पदयात्रा आणि बदलता जपान!

मी टोकियोमधील सुगिनमी वॉर्ड ग्रंथालयाच्या प्रांगणात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला भेट दिली. २००८ मध्ये हा पुतळा इथं बसवण्यात आला.
Japan
JapanSakal
Summary

मी टोकियोमधील सुगिनमी वॉर्ड ग्रंथालयाच्या प्रांगणात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला भेट दिली. २००८ मध्ये हा पुतळा इथं बसवण्यात आला.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

मी टोकियोमधील सुगिनमी वॉर्ड ग्रंथालयाच्या प्रांगणात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला भेट दिली. २००८ मध्ये हा पुतळा इथं बसवण्यात आला. हातात काठी घेऊन चालत असलेले गांधीजी ही त्यांची एक जगप्रसिद्ध असलेली प्रतिमा या पुतळ्यात आहे आणि अशाच प्रकारचे गांधीजींचे पुतळे मी पुढं जगभर पहिले. त्यांच्याएवढे आयकॉन जगभरात कोणत्याही व्यक्तीचे नसावेत. चष्मा, चरखा, काठी, मिशा, कंबरेचं घड्याळ, अहिंसा-शांती असे शब्द... अशा प्रकारे एक ना अनेक महात्मा गांधीजींचे आयकॉन आहेत, ते पाहिलं की सहज लक्षात येतं की हे गांधीजींचं प्रतिनिधीत्व करतात. २०१९ च्या ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रकाशित केलेल्या विश्लेषणानुसार, ४० वर्षं गांधीजी रोज १८ किलोमीटर चालत होते. १९१३ ते १९४८ पर्यंत त्यांचा पायी प्रवास ७९ हजार किलोमीटर झाला असेल. सहज याची तुलना केली तर हे म्हणजे दोन वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करता येईल एवढं आहे. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी ते चालले, त्यांच्याकडं गाड्या-घोड्यांची सोय नव्हती का? म्हणून ते चालत होते? तर नाही, त्यामागे संसाधनांचा गैरवापर टाळणं, हा त्यांचा उदात्त हेतू होता. सोबत स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी ही योग्य पद्धत होती. चालणं हा फक्त शारीरिक व्यायाम नसून, मानसिक व्यायामही आहे. तसंच, तो आशावादही देतो, कारण तुम्ही जगाची गती पाहू शकता, निसर्गाच्या अनिश्चिततेच्या नियमाबद्दल हळू-हळू जागरूक होता.

गांधीजी आपल्या व्यग्र दैनंदिन कामांतून वेळ काढून चालत, खूप साऱ्या व्यक्तींच्या चालत भेटी घेत. असा वेळ काढणं आताच्या धावपळीच्या जीवनात खूप लोकांना काठीण जातं; पण हे खूप महत्त्वाचं आहे की, आपण जीवनात महत्त्व कशाला देतो. त्यांनी आपल्या जीवनात चालत खूप सारे मोर्चे काढले.

सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील मोर्चापासून पाहिली तर लक्षात येईल की, ५० हजार लोकांसोबत हा मोर्चा होता. नंतर मिठावरील कराचा कायदा मोडण्यासाठी वयाच्या ६० व्या वर्षी गांधीजींनी त्यांच्या आश्रमापासून दांडीपर्यंत ३८५ किलोमीटर ‘दांडी मार्च’ केला. या जगप्रसिद्ध दांडी मार्चने ब्रिटिश सरकार हादरलं. अशा या शक्तिशाली आणि प्रेरणादायी जगप्रसिद्ध मार्चला जगभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान मिळालं आहे. माझ्या या शांती यात्रेत मी जेव्हा परदेशातील मुलांना प्रश्न विचारायचो की, तुम्हाला गांधीजींबद्दल काय माहीत आहे? तेव्हा ती मुलं ‘दांडी मार्च’ किंवा ‘मिठाचा सत्याग्रह’ हे उत्तर द्यायची. भारतात आजकाल काही लोक द्वेषभावनेने हा प्रश्न करतात की ‘गांधीजींबद्दल पाठ्यपुस्तकांत जास्त माहिती का दिली जाते?’ मला तर वाटतं की, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये खूप कमी माहिती आहे; आणि कदाचित यामुळे आपल्या इथं मुलांना गांधीजी समजत नाहीत. मला स्वतःलाही गांधीजी खूप उशिरा समजले आणि खूप लोकांना वयाची ५० वर्षं लागली गांधीजी त्यांच्या जीवनात येण्यासाठी, कारण जगात जोपर्यंत माणसात भावना (काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर) शिल्लक असतील, तोपर्यंत गांधीजी या अद्‍भुत रसायनापासून जगाची सुटका नाही.

जपानमध्ये मी पहिल्यांदाच पदयात्रा करण्याचा निर्णय घेतलेला. माझी ही पहिलीच पदयात्रा असल्याने काही शंका उपस्थित झाल्या. मला जास्त चालण्याचा सराव नव्हता, सोबत पाठीवर मोठी बॅग होती. याआधी सायकल यात्रा सुरू करतानाही अशीच काही विशेष अनुभवाशिवाय सुरुवात केली होती. विश्वशांती आणि सोबत मानवतेवरील प्रचंड विश्वास हा मनातील भाव शुद्ध होता, त्यात काहीही विशेष शंका नव्हती. ही पदयात्रा टोकियो ते हिरोशिमा साधारण ७०० किमी आणि ५६ दिवस चालणार होती. चार जपानी महिला या माझ्यासोबत चालण्यासाठी गांधी पुतळ्यापाशी आल्या. तो सुट्टीचा दिवस नसल्यामुळे त्यादिवशी खूप लोक येऊ शकले नाहीत. आम्ही ‘वैश्व जाणतो’ हे भक्तिगीत गाऊन, बापूंना नतमस्तक करून यात्रेची सुरुवात केली. दोन पावलं पुढं टाकताच एक लहान बाळ आपल्या इवल्याशा पावलांनी आमच्यापुढून धावत गेलं.

नुकतंच ते चालायची कला शिकलं होतं आणि त्याचा आनंद घेत सैरावैरा धावत होतं. ते जणू आमच्या या टोकियो ते हिरोशिमा मार्चचं नेतृत्व करत आहे असं वाटलं. आपले हे दोन पाय किती असाधारण आहेत याची प्रचिती वेळावेळी येते. इथं जपान कॉलेजमध्ये मी खूप साऱ्या सायकली पहिल्या. तसं पाहता पूर्ण टोकियो शहरात खूप साऱ्या सायकली आहेत. मी इंजिनिअरिंग करत असताना एकही कॉलेजचा विद्यार्थी सायकल घेऊन येत नसे. इथं जपानमध्ये महिला या आपल्या लहान मुलाला सायकलवर घेऊन आपली कामं करतात किंवा मुलांना शाळेत सोडवतात. मेट्रो स्टेशनच्या बाजूला इथं सायकलसाठी स्वतंत्र जागा असते.

पदयात्रेची सुरुवात झाली होती, वाटेत लोक भेटत होते; परंतु भाषेमुळे संवाद साधणं अवघड होतं. माझ्यासोबत जपानी भाषेतील या यात्रेचं एक पत्रक होतं, ज्यामुळे मला मदत झाली. माझ्या या पदयात्रेतील सर्वांत मोठ्या दोन गरजा म्हणजे जेवण आणि रात्रीचा निवारा. जपानमध्ये ७५ हजारपेक्षा जास्त बुद्धिस्ट मंदिरं आहेत, जास्तकरून मंदिरांचं बांधकाम हे लाकडी. अशी सुंदर जुनी मंदिरं मी खूप पहिली. त्यांचं एक वैशिष्ट्यं असं की, त्यांची लाकडं ही पायाच्या आत रोवली नव्हती, सर्व बाजूची लाकडं ही फक्त दगडी पायावर टेकवली होती. त्याचं कारण इथं वर्षभरात पंधराशे भूकंप होतात, म्हणजे दिवसाला साधारण दोन-तीन. शेकडो वर्षांनंतरही ही मंदिरं शाबूत आहेत, कारण त्यांची संरचना. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक बुद्धिस्ट मंदिरात पोहोचलो आणि दरवाजा वाजवला. एका महिलेनं दार उघडलं. मी तिला माझ्या यात्रेसंदर्भात सांगितलं आणि एक रात्र या मंदिराच्या आवारात माझा तंबू लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीची विनंती केली. पण तिचं उत्तर आलं, ‘हे काही राहण्याचं हॉटेल नाही किंवा टेंटिंगसाठीची जागा नाही.’ बुद्धिस्ट मंदिरात पहिल्यांदा असा अनुभव आल्यावर, असा नकार का मिळाला असेल हे शोधताना, मला एक नवीन माहिती मिळाली. ती महिला तेथील बुद्धिस्ट भिक्खूची बायको होती आणि जपानमध्ये भिक्खू लग्न करतात, ते आपल्या बायको आणि मुलांसोबत एकत्र त्या बुद्धिस्ट मंदिरात राहतात. यालाही काही अपवाद आहेत.

साधारण जगभरात मी पहिलं की, बुद्धिस्ट भिक्खू आणि भिक्खूनी हे ब्रह्मचर्य पालन करतात. यात्रेच्या पहिल्या महिन्यात मी २ बुद्धिस्ट मंदिरं आणि १ चर्च या ठिकाणी राहिलो. निसर्गामध्ये राहण्याला मी सुरुवात केली. शहर असलं तर उशिरा रात्री गार्डनमध्ये तंबू टाकून राहायचो. एके दिवशी एका हॉटेलच्या व्हरांड्यात राहायला लागलं, कारण खूप पाऊस होता. कोफू नावाच्या गावात मला एक पाकिस्तानी गृहस्थ भेटले, त्यांनी माझी राहण्याची सोय त्यांच्या मोठ्या गाडीत केली. जपान देशाचं जागेचं नियोजन खूपच चांगलं आहे. कारण जमीन ही मर्यादित आणि लोकसंख्या जास्त, यामुळे छोटी रिकामी जागा मिळणं अवघडच. मी दिवसभर रोडवर असे. रोडच्या दोन्ही बाजूंनी कंपाउंड, त्यामुळे मला आरामासाठी जागा शोधणंही कठीण जात असे. मी जपान प्रवासापूर्वी बूट खरेदी करताना मोठी चूक केली होती. बूट थोडा छोटा घेतला गेला आणि यामुळे मला चालताना खूप त्रास झाला. माझ्याकडे नवीन बूट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून हा बूट वापरण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नव्हता. खूप साऱ्या ग्रामीण भागातून मला जावं लागलं. रस्ते सर्वत्र छान होते आणि चालण्यासाठी थोडी जागा मिळायची. ग्रामीण भागात वयस्कर लोक जास्त राहतात, कारण तरुण हे शहरी जीवन पसंत करतात.

ग्रामीण भागात भाताची शेती केली जाते आणि त्यात खूप वृद्ध लोक काम करताना मी पहिलं आहे. वृद्ध लोक इथं खूपच मजबूत आहेत, त्यांना जीवनाची कला चांगली अवगत आहे. २०२२ मध्ये जपानमधील आयुर्मान हे ८४.९१ एवढं आहे. त्यांचं जीवन हे खूप संतुलित आहे. संतुलित आहार, शारीरिक व्यायाम आणि उत्तम आरोग्य सेवा ही कारणं मला प्रकर्षाने दिसली. जपानमध्ये मी नदीकिनारी, डोंगर आणि जंगलात राहिलो. याचा खूप मोठा परिणाम माझ्यावर झाला. मी या निसर्गाशी एकरूप होत होतो. आपण सर्व एक आहोत; पशू, पक्षी, झाडं, डोंगर, पाणी, आकाश यांची अनुभूती मला आली आणि एक महिन्याच्या प्रवासानंतर मी संपूर्ण शाकाहारी बनलो. भारतात मला खूप साऱ्या लोकांनी शाकाहारी होण्याचे सल्ले दिले होते.

‘तू गांधीविचार घेऊन बाहेर जात आहेस, तू शाकाहारी असणं गरजेचं आहे,’ असं खूप लोक मला बोलत होते. पण मी माझ्या विचारावर ठाम राहिलो, कारण माझे खूप सारे प्रश्न होते. ‘आपलं हे जीवन हिंसेवर आधारित आहे. जेव्हा आपण श्वास घेतो, हात धुतो, चालतो, तेव्हा नकळत आपण खूप सारे जीव मारत असतो,’ असं मी म्हणायचो. परंतु आता मला माझ्या या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. ती म्हणजे, ‘कमीत-कमी हिंसा’. आपण जर आपली चेतना वाढवली, तर जागरूकता वाढते आणि हिंसा कमीत कमी होते. जपानच्या शाकाहाराचा इतिहास विलक्षण आहे. इ.स. ६७५ मध्ये बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे जपानमध्ये सम्राट टेन्मू याने पशुधन आणि काही वन्य प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली होती. त्यानंतर नाराकाळातील इ.स. ७३७ मध्ये सम्राट सेमूने मासे आणि शेलफिश खाण्यास मान्यता दिली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात नाराकाळापासून मिजी रिस्टोरेशनपर्यंतच्या बाराशे वर्षांमध्ये जपानी लोकांनी शाकाहारी शैलीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. ते सहसा मुख्य अन्न म्हणून भात, सोयाबीन आणि भाज्या खातात. विशेष प्रसंगी किंवा उत्सवातच मासे दिले जायचे. १९ व्या शतकात यूरोपपासून प्रभावित होऊन मिजी साम्राज्याने गोमांस खाण्यास लोकांना प्रवृत्त केलं. त्याचं कारण, मिजी साम्राज्यानुसार जपानी लोक हे शारीरिक दुबळे आणि कमी उंचीचे आहेत आणि मांसामुळे ते बलवान होतील. याला विरोधही झाला, कारण मांसाहार हा अपवित्र होय. आत्ताच्या काळात गाई आणि बैल यांचं मांस हे इथं खूप प्रसिद्ध आहे. एक महिन्याच्या अद्‍भुत यात्रेनंतर मी जपानच्या क्योटो या शहरात पोहोचलो आणि तिथून एका नवीन यात्रेला सुरुवात केली.

(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे असून, महात्मा गांधीजी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com