धर्मग्रंथांचा प्रभाव

छत्रपती शिवराय आणि संत कबीर यांच्या मालिकेच्या निमित्तानं या महापुरुषांविषयी खुप वाचन केलं.
छत्रपती शिवराय आणि संत कबीर यांच्या मालिकेच्या निमित्तानं या महापुरुषांविषयी खुप वाचन केलं.

लहानपणापासून आपण ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ आपल्या आई - वडिलांच्या माध्यमातून वाचत असतो, त्याबद्दल ऐकतही असतो. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि अशाप्रकारचे ग्रंथ वाचून आपण आपल्याला जीवनात चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध होत असतो. ते काम करताना आपल्याला जी मूल्य राखायची असतात, ते आपल्याला या वाचनातूनच मिळत असतं. वाचनातूनच आपल्यात कोणत्याही धर्माबद्दल, समाजाबद्दल, थोर पुरुषांबद्दल आदर्श निर्माण होतो आणि त्यातूनच प्रेरणा घेत, आपण आपल्या आयुष्यात वाटचाल करीत असतो. कारण आपण जेवढं वाचू तेवढं आपल्याला जगाचं ज्ञान मिळत जातं. 

इयत्ता चौथीमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे धडे मिळतात तेव्हा स्वाभिमानानं आपल्यात एक प्रकारचा जोश येतो. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी ‘तमस’ ही फाळणीवर आधारित मालिका केली. त्याकाळी आपल्या देशात कशी परिस्थिती होती याचा अभ्यास करताना भारताच्या इतिहासावर आधारित अनेक पुस्तकं मी मालिकेच्यावेळी वाचली. ही मालिका प्रेक्षकांना आवडल्यानंतर मला ‘कबीर’ ही मालिका मिळाली. तेव्हा मी कबीरांच्या दोह्यांचा अभ्यास केला. त्यांचं समाजात कशाप्रकारचं स्थान होतं, कशाप्रकारे त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं यावर आधारित अनेक पुस्तकं वाचली. असं करत करत माझं स्वतःचं एक वाचनालयच  तयार झालं. 

आजच्यासारखं माझ्या करिअरच्या सुरवातीला इलेक्ट्रॉनिक साधनं किंवा गूगल नव्हतं. त्यामुळे सकाळी ग्रंथालयं उघडण्याच्या वेळी तिथं जायचं, दिवसभर तिथं बसून विविध पुस्तकांमधून नोट्स काढल्या आहेत. लहानपणी आजोबांबरोबर म्हटलेली भजनं, भारूडं तरुणपणी मी पुन्हा वाचून काढली आहेत. लोकांसाठी बोधपर, सूचक असं कशाप्रकारे लिहिलं गेलं आहे हे मी या सगळ्यातून अभ्यासलं. आपल्या देशाच्या इतिहासावर आधारित अनेक पुस्तकं मी वाचली. ही सगळी पुस्तकं वाचून देशभक्तीही वाढली. ही पुस्तकं वाचत असताना माझ्यात वाचनाची आवड निर्माण होत गेली. बरेच ग्रंथ, पुस्तकं मला तरुण वयातच वाचता आले. मी जेव्हा जेव्हा छत्रपती  शिवाजी महाराजांचा अभ्यास करत होतो तेव्हा, जेवढे जेवढे थोर इतिहासकार आहेत त्यांची पुस्तकं मी वाचून काढली. बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव भोसले यांची महाराजांवर आणि शहाजी राजेंवर लिहिलेली अनेक पुस्तकं वाचली. त्यानंतर लगान, देवदास, जोधा अकबर....प्रत्येक कलाकृतीला तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. सुरुवातीला मी आर्यन संस्कृतीचा अभ्यास करत होतो तेव्हा पर्सी ब्राऊन या ब्रिटिश इतिहासकाराने भारतावर लिहिलेली पुस्तकं वाचली. 

मला असं वाटतं, तुम्ही काम करत असताना तुमचे विचार प्रगल्भ असणं आवश्यक आहे. ते जर असले तर तुम्ही ती गोष्ट उत्तम प्रकारे सादर करून तुम्ही त्याला न्याय देऊ शकता. त्यामुळं वाचन आणि त्याचं आचरण हे खूप महत्वाचं आहे.  आताच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपलं आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे करताना वाचनासाठी वेळ मिळणं कठीण होऊन जातं, पण अशा वेळी एखादी छान कविता आपण वाचली किंवा कुणी समाज प्रबोधनाचं काम केलं आहे आणि ते आपण वाचलं आणि की आपल्यालाही त्यातून एक नवी ऊर्जा मिळते. वाचनाच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद घेता आला तर तुम्ही जीवन चांगलं जगण्याचा खूप मोठा टप्पा पार केला असं म्हणावं लागेल. 

जगात वाचण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, ज्यांच्यामुळं आपण आपल्या आयुष्याचं सार्थक करू शकतो. म्हणून आजही मी माझ्यातली वाचनाची आवड आणि अभ्यासक बुद्धी जपण्याचा प्रयत्न करतो. ‘आधी मी स्वतः वाचायचो, आता कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळं लोकं माझ्यासाठी वाचतात. आणि त्यांच्या माध्यमातून मी ते ऐकणं आणि वाचणं सोडलेलं नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com