Ratnagiri road in rainy season
Ratnagiri road in rainy seasonsakal

सोनेरी स्वप्नं : रस्त्यावर घसरलं भविष्य

‘काय बाबा जनाची नाय निदान मनाची तरी लाज वाटाय पायजे. दोन्ही लेकरं तुमच्यासमोर घसरून पडली.
Summary

‘काय बाबा जनाची नाय निदान मनाची तरी लाज वाटाय पायजे. दोन्ही लेकरं तुमच्यासमोर घसरून पडली.

‘काय बाबा जनाची नाय निदान मनाची तरी लाज वाटाय पायजे. दोन्ही लेकरं तुमच्यासमोर घसरून पडली. तरी तुम्ही त्यांना मदत कराय उठले नाय,’ रागावैतागानं मी असं म्हटलं अन् गाडी बाजूला लावत त्या पोरांना उठवलं.

पहिल्याच पावसात रत्नागिरीतल्या एका आडरानातल्या गावचा रस्ता निसरडा झाला. रस्त्याला लागूनच ओढा होता. ओढ्याला पाणी नव्हतं आलेलं; पण उतार आणि मातीचा रस्ता असल्यानं पाय सटकत होते. दुपारपासून रिमझिम सुरू होती. त्यात शाळा सुटल्यामुळं पोरासोरांची घरी जायची लगबग. एका सायकलीवर दोघं निघाले होते. मी त्यांच्यामागोमागच होतो. तोच त्या पोरांची सायकल घसरली आणि दोघंही शाळेच्या कपड्यांवरच चिखलात आडवे झाले. रस्त्याच्या बाजूलाच एका झाडाखाली मोठ्या दगडावर आजोबा बसलेला. त्याची गुरं अवतीभोवती चरत होती. मी वैतागून त्याच्याकडं पाहिलं आणि पोरांना उठवता उठवता त्या आजोबावर रागही काढला. तसं ते लेकरू पँट झटकत म्हणालं, ‘माझेच आजोबाहेत हे.’ ते तसं म्हटलं तसा मी कपाळावर हातच मारला आणि आजोबांकडं पाहत म्हणालो, ‘स्वत:च्या नातवाला पडताना बघूनबी काय वाटलं नाय होय आजोबा? असले कसले गेंड्याच्या कातड्याचे झालाय तुम्ही? छाताडात काळीज बिळीज हाये का नाय?’

आजोबांनी स्मित करत तोंडातली तंबाखू बाहेर काढून फेकली अन् म्हणाले, ‘मी लहानपणी गुरं राखाय यायचो, तवा याच रस्त्यावर घसरून पडलो होतो. माझा लेकबी दूध घालाय निघाला होता, तवा तोबी याच रस्त्याव घसरून पडला होता. आता माझा नातूबी पडला. उद्या याचा लेकबी घसरून पडंल आणि याचा नातूबी घसरून पडंल. तवा त्यानीबी माझ्यासारख्या गेंड्याच्या कातड्याचं व्हायला पायजे की. तुमच्यासारखी शिकल्याली लोकं आन् आम्ही निवडून दिल्याली नेतेलोकं काळीज निबार करून आम्हा गावाकडल्या लोकांना वाऱ्यावर सोडून देत्यात, मग आम्हाला असंच मरावं लागणारे. तुमचे फोटो काढून झाले असत्यान तर निघा आता. जगूद्या आम्हाला आमच्या पद्धतीनी.’ असं म्हणत तो म्हतारा लंगडत लंगडत गुरांमागं गेला आणि मी गुमान गाडी चालू केली आणि माझ्या हॉटेलकडं निघालो. हॉटेलवर येईपर्यंत आजोबा, त्यांचं बोलणं, रस्ता, घरसलेली मुलं सारं काही डोळ्यांसमोर फिरत होतं. हॉटेलवर आल्या आल्या मी टीव्ही लावला आणि राज्यातल्या राजकीय घडामोंडींच्या बातम्यांमध्ये आरामात हरवून गेलो. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं होतं बहुतेक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com