...सत्याच्या शोधात थायलंडमध्ये

थायलंड या देशात पाऊल ठेवल्यावर, आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलता येणार नाही याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली होती. कदाचित या जाणिवेमुळेच आपोआप आमचं मन हे इंग्रजीमध्ये काम करू लागलं.
Thailand
ThailandSakal
Summary

थायलंड या देशात पाऊल ठेवल्यावर, आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलता येणार नाही याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली होती. कदाचित या जाणिवेमुळेच आपोआप आमचं मन हे इंग्रजीमध्ये काम करू लागलं.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

थायलंड हा यात्रेतला भारताबाहेरचा पहिला देश. आमचं थायलंडच्या बँकॉक इथल्या विमानतळावर आगमन झालं आणि इमिग्रेशनच्या ठिकाणी दोन थाई अधिकाऱ्यांनी बाकी यात्रेकरूंना न अडवता मला आणि माझा मित्र अजयला अडवून खूप साऱ्या प्रश्नांची सरबत्ती चालू केली. बाकीचे सर्व पुढे जात होते, कदाचित आमचे साधे कपडे आणि साधं राहणीमान, हे एक कारण असावं. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं. हा असा प्रसंग प्रत्येक देशामध्ये मला यापुढेही आला. खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागलं; पण मी शेवटी त्यामधून बाहेर पडलो. याचं कारण एकच होतं, मनातील भाव. माझी ही यात्रा सत्याचा शोध आणि गांधीजींचा अहिंसेचा संदेश जगभर पोहचवणे याचसाठी होती; आणि मला हे जाणवलं की, जेव्हा आपली बाजू सत्याची असते, तेव्हा विजय आपलाच होतो.

थायलंड या देशात पाऊल ठेवल्यावर, आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये बोलता येणार नाही याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली होती. कदाचित या जाणिवेमुळेच आपोआप आमचं मन हे इंग्रजीमध्ये काम करू लागलं. अजय आणि मी बँकॉकला एका सायंकाळी उतरलो. साधारण चार तासांच्या प्रवासाअंती आम्ही भारतातू एका नव्या दुनियेत आगमन केलं होतं. इथे कोणी ओळखीचे लोक नव्हते. मनामध्ये खूप सारी वादळं निर्माण झाली. सोबत जवळपास पंधरा हजार रुपये असतील. या पैशांत आम्ही एक महिना इथं राहू शकत होतो. थायलंड टुरिस्ट देश असल्याने, विमानतळावर जगभरातील लोक आले होते. खूप गर्दी आणि त्यांचे कपडे, साहित्य, रहाणीमान, रंग, उंची पाहून मनात धडकी भरली आणि एक न्यूनगंड मनामध्ये आला. आम्ही बॉक्समध्ये बांधून आणलेली आमची सायकल पुन्हा जोडायला घेतली आणि आजूबाजूचे सर्व लोक आमच्याकडे पाहायला लागले. सायकल यशस्वीरीत्या जोडून आम्ही गुगल मॅपच्या साह्याने एक हॉटेल गाठलं. रात्रीचे अकरा वाजले असतील. दोघांनाही खूप भूक लागली होती. आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करताच, एक आगळावेगळा वास येत होता. थाई लोक माशांचा सॉस वापरतात, त्याचा हा वास असावा. माझी आई वर्षानुवर्षं मासेविक्रीचा व्यवसाय करत होती आणि कधी कधी मीही तिला त्या व्यवसायात मदत करत असे म्हणून हा वास मला काही विशेष वाटला नाही. परंतु, अजय हा जन्मापासून पूर्ण शाकाहारी होता, त्यामुळे त्याची या वासाने घुसमट झालेली मी पहिली. पण, आमच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता. प्रवासाला निघण्याआधी आम्ही काही थाई शब्द शिकलो होतो; पण ते काही कामी आले नाहीत. सरतेशेवटी हातवारे करून, खुणांची भाषा वापरून आम्ही जेवण मागवलं.

थायलंडमध्ये आम्ही काही योजना आखली नव्हती. निसर्ग आपल्याला जिथं घेऊन जाईल, तिथं जात-जात पुढच्या देशात जायचं, हाच काय तो आमचा प्लॅन. दुसऱ्या दिवशी आम्ही सायकल घेऊन बाहेर निघालो. वाटेत एक खूप मोठी बुद्धांची मूर्ती दिसली. खूपच सुंदर चेहरा, लांब नाक, मोठे कान, डोळे बंद आणि सुंदर असा रंग... समोरच खूप मोठा बाजार भरलेला होता आणि विशेष म्हणजे, त्या बाजारात महिलांचं प्रमाण खूप होतं. आम्ही फिरलो आणि तिथं काही पदार्थ खाल्ले. सायंकाळचे ६ वाजले. रोडवर मोटो टॅक्सी म्हणजे बाइकने काही लोक प्रवास करत होते. त्याला तिथं मोटोसाई म्हणतात. एक चालक आम्हाला विचारत होता, ‘कुठं जायचंय?’ आम्ही त्याला हातवारे करून सांगितलं की, आम्हाला रात्री राहण्यासाठी जागा हवी आहे. कसंबसं त्याला ते समजलं. तो आम्हाला एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथं गेल्यावर त्याला आम्ही बोललो की, आमच्याकडे हॉटेलमध्ये राहण्याइतके पैसे नाहीत. हेही कसंतरी हातवारे करून त्याला समजावलं. मग तो बोलला, चला माझ्यासोबत व आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. साधारण ५ फूट उंचीचा, सडपातळ, करुणामय व्यक्ती होता तो. त्याचं छोटंसं पत्र्याचं घर होतं. खूप कमी साधनांमध्ये तो जगत होता. ते पाहून वाटलं की, तो देशाच्या एखाद्या कोपऱ्यातून इथं स्थायिक झाला असावा. त्याने त्याच्या बायकोला आमच्याबद्दल सांगितलं. सोबत एक त्याचा मुलगा आणि दोस्त होता. खूप प्रेमाने त्यांनी आम्हाला जेवण दिलं; मला नूडल्स आणि अजयला काही पालेभाज्या. जेवण केल्यावर आम्ही त्यांचे थाई भाषेत आभार मानले, ‘खाबकून माक’. नंतर तो आम्हा दोघांना जवळच्या एका बुद्धिस्ट मंदिरामध्ये घेऊन गेला. मंदिरांना तिथं ‘वाट’ म्हणतात. रात्र झाली होती. तो बोलला की, इथं टेन्टमध्ये तुम्ही राहू शकता. त्याला मी गुगल ट्रान्सलेटरने विचारलं, ‘‘मंदिरातील व्यवस्थापनाची परवानगी घेता का?’’ तो बोलला की ‘‘इथं गरज नसते, मंदिरं ही लोकांसाठी असतात.’’ आमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करून तो गृहस्थ निघून गेला. हा क्षण खूप महत्त्वाचा होता. त्याचे आम्ही मनातून खूप आभार मानले. परदेशातील माणुसकीचं हे पहिलं दर्शन पाहून माझी भविष्याची चिंता कमी होऊ लागली.

रात्री चांगली झोप झाली. सकाळी उठलो व पाहतो तर काय; समोर एक खूपच सुंदर बुद्धांचं मंदिर होतं आणि बाजूला एक प्राण्यांचा पिंजरा होता. त्यातून बदक, मोर, मांजरी, कोंबडे आणि डुक्कर सर्व एकदम बाहेर पडले. डुकरांचा वावर मंदिरात होता, ते पाहून भारताची आठवण आली. आपल्या देशात डुक्कर हा खूपच घाणेरडा प्राणी समजला जातो, त्याला शिवलं की काहीतरी पाप लागलं असं मानून लोक अंघोळ करतात. प्राण्यांमध्येही उच्च आणि नीचपणा आपल्या देशात आहे. जे लोक त्याचं पालन करतात, त्यांना आपले लोक अत्युच्च मानतात. परंतु, इथली समानता पाहून मला माझ्या देशातील वास्तवाबद्दल जरासं वाईट वाटलं. आपला देश जातिव्यवस्थेमध्ये जखडला आहे. महाराष्ट्र जातीमुक्त व्हावा यासाठी मी कुमार सप्तर्षी यांच्यासोबत काम केलं होतं व सोबतच स्वतःसोबत काही प्रयोगही केले होते आणि ज्या जातीमध्ये आपला जन्म झाला, त्यामध्ये लग्न नाही करणार, हे तेव्हाच ठरवलं होतं. माझ्या गावी जातीयतेची वाईट प्रथा मी अनुभवली होती. जोपर्यंत आपण यामध्ये पडून राहू, तोपर्यंत आपण एक वैश्विक नागरिक नाही होऊ शकत. या जातीय विचारसरणीतून जेव्हा मुक्त होऊ, तेव्हा एक नवीन दुनिया अनुभवास येईल. ही बंधनं मोडून आपण या अफाट आणि रहस्यमय जगात एक एक पावल पुढे टाकत जाऊ, तेव्हा आपल्याला सत्याच्या जवळ पोहोचता येईल.

थायलंड हा खूपच सुंदर देश आहे, त्याचं अधिकृत नाव किंग्डम ऑफ थायलंड. या देशात घटनात्मक राजेशाही आणि संसदीय लोकशाही आहे. हा देश आशियामधील असा एक देश, ज्याला युरोपियन देश वसाहत बनवू शकले नाहीत. या देशाची लोकसंख्या साधारणतः सात कोटींच्या जवळपास असावी. येथील ९३ टक्के लोक हे बुद्धिस्ट आहेत. साधारणतः पाच टक्के मुस्लिम आणि उर्वरित अन्य लोक. खूप सारे कारखाने इथे असल्याने येथील दळणवळण खूप वेगवान आहे. जगातील सगळ्यात वेगवान रोड इथे आहेत. इथे खूप अपघात होत असतात. जगभरातील लोक इथे पर्यटनासाठी येत असतात त्याची खूप कारणं आहेत. सुंदर प्रदेश, समुद्रकिनारे, दयाळू आणि आदरातिथ्य करणारे लोक, स्वादिष्ट अन्न व सोबत लैंगिक पर्यटन जे की खूप वाईट आहे. आर्थिक परिस्थितीसमोर झुकून ग्रामीण भागातील मुली आणि मुलं यात गुंतली जातात. मला ही आधुनिक काळातील गुलामगिरी वाटते.

आम्ही आमच्या प्रवासाच्या ध्येयासाठी, म्हणजेच शांतीसाठी काम करणाऱ्या काही संस्था - लोक आहेत का, याचा शोध घेत असताना, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड डेव्हलपमेंट स्टडीज ( I.I.P.D.S.) या शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थेशी आमचा संबंध आला. ही संस्था आशियात शांतीसाठी आणि संघर्ष निराकरणासाठी युवकांना प्रशिक्षण देते व मदतही करते. मूळचे बांगलादेशचे अबुस सबुरी, ज्यांची पत्नी थाई आहे, हे या संस्थेचे संस्थापक आहेत. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, कंबोडिया आणि इतर देशांतील लोक आले होते. त्या संस्थेची व्यवस्थापक वनिदा जेराम हिने मला आमंत्रित केलं. आम्हाला निःशुल्क राहणे व जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. तो परिसर हिरवागार होता. आजूबाजूला भाताची लागवड चालू होती. इथे पहिल्यांदा मला पाकिस्तानातील लोक भेटले होते, त्यांच्याशी आमची चांगली मैत्री झाली. भारतात पाकिस्तानमधील लोकांबद्दल खूपच तिरस्काराची भावना आहे, त्याची खूप सारी कारणं आहेत; पण सध्याच्या घडीला टीव्हीमधून खूप वाईट प्रचार केला जातो. त्यांना भेटल्यावर माझ्या मनातील धूळ निघून गेली.

(क्रमशः)

(सदराचे लेखक जगभर फिरणारे व महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com