...आता 'मोदी, योगी विरुद्ध प्रियंका गांधी' !

बुधवार, 23 जानेवारी 2019

प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात कधी येणार, असा प्रश्‍न काँग्रेस कार्यकर्ते आणि विविध स्तरांमधील सहानुभूतीदारांना गेली अनेक वर्षे पडला होता. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यापलीकडे त्या यापूर्वी सक्रिय नव्हत्या. आता थेट सरचिटणीसपदी नियुक्ती करून काँग्रेसने प्रियंका यांच्याकडे पूर्वांचलची जबाबदारी सोपविली आहे. हा निर्णय लक्षणीय आहे. ​

नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमधील काँग्रेस समोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी! मोदी यांचा झंझावात आणि अमित शहा यांची संघटना बांधणी यासमोर काँग्रेस एकदम कोलमडली होती. पण आता लोकसभा निवडणुकीला दोन-अडीच महिने शिल्लक असतानाच काँग्रेसने आतापर्यंतचा सर्वांत हुकमी एक्का बाहेर काढला आहे. हा राजकीय 'मास्टरस्ट्रोक' आहे की नाही, हे काही दिवसांमध्ये उघड होईलच; पण यातून एक संदेश ठामपणे मतदार आणि विरोधकांपर्यंत पोचला आहे. तो म्हणजे आता गांधी घराणे थेट मोदी-शहा जोडगोळीला टक्कर देणार आहे. 

प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात कधी येणार, असा प्रश्‍न काँग्रेस कार्यकर्ते आणि विविध स्तरांमधील सहानुभूतीदारांना गेली अनेक वर्षे पडला होता. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यापलीकडे त्या यापूर्वी सक्रिय नव्हत्या. आता थेट सरचिटणीसपदी नियुक्ती करून काँग्रेसने प्रियंका यांच्याकडे पूर्वांचलची जबाबदारी सोपविली आहे. हा निर्णय लक्षणीय आहे. 

याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेला गोरखपूर मतदारसंघही याच भागात आहे. याच भागात भाजप सर्वाधिक बलशाली आहे आणि प्रियंका गांधी यांनी आता थेट मोदी-योगी या दोघांना टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

या राज्याच्या पूर्व भागात गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण वर्चस्व राखले होते. या भागात लोकसभेच्या 26 जागा आहेत आणि त्यापैकी 25 जागांवर भाजपने विजय मिळविला होता. त्यात मोदी आणि आदित्यनाथ यांचाही समावेश होता. आता देशात भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्येच भाजपची ताकद खर्च करण्यास भाग पाडणे, ही काँग्रेसची रणनिती आहे. त्यामुळे मोदी-योगी यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या लढाईचे नेतृत्त्व प्रियंका करणार आहेत. 

या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे.. तो म्हणजे प्रतिमेच्या लढाईचा! 'नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी' या लढाईमध्ये कुणाची सरशी होत आहे, हे गेल्या साडेचार वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला कदाचित पुन्हा 'मोदी विरुद्ध राहुल' ही लढाई नकोशी असेल. त्यामुळे ही निवडणूक आता 'मोदी विरुद्ध प्रियंका' अशी करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असावी.

Web Title: now Modi and Yogi aditynath Against Priyanka Gandhi