esakal | अन् लागली सुखाची झोप...

बोलून बातमी शोधा

Pregnant Women
अन् लागली सुखाची झोप...
sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

सकाळचं साधारण धा साडे धा वाजल्या आसतील कामावर सुट्टी म्हणून आज रानात गेलो हुतो... एवढ्यात शिऱ्या आपाचा सुभ्या पळत पळत आला... माझ्या नावानं हाका मारायला लागला... हातातला मका तिथंच ठिऊन मी बांधाकडं पळत आलो... शुभ्या नुसता घामाघूम झाला हुता, काय झालं हे मी इचारायच्या आतच त्यो धापा टाकत... डोळ्यात पाणी आणून बोलायला लागला... बहिणीची आज डिलिव्हरी हाय... सिव्हिल ला जायचंय... सगळीकड गाड्या बंद हायत... सगळ्या दोस्ताना फोन केलं पण दवाखाना म्हटल्यावर कुणीच यायला मागना... ह्या कोरोनाच्या काळात खरंतर माणुसकी दाखवली पायजेल पण ह्यो रोगच आसा हुता की जवळ आलं कि धोका हुनार... त्यो म्हणला कुणीच धजावतं न्हाय.! लय मिंनत्या केल्या..., म्हणलं आरं कशाला कुणाला मिनत्या करीत बसलास आधीच याचं न्हायस व्हय...म्हणलं, कुठं हाय बहीण ? त्यो म्हणला हाय घरी, चल जाऊ म्हणलं घिवून...

त्याला घिवून घरी आलो. कशीबशी आंगावर दुसरी कापडं चढवली आणि गाडीला स्टार्टर मारला... तिच्या दारात गेलो... सोबत आय हुती आन नऊ महिने पूर्ण झाल्याली त्याची गरोदर बहीण... सामान डिकीत टाकून दोघींनाबी गाडीत बसवलं...!

गाडी आबदार रस्त्याला लागली. आपण तिला दवाखान्यात सोडून कसलं उपकार करतूय आसं आपलं भाव नसावं आस मला कायम वाटत... एकाद्याच्या आवघड येळी आपल्याला शक्य आसलं तर उपयोगी पडावं, असं उपयोगी पडता यत नसलं तर माणूस म्हणून आपला कायचं उपयोग न्हाय आसं मला वाटायचं...

हिकड तिकडच्या गप्पा मारत प्रवास सुरु झाला... तिजा भाव म्हंजे माझा दोस्त पुढंच्या बाजूला बसला हुता... सकाळपासून केलेले प्रयत्न आन लोकांचा नकार त्यो पुन्हा पुन्हा सांगत हुता..आई दुवा देत हुती... गाडी जवळच्या सरकारी दवाखान्यात आणली.. तिला आई आणि भावानं आत नेलं... आधी कोरोनासाठीची टेस्ट करावी लागणार हुती... डॉक्टर वळकीच हुतं.. त्यास्नी पोरीची अवस्था सांगितली, समदी कामं बाजूला ठिवून त्यांनी तिची तपासनी करून पहिला रिपोर्ट हातात ठेवला... त्यावेळी वाटलं, माणुसकी संपली असं वाटत असताना कुणीतरी आशेचा किरण बनून येत, आपण न्हायतर दुसरं कुणी... उलट ती संधी आपल्याला मिळाली, हिच किती मोठी गोष्ट हुती...

ज्यांस्नी खाजगी दवाखान्याचा खर्चच परवडत नाय आशी डोंगर कपाऱ्यातील गरीब म्हातारी - कोतारी माणसं लायनीत उभी हुती...! डॉक्टर म्हणतं व्हतं "माझ्या हातान हुईल एवढी सेवा करणार... मोठी माणसं पैशानं करत्यात उपचार, गरीबांन कुठं जायचं... " ते आयकून मनाला जे बरं वाटलं ते कुणाला सांगू... अलगद भरूनच आलं... रिपोर्ट घिवून बाहेर पडलो... डोसक्यात चक्र सुरु होत..पुन्हा सिव्हिलकडं यायचा प्रवास सुरु झाला... पुन्हा हळूहळू गाडी साताऱ्याकडं येऊ लागली, गाडीच्या मधल्या काचेतन मागच्या सीटवर जरा विसावा घेताना आई आणि पोरगी मला दिसल्या... काही येळापूर्वी पडलेल्या तोंडावर आता आशेचा किरण दिसत हुता... दवाखान्याच्या बाहेरच्या गेटवरून गाडी आत घितली...!त्याना उतरवून डिकीतून सामान काढून दिल... इथूनच जातो म्हणालो त्यांनी निरोप दिला... दोस्त जवळ आला पाकिटातनं पैस काढून समोर धरत म्हणला...! " हे घे त्याल टाक... मी म्हटलं, लय मोटा झालास का? गाडी हाय म्हणल्यावर त्येलाला पैसंबी असत्यात तू जा आत.. आन मला कळवं, काय हुतंय ते... काळजी घे ताईची... " मी पुन्हा गाडीला स्टार्टर मारला... डोक्यात विचार सुरु हुतं... मी एकटा न्हाय, पण आस काय केल की समाधान मिळतयं... जीवाला बरं वाटतं, त्या ईश्‍वरानं आपल्याला आश्या लय संधी दयाव्या... त्या दिवशी माज्याकडं गाडी असल्याच पयल्यांदा एवढं कौतुक वाटलं हुत...! घरी आलो अंघोळ किली... कामाला लागलो सांजच्या येळेला म्हंजी ७ वाजता फोन आला..." भावा मामा झालो, पोरगा झाला... तुझं उपकार आयुष्यभर इसारणार न्हाय लका... सकाळी बोलायला जमलं न्हाय पण... "

असं म्हणताना त्याचा गळा भरून आला,... त्याच्या आवाजातलं कंप मला सगळं सांगत हुत... मी धीर दिला म्हणलं उपकार बिपकार आसल काय बोलू नगं बाबा, बहिणीची काळजी घे.. पुन्हा काय लागलं तर सांग... त्या दिवशी माझी बहीण बाळंतीण झाल्यासारखं वाटलं... सगळ्या काळजीची जागा, आता आनंदान घितली हुती... सगळीकडं वाईट बातम्या हुत्या, पण मला ह्या चांगल्या बातमीन जे बरं वाटलं हुतं ते नव्यानं आशा लावणारं व्हतं... ह्यो जन्म हाय तवर लोकांची सेवा करता आली पायजे हेच त्याच्याकडं मागून अंथरुणावर पडलो.... अशी गाढ आणि सुखाची झोप मला आजवर कवाच लागली नव्हती..