सोनेरी स्वप्नं : लेखक नको, सलमानला बोलवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Author

‘लेखक आपल्या भेटीला’ अशा एका इटुकल्या पिटुकल्या उपक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून एका शाळेत जाण्याचा योग आला.

सोनेरी स्वप्नं : लेखक नको, सलमानला बोलवा!

‘लेखक आपल्या भेटीला’ अशा एका इटुकल्या पिटुकल्या उपक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून एका शाळेत जाण्याचा योग आला. मुळशीतल्या एका हिरव्यागार घाटमाथ्यावरची शाळा होती. पहिली ते चौथीतली मोजून तेवीस मुलं आणि दोन शिक्षक. चार खोल्यांची ती शाळा. शाळेत गाडी पोहचली तशी चिमुकल्या पोरांनी ढोल-ताशा आणि लेझीम खेळत स्वागत केलं. लहानपणी आमच्या शाळेत आमदार आले होते, तेव्हा आम्हीपण त्यांचं असंच स्वागत केलं होतं. उगीचंच आमदार झाल्यासारखा फिल आला. जसा वर्गात पोहोचलो तसं ढोल वाजवणाऱ्या एका पोरानं ढोल खाली ठेवला अन् गुरुजींना विचारलं, ‘जाऊ का आता घरी?’ गुरुजी काही उत्तर देणार तोच एक आडदांड पोरगा म्हणाला, ‘अय वर्गात लेखक आल्यात. नंदीबैलापुढं ढोल वाजवत नव्हता. घरी गेला तर तंगडच तोडीन. घुस वर्गात.’ मी बळजबरी स्मित केलं आणि वर्गात गेलो. शिक्षकांनी सगळी पोरं एकाच वर्गात कोंबली आणि माझी ओळख करून दिली.

सगळीच पोरं तोंड दाबून हसत होती. दोन वेळा मी मोबाईलचा सेल्फी कॅमेरा ऑन करून चेहरा चेक केला. गुरुजींनी सगळ्यांना दरडावलं. पण, पोरं काय शांत होईनात. तसे गुरुजी मला म्हणाले, ‘सर, तुम्ही तुमची बडबड चालू करा. आपोआप शांत होत्यान पोरं.’ गुरुजींकडं मी रागाचा कटाक्ष टाकला. पण, गुरुजी हसत हसत फोटो काढत होते. अखेर नाइलाजास्तव मी ‘बडबड’ चालू केली आणि कशीबशी पोरं शांत झाली. अर्धा तास बडबड करून पोरांना म्हणालो, ‘कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा.’ तसा दुसरीतल्या एका पोरीनं हात वर केला. तिला उभं केलं तर ती म्हणाली, ‘सर तुम्हाला एवढीच दाढी येती का?’ तिच्या या प्रश्नावर बाकीची पोरं हसू लागली. तशी दुसरी पोरगी म्हणाली, ‘सर, तुम्ही थोडं थोडं बोबडं बोलता ना?’ आता अख्खा वर्ग हसू लागला.

तसा दुसरा पोरगा उभा राहिला अन् गुरुजींना म्हणाला, ‘सर, पुढच्या वेळी सलमान खानला बोलवा. हे बोबडे लेखक काय बोलत्यात कळतच नाय.’ मला घाम फुटायला लागला होता. तोच मगाशी दम देणारा तो आडदांड पोरगा उभा राहिला. त्याला पाहून जरा बरं वाटलं, पण तो तर थेट वर्गाबाहेरच निघाला. गुरुजींनी त्याला हटकलं; तसा तो म्हणाला, ‘आवं भूक लागलीया मला. कवाचा बडबड करतोय तो माणूस. जेवायच्या सुट्टीचा टाइम झाला तरी बोलायचा थांबाना. मगाशीच म्हणत होता तहानभूक विसरून पुस्तक लिहितो तो. असली माणसं नका बोलवत जाऊ गुरुजी.’ मी पटकन टेबलावर ठेवलेली पुस्तकं उचलली आणि वर्गाबाहेर निघालो. सगळी पोरं कालवा करत बाहेर पळाली. ना कुणी सेल्फी घ्यायला थांबलं ना कुणी माझ्या पुस्तकाचं कौतुक केलं. ‘लहान लेकरांना मोठ्या लेखकाची किंमतच नसते,’ असं म्हणत गुरुजींनी माझं सांत्वन केलं आणि दोनशे रुपयांचं बंद पाकिट हळूच हातावर टेकवलं.

Web Title: Nitin Thorat Writes Author

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang