शहाणं बाळ! (नितीन राणे)

नितीन राणे nitinr2607@gmail.com
रविवार, 3 जून 2018

सागर-सान्वीला वेळ असेल-नसेल तेव्हा घरातली सगळी छोटी-मोठी कामं सोपानराव करू लागले.
कुठल्याच कामाची लाज त्यांनी बाळगली नाही. समोरच्याचे मूड्‌स, प्रसंग ओळखून ते स्वतःचं वागणंही बदलू लागले. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल, तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही, ही एक गोष्ट त्यांना चांगलीच पटली होती व तिचा प्रत्ययही त्यांना घरात येत होता...

सागर-सान्वीला वेळ असेल-नसेल तेव्हा घरातली सगळी छोटी-मोठी कामं सोपानराव करू लागले.
कुठल्याच कामाची लाज त्यांनी बाळगली नाही. समोरच्याचे मूड्‌स, प्रसंग ओळखून ते स्वतःचं वागणंही बदलू लागले. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल, तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही, ही एक गोष्ट त्यांना चांगलीच पटली होती व तिचा प्रत्ययही त्यांना घरात येत होता...

अचानक आलेल्या पावसानं टेरेसवरचं सुकवण घरात आणताना सोपानरावांची त्रेधातिरपिट उडत होती. ऑफिसला जाण्यापूर्वी सून सान्वी हिनं ते टेरेसवर वाळवायला ठेवलं होतं. सोपानराव नातू चिन्मयला नुकतेच शिकवणीवर्गाला सोडून आले होते; त्यामुळं सुकवण घरात आणताना त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळं काही घरात आणेपर्यंत थोडंफार भिजलंच; पण फॅन सुरू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवलं.
इतक्‍यात त्यांचा मोबाईल-फोन वाजला. सान्वीचाच फोन होता. "सुकवण आत आणलंत का?' हेच विचारण्यासाठी तिनं तो केला होता. शिवाय, चिन्मयचीही चौकशी करून तिनं फोन ठेवून दिला.

संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. सोपानरावांनी गॅसवर कढई ठेवली आणि ते बाकीची तयारी करू लागले. सुरवातीला चहा करतानासुद्धा त्यांच्या खूप चुका व्हायच्या; पण सकाळच्या वेळी किचनमध्ये सान्वीबरोबर लुडबूड करून त्यांनी चहाचं तंत्र आत्मसात करून घेतलं होतं आणि एके दिवशी मुलगा सागर आणि सान्वी ऑफिसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांच्या पुढ्यात फक्कड चहा ठेवून त्यांनी दोघांना सरप्राईजही दिलं होतं. सागरला तर कमालीचं आश्‍चर्य वाटलं होतं. गॅस कसा पेटवतात हेही ज्या बाबांना नीट माहीत नव्हतं, त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब...
त्या दिवशीपासून सोपानरावांचे आणि चिन्मयचे "प्रयोग' सुरू झाले. इंटरनेटवर रेसिपीज्‌ पाहायच्या
आणि काही ना काही नवनवीन खाद्यपदार्थ करत राहायचे...
सागर-सान्वी ऑफिसला गेल्यावर सोपानराव विचार करत राहायचे...दोघंही घरी आल्यावर त्यांना खूश कसं करता येईल याविषयीचे विचार...
आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळं सोपानरावांना वेगळंच काही तरी करायचं सुचलं होतं आणि ते चक्क कांदा चिरायला बसलेसुद्धा.
* * *

असाच एके दिवशी सावित्रीबाईंचा, म्हणजे बायकोचा, हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते, तेव्हा सोपानरावांना कांदा चिरायला सांगताना सावित्रीबाईंना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या, तेव्हा कुठं त्यांनी कांदा चिरला होता. तोही वैतागत. त्या प्रसंगाची आठवण आज सोपानरावांना झाली आणि त्यांचं मन गतकाळात गेलं...
सोपानराव नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर सावित्रीबाईंसाठी खूप काही करायचं त्यांनी ठरवलं होतं. ती माउलीही खूप खूश होती; पण ते सुख नियतीला पाहवलं नाही. सावित्रीबाईंना दुर्धर आजार असल्याचं कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, सावित्रीबाई आता केवळ काही दिवसांच्याच सोबती होत्या...

सोपानरावांनी रंगवलेल्या सेवानिवृत्तीनंतरच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. सोपानराव सावित्रीबाईंची खूप काळजी घेऊ लागले. त्यांना काय हवं, काय नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसला तरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती. त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला, तर सावित्रीबाईंच्या हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईंनी त्यांना तो खुणेनंच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरवात केली....

"प्रिय सोपान,
-मी तुम्हाला एकेरी हाक मारते आहे, याबद्दल मला माफ करा...पण आज तसंच म्हणावंसं वाटतंय. खूप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी, अशी माझी इच्छा होती; पण कधी धीरच झाला नाही! मी आता फार जगेन असं वाटत नाही. कालच सूनबाई आणि सागर बोलत असताना काही गोष्टी कानावर आल्या. खरंतर आज तुम्हाला हे प्रत्यक्ष बोलूनच सांगणार होते; पण काल रात्रीपासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो. बहुतेक त्या दोघांनाही माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणीच मरणोत्तर गोष्टींचं बोलणं दोघांमध्ये सुरू होतं. मला माझी काळजी नाहीये; पण माझ्या पश्‍चात तुमचं कसं होईल, याची चिंता मला लागून राहिली आहे. तुमच्या जवळचं
तुटपुंजं धनही मुलांच्या लग्नांत आणि माझ्या औषधोपचारांत संपत आलंय. कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची अधिकच काळजी वाटू लागली आहे. माझ्या मरणानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला, तरी त्याचं मत बदलायला वेळ नाही लागणार. ...तर आता, मी काय सांगते ते नीट ऐका...इथून पुढं तुम्हाला "शहाणं बाळ' बनून राहावं लागणार आहे. मुलाची-सुनेची अडचण न ठरता त्यांची सोय बनून राहावं लागणार आहे. कदाचित ते दोघंही नोकरीला असल्यामुळं माझ्या पश्‍चात रोजच्या संसारातले निर्णय घेण्याची जबाबदारी त्या दोघांचीच राहील, ते ठीकही आहे...पण तुम्हालाही तुमचं अस्तित्व दाखवून द्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाहीये. थोड मनकवडं व्हावं लागेल इतकंच! घरातली छोटी-मोठी कामं "आपली कामं' समजून आत्मीयतेनं केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना तुम्ही हक्कानं एखादी गोष्ट मला सांगत होतात आणि ती मी करतही होते; पण आता तुमची कामं तुम्हालाच करावी लागतील, हे लक्षात घ्या. हे सगळं तुम्हाला सुरवातीला कठीण जाईल, हे मला माहीत आहे. हे सगळं करण्यापेक्षा आपण वृद्धाश्रमातच का जाऊ नये,
असाही विचार तुमच्या मनात येऊ शकेल. मात्र, वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल, न होईल; पण इथं तुम्हाला आपल्या माणसांत तरी राहता येईल, हे विसरू नका.

एक सांगू, मी जशी एक स्त्री आहे, तशीच आपली सूनदेखील एक स्त्रीच आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात, त्या ओळखून वागलं की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज्‌, आवडी-निवडी, कल हे सगळं जपलं की ती माणसं आपलीशी बनतात. शेवटी, माणूस सगळ्यात जास्त कशाचा भुकेला असतो तर प्रेमाचा! हे प्रेमच आता तुम्हाला तुमच्या मुलावर, सुनेवर आणि नातवावर करायचं आहे. त्यांची मनं ओळखून वागायचं आहे. मग तुम्ही म्हणाल, "माझ्यावर कोण प्रेम करणार...?' तर मी तेही सांगते तुम्हाला, सृष्टीचा एक नियम मला माहीत आहे व तो म्हणजे, एखाद्याला प्रेम दिलं तर ते तुम्हाला सव्याज परत मिळत असतं. तुम्हालाही ते तसंच मिळेल. मी म्हणतेय म्हणून एकदा "शहाणं बाळ' बनून बघा. घर तुमचंच आहे; पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सगळ्यांचे आवडते बनून जगण्यातही एक प्रकारची मजा आहे...
- तुमची सावित्री'
* * *

पत्र वाचून झाल्यावर सोपानरावांचे डोळे पाणावले. ते विचार करू लागले..."स्वतः मरणोन्मुख आहे बिचारी; पण माझी किती काळजी करतेय सावित्री... तिचं सगळं आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेलं. मी तर कधीच तिचं म्हणणं ऐकलं नव्हतं. स्वतःचंच खरं करत आलो होतो. मात्र, आज तिचं ऐकण्याची हीच वेळ आहे. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी मला "शहाणं बाळ' व्हायला हवं...' सावित्रीबाईंना वचन देण्यासाठी सोपानरावांनी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर अस्पष्ट हास्य उमटलं; पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून त्या नकळत अनंतात विलीन होऊन गेल्या होत्या.
* * *

त्या दिवसापासून सोपानराव स्वतःत हळूहळू बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
खारीचा वाटा उचलू लागले. दोन महिन्यांनंतर सान्वीनं वृद्धाश्रमाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला; पण
तो शेवटचा होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. सागर-सान्वीला वेळ असेल-नसेल
तेव्हा अगदी गिरणीतून दळण आणण्यापासून ते घरातली साफसफाई करण्यापर्यंतची सगळी कामं सोपानराव करू लागले. संकोच-लाज त्यांनी बाळगली नाही. समोरच्याचे मूड्‌स, प्रसंग ओळखून ते स्वतःचं वागणं बदलू लागले. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल, तर त्या व्यक्तीपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही, ही एक गोष्ट सोपानरावांना चांगलीच पटली होती आणि तिचा प्रत्ययही त्यांना घरात येऊ लागला होता. सान्वीचं वागणं बदललं. तीही त्यांच्याशी प्रेमानं वागू लागली. आपल्याशी अगोदर केवळ कामापुरतं बोलणाऱ्या बाबांचं सध्याचं वागणं सागरलाही आवडू लागलं. तोही त्यांच्याशी मनमोकळेपणानं वागू-बोलू लागला.
विस्मरणात गेलेला सोपानरावांचा वाढदिवसही सागर-सान्वीनं उत्साहात साजरा केला. हे सगळं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत, सावित्रीबाईंचं "शहाणं बाळ' घरात आता चांगलंच रांगू लागलं होतं.
इतक्‍यात दारावरची बेल वाजल्यानं सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर सागर-सान्वी आणि चिन्मय चिंब भिजून उभा.
'अरे, तुम्ही तर पूर्ण भिजलात की...आणि चिन्मयला का आणलंत तुम्ही? मी त्याला आणायला जाणारच होतो,'' असं म्हणत बाथरूमकडं वळत सोपानरावांनी तिथला गिझर सुरू केला.
'बाबा, पाऊस खूप पडत होता म्हणून आम्हीच चिन्मयला घेऊन आलो. परत तुम्हालाही त्याला आणायला जावं लागलंच असतं ना? आणि तुम्हीही भिजला असतातच की....'' चिखलानं भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला.
बाहेर अजून पाऊस पडतच होता. सर्वजण फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात सान्वी गरमागरम भज्यांच्या प्लेट्‌स घेऊन हॉलमध्ये येताना दिसली.
-'बाबा, खरं सांगू का? मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटतच होती,'' भज्यांची एक प्लेट सोपानरावांना देत सान्वी म्हणाली.
'अगं सान्वी, बाबा ना मनकवडे झालेत!'' बाबांच्या प्लेटमधलं एक भजं उचलत सागर म्हणाला.
हे ऐकल्यावर सोपानरावांनी गालातल्या गालात हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडं पाहिलं आणि भज्याचा
एक तुकडा तोंडात टाकला. अगदी "शहाण्या बाळा'सारखा...!

Web Title: nitin rane write article in saptarang