नव्या युगाचा दिवस, तुझ्या मर्जीचा उगवावा

file photo
file photo
चिकाटीने व धैर्याने लढत राहल्यास संकटाला हरविता येते हे खरे करून दाखविले अनिता सुजित मुजेवर या एकल महिलेने. त्या केळापूरला राहतात. अनिताने आपले फाटलेले स्वप्न मोठ्या कष्टाने शिवले. संकटामागून संकटे आली पण परिस्थितीचा सामना करून आयुष्यात पसरलेल्या काळोखाला मागे सारून नव्या युगाचा दिवस आपल्या मर्जीने उगविण्यास भाग पाडले. तिची कहाणी ही संकटात अडकलेल्या महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अनिताला जन्मत:च एका हाताला पोलिओमुळे अपंगत्व आले. बालवयात आई सोडून गेली. सावत्र आईच्या मातृत्वात ती मोठी झाली. आपल्या आयुष्याचा साथीदार तिने स्वमर्जीने निवडला. त्यामुळे आलेल्या संकटाला परिणामस्वरूप पुढे जावे लागले. गावातीलच स्थळ असल्याने हो-नाही करत तिचे लग्न झाले आणि ती सासरी राहायला आली. शेतकऱ्यासोबत विवाह झाल्याने आयुष्य मोठ्या संघर्षात गेले. ती म्हणते, आयुष्यात मी खूप संकटे पहिली. राहायला घर नव्हते. लग्न झाल्यावर अल्पावधीतच आम्ही वेगळे झालो. चार एकर कोरडवाहू शेती वाट्याला होती. शेतीच्या भरोशावर चार भिंतीचे पक्‍के घर करता आले नाही. संकटावर संकटे कोसळली. अशातच आरोग्य साथ देत नाही. पतीला टीबी झाला तेव्हा सहा महिने दवाखान्यात गेले. परिस्थिती गरिबीची होती. मुले लहान होती. पती शेती करायचे आणि शेतमजुरीही. त्यांनी मला प्रत्येक संकटात सोबत दिली. समजून घेतले; पण शेतीत आपल्या मर्जीचा दिवस कधीच बघायला मिळाला नाही. माझे पती शेती करून जिनिंगमध्ये कामाला जात होते. त्या बदल्यात बारासे रुपये मिळायचे. एवढ्या कमी पैशात घरखर्च भागत नव्हता म्हणून मी जेवणाचे डब्बे बनविण्याचे काम केले. जिनिंगच्या गरजू मजुरांना कामावर जाताना ते जेवणाचे डब्बे घेऊन जायचे. गावातही सरकारी उपक्रमाला मी जेवण बनवायची. शेतीला जो पैसा लागायचा तो मात्र कधीच जोडता आला नाही. कर्जातून केलेली शेती कधीच फायदा देऊ शकत नाही. मुद्दल आणि व्याज हे शेतीमधील मूळ उत्पन्न घेऊन जाते. पण शेतीत उत्पन्नाची हमी मिळत नाही. त्यामुळे बॅंकेचे कर्ज थकले. शेतीवर सोसायटी व भूविकास बॅंकेचे कर्ज होते. बॅंकेची कर्जवसुली ही नोटीस व घरी येऊन तगादा लावण्याची होती. गरजांमुळे कर्ज परत करणे झाले नाही. मुलांचे शिक्षण सुरू होते. अशातच माझ्या पतीने विष घेऊन आत्महत्या केली आणि माझ्यावरील संकटाचा भार अधिक वाढला. मोठा मुलगा शिकत होता आणि लहान कंपनीत होता. मला मुलाचे भविष्य घडवायचे होते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी एकतरी मुलगा सरकारी नोकरीत गेला पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगले व त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याचा मनोदय ठेवला. पतीच्या अचानक जाण्याने वडिलाची धुरा मोठ्या मुलाच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्याचे शिक्षण थांबले व तो शेतीत उतरला. सरकारने एक लाखाची मदत दिली. त्यातील तीस हजार शेतीत लावले व सरकारी रकमेच्या व्याजावर मी आपला खर्च भागविला. नाम फाउंडेशनने मदत दिली. त्यात लहानसे दुकान टाकले. माझ्या वडिलांनी मला दोन एकर शेत दिले होते ते गरजेपोटी विकले. लहान मुलाचे स्वप्न आर्मीत जाण्याचे होते. पण मी दोघांनाही भरतीला पाठवत होती. पहिली भरती गोंदिया येथे होती. खिशात पैसे नव्हते, पण मी त्यात तडजोड केली नाही. लहान मुलगा एका मार्काने कटला. त्यामुळे मनाला हुरहूर होती, पण त्याला हिंमत देऊिन पुन्हा भरतीची तयारी करायला लावली. कर्ज काढले. योगायोगाने तो आर्मीत लागला. माझ्या स्वप्नात खरे रंग भरण्याचे काम माझ्या मुलांनी केले. आज जे दिसते ते सर्व स्वप्नात असल्यासारखे वाटते. घर, दार, मोटारगाडी सर्व आहे. फक्त उणीव आहे माझ्या पतीची. आज ते हयात असते तर आपल्या मुलांच्या कर्तबगारीवर त्यांना अभिमान असता... आज सवितांच्या मुलांनी आपल्या घराच्या संपूर्ण परिस्थितीचा कायापालट केला आहे. या बदल्यात त्यांच्या प्रतिकिया महत्त्वपूर्ण आहे. रोशण सांगतो, मी जे काही मिळविले ते सर्व कष्टातून आहे. वडील गेल्याने माझे शिक्षणाचे नुकसान झाले. पेपर देण्याचा प्रयत्न केला पण ते शक्‍य झाले नाही. आईचे उपकार फेडता फिटणार नाहीत. तिने उपास तापास भोगून सर्व गरजा पूर्ण केल्या. शिक्षण दिले, मार्गदर्शन दिले, म्हणून आम्ही घडलो. माझा लहान भाऊ आर्मीत लागला. नोकरी लागताच त्याने सर्व पगार शेतीला जोड देण्यासाठी लावला. घर बांधण्यासाठी कर्ज घेतले. मी शेती करतो, त्यातून रोज पैसे येत नाहीत, म्हणून डेकोरेशनमध्ये पाच-सहा लाख गुंतवणूक केली. दहा-बारा लाखांचे कर्ज घेऊन घर बांधले. लोडिंग गाडी घेतली. आईला आधार व्हावा म्हणून एक दुकानची रूम काढली. आता काही दिवसांत माल भरायचा आहे. हे सर्व एकमेकांच्या मदतीशिवाय शक्‍य नाही. पण एक अनुभव आला. शेतीला रोज उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाची जोड दिल्याशिवाय शेती नफ्यात येऊ शकत नाही. आज मी शेतीव्यतिरिक्त पंधरा-वीस हजार रुपये महिन्याला कमवितो. तेवढे उत्पन्न हे एकट्या शेतीतून शक्‍य नाही. म्हणून शेतीची समस्या कायम आहे. शेतीत उत्पादन वाढवून उपयोग नाही तर उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न पाहिजे. भूषण म्हणतो, माझ्या यशाला आईच्या घामाचा वास आहे. मला तिच्या स्वप्नाला नवा आकार द्यायचा आहे. मी आईच्या दूर आहे. बापाचे दुख डोळ्यात आजही दिसते. बाप गेल्याने बापाची जबाबदारी भावाने स्वीकारली, म्हणून त्याचे शिक्षण थांबले. उत्पन्नाची हमी राहावी म्हणून शेतीला जोड देण्याचा माझा प्रयत्न आहे. मला वाटते, नोकरीमुळे आज आर्थिक परिस्थिती बदलू शकते पण नोकरी मिळविणे हे सहज राहिले नाही. पण आर्मीत जाण्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. फक्त ध्येय आणि मेहनत करण्याची गरज आहे. शेतकरी कुटुंबातील एकतरी मुलगा आर्मीत गेला पाहिजे. संकटात रडण्यापेक्षा लढणे हाच एक उपाय आहे, असे तो अनुभवावरून सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com