स्थानिक अस्मितांचं प्रभावी चित्रण

स्पॅनिशमधलं समकालीन साहित्य - भाग २
Spanish
Spanish
Summary

स्पॅनिशमधलं समकालीन साहित्य - भाग २

- नीना गोडबोले ninagodbole@yahoo.com

स्पॅनिश भाषेतच; परंतु स्पेनबाहेर निर्माण झालेल्या समकालीन स्पॅनिश साहित्याबद्दल या भागात आपण थोडक्यात जाणून घेऊ या. कधीकाळी स्पॅनिश वसाहती होऊन गेलेल्या वीसपेक्षा अधिक देशांची स्पॅनिश ही अधिकृत भाषा आहे (सोबतचा नकाशा पाहावा). या सर्व देशांत स्पॅनिश भाषेत विपुल साहित्य निर्माण झालं. त्यांपैकी काही मोजक्या देशांमधीलच स्पॅनिश साहित्याबद्दलचा थोडक्यात आढावा इथं घेता येईल.

सन १९६०-७० चं दशक हा दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश साहित्याचा भरभराटीचा काळ मानला जातो. या काळात दक्षिण अमेरिकेतील साहित्यात ‘मॅजिक रिॲलिझम’ हा प्रकार उदयास आला. यात जादूई आणि अद्भुत अशा गोष्टी दैनंदिन जीवनाचा भागच असल्यासारख्या दाखवल्या जातात. या काळात झालेला तंत्रज्ञानाचा विकास आणि स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक अंधश्रद्धा यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या तत्कालीन प्रतिक्रियेतून या साहित्यप्रकाराचा जन्म तिथं झाला.

पाब्लो नेरुदा हे चिले या देशातील सुप्रसिद्ध कवी. चिले हा ‘कवींचा देश’ म्हणूनच ओळखला जातो. स्पॅनिश भाषेतील उत्तमोत्तम कविता इथं रचल्या गेल्या. एकविसाव्या शतकात चिलेमध्ये अनेक कवयित्रीही गाजल्या.

‘२६६६’ ही ‘रोबेर्तो बोलान्यो’ या लेखकाच्या मृत्योत्तर, २००४ मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी आधुनिक काळातील एक उत्कृष्ट कलाकृती मानली जाते. सन २००२ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘दिआमेला एल्तित’ हिची ‘मानो दे ओब्रा’ (कामगाराचे हात) आणि अर्जेंटिनामध्ये २०१० मध्ये प्रकाशित झालेली ‘पेद्रो मैराल’ या लेखकाची ‘उन आन्यो देल देसिएर्तो’ (एक रखरखतं वर्ष) यासुद्धा महत्त्वाच्या कादंबऱ्या ठरल्या. नवस्वतंत्रतावाद-विचारप्रणालीत मोडणाऱ्या या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये आढळतं संघर्षाचं चित्रण. ‘मानो दे ओब्रा’ ही कादंबरी सध्याच्या भांडवलशाही जगातातील मनुष्यबळाच्या मध्यवर्ती स्थानाचा वेध घेत कामगारवर्गाच्या शोषणाचा प्रश्न मांडते. सेवाक्षेत्राची वाढती व्याप्ती, या क्षेत्रातील कामाचे प्रदीर्घ तास, घरगुती जीवनातील भावनिक ताण-तणाव यांतून घडणाऱ्या संघर्षाचं चित्रण या कादंबरीत दिसून येतं. ‘उन आन्यो देल देसिएर्तो’ या कादंबरीत आहे. ‘मारिया वाल्देझ नेलान’नामक व्यक्तिरेखेच्या शब्दांत साकारलेली, वर्षभराच्या काळात घडलेली कथा. त्यात दाखवलं आहे ‘निर्मनुष्यता’ आणि ‘ओसाडलेपण’ यांमुळे होत चाललेलं अर्जेंटिनाच्या ब्यूनोस आयरेस या राजधानीच्या शहराचं विघटन. मात्र, शहराची होत चाललेली ही अवस्था प्रतीकात्मक की प्रत्यक्षात घडणारी, याचं स्पष्टीकरण कादंबरीत येत नसल्यानं ती काहीशी गूढच ठरते.

‘परू’ देशाच्या साहित्यिक इतिहासाच्या कालखंडाचे चार ठळक भाग पडतात. पहिला कालखंड म्हणजे इतिहासपूर्वकाळ ते ‘इंका’ साम्राज्याचा काळ. दुसरा कालखंड (१५३५-१८१०) हा परूमधील स्पॅनिश वसाहतींचा काळ. तिसरा कालखंड परूच्या स्वातंत्र्यलढ्याचा काळ (१८१०-१८२६), ज्याच्या अखेरीस स्पॅनिश वसाहतवाद्यांपासून परूला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. चौथा कालखंड परूच्या स्वायत्ततेचा शंभर वर्षांचा काळ. खोसे मारिया अर्गेदास यानं वर्षभर सोसलेल्या तुरुंगवासात त्याला आलेल्या भयंकर अनुभवांवर आधारित १९६१ मध्ये त्यानं लिहिलेल्या ‘एल सेक्स्तो’ (म्हणजे ‘सहावा’) या कादंबरीचा उल्लेख महत्त्वाचा. परू देशाचा आधुनिक काळातील कवी बाय्येखो याच्या १९१९ मधल्या कवितासंग्रहाचा उल्लेखही तितकाच महत्त्वाचा. यामध्ये मृत्यू, भ्रमनिरास, अनिश्चितता, वेदना यांवरच्या कविता दिसतात. परूचे इतर काही साहित्यिक मानदंड म्हणजे १९३९ मधील सेसार बाय्येखो याचा मानवतावादी विषयांना वाहिलेला कवितासंग्रह, सन २०१० मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या मारियो बार्गास जोसा याची चर्चमधील काही संभाषणांवर आधारित ‘कोनबेर्सास्योन एन ला कातेद्राल’ ही कादंबरी (१९६९), जिच्यात पन्नासच्या दशकात परूमध्ये होऊन गेलेल्या हुकूमशहा मानुएल ओद्रियाच्या काळातील छळवादी सत्ता, भ्रष्टाचार आणि त्या काळात लोकांची हरवलेली ओळख याबद्दल भाष्य आहे. सन १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या अल्फ्रेदो ब्रिस एन्रिके याच्या ‘उन मुंदो पारा खुलिउस’ (जुलिअसचं जग) कादंबरीला परूमधील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तसंच १३ भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद झाले. यात आपल्या समोर येते पन्नासच्या दशकात अंत झालेल्या एका खानदानी घराण्यातील अखेरचा वारस जुलिअस याच्या दृष्टिकोनातून उलगडत जाणारी कथा.

अर्जेंटिनातील स्पॅनिश साहित्याइतकंच महत्त्वाचं आहे मेक्सिकोत निर्माण झालेलं स्पॅनिश साहित्य. मेक्सिकोत १९१० मध्ये सुरू झालेल्या क्रांतीचे पडसाद तिथल्या साहित्यात आजही उमटताना दिसतात. मेक्सिकोत ओक्ताविओ पाझ हे कवी, निबंधकार, तसंच कथालेखक म्हणूनही गाजले. निबंधकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध पावलेले कार्लोज फुएन्तेस, तसेच गुआदालुपे दुएन्याज, खुआन गार्सिआ पोन्से, खोर्खे बोल्पी (एका दुष्ट जादूगाराच्या शोधमोहिमेवर आधारलेली याची कादंबरी, उत्तम कथा आणि तीमधील ऐतिहासिक माहिती यादृष्टीनं महत्त्वाची) इत्यादी कादंबरीकार आणि लघुकथालेखक रूबेन बोनिफाज नून्यो (कवी), ग्रिसेल्दा आल्वारेझ (कवयित्री), ह्यूगो आर्गुएझ हे नाटककार अशी इतर काही नावं सांगता येतील.

कोलंबियन साहित्याचं आवर्जून लक्षात घेण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे त्यात दिसणारं तिथले स्पॅनिश, आफ्रिकी आणि स्थानिक लोक यांच्या मिश्र संस्कृतीचे रंग.

आधुनिक काळातील कोलंबियन कवी शहराचे प्रश्न, गरिबांच्या व्यथा असे विषय हाताळताना दिसतात. उल्लेखनीय असे काही कोलंबियन कवी म्हणजे अंतोनिएता बिलामिल, अंद्रेया कोते, लूसिया एस्त्रादा, फेलिपे गार्सिया किंतेरो. सन १९४०-५० च्या दशकात कोलंबियामध्ये घडलेल्या काही हिंसक घटनांमुळे, तसंच तिथल्या लष्करी राजवटीच्या काळातील विमनस्कतेमधून शून्यत्ववादाचं साहित्य निर्माण झालं.

या शून्यत्ववादी साहित्यचळवळीचं प्रतिनिधित्व करणारे काही महत्त्वाचे कोलंबियन लेखक म्हणजे गोंझासलो आरांगो, खोतामारिओ आर्बेलेझ आणि फानी बूइत्रागो, पात्रिसिआ आरिझा या लेखिका. एवेलिओ रोसेरो, खुआन गाब्रिएल बास्क्वेझ, खेर्मान एस्पिनोसा, मॅन्युएल झापाता ऑलिवेला, हेक्तोर आबाद फासिओलिन्से हे विविध पारितोषिकांनी सन्मानित झाले. कित्येकांच्या लेखनाचे इतर भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

क्यूबा देशातील साहित्याचा आवाज जागतिक क्षितिजावर उमटू लागला एकोणिसाव्या शतकात. त्या वेळी या साहित्याचा सूर स्पॅनिश वसाहतवाद्यांच्या काळात निर्माण झालेल्या गुलामगिरीस निपटून काढण्याचा होता. विसाव्या शतकात क्यूबानं अमेरिकेच्या मदतीनं स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवलं. त्याचे पडसाद विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकापर्यंत क्यूबाच्या साहित्यात उमटलेले दिसतात. अमेरिकी विचारसरणीचा प्रभाव (काही प्रमाणात) क्यूबाच्या साहित्यात न दिसता तरच नवल. खुलिआन दे कासाल आणि खोसे मार्ती हे क्यूबातील थोर लेखक. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत क्यूबातील साहित्य त्यांच्याच विचारांनी प्रभावित झालेलं आढळतं. क्यूबामधील निखळ कवितेचा कालखंड १९२० मध्येच संपुष्टात आल्याचं मानलं जातं. त्यानंतर येणारे सामाजिक बदल आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता यांची चाहूल तिथल्या कविताविश्वाला जणू आधीच लागली असावी. कारण, क्यूबामधील नंतरच्या काळातील कवितेत त्याचंच प्रतिबिंब आढळतं. या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक म्हणजे आगुस्तिन आकोस्ता, खोसे झाकारिआस ताय्ये आणि रुबेन मार्तिनेझ बिजेना. क्यूबामधील लेखिकाही मागं नाहीत. त्यांच्या लेखनात विविध शैलींचं मिश्रण दिसून येतं. कविता, लघुकथा, व्यक्तिरेखांचं मूल्यमापन करणारं लेखन, आत्मचरित्रं, निबंधात्मक लसेखन, कादंबरी असं सर्व काही या लेखिकांनी हाताळल्याचं दिसतं. क्यूबामधील १९५९ च्या क्रांतीनंतर संपुष्टात आल्याचे समजले जाणारे अनेकविध विषयही त्यांच्या लेखनात आढळतात. अगदी आताच्या काळातील दुल्से मारिया लोयनास याच्या कवितांमध्ये लैंगिकता आणि आर्तता उत्कट प्रमाणात दिसून येते. एकंदरीत पाहता, क्यूबाच्या साहित्यात दिसून येणारं स्पॅनिश संस्कृती आणि स्थानिक अस्मिता यांचं सुसंवादी मिश्रण ही विशेष नमूद करण्याची बाब होय.

(सदराच्या लेखिका ‘स्पॅनिश साहित्य व संस्कृती’ या विषयाच्या एमए असून, ती भाषा त्या शिकवतात. त्यांनी स्पॅनिशमधून थेट मराठीत अनुवाद केलेल्या कथा, छोट्या नाटिका, तसंच भाषांतराविषयीचे लेख ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकात नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच त्यांना कातालान या भाषेतील तीनअंकी नाटक मराठीत अनुवादित केलं आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com