवादित होताना आढळतं. आजच्या घडीला ही भाषा आणि तीमधील साहित्य जगातील काही प्रख्यात विद्यापीठांत शिकवलं जात आहे. स्पेनच्या गॅलिशिअन भाषेतील साहित्यालाही चांगले दिवस आलेले दिसतात. या भाषेतील कविता आणि कथा यांचे इंग्लिशमध्ये झालेले अनुवादही वाचकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. आजच्या काळातले स्पेनमधील काही सुप्रसिद्ध कथालेखक म्हणून खाविएर मारिआस, रोझा मोंतेरो, एल्विरा नावार्रो, कार्लोस रुइझ साफोन अशी नावं उदाहरणादाखल सांगता येतील.

आधुनिक काळातील स्पॅनिश कादंबऱ्यांमध्ये आधीच्या परंपरेतील प्रखर असा ‘वास्तववाद’ आणि आधुनिक कादंबरीतील सौंदर्य यांचं मिश्रण दिसतं. काही वेळा एका शैलीपासून फुटून दुसऱ्या शैलीकडे वळताना होणारी सौंदर्यपूर्ण निर्मिती स्पेनच्या आधुनिक कादंबरीमध्ये दिसून येते. सध्याच्या काळात, कादंबऱ्यांमध्ये स्त्रियांचं आत्मकथन, शहरी जीवनावर आधारित वास्तव, स्पॅनिश यादवी युद्धाची अधिक सशक्तपणे केलेली मांडणी, हेरकथा, ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील कथानकं, वैषयिक प्रेमाच्या गोष्टी इत्यादीही स्पेनच्या चारही भाषांमधील साहित्यात दिसून येतं.

कातालान, बास्क, गॅलिशिअन या भाषांमधील कादंबऱ्यांच्या कथानकात तर त्यांची स्वतंत्र भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता जागृत झाल्याचं दिसून येतं. स्पेनमधील फुटीरतावादी चळवळींचं केंद्र या प्रदेशांमध्ये असल्याचं सर्वश्रुत आहे. आधुनिक काळातील स्पॅनिश कादंबऱ्यांमध्ये जागतिक आस्थेचे विषयही दिसून येतात. साहित्य आणि चित्रपट यांच्यातील नातं असे विषयही कादंबऱ्यांमध्ये आढळतात. अस्तित्ववादी विचारांचा प्रवाहदेखील स्पेनच्या आधुनिक काळातील कादंबरीमध्ये दिसतो.

गोन्सलो तोर्ने या तरुण स्पॅनिश लेखकाच्या, सन २०१० ते २०१७ या काळात कातालान भाषेत लिहिलेल्या, तीन कादंबऱ्या गाजल्या. त्यांची भाषांतरं फ्रेंच, इटालियन, जर्मन, डच, पोर्तुगीज अशा इतर युरोपीय भाषांमध्ये झाली. सध्याच्या काळातील स्पेनमधील आणखी काही प्रसिद्ध कादंबरीकार असे : इल्देफोन्सो फाल्कोनेस, आन्तोनिओ मुन्योझ मोलिना.

बदलत्या काळानुसार समाजातील विविध स्रोत, विविध प्रकारच्या विचारसरणी आदींना स्पर्श करत जाणारं साहित्य तयार होत जातं, हे खरं असलं तरी, वाचकवर्गही तितकाच महत्त्वाचा असतो. सध्याच्या काळात स्पेनमध्ये वाचकवर्गात काही बदल दिसून येत आहेत. नवीन विषयांसाठीची त्यांची भूक वाढताना दिसत आहे. स्पेनमधील सध्याच्या वाचकवर्गात आता सामाजिक जीवनातील स्त्रिया, शहरात राहणारे तिशी-चाळिशीतील मध्यमवर्गीय वाचक यांचा अधिकाधिक समावेश दिसून येतो, तसंच त्यांचा कल कादंबरी या साहित्यप्रकाराकडे असल्याचं दिसतं.

स्पॅनिश रंगभूमी खऱ्या अर्थानं फुलली ते हुकूमशहा फ्रांको यांच्या पाडावानंतर; कारण, त्यांच्या काळात स्पेनमध्ये नाटकांवर असलेली बंदी. फ्रांकोंनंतर स्पेनमध्ये सुरू झालेल्या लोकशाहीच्या काळात मात्र नाटकांना पुन्हा चांगले दिवस आले. प्रतिभावान नाटककारांनी एकत्र येऊन स्पॅनिश रंगभूमी पुन्हा एकदा सजीव केली. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग लाभावा यासाठी सध्याच्या काळात ही मंडळी संगीत-विनोदिका, विनोदी हावभावांवर आधारित नाटुकल्या, नृत्यात्मिका असे प्रयोग करताना दिसतात. वास्तविक, परंपरागत स्पॅनिश नाट्यक्षेत्रात पुष्कळ काम होऊन गेलेलं असलं तरी, टेलिव्हिजनच्या आणि सिनेमाच्या सध्याच्या काळात स्पॅनिश नाट्य-रंगभूमीचं अस्तित्व एकप्रकारे असून नसल्यासारखंच आहे, तरीदेखील छोट्या प्रमाणात नाटकांचे प्रयोग होताना दिसतात. बार्सेलोना इथले संवेदनशील असे प्रसिद्ध लेखक अंतोनी विवास यांनी अलीकडेच धारावी इथल्या त्यांच्या अनुभवांवर ‘प्रेम आणि सत्य’ हे नाटक कातालान भाषेत लिहिलं. या तीनअंकी नाटकाचा मराठीत थेट अनुवाद नुकताच पूर्ण करण्यात आला.

गलिशियन भाषेतील विशेष उल्लेखनीय असे काही कवी म्हणजे खोसे लुईस मेंदेस फेर्रिन आणि मॅन्युएल रिवास बार्रोस. गलिशियन स्त्रियाही काव्यजगतात सध्या गाजत आहेत. सन २०१० मध्ये ‘आमच्या शिडांमधील वाऱ्यास’ या शीर्षकांतर्गत विविध अशा दहा गॅलिशियन कवयित्रींच्या कविता इंग्लिशमध्ये पाच खंडांत अनुवादित झाल्या.

स्पेनमधील स्त्रियांच्या साहित्यात स्त्रियांच्या सामाजिक सहभागातील विषयांवर आधारित लेखन वाढत्या प्रमाणात दिसून येतं. आतापर्यंतच्या स्पेनच्या परंपरागत साहित्यात प्राधान्यानं कास्तिलिअन भाषेत लिहिणारे पुरुष-लेखक आढळत असले तरी, सध्या मात्र अधिकाधिक लेखिका स्पेनच्या प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करताना आढळतात. सध्याच्या काळात स्पेनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या साहित्यावर देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक इतिहासाची छाप दिसून येते. उदाहरणार्थ : विसाव्या शतकातील दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात स्पेनमध्ये उद्भवलेल्या यादवी युद्धाचा काळ (१९३६-१९३९) क्लेशकारक होता, त्याचे पडसाद स्पेनच्या आधुनिक साहित्यात कित्येकदा उमटलेले दिसून येतात. सन १९७५ मध्ये स्पॅनिश हुकूमशहा ‘फ्रांको’ याच्या मृत्यूनंतर स्पेनची वाटचाल लोकशाही पद्धतीकडे सुरू झाली. या काळातील आठवणी सांगणारं साहित्यही आज दिसून येतं. फ्रांकोंच्या काळात मागासलेपणा आलेल्या स्पॅनिश समाजानं या काळात जगाबरोबर आधुनिकीकरणाकडे वाटचाल करण्याचं स्वप्न पाहिलं, त्याचेही पडसाद स्पॅनिश समकालीन साहित्यप्रवाहात दिसून येतात.

एकंदरीत, सध्याच्या काळात स्पेन या देशात प्रसिद्ध होत असलेल्या वाङ्मयावर आधुनिक माध्यमांचा झालेला परिणाम तीव्रपणे दिसून येतो. इंटरनेटच्या व्यापक प्रभावक्षेत्रामुळे पुष्कळसे लेखक त्यांचा उपयोग करताना दिसून येतात. आधुनिक माध्यमांमुळे आता नेमका असा वाङ्मयीन रूपबंध राहिलेला नसल्याचंही दिसून येतं. एवढेच नव्हे तर, सध्या जगभर उपलब्ध असलेल्या सद्यस्क प्रकाशनपद्धतीमुळे, तसंच स्वयंप्रकाशनासाठी उपलब्ध संधींमुळे लेखनाचा ‘अस्सलपणा’ सिद्ध करण्यात येणाऱ्या अडचणींचा प्रश्न स्पेनच्या समकालीन साहित्यालाही लागू पडतो.

(सदराच्या लेखिका ‘स्पॅनिश साहित्य व संस्कृती’ या विषयाच्या एमए असून, ही भाषा त्या शिकवतात. त्यांनी स्पॅनिशमधून थेट मराठीत अनुवाद केलेल्या कथा, छोट्या नाटिका, तसेच भाषांतराविषयीचे लेख ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकात नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच त्यांनी ‘कातानाल’ या भाषेतील तीनअंकी नाटक त्यांनी मराठीत अनुवादित केलं आहे.)

Web Title: Nina Godbole Writes Contemporary Spanish Literature Autobiographies Of Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womensaptarang
go to top