Rain
RainSakal

पाऊस अस्तोय असा बी...

मी पाचवीला जातोय शाळंला... आमच्या गावापसनं शाळा पाच मैलावर हाय, तशी गावात शाळा हाय चवथी पत्तुर..मग तिथनं पुढं मुरुडाला जावं लागतंय...पावसात शाळा नगो वाटती.

मी पाचवीला जातोय शाळंला... आमच्या गावापसनं शाळा पाच मैलावर हाय, तशी गावात शाळा हाय चवथी पत्तुर..मग तिथनं पुढं मुरुडाला जावं लागतंय...पावसात शाळा नगो वाटती. वरच्या पोरास्नी आर्धा तास आधी सोडत्यात.. तरिबी तासभर चालायचं. तेबी भर पावसात डोंगर चढायचा नगो वाटतं...पाऊस जास्त पडला की पुलावरनं पाणी जातं... त्या दिवशी सकाळपासनं पावसाची रिपरिप चालू हुती म्हनून मास्तरानी शाळा लवकर सोडली...आम्ही ४ पोरं आणि ५ पोरी हुत्या, एकवेळ पाऊस पडला, तर पोर घरीच थांबायची पण पोरींनी कवाच शाळेला खडा केला न्ह्याय, आजारी असल्या तरी शाळेत याच्या, त्यास्नी शाळा लयच आवडायची...जी गोष्ट सहज मिळती त्याची आवड कमीच असती माणसाला... ज्या गोष्टीला मिळवनं आवघड आसतं त्ये आवडतं... आन त्यजी किंमत सुदा राहती... पोरीसंनी शिकवायची आय- बापाची तयारी, त्यात एवढ्या लांब एकलीला कशी धडायची म्हणून बरोबरच्या पोरी असल्या तरच धाडायचं आस ठरल्याल हुतं... आपुन न्हाय गेलो तर दुसरीची शाळा बुडल म्हणून एकमेकींच्या सोबतीला जायच्या पोरी...

दहाच्या शाळलां सकाळी आठला घर सोडायचो आम्ही संध्याकाळी साडेचारला शाळा सुटली की सहा वाजायच्या घरी यायला, कधी कधी अंधार पडायचा... त्यात पावसाच्या दिवसात कायम अंधार पडताना गाव नजरला पडायचं...मग जाऊन चुलीपाशी तासभर बसायचो तवा गारवा जायचा अंगातला... मग जेवणं हुस्तवर १० वाजायचे. मग कवा अभ्यास करायचा तुम्हीच सांगा... तरिबी सगळी झोपल्यावर दिव्याच्या उजेडात ऐकलंच काय बाय खरडत बसायचं... पोरीचं तर बोलायलाच नगो... आल्या की भाकऱ्या थापा.. मग जेवणं झाली की भांडी घासा... ह्यातनं सगळं करुनबी अभ्यास कायम पूर्ण असतो त्यांचा... कवा करत्यात आन किती तास झोप्त्यात देव जाणे... वर्गात पहिल्या तीन नंबरात आमच्यातली दीपी असती...आज लयच जोरदार पाऊस झाल्याला... काल रात्री पसन पाऊस थांबला नव्हता. तवा आज नदीला पूर यणार ह्ये माहीत हुत... आम्ही सगळी शाळेपासून चिखल तुडवत पुलाकडं येत हुतो... छत्रीच्या तिरगाण्या झाल्या हुत्या... गोंपाटाची केल्याली ख्वाप सगळी भिजून आत पाणी झिरपत हुतं... सगळ्यांचा दप्तरं वाचवायचा प्रयत्न हुता... आताच घरच्यांनी कशीबशी रडून रडून नवी दप्तरं आन वह्या घिवून दिल्या हुत्या... त्या भिजल्या तर पुन्हा वर्षभर पंचायत हुयाची आन घरी मार बसला त्यो येगळाच. म्हणून आधीच वह्या पुस्तक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्या हुत्या... तरिबी भ्या हुतंच... च्यागत गढूळ झालेलं पाणी समुद्राच्या लाटेगत पुलावरून पलीकडं पडत हुतं...आम्हास्नी असल्या पाण्याची सवय हुती, पण आज भ्या वाटतं हुत... पावसामुळं वाहतूक मात्र बंद झाली हुती...

पाणी वसरावं म्हणून तासभर तिथंच वाट बघितली, पण पाणी काय वसरंना...अंधार हुयाला आला हुता.. एकदा का आंधार पडला, तर पुन्हा सगळंच आवघड हुनार हुत... आम्ही सगळ्यांनी साखळी करायची ठरवली... एकमेकांचा हात धरून पुलावरनं पलीकडं जायचं ठरलं.. हळूहळू एकमेकांना धीर देत पाण्यात उतरलो... पाणी खवाळलं हुत... तरिबी आम्ही एकजूट किली... पाण्याखाली कुणीतरी पाय ओढतंय आसं वाटत हुतं...हिम्मतीनं आम्ही एक एक पाऊल टाकीत हुतो...पोर पुढं लागलो हुतो. जर काय वाटलंच तर पोरींना तिथंच थांबवता यील... पुलावर कुठं खड्डा काय हयेजा अंदाज हुता, तरी आता पाण्यानं काय वाढीव झालं नसलं म्हजी मिळवलं... पोरं मध्यभागी आली... पोरीबी आमचा हात धरून चालत हुत्या... दीपी भेल्यामुळं सगळ्यात शीवटी चालत हुती... हळूहळू पोर कशिबशी पलीकडं आली... पोरी किंचळत, वरडत एक एक पाय टाकीत हुत्या... पाणी त्यास्नी आत वडत हुत... तरिबी आम्ही साखळी सुडली नव्हती... अचानक दीपीचा पाय खड्ड्यात पडला, आंन तिजा हात सुटला... बघता बघता ती त्या गढूळ पाण्यात गायब झाली... शेवटची किंचाळी तिवढी आयकू आली... सगळी सुन्न झालो... पोरींनी रडायला सुरुवात किली... कुणालाच कायच सुचत नव्हतं... एका मिनटात हुत्याच नव्हतं झालं हुत... आम्ही तितंच रस्त्यावर मुडगा घालून बसलो... पोरी नुसत्या रडत हुत्या.. वर धो धो पावसाचा आन पुलावरनं पडणाऱ्या पाण्याचा आवाज काळीज चिरतर हुता बाकी सगळं गप्पगार हुतं... कितीसा यळ गेला कुणास ठावक... पण लयच उशिर झाला म्हणून गावातली माणसं आली हुती... आमच्यात दीपी न्हाय म्हणल्यावर झाल्याला सगळं त्येनंच्या ध्यानात आलं... दीपीचा बाप त्या पुलावरच्या पाण्याकडं राहून राहून पळत हुता... माणसांनी त्याला धरून ठिवलं हुतं... सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी हुतं, पण पावसानं आन काळ्याकुट अंधारातनं त्ये कुणाला दिसलं नव्हतं एवढंच... कुणाला ह्यो पाऊस आवडतो... त्याज्यावरची कविता आवडती... आमच्या शाळेत पण पावसावर लय लिहलंय तिकडच्या बंगल्यातल्या लेखकांनी... गावाकडच्या पुरात एकदा भिजवायला पायजे त्यास्नी... त्या पुलावरनं वाहणारं आन आमच्या दीपीला न्हेणार पाणी ओंजळीत घेऊन तोंडावर मारायला पायजे आन जाग करून सांगायला पायजे ह्यो आसाबी पाऊस अस्तुय...ह्याज्यावर बी कविता करा म्हणावं एखांदी....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com