मोबाईलवरची शाळा!

आम्ही पवून आल्यावर चिंचंच्या सावलीला निवांत बसलो हुतो... गण्या...पप्या, सगळ्यांनी कालच्या ऑनलाइन लेक्चरला काय झालं त्ये सांगितलं... पुन्हा एक वाजता लेक्चर हाय म्हणून सगळी उठून गेली.
Mobile School
Mobile SchoolSakal

आम्ही पवून आल्यावर चिंचंच्या सावलीला निवांत बसलो हुतो... गण्या...पप्या, सगळ्यांनी कालच्या ऑनलाइन लेक्चरला काय झालं त्ये सांगितलं... पुन्हा एक वाजता लेक्चर हाय म्हणून सगळी उठून गेली. माज्याकडं फोन नसल्यानं मी तिथंच चिंचंखाली कलंडलो... आमचं पप्पा तालुक्यातल्या हॉटेलला वेटर हायत... दर आठवड्याला सुट्टी आसली की गावाला यत्यात; पण मला त्ये यत्यात त्यापेक्षा त्या हॉटेलातलं राहिल्यालं मटाण आणत्यात, त्ये लय बरं वाटतं... मला आठवत न्हाय, आमच्या घरात शेवटचं मटाण कवा केलं हुत... आय लोकाच्या घरांवर कामावर जाती... एकदा मी तिज्याबर गेलंतो, लय आवगड आसतंय तिजं काम... वाळू आन सिमेंट कालवलेला माल दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर घिवून जावा लागतो... आसं वाटायचं, शाळा शिकली की नोकरी लागती आन नोकरी लागली की पैसं येत्यात... मग पैस आलं की आपून मोटं घर बांदायचं... पण आता मला माजीच आय त्या घरावर कामाला आसल्याली दिसती... नगो वाटतं... ज्याला रहायचंय, त्योच का न्हाय त्याचं घर बांधत... चिमणी कशी स्वत:चं घर स्वत:च बांधती... तसं माणूस का करत न्हाय... मला कायबाय मनात याला लागलं...

गावात लिंबाच्या पेड्यावरच फुल रेंज येती... गण्या, दीप्या, पप्या सगळी तिकडंच जात्यात... मी त्येंच्याबर नुस्ता जातो... गण्या माज्या वर्गात आसल्यामुळं त्याज्या मोबायलमधी माजा आब्यास हुयाचा... पण त्याला आब्यास करायचंच नव्हतं...

त्यो हिकडं यवून गेम खेळायचा, न्हायतर दुसरंच कायतरी बगत बसायचा... घरातली आशी त्यला मोबायलला हात लाव द्याची न्हायत... मग लेक्चरच्या टायमाला मनासारखं वागायचा त्यो... मी लयदा म्हणलं त्यला, लेक्चर बगत जावं, पण न्हाय आयकला त्यो... त्येजा मोबायल आसल्यामुळं माजं कायच चालायचं न्हाय... मला वाटायचं, मला आब्यास करायचा आसून माज्याकडं फोन न्हाय अन ह्याज्याकडं आसून करीना झालाय...

आयकडं सादा फोन हाय, त्यज्यावर लेक्चर बगायला यत न्हाय... मी आय आन आण्णांच्या लय मागं लागलो, मलाबी फोन घ्या म्हणलं... आण्णांचा फोन आला की एवढंच बोलून ठिवतो आता. मला त्येंच्याबर बुलू वाटत न्हाय... आसलं कसलं काम करत्यात, सादा फोन घ्याला यत न्हाय ह्यासनी... मी जेवाण टाकलं... मला कसंच करमंना झालंय... कायच करू वाटंना... मला लेक्चर बगायचा हाय... मी नापास झालो तर गावातली माणसं काय म्हणत्याल... मला जाव द्या; पण आय आन आण्णास्नी काय म्हणत्याल... पोरगं नापास झालं म्हणत्याल... काय शिकावलं न्हाय म्हणत्याल... तवा कोणच ह्येंच्याकडं फोन न्हाय म्हणणार न्हाय... माजा आब्यास मागं राहिलाय... शिकवल्यालं सगळं धडं मला बगायला भेटलं न्हाय... मी घरीच गुरुजींगत वाचून काडलं... वहीवर प्रश्न-उत्तरं सोडवली... पण विज्ञान आन गणितातलं वाचून कायच कळत नव्हतं...

कुणी आपल्याला त्यजा मोबायल दिल आसबी वाटत नव्हतं... सरकारला वाटलं आसंल, समद्यांकडं फोन हायत; पण नुस्तं फोन आसल्यावर लेक्चर दिसत न्हाय ह्ये म्हायत न्हाय व्हय ह्यास्नी... तिकडं शहराकडची शाळंतली पोरंबी फोन वापरत्यात म्हणं; आन आमच्या आय-आण्णांकडं काम करून कमवूनबी आजून तसला फोन न्हाय... कुणाचा इचार करून ही फोनवरची शाळा सुरू किली आसंल बरं... आयनंसुदा लय जणांपुढं हात पसरलं... एकादा जुना पडल्याला आसला तरी द्या... पोराच्या शाळंचं नुकसान नगो म्हणायची आय... कामावर मुकादमाकडं आजीच्या आजारपणाला पैसं घेतल्यालं आजून फेडलं नव्हतं... आण्णांनीसुद्धा

आधीच दवाखान्यात मालकाकडनं घेतल्याली उचल संपिवली हुती... तरी आजी काय वाचली न्हाय... पण पैसं दिवूनबी माणूस वाचला न्हाय तरी देणारा पैसं माफ करीत न्हाय... आन आजारी आसूनबी पैशासाटी माणसाला आवशीद पाणी दिलं न्हाय तरी मरणारा माणूस माफ करीत न्हाय... आण्णा म्हणलं, म्हातारी वाचली म्हंजी पैसा काय पुन्हा उबा करू... पण म्हातारीबी गीली आन पैसंबी... त्यात कामधंद्याची आबाळ झाली... मला समदं कळत हुतं... पण राहून राहून वाटायचं... आसं कितीसं पैसं लागत्यात फोन घ्याला... माज्या आय-बापाकडं तेवडंबी न्हायत, आसं का... दोगंबी शाळा शिकली न्हायत म्हणून आज माज्या शाळंचं आवगड झालंय का... आन शिकूनबी त्या गण्याच्या फादरनं बाप जावू पण पैसा सोडला न्हाय. ह्ये शानपण माझ्या बापाला आलं आसतं तर... मला त्येला बाप म्हणायचीच लाज वाटली आसती का... मला कायच कळत नव्हतं... दुपारचं ऊन वाढायला लागलं हुतं... घरात जावून जेवून गुरांकडं जावं म्हणलं म्हणून मी सपासप पाय टाकायला सुरुवात किली...

घरात आयनं जेवायला वाढलं... पुस्तक आन कपड्यावर पाणी शिडकून बाटलीला गुंडाळल्याली पाण्याची बाटली भरून ठिवली... मी मला कायच वाटत न्हाय आसं दाकवून गुरांकडं गेलो... दिवसभर गुरं चारली; पण माजं मन काय त्यात लागलं न्हाय... मला लय शिकून मोटं करावं आसंच आय आन आण्णांस्नी वाटायचं... घरी आलो तवा बगितलं, आण्णा घरी आलं हुतं... आज मटणाचा बेत हुता... जेवण झाल्यावर आण्णा म्हणलं, एक सेकन्ड हॅन्ड फोन बगितलाय... आन दोगांनी मिळून पैशांची जुळणीसुद्धा केलीया... उद्याच जावून फोन आणायचा तुला...

मी सकाळी लवकर उटलो... सगळ्यात आधी आंगूळ करून तयार झालो... आण्णांस्नी उटीवलं... तयारीला लावलं... आण्णांचं आवरंस्तवर रेडिओवर गाणी आयकू म्हणलं... आण्णा आवरत हुतं... आय भाकऱ्या थापत हुती आन रेडिओवर बाय सांगत हुती... आमच्या वार्षिक परीक्षा रद्द झाल्या हुत्या... मी आयपाशी जावून तिच्या कुशीत शिरलो... मला कायच कळत नव्हतं... तवर आण्णाबी तयार हुन आलं... माझ्या डोळ्यांत पाणी हुतं... त्यांनी काळजीनं, काय झालं म्हणून इचारलं... मी म्हणलं, आण्णा माजी परीक्षा रद्द झालीया... आता पुढच्या वर्षी बगू... तुम्ही ह्यातनं कर्जाचं पैसं भरा... आण्णा म्हणलं, न्हाय, ह्ये तुज्या फोनचं हायत, ह्यातनं फोनच घ्याचा आन आजच घ्याचा...

मी म्हणलं, "नगो आण्णा... आवं पैसंबी गेलं आन म्हातारीबी वाचली न्हाय, तर काय उप्योग सांगा की..."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com