शिस्तबद्ध देशात प्रवेश...

जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हटलं जातं, जपानी भाषेत देशाला निहोन, निप्पॉन म्हणतात, त्यांचा शब्दशः अर्थ ‘जिथं सूर्य उगवतो’ असा होतो.
Japan
JapanSakal
Summary

जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हटलं जातं, जपानी भाषेत देशाला निहोन, निप्पॉन म्हणतात, त्यांचा शब्दशः अर्थ ‘जिथं सूर्य उगवतो’ असा होतो.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

‘शिस्त’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर आयुष्यात एकदा तरी निःसंशय जपान या देशाला भेट देणं आवश्यक आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, मला निप्पॉन (जपान)मध्ये २०१७ मध्ये जाण्याची संधी मिळाली. मी साधारणतः तीन महिने तिथं होतो. या तीन महिन्यांच्या कालावधीत मला खूप नवीन गोष्टी समजल्या, शिकता आलं आणि स्वतःमध्ये बदलही करता आले. जपान देशाच्या यात्रेतला प्रत्येक दिवस मला आश्चर्यचकित करणारा होता. जेव्हा स्वामी विवेकानंद ३० वर्षांचे होते, तेव्हा बोटीने ते कोबे म्हणजे जपानमध्ये गेले होते. नंतर नागासाकीहून जमिनीवर प्रवास करत त्यांनी ओसाका, क्योटो आणि टोकियो इथं काही काळ घालवला. अखेरीस योकोहामाहून त्यांनी अमेरिकेला प्रयाण केलं. शिकागो इथं भरलेल्या विश्व धर्म परिषदेमध्ये अप्रतिम असं भाषण स्वामी विवेकानंद यांनी केलं, ज्याचं आजही प्रत्येक भारतीय स्मरण करतात. जपानमधील शिस्त, स्वच्छता, कला आणि प्रगती पाहून स्वामी विवेकानंद यांनी जपानची खूप प्रशंसा केली होती. स्वामी विवेकानंद भारतीयांना सांगतात की, ‘‘माझ्या मते, आपल्या सर्व श्रीमंत आणि सुशिक्षितांनी एकदा जपानला जाऊन पाहिलं, तर त्यांचे डोळे उघडतील.’’

जपानला ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हटलं जातं, जपानी भाषेत देशाला निहोन, निप्पॉन म्हणतात, त्यांचा शब्दशः अर्थ ‘जिथं सूर्य उगवतो’ असा होतो. चीनच्या पूर्वेला जपान आहे व त्या दिशेने सूर्य उगवतो. जपान हा देश ६८५२ बेटांचा मिळून बनलेला आहे. इथं जाण्यासाठी पाण्यातून जहाजामार्गे किंवा हवेतून विमानाचा वापर करावा लागतो.

जपान हा जगातील अकरावा- सर्वाधिक लोकसंख्या असलेला, तसंच सर्वांत दाट लोकसंख्या आणि शहरीकरण झालेला देश आहे. देशाचा सुमारे तीनचतुर्थांश भूभाग पर्वतीय आहे. जपान हा एकमेव आशियाई देश आहे, ज्याने युरोप आणि रशियाला १९०४ च्या जापनीज-रुसो युद्धात हरवलं. युद्ध विजय काही खूप अभिमानाने सांगण्याचा विषय आहे असं मी मानत नाही, कारण युद्धामध्ये शेवटी मानवतेचा पराभव होतो. विशेषकरून महिला आणि मुलं यांच्यावर खूप अत्याचार होतात, हे आपण मानवजातीच्या युद्ध इतिहासात पाहत आलो आहेच.

सध्या युक्रेन-रशियामध्ये चालू असलेल्या युद्धाच्या भयाण कथा आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहत असालच. रशिया आणि जपान युद्धातील जपान या आशियाई देशाचा विजय महत्त्वाचा आहे, कारण त्या वेळी बरेच आशियाई देश हे युरोपियन देशांच्या वसाहती होत्या. खूप सारा अत्याचार इथं झाला, तरीही प्रतिकूल परिस्थितीत जपानने हे युद्ध जिंकलं. असो.

माझ्या प्रवासात मी रात्री १० वाजता नरिता विमानतळावर पोहचलो. तेथील अधिकाऱ्यांनी माझा पासपोर्ट पाहिला व काही प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मी जपानमध्ये प्रवेश केला. समोर काही अधिकारी लोकांच्या बॅगची तपासणी करत होते. त्यांची तपासणीची पद्धत मला खूप भावली. ते बॅग खूप व्यवस्थित उघडत आणि एक-एक वस्तूची हाताळणी काळजीने करत व ते सारं सामान पुन्हा बॅगमध्ये ठेवत. हे पाहून मला वाटलं की, ते कर्मध्यान साधना करत आहेत. त्यांच्या कामामधून, खूप जागरूकता त्यांच्या कृतीत दिसत होती. अशी वस्तूंची आदरपूर्वक तपासणी मी पुन्हा माझ्या प्रवासात कुठंही पहिली नाही. या पहिल्या क्षणात कामाची दिसलेली झलक माझ्यासाठी या देशाबद्दल आपुलकी निर्माण होण्यास अत्यंत महत्त्वाची ठरली.

एका देशातून दुसऱ्या देशात जाताना आपण सोबत काय घेऊन जात आहोत, याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मी हाँगकाँगमधील गुरुद्वारातून प्रसाद म्हणून मिळालेला एक हापूस आंबा सोबत घेऊन आलो होतो. जपानी नियमानुसार खूप साऱ्या वस्तू तिथं घेऊन येण्यास बंदी आहे. त्यात फळं, भाज्या हे आणणंही बंदी आहे. त्यामागचं कारण मी नंतर शोधलं, तर मला कळलं की, त्या फळात जर कीटक असेल आणि ते कीटक जपानच्या झाडावर गेले, तर ते खूप समस्या निर्माण करतील. तसं होऊ नये याची काळजी म्हणून ही बंदी होती. माझा प्रवास हा एका स्वस्तातील विमानातून झाला होता आणि त्यामध्ये पाणीसुद्धा निःशुल्क नव्हतं, त्यामुळे मी आता विमानतळावर पाणी शोधत होतो. तिथं एक मोठा फ्रिज होता व त्यात पैसे टाकून पाण्याची बाटली घेण्याची सुविधा होती. मात्र, तिची किंमत भारतीय चलनात शंभर रुपयांपेक्षा जास्त होती. हे पाहून मी थोडा निराश झालो, कारण माझ्याकडं फक्त ८०० रुपये होते आणि पाण्यासाठी मला १०० रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार होता.

आमचं विमान त्या दिवसातील शेवटचं विमान होतं, त्यामुळे विमानतळ रिकामंच पडलेलं होतं. मी बाहेर येऊन माझी सायकल बॉक्समधून काढून तिचं चाक, हॅण्डल आणि पायडल हे त्याच्या-त्याच्या जागी बसवलं. हे करण्यासाठी मला दोन जपानी मित्रांनीही मदत केली आणि सोबत लिंबू-पाणी पिण्यास दिलं. आता सायकल चालवण्यासाठी तयार झाली. रात्रीच्या १२ वाजता प्रश्न होता, आता रात्री कुठं झोपायचं? मी त्या रात्री सायकल घेऊन निघालो. सुंदर आणि मोकळे रस्ते असल्यामुळे भीती कमी वाटली. खूप साऱ्या उद्योग कंपन्या या रोडच्या बाजूला दिसू लागल्या. वाटेत एकही मोकळी जागा दिसत नव्हती. एक ते दोन तास सायकलिंग करून भूक लागली. मध्यरात्री तिथं एक ७-११ नावाचं दुकान दिसलं. तिथं मी थोडे खाद्यपदार्थ विकत घेतले आणि भुकेची दाहकता कमी केली. ही ७-११ नावाची दुकानं पूर्ण जपानभर आहेत, जी दिवस-रात्र चालतात आणि इथं तुम्हाला खाण्याच्या वस्तू आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू मिळतात. पूर्ण जपानभर या दुकानांमुळे माझी खूप मोठी सोय झाली. जपानमध्ये मोबाईल सीमकार्ड घेणं मुश्‍कील होतं, त्यामुळे मला इंटरनेट वापरणं कठीण होतं; पण या दुकानात फुकट वायफाय असतं, त्यामुळे मला लोकांशी जोडता आलं. तसंच, या दुकानांमध्ये टॉयलेटही असतात आणि ती खूप स्वच्छ असतात. मी खूप वेळ या टॉयलेटमध्ये घालवला होता.

माझ्या संपूर्ण यात्रेत, अशी टॉयलेट जगात कुठंच मला पाहायला मिळाली नाहीत. जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता, तेव्हा एक सुगंध आपोआप बाहेर पडतो आणि एक विशिष्ट प्रकारची धून वाजत राहते. युरोपियन प्रकारची मलपात्रं इथं वापरली जातात आणि ती तंत्रज्ञान वापरून बनवली आहेत. त्याच्या डावीकडे एका हॅण्डलवर नियंत्रण पॅनेल असतं, त्याच्या बटनावरून आपण खूप सारी यंत्रणा नियंत्रित करू शकतो. जसं - टॉयलेटवरील बसण्याची सीट गरम करणं, ‘टॉयलेट बिट्स’ जे की टॉयलेटच्या मागील भागात असतात, त्यांचा वापर बूड साफ करण्यासाठी केला जातो. त्या बिट्सचं बटन दाबावं लागतं आणि सोबत त्यामधून येणाऱ्या पाण्याचं तापमान आणि दबाव आपण बटनांद्वारे नियंत्रित करू शकतो. काही दिवसांतच मला ते शिकता आलं. रात्री दोन वाजता मला एक बगीचा दिसला, तिथं जाऊन मी माझ्या टेन्टमध्ये झोपलो. झोप तर खूप लागलेली. काही तासांनंतर पाहतोय तर उजेड पडलेला. मी मोबाईलमध्ये वेळ पहिली तर साधारण चार वाजले होते. मला वाटलं की माझा मोबाईल खराब झाला की काय? मग बाहेर पहिलं तर काही लोक माझ्या टेन्टच्या आजूबाजूस धावत होते. इथं सूर्योदय सकाळी चार वाजता होतो आणि लोक त्यांचा दिवस लवकर सुरू करतात. मी खूप थकलो होतो व झोपी गेलो आणि ८ वाजता उठून टोकियो शहराकडे प्रस्थान केलं.

(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे आणि महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com