जेजू बेटावरील विलक्षण अनुभव

मला माझ्या व्हिसाच्या तारखेवर लक्ष ठेवणं कर्तव्यप्राप्त होतं. माझा व्हिसा संपत आला होता आणि पुढं अमेरिकेला जाण्याची मी तयारी करू लागलो.
जेजू बेटावरील विलक्षण अनुभव
Summary

मला माझ्या व्हिसाच्या तारखेवर लक्ष ठेवणं कर्तव्यप्राप्त होतं. माझा व्हिसा संपत आला होता आणि पुढं अमेरिकेला जाण्याची मी तयारी करू लागलो.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

मला माझ्या व्हिसाच्या तारखेवर लक्ष ठेवणं कर्तव्यप्राप्त होतं. माझा व्हिसा संपत आला होता आणि पुढं अमेरिकेला जाण्याची मी तयारी करू लागलो. जेजूमध्ये असताना अमेरिकेच्या व्हिसाबाबत मला चिंता नव्हतीच; परंतु खूप मोठा समुद्र असल्या कारणाने मला जेजू ते अमेरिका हा प्रवास विमानाने करणं गरजेचं होतं. माझ्या खिशात थोडेच पैसे होते आणि अमेरिकेचं विमान तिकीट काढायचं होतं. मी भारतातील माझ्या मित्रांशी या तिकिटाविषयी बोललो. अजय, अतुल, डॉ. ऋषिकेश आणि बाकी सहकारी यांचे तिकिटाचे पैसे उभे राहावेत यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी बऱ्याच लोकांची भेट घेतली, त्यात अहमदनगर दक्षिणचे तत्कालीन खासदार स्वर्गीय दिलीपजी गांधी यांची भेट माझ्या या मित्रांनी घेतली आणि खासदार साहेबांना माझ्या या प्रवासाबद्दल आणि सध्या असलेल्या तिकिटाच्या अडचणीबद्दल सांगितलं. गांधी यांनी तत्परता दाखवली आणि त्यांचे नातेवाईक, जे जपानमध्ये वास्तव्यास होते, त्यांना एक फोन करून मला तिकिटाची तत्काळ मदत करावी यासाठी सूचना केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे माझ्या जेजू ते अमेरिका या तिकिटाची व्यवस्था झाली.

मी जेजू बेटाहून अमेरिकेला निघालो. जेजू ते शांघाय ते सॅन फ्रान्सिस्को असा तो प्रवास. जेजू बेटावर खूप चिनी महिला करमुक्त खरेदीसाठी येतात आणि जाताना त्या खूप मोठ्या सुटकेस घेऊन जातात. मी माझी सायकल एका खोक्यात घेऊन चाललो होतो, ते पाहून सर्व चिनी महिला अचंबित झाल्या. त्यांना वाटलं की, मी खूप खरेदी केली आहे. शांघाय या विमान अड्ड्यावर पोहचल्यावर मी विमान कंपनी युनायटेड एअरलाइन्सच्या काउंटरला गेलो, त्यांनी मला पुढचा बोर्डिंग पास दिला. मी त्यांना सायकल वजन करण्यासाठी दिली. सायकलचा आकार मोठा असल्यामुळे १५० डॉलर विमानात बसण्याआधी भरावे लागणार होते आणि माझ्याकडे असलेले १५० डॉलर मी नगद दिले; परंतु त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही फक्त कार्डने पैसे स्वीकारतो. मी सांगितलं माझ्या कार्डमध्ये पैसे नाहीत, माझ्याकडे रोख रक्कमच आहे. ते काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सूचना केली की, जर कार्डने पैसे नाही देऊ शकत, तर तुझी सायकल इथंच ठेवून पुढे प्रवास कर. माझा प्रवास हा सायकलवरचा होता आणि हे मला सायकल तिथं ठेवून जा असं सांगत होते, त्यांचं हे उत्तर ऐकून मी एकदम स्तब्ध झालो. मी खूप विनंती केली; पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. मी खिन्न मनाने मागे सरकलो. माझी प्रवास सोबती ‘ब्लू मार्बल’ या माझ्या सायकलशिवाय मी कसा प्रवास करणार, हा विचार मला स्वस्थ बसू देईना. यातून मला काहीतरी मार्ग काढायचा होता आणि हातात फक्त एक तास होता. मी काही लोकांना भेटलो व विनंती केली की, १५० डॉलर तुम्ही कार्डने भरा मी तुम्हाला ते रोख स्वरुपात देतो. माझे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. नंतर मी डॉ. ऋषिकेश आणि अतुल या माझ्या मित्रांना फोन केले व झालेली अडचण सांगून माझ्या बँक कार्डमध्ये पैसे टाकण्यासाठी सांगितले; परंतु त्यासाठी काही वेळ लागणार होता. मी पुन्हा काही लोकांना विनंती करण्यासाठी गेलो.

हे सर्व सुरू असताना मला एक ATM कार्ड सापडलं. मला वाटलं, निसर्ग माझी मदत करत आहे. मी ते घेऊन पुन्हा त्या विमानसेवेच्या डेस्कवर गेलो आणि सांगितलं की, कोणीतरी हे विसरलं आहे, त्यांना परत करा. ही माझी धडपड पाहून पुढच्याच क्षणी एक उंच, लांब केस असलेला अमेरिकन तरुण, जॉन लोहमान समोर दिसला आणि मी त्याला माझ्या सायकल घेऊन जाण्यासाठी असलेल्या समस्येबद्दल बोललो. त्याने कसलाही विचार न करता लगेच होकार दिला आणि त्याच्या कार्डने डेस्कवर जास्तीच्या सामानासाठी लागणारे पैसे दिले.

आमच्या गप्पा झाल्या. मी त्याला माझ्या यात्रेबद्दल सांगितलं आणि १५० डॉलर देऊ लागलो, तेव्हा त्याने त्यातील फक्त शंभर डॉलर घेतले. तो माझ्या यात्रेबद्दल ऐकून खूप प्रभावित झाला होता. त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला आणि अमेरिकेत त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं.

अनंत अडचणींवर मात करीत मी एकदाचा अमेरिकेच्या विमानात बसलो. जागतिक महासत्ता अमेरिका, जगात कदाचितच असा कोणी सापडेल, ज्याला अमेरिका हा देश माहीत नसेल. एखादी गोऱ्या रंगाची व्यक्ती दिसली तर लोक त्या व्यक्तीस अमेरिकन आहे असं म्हणतात, हे खूप वेळा मी माझ्या युरोपियन मित्र-मैत्रिणीं सोबत असताना प्रत्यक्षात अनुभवलं आहे. जगभरातील लोक बहुधा रोज सकाळी कोलगेट या अमेरिकन कंपनीच्या टूथपेस्टने आपले दात घासून दिवसाची सुरुवात करतात. रोजच्या वापरातील एक ना अनेक उत्पादने अमेरिकेने जगाला दिली आहेत. आकर्षक जाहिराती आणि सुंदर गोष्टी कथनातून अमेरिका बऱ्याच गोष्टी जगासमोर घेऊन आली आहे. अमेरिकेचे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन खंड आहेत. कोलंबस १४९२ मध्ये चुकून बहामास या बेटांवर पोहचला, जे की उत्तर अमेरिकेत आहे. कोलंबस येण्यापूर्वी इथं लाखो लोकांची मनुष्य वस्ती होती आणि वेगवेळाल्या जमाती वास्तव्य करत होत्या. या लेखात मी अमेरिका असं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) याला संबोधलं आहे. जगभरात याबद्दल गैरसमज आहेत. उत्तर दक्षिण, मध्य अमेरिका आणि कॅरिबिना बेटं या पूर्ण भागाला अमेरिका असं संबोधलं जातं आणि यात ३२ देश आहेत. अमेरिकेबद्दल आपल्याला खूप माहीत असेलच, यामुळे मी जरासं आवरतं घेतो.

अमेरिकेत शिक्षण घेणं, नोकरी करणं किंवा स्थायिक होणं हे जगभरातील लोकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी कष्ट करावे लागतात. तिथं जाण्यासाठी खूप भारतीय लोक प्रयत्न करत असतात, काही यशस्वीही होतात. अमेरिकेत जाण्यासाठी लागणाऱ्या व्हिसासाठी मला शांती फंड या न्यूयॉर्क येथील महात्मा गांधीजींच्या विचारांवर काम करणाऱ्या संस्थेने निमंत्रण पाठवलं, त्यासाठी जर्मनच्या पीटर रुही या माझ्या मार्गदर्शक आणि मित्र यांनी खूप मदत केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्थेने प्रायोजकत्व पत्र दिलं आणि माझी जबाबदारी स्वीकारली. मी तेव्हा २५ वर्षांचा होतो. तरुण व्यक्तीस असा टुरिस्ट व्हिसा अमेरिका सहसा नाकारते, कारण खूप लोक तिथं अवैध स्थलांतर करतात. मुंबई बांद्रा येथील अमेरिकन दूतावास कार्यालयात माझी व्हिसासाठी मुलाखत होती. सकाळी हजारो लोक तिथं मुलाखतीसाठी जमले होते. त्यांचा सुटाबुटातील पेहराव पाहून वाटलं, आपल्याला व्हिसा मिळणं शक्य नाही. माझा क्रमांक आला. तत्पूर्वी एका मुलीची मुलाखत चालू होती.

तिला काही शैक्षणिक प्रश्न विचारले गेले, तिचा व्हिसा नाकारण्यात आला आणि ती रडू लागली. त्याचवेळी माझ्या सोबतीचा व्हिसा नाकारल्याची खबर आली आणि मनात आलं, आता शक्य नाही व्हिसा मिळणं. माझा नंबर आला, त्या अमेरिकन अधिकाऱ्याने मला काही प्रश्न केले. माझी इंजिनिअरिंगची पदवी, मागील दीड वर्ष महाराष्ट्र गांधी स्मारक निधीसोबत गांधीविचारांवर केलेलं काम आणि गांधी विश्वयात्रेची संकल्पना याबद्दल मी सगळी माहिती त्यांना पटवून दिली. यामध्ये त्यांना समजलं की मला इथं स्थायिक होण्यात काही रस नाही. या सत्यपूर्ण कथनामुळे त्यांनी मला व्हिसा दिला. जर तुम्ही सत्यपूर्ण असाल, तर यश नक्की येतं याचा मला अनुभव आला आणि पुढे माझ्या यात्रेत मला खूप त्रास झाला नाही. मी त्या अधिकाऱ्याला वंदन करून बाहेर आलो. अमिरिकेचा व्हिसा माझ्या नवीन पासपोर्टवर असणं हे खूप मोठं यश होतं. कारण त्या व्हिसाची शक्ती खूप मोठी आहे, खूप साऱ्या देशांत आपण विनाव्हिसा प्रवास करू शकतो जसं - मध्य अमेरिका, दक्षिण अमरिकेतील काही देश. पुढे जेव्हा मी हाँगकाँग येथील गुरुद्वारात राहिलो आणि तेथील अवैध स्थलांतरित भारतीयांना माझा पासपोर्ट आणि व्हिसा दाखवला, तेव्हा त्यांनी माझ्या पासपोर्टसोबत सेल्फी घेतली. अशा पासपोर्टची किंमत काळ्या बाजारात २० लाख असते, त्यामुळे तू त्याची काळजी घे असा माझ्या मित्राने सल्ला दिला होता. यापुढं आपण जागतिक महासत्ता अमेरिका या देशाची सफर आणि तेथील अनुभव यावर चर्चा करणार आहोत.

(सदराचे लेखक महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक व जगभर भ्रमंती कऱणारे आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com