आनंदी देशाची सफर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

costa rica country

ग्रॅनडा शहरातून मी ‘कोस्टारिका’ देशाकडं प्रस्थान केलं. खूप सहजतेने हा १२० किलोमीटरचा प्रवास मी पार पडला, रस्ते मोठे आणि बाजूला झाडे आणि पवनचक्की यामुळे मला वेळ कसा गेला ते समजलेच नाही.

आनंदी देशाची सफर...

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

ग्रॅनडा शहरातून मी ‘कोस्टारिका’ देशाकडं प्रस्थान केलं. खूप सहजतेने हा १२० किलोमीटरचा प्रवास मी पार पडला, रस्ते मोठे आणि बाजूला झाडे आणि पवनचक्की यामुळे मला वेळ कसा गेला ते समजलेच नाही. माझ्या यात्रे दरम्यान मी सोळाव्या देशात कोस्टारिका मध्ये प्रवेश केला होता. सायंकाळची वेळ होती, यापूर्वी मी कधी एवढ्या उशिरा कुठल्या देशाची सीमा पार करून गेलो नव्हतो. मी पुढं जाण्याचा विचार केला, पण अंधार, लहान रस्ते आणि मोठया गाड्या यामुळं जास्त वेळ सायकल चालवणं धोकादायक होतं. संध्याकाळचे सात वाजायला आले होते, मी आत्तापर्यंत १० किलोमीटरचा प्रवास या देशात केला होता.

आजूबाजूला घनदाट झाडी आणि डोंगराळ भाग यामुळे मला तंबू लावून त्यात राहणे अवघड होते. त्यामुळं निवाऱ्यासाठी घरं पाहत होतो, जेणेकरून मला रात्री आराम करता येईल. मला रस्त्यालगत एक पत्र्याचे छत असलेले घर दिसले, त्याच्या समोर खूप फुलझाडं होती, अशी फुलझाडं असलेल्या लोकांकडचा माझा अनुभव चांगला होता.

मी आत गेलो आणि घरच्या दरवाज्यावरून हाक मारली, आतून एक महिला, साधारण माझ्या वयाची होती व तिच्या कडेवर एक बाळ होतं, ती एकटी होती. मला वाटलं की ती मला नाही राहू देणार. कारण अमेरिकेमध्ये असताना मी असेच एका महिलेच्या घरी गेलो होतो, जिथे तिचा नवरा बाहेर होता आणि तिचं एक मूल होत तिने मला सांगितले होते की ‘मी निर्णय घेऊ शकत नाही कारण माझा नवरा बाहेर आहे.’ असे जगभरात खूप ठिकाणी झाले जेव्हा मी कोणा घरी जायचो तेव्हा प्रथम महिला दरवाजा उघडायची आणि माझी विनंती ती आपल्या पती किंवा घरातील पुरुषाकडे सांगायची आणि ते पुरुष निर्णय घेत. जर महिला ही वयस्कर आणि प्रमुख असले तर ती निर्णय घ्यायची, यावरून जगभरातील महिलेचे स्थान अजूनही दुय्यम आहे हे समजते. पुरुषसत्ताक समाजाची ही लक्षणे मी जगभरात पाहत होतो. आज मला ते परत दिसतील असे वाटले, मी त्या महिलेला विचारले "आज रात्री मी तिथे राहू शकतो का?" त्यापूर्वी माझ्या यात्रेबद्दल सांगितले, ती विचार करू लागली आणि लगेच म्हणाली "हो तू राहू शकतो" आणि मला विश्वासच बसेना नाही की ती असे काही उत्तर देईल म्हणून, तिच्या या निर्णय क्षमतेवर मी थक्क झालो. यामागचे कारण शोधण्याचा मी प्रयत्न करू लागलो आणि जसे जसे मी पुढे कोस्टारिका मध्ये प्रवास करत होतो तसं मला याची उत्तरे मिळू लागली.

कोस्टारिका या देशाच्या उत्तरेस निकाराग्वा आणि दक्षिणेस पनामा आणि बाजूला प्रशांत महासागर आणि दुसऱ्या बाजूला कॅरिबिना समुद्र. या देशाचे क्षेत्रफळ भारताच्या दीड टक्के आहे. यावरून त्याचा छोट्या आकारमान बदल समजू शकते. या देशाची लोकसंख्या साधारण ५० लाखाच्या आसपास, म्हणजे आपल्या पुणे शहरापेक्षाही कमी. इथे स्पॅनिश भाषा बोलली जाते, इतर मध्य आणि दक्षिण अमेरिकेप्रमाणे इथेही स्पॅनिश देशाची वसाहत होती. त्याआधी इथे खूप साऱ्या जमाती होत्या त्यांच्यावर उत्तरेकडील मायन सभ्यता आणि दक्षिणेकडील अँडी पर्वतावरील इंका सभ्यता याचा प्रभाव होता. येथील लोक मला खूप अभिमानाने सांगत की आमच्या देशात युद्धसैनिक नाही हे एकूण मी आश्चर्यचकित झालो, यापूर्वी मी सैन्य नसलेला देश पहिला नव्हता. खूप मोठा सरकारी पैसा हा सैन्यासाठी लागतो त्यामागची कारणे म्हणजे दुसऱ्या देशाकडून असलेल्या भीतीमुळे स्वसंरक्षणासाठी किंवा दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी आणि सोबत देशात लोकांना काबू करण्यासाठीही सैन्याचा वापर जगभरात केला जातो. या देशात असे सैन्य का नाही ? याची करणे मी शोधू लागलो व सोबत त्याचे फायदे.

१ डिसेंबर १९४८ रोजी, कोस्टारिकाचे राष्ट्राध्यक्ष जोसे फिग्युरेस फेरर यांनी त्या वर्षी कोस्टारिकाच्या गृहयुद्धात विजय मिळविल्यानंतर कोस्टारिकाचे सैन्य संपुष्टात आले. सैन्यावर होणारा खर्च हा आता शिक्षणावर आणि आरोग्यावर होऊ लागला. इथं ६.९ टक्के खर्च शिक्षणावर होतो त्यामुळे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मुलांना मिळते. इथे ९६ टक्के लोक साक्षर आहेत, सोबत मोफत आरोग्य सेवा हा आपल्या नागरिकांना देते. अमेरिकेतील इंटेल कॉर्पोरेशनने १९९७ मध्ये कोस्टारिकामध्ये एक मोठी मायक्रोप्रोसेसर सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उघडली, ज्यामुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या. तेव्हापासून, इतर मोठ्या परदेशी तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल कंपन्यांना देशाचे स्थान, राजकीय स्थिरता, महाविद्यालयीन पदवीधरांची उच्च संख्या आणि कर सवलतींमुळे आकर्षित केले. हा देश लॅटिन अमेरिकेतील सर्वांत आनंदी देश असल्याचे म्हटले जाते. त्याच्या कारणांमध्ये सामाजिक सेवांची उच्च पातळी, तेथील रहिवाशांचा काळजी घेणारा स्वभाव, दीर्घायुष्य आणि तुलनेने कमी भ्रष्टाचार यांचा समावेश होतो व ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. नोव्हेंबर २०१७ मध्ये, नॅशनल जिऑग्राफिक मासिकाने कोस्टारिकाला जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून घोषित केले होते.

इथं राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रे, देशाच्या भूभागाच्या सुमारे २३.४ टक्के व्यापतात. हे देशाच्या क्षेत्राच्या टक्केवारीनुसार जगातील सर्वांत मोठे राखीव आहे. सुंदर असे समुद्रकिनारे, जंगले आणि आनंदी जीवन जगणारी लोक, यामुळे या देशात खूप मोठया प्रमाणात पर्यटक येतात. सेवानिवृत्त अमेरिकेनं नागरिक आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालण्यासाठी इथे स्थायिक होतात. इथे काही भारतीय लोकही राहतात आणि ते खूप आनंदी आहेत, ते इथे तंत्रज्ञान क्षेत्रात आणि काही इतर व्यवसाय करतात. त्यांनी सॅनहोसे या राजधानीच्या शहरात माझी राहण्याची व्यवस्था केली होती. अलेक्झांडर गुटरेझ्झ हा एक युवक एल रॉबले या शहरात राहतो, त्याची भेट ही काउचसर्फिंग या वेबपोर्टेल वर झाली. काउचसर्फिंग अँपवर जगभरातील प्रवासी असतात आणि सोबत नागरिक यावर आपण लोकांना विनंती करू शकतो त्याच्या घरी राहण्यासाठी, मी अलेक्झांडरला विनंती केली आणि त्याने ती स्वीकारली.

खूप सारे जगभरातले लोक उत्तर अमेरिकेतील कॅनडामधून दक्षिणेस असलेल्या अर्जेन्टिना पर्यंत सायकल प्रवास करत असतात आणि त्यातील खूप लोक हे अलेक्झांडरच्या घरी राहतात, कारण निकाराग्वा सीमेपासून त्याचे घर हे साधारण ८०-९० किलोमीटर आहे. त्याचे जीवन हे खूप साधे आणि सुंदर होते, घराजवळ प्रशांत महासागर होता. कोस्टारिका हा थोडा महाग देश आहे, एक वेळेच्या जेवणाचा खर्च आहे ४-५ डॉलर. त्यामुळे मी पनामाकडे लवकर जाण्याचा निर्णय घेतला. इथे फक्त आठ दिवस होतो. सॅनहोसे हे सुंदर आणि आधुनिक शहर आहे आणि त्यामध्ये "University Of Peace" ही युनिव्हर्सिटी आहे तिथे विश्वशांतीचे शिक्षण दिले जाते, ती संयुक्त राष्ट्र संघटनेची शैक्षणिक शाखा आहे. तेथील मानव अधिकार केंद्राचे प्रमुख मिहीर कानडे या नागपूरच्या प्राध्यापकाला भेटलो, त्यांनी मला कॉलेज दाखवले आणि भारत देशाची शान असलेले महात्मा गांधी यांचा पुतळाही दाखवला, जिथे शांती हा शब्द येतो तेथे आपले बापू येतातच हे मी जगभरात पाहिले व अनुभवले आहे. कोस्टारिका हे जगासाठी खूप प्रेरणादायी आहे, या माझ्या आवडत्या देशात मला परत जावे वाटते, तुम्ही जर अमेरिका खंडात जात असाल तर या देशाला नक्की भेट द्या.

(सदराचे लेखक जगभर सायकलने भ्रमंती करत असतात आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)

टॅग्स :saptarangTourism