दंगलीत मरतो माणूस

दंगल कुठेही आणि कधीही झाली तरी त्यात नुकसान सामान्य माणसांचेच होते. बळी जातो तो माणुसकीचाच.
दंगल कुठेही आणि कधीही झाली तरी त्यात नुकसान सामान्य माणसांचेच होते. बळी जातो तो माणुसकीचाच.

आसिफ माझा शाळेतला दोस्त... आमच्या मागच्या बेंचावर बसायचा... पोरींगत डोळ्याखाली काजळ लावायचा... त्याज्यावरनं आमी त्याला लय चिडवायचो... गुरजींनी सर्व धर्म समभाव शिकवताना समजलं, आसिफचा आणि माझा धर्म येगळा हुता... कान, नाक, डोळं समद एकसारंखचं, मग वेगळं कायं हुतं मला कवा कळालचं न्हाय... त्यो नवरात्रीला नव दिवस उपास धरायचा, बिना चपलीचा फिरायचा... गणपतीत एकवीस मोदकाचा प्रसाद आनायचा... ईदला आमीबी त्याज्याकडं बिर्याणी आन शीरखुर्मा खायला जायचो... शाळा संपली आन बापानं त्याला चिकनचं दुकान टाकून दिलं... मी बी नंतर कामाला लागलो... गावात कधी येनं जाण झालं तर बोलणं व्हायचं... हिथल्या माणसात इतकी मिळसून गेली हुती ही माणसं, की कधी परकेपणा वाटलाच न्हाय... मी आसिफच्याच दुकानातनं चिकन घ्याचो... त्याच्याकडं चांगलं मिळायचं, लोकांची काळजी असायची त्याला... त्यानं कधीच धंद्यात बेईमानी केली न्हाय... जेवढ्या मनापासन मशिदीत चादर चढवायचा, तेवढ्याच आनंदान देवळात गुलाल उधळायचा...... आता भेटला की म्हणतू टायम नसतो तुला... लयं बोलायचं असतं तुझ्याशी, कव्हातरी निवांत भेट... पण निवांत भेटणं कधी झालचं न्हाय...
माझ्याबी मनाला रुखरुख लागून राहायची... कधीतरी वेळ भेटायचा त्याला, पण भेट राहून जायची...

सगळं चांगलच सुरू हुतं... कुठंतरी मंदिर आन मशिदीवरनं दंगल उसाळली... जाळं तिकडं झाला, पण धूर तेवढा गावापतर आला... दोघांचं समाज एकवटलं, मीटिंगा झाल्या... हिकडून तलवारी, तर तिकडच्यानी सत्तूर उपसली गेली. रात्रभर गस्ती झाल्या... दुकानं बंद झाली.. बाजारपेठा मोकळ्या झाल्या... तणावाचं वातावरण तयार झालं... रात्री नुसतंच हातरूनावर पडलो आन मोठं मोठ्यानं आरडा ओरडा आयकू आला... पटापट रात्रीच्या अंधारात माणसं गोळा झाली... सगळी टू-व्हीलर फोर-व्हीलर मधनं गावाभायर आली... निघता निघता आपल्यातल्या एकाला कुणीतरी मारल्याच्या बातम्या कानावं आल्या... वाद आता विकोप्याला गेला हुता... 

कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं.. गावात सगळ्या कार्यक्रमाला दोन्ही धर्मांचा सलोखा असतो... तिकडं कायबी झालं तरी हिकडं फरक पडत नसतो... त्यांच्या उर्दूत मराठी आन आपल्या मराठीत तुटकी हिंदी आपोआप आली हुती... पण ह्यायळी गोष्ट यगळी हुती. आम्ही सगळी गल्लीच्या बाहेर पोचलो जित मारहाण झाली हुती... माझ्या डोळ्यादेखत त्यांच्यातल्या एकाला घरातन वडून बाहेर काढला हुता... रात्रीच्या अंधारात तोंडाला फडक बांधल्याला त्यो आपला आसिफ हे कळस्तवर धिंगाणा झाला हुता... सपासप त्याच्या अंगावर दोन वार झालं, अंगातनं रगात आलं पण .. त्यांच्यातलं कुणी बाहेर आलं न्हाय... आसिफ तिथंच पडला, जमाव पांगला... मी एकटाच माग राहिलो... मला आसिफची अवस्था बघवत नव्हती... त्याच्या अम्म्मी अब्बूला त्यो यकुलता एक पोरगा हुता.. माझ्या डोळ्या समोर त्याज घर लक्ख दिसत हुत... त्याला दवाखान्यात न्यायला मी खांद्यावर घेतला.. रगात माझ्या शर्टावन आत झिरपायला लागलं हुत... मला त्यजा वलावा जाणवत हुता... माझ्या डोळ्यासमोर अंधारात रस्ता आणि लांब कुठनं तरी दंगलीचा आवाज येत हुता... मी पटापट पावलं टाकीत हुतो...

अचानक माझ्यावर वार झाला मला काय कळायच्या आत मी जमिनीवर पडलो हुतो... आसिफ माझ्या पुढ्यात पडला हुता... मला मारायला सुरुवात झाली, इतक्यात पोलिस सायरनचा आवाज आला... जमाव पांगला खरा, पण आता कुणी कुणाला दवाखान्यात न्यायचं असा प्रश्‍न हुता... दोघांचं रगात एकमेकांत मिसळत हुत... अंधारात पण लालसर दिसत हुतं... आता सगळीकडे शांतता हुती, डोळे आपोआप मिटायला लागलं हुतं... थकव्यानं झोप येत होती, आसिफ म्हणाला... दोस्त हुतो आपण, कधी भांडण न्हाय का तंटा... कायम एकमेकाला साथ दिली मग आपल्यावर वार का? दंगल का झाली आसंल, म्हायत न्हाय, पण दंगलीत हिंदू- मुसलमान मरत न्ह्यायं, मरतो त्यो माणूस...आन माणूस मारणं पाप असतं हे सगळ्यांचा धर्म शिकिवतो...

मग आपल्या बायका पोरांचं काय ?.. मी म्हणलं आता एवढ्या दिवसात भेटलायस, निवांत झोप लागस्तवर बुलू... तुला बोलायचं हुता ना निवांत... लयं बोल्लो, आम्ही त्या रात्री अगदी झोप लागस्तवर...

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com