शॉपिंगची ‘नशा’ (डॉ. स्वप्नील देशमुख)

डॉ. स्वप्नील देशमुख
रविवार, 8 जुलै 2018

ऑनलाइन गेमिंगपाठोपाठ ऑनलाइन शॉपिंगनंही तरुण-तरुणींच्या मेंदूचा ताबा घ्यायला सुरवात केली आहे. अशा शॉपिंगची ‘नशा’ चढलेल्यांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक असल्याचंही उघड झालं आहे. खरेदीची ही अनावर झिंग नेमकी चढते तरी कशामुळं, तिच्यामुळं कोणते मनोकायिक परिणाम होतात, हे वेड कुठपर्यंत जाऊ शकतं, त्यातून बाहेर कसं पडायचं, पालकांनी काय काळजी घ्यायची आदी गोष्टींबाबत विश्‍लेषण.

वीस वर्षाची संजना (नाव बदललेलं आहे) काँप्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तिचे वडील तिला घेऊन माझ्या क्‍लिनिकला आले होते. तिची समस्या होती तिच्या सततच्या वाढत जाणाऱ्या क्रेडिट कार्डच्या बिलाची. ते तिनं अपराधीपणामुळं आपल्या पालकांपासून लपवून ठेवलं होतं आणि मूळ बिल आणि व्याज लागून ते वाढतच गेलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळं संजनाला नैराश्‍यानं (डिप्रेशन) ग्रासलं होतं. या सर्वाला कारणीभूत होती संजनाची ऑनलाइन शॉपिंगची सवय... सवय नव्हेच व्यसन!

होय, इतर व्यसनांप्रमाणं- उदाहरणार्थ कोकेनसारख्या अंमली पदार्थाच्या सेवनानं, दारूमुळं ज्याप्रमाणं मेंदूत डोपामाइन हे संप्रेरक वाढतं आणि त्या व्यक्तीला कथित ‘किक’ मिळते, अगदी त्याचप्रमाणं खरेदीसुद्धा डोपामाइन रिवार्ड सिस्टिमला चालना देते आणि त्या व्यक्तीला तात्पुरता का असेना; पण एक उत्साह येतो, समाधान मिळतं. मात्र, हा आनंद क्षणाचा असतो. तो वाढत गेला, की लवकरच त्या व्यक्तीमध्ये अपराधीपणाची भावना वाढीस लागते. इतर व्यसनाप्रमाणं यातही व्यक्ती गुरफटली जाते आणि खरेदी-अपराधीपणाची भावना-नैराश्‍य असं दुष्टचक्र सुरू राहतं. यालाच वैद्यकीय भाषेत ‘इंपल्स कंट्रोल डिसॉर्डर’ असं म्हणतात. ‘बाइंग ॲडिक्‍शन’, ‘पॅथॉलॉजिकल बाइंग’, ‘कंपल्सिव्ह बाइंग’, ‘ऑनिमॅनिया’ आदींचा यात समावेश होतो.  

‘अति सर्वत्र वर्जयेत्‌’ असं भारतीय संस्कृतीत म्हणतात, ते अगदी खरं आहे. विशेषतः खरेदीच्या किंवा ऑनलाइन शॉपिंगच्या बाबतीत तरी नक्कीच. ऑनलाइन शॉपिंग खूप सोयीचं असतं; कमी दरांत, कमी श्रमांत, अगदी घरबसल्या जगभरातल्या वस्तू एका क्‍लिकवर उपलब्ध होत असल्या, तरी याचा अतिरेक मात्र मानसिक, सामाजिक, आर्थिक आरोग्यास हानिकारकच आहे. या शॉपिंगनं आता तरुण-तरुणींच्या मेंदूचा ताबा मिळवायला सुरवात केली आहे. विशेषतः अशा शॉपिंगची ‘नशा’ मुलींमध्ये जास्त असल्याचंही उघड झालं आहे. राज्य नशाबंदी मंडळाकडं आठवड्याला किमान एक व्यक्ती सल्ला घेण्यासाठी येते, असंही नुकतंच स्पष्ट झाली आहे.  

ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डर/ इंपल्स कंट्रोल डिसॉर्डरचं प्रमाण भारतात सुमारे पाच ते आठ टक्के एवढं आहे. याच्या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं स्त्रिया/मुली असून, त्यांचा वयोगट साधारणतः १५-३० असा आहेत. भविष्यात हे प्रमाण अजूनच वाढण्याचा धोका आहे. शहरी भागांत हे प्रमाण जास्त आहे. आपण यामागची प्रमुख कारणं समजून घेऊ या. 

शॉपिंगचं ‘वेड’ कशामुळं?
ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डर होण्याची कारणं साधारणपणे तीन प्रकारची असतात :

 • उपलब्धता
 • व्यक्तिमत्त्वातले दोष
 • सामाजिक दबाव 

उपलब्धता : आजकाल वयाच्या साधारणतः तेरा-चौदाव्या वर्षापासून मोबाईलचा वापर करणं सुरू होतं. सर्व ऑनलाइन शॉपिंग ॲप्स या वयातल्या नवतरुणांची जिज्ञासा, आवड, त्यांची ‘सर्च हिस्टरी’ वापरून, क्‍यू रिॲक्‍टिवली- म्हणजे तुमच्या सर्च हिस्टरीनुसार जाहिरात ‘पॉप’ होणं या तंत्राचा वापर करून, अगदी इतर वेबसाइट्‌सवरही आपल्या उत्पादनांची सतत जाहिरात करतात. हल्ली बऱ्याच तरुण- तरुणींना त्यांचे आई-वडील क्रेडिट कार्ड वापरण्याची मुभा देतात. अशा रितीनं सुरवातीला हौस म्हणून आणि नंतर सवय म्हणून ऑनलाइन शॉपिंगची चटक लागते आणि कालांतरानं त्याचं व्यसन बनतं. 

व्यक्तिमत्त्वातले दोष : ऑनलाइन शॉपिंग करणारे सगळेच या व्यसनाला बळी पडतात का? तर नाही. काही जणांच्या व्यक्तिमत्त्वात असे काही दोष / बाबी असतात, ज्यामुळं त्या व्यक्तींना व्यसनाधीनतेचा धोका अधिक असतो. एकलकोंडा स्वभाव, अँक्‍झायटी, अतिताण घेण्याची सवय, बेजबाबदारपणा, नैराश्‍य, ध्येय नसणं, स्वतःबद्दलचा विश्‍वास कमी असणं, न्यूनगंड आदी कारणांमुळं या व्यसनाला बळी पडण्याचं प्रमाण जास्त असतं.

सामाजिक दबाव : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲपसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌समुळं तरुण-तरुणींमध्ये ब्रॅंडेड कपडे, शूज घालण्याची, चित्रपटांतल्या कलाकारांप्रमाणं दिसण्याची एक प्रकारची चढाओढच दिसून येते. मित्र-मैत्रिणीकडं असणारं महागातलं ब्रॅंडेड सामान जेव्हा ऑनलाइन शॉपिंगमध्ये थोड्या डिस्काऊंटमध्ये किंवा सेलच्या नावाखाली स्वस्तात मिळतं, हे पाहून अनेक तरुण मंडळी त्याच्याकडं आकर्षित होतात. फक्त सेल्फी काढून जगाला दाखवण्यासाठी हे कपडे घेतले जातात, असंही दिसून आलंय. समाजमाध्यमांच्या एकूणच अतिरेकामुळं जे अनेक दुष्परिणाम होतात त्यातलाच हा एक मोठा दुष्परिणाम आहे.

लक्षणं 
‘खरेदीज्वरा’नं तुम्हाला पुरतं ग्रासलंय हे ओळखायचं कसं? साधारण खालील लक्षणं दिसायला लागली, की तुम्ही या मार्गावर जायला लागला आहात हे ओळखायला हरकत नाही. 

 •  सतत खरेदीचा विचार मनात येणं.
 •  स्वतःवर ताबा ठेवणं अवघड होणं. इच्छा नसूनही शॉपिंग ॲप्सवर वेळ घालवणं.
 • मासिक बजेटमध्ये बसत नसतानाही खरेदीवर पैसे खर्च करणं.
 • ईएमआयवर किंवा उधारीवर, क्रेडिट कार्डवर खरेदीचा सपाटा लावणं
 • गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करणं.
 • या सवयीमुळं कामावर परिणाम होणं. घरात भांडणं होत असली, तरीही सवय सुटत नाही असं होणं.
 • खरेदीनंतर अपराधीपणाची भावना येणं.
 • ऑनलाइन शॉपिंग केल्याशिवाय उत्साह न वाटणं. सतत अस्वस्थ होणं.
 • खरेदी केलेल्या वस्तू वापरात न आणणं. आधीच्या वस्तू पडून असल्या, तरी अजून खरेदी करणं.
 • अपराधीपणाच्या भावनेमुळं खरेदी लपवून ठेवणं.

व्यसनाचे दुष्परिणाम
ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन विशिष्ट मर्यादेपुढं गेलं, की अनेक दुष्परिणाम होतात.
आर्थिक : आर्थिक व्यवस्थापन अवघड होतं. तरुणांमध्ये या व्यसनामुळे पैशाच्या अभावी चोरी करणं, घरातून नकळत पैसे घेणं यांसारख्या प्रवृत्ती बळवतात.
सामाजिक : सततच्या ऑनलाइन शॉपिंगमुळं पाल्य-पालक, पती-पत्नी यांच्यात किंवा मित्र-मैत्रिणींमध्येसुद्धा मतभेद होतात आणि त्यातून निर्माण झालेला ताण त्या व्यक्तीला अजून व्यसनाधीन बनवतो. 
कार्यक्षमतेवर परिणाम : कामात लक्ष लागणं कमी होतं. वैफल्याची जाणीव आणि अपराधाची भावना वाढीस लागते. 
मानसिक आजार : या सर्व दुष्परिणामातून पुढं मानसिक आजार होतात. अशा तरुणांना नैराश्‍य, अस्वस्थता (अँक्‍झायटी), ओसीडी, ताणतणाव असे मानसिक आजार संभवतात. यातून पुढं वैफल्य वाढत गेल्यामुळं आत्महत्येचंही प्रमाण वाढत जातं असंही दिसून आलं आहे. 

उपचार 
दारू किंवा अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणं ऑनलाइन शॉपिंगचं व्यसनदेखील वेळीच निदान आणि योग्य उपचार यांच्या माध्यमातून वेळीच आटोक्‍यात आणता येतं. साधा छंद व्यसनापर्यंत जाऊच नये यासाठी काही छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेता येते आणि वैद्यकीय उपचारांचीसुद्धा मदत घेता येते. 

प्रतिबंधात्मक उपाय 
अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. त्या पाळल्या, तर परिस्थिती हाताबाहेर जाणारच नाही. या काही गोष्टींची काळजी घ्या.

 • कधीही खरेदी करण्याआधी हव्या असलेल्या वस्तूंची यादी करा.
 • गरज नसताना खरेदी करू नका.
 • मासिक खर्चाचं आकलन करूनच यादी तयार करा.
 • चढाओढीत पडू नका किंवा प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या गरजांचा सारासार विचार करून मगच खरेदी करा.
 • शक्‍य झाल्यास ऑनलाइन शॉपिंगला उद्युक्त करणारी कमीत कमी ॲप्स मोबाईलमध्ये ठेवा. या छोट्याशा गोष्टीमुळं मनावर ताबा ठेवणं सोपं होईल.
 • दररोजचा स्क्रीन टाइम मर्यादित असला पाहिजे. साधारण एक तासाहून अधिक वेळ मोबाईलवर घालवू नका.
 • छंद जोपासा.
 • नियमीत मैदानी खेळ खेळा. व्यायाम करा.
 • सतत कार्यशील राहा. जेणेकरून वैफल्याची भावना किंवा ताणतणाव वाढणार नाही. 
 • मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा. 

वैद्यकीय उपचार 
ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डरमध्ये वरचे प्रतिबंधात्मक उपाय करूनही काही फरक जाणवत नसेल, तर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घेणं आवश्‍यक असतं. या उपचारांत कॉग्निटीव्ह बिहेविअर थेरपी (बीटी) आणि नैराश्‍य घालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग होतो. 

ऑनलाइन शॉपिंगचं वेड हा एक ‘आजार’ आहे, हे लक्षात घेतलं, तर उपचारांनी तो बरा होऊ शकतो. याविषयी सामाजिक जागृती करणं भारतासारख्या विकसनशील देशातही आवश्‍यक झाले आहे. 

ऑनलाइन शॉपिंगप्रमाणंच ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या ॲप्सची गर्दी बघता नजीकच्या भविष्यकाळात बाहेरच्या खाण्यामुळं होणारे लठ्ठपणा, जंक फूड ॲडिक्‍शनसारख्या समस्या होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यावरही वेळीच उपाययोजना आणि उपचार करणं आवश्‍यक आहे. 

स्व-मदत गट 
सध्या अनेक स्व-मदत गटसुद्धा कार्यरत आहेत. अशा गटांमध्ये समान समस्या असणारे लोक कार्यरत असतात. ते एकमेकांना मदत करतात, अनुभवांची, उपचारांची देवाणघेवाण करतात आणि माहितीही देतात. ‘स्पेंडर्स ॲनॉनिमस’, ‘डेब्टर्स ॲनॉनिमस’ यांसारखे स्व-मदत गट शॉपिंगच्या नशेतून बाहेर यायला निश्‍चित मदत करू शकतील. स्वतःच्या अनुभवांनी इतरांना सावध करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. 

सुजाण नागरिक, पालक म्हणून काय करायचं?
इंटरनेटच्या अतिवापरामुळं होणाऱ्या ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डरपासून आपल्या प्रियजनांना किंवा पाल्यांना वाचवण्यासाठी आपण सर्व मिळून काही महत्त्वाची मदत करू शकतो. 

 •   ‘व्यक्तिस्वातंत्र्य दिलं, तरी स्वैराचार नको,’ या उक्तीला अनुसरून भूमिका घ्या. काही कारणांमुळं पाल्यांना आपला मोबाईल, किंवा क्रेडिट कार्ड दिलं, तरी या स्वातंत्र्याचा काय, किती आणि कसा वापर करावं याची जाणीव त्यांना करून देणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. 
 •   पालकांनी स्वतःच्या आचरणानं आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवायला हवा. ‘लीड बाय एक्‍झांपल’ किंवा ‘प्रॅक्‍टिस व्हॉट यू प्रीच’ असं म्हणतात ते अगदी खरंच आहे. त्यामुळं पालकांनी स्वतः मोबाईलचा अतिवापर करणं, ऑनलाइन शॉपिंगचा अतिरेक करणं या गोष्टी टाळायला पाहिजेत. 
 •   ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे सूत्र जमेल तेवढं तरी आपण मुलांना सांगू शकतो. 
 •   हव्या तेवढ्याच गोष्टींची आवश्‍यकतेनुसारच उपलब्धता असावी, हे मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे.
 •   समाजकार्यात सहभाग ः लहानपणापासूनच पाल्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवावी आणि इतरांना मदत करण्याच्या बाबतीत जागरुक करावं. त्यात गरीब मुलांना मदत करणं, अनाथाश्रमांना भेट देणं, स्वच्छता अभियानात मदत करणं, श्रमदान करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. यातूनच मुलांना सद्‌सद्विवेकबुद्धी निर्माण होईल आणि खरा आनंद हा घेण्यात नाही तर देण्यात असतो, याची प्रचिती येईल. 
 •   आजकाल एकुलती एक असलेल्या आपल्या पाल्यांना पालक कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाहीत. हे सर्वथा चुकीचं आहे. मुलांना योग्य वेळी नकार दिल्यास त्यांची नकार पचवण्याची क्षमता वाढतेच; पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करण्याची क्षमतादेखील वाढते. अशी मुलं मानसिकरित्या सशक्त होतात आणि प्रलोभनांना बळी पडत नाहीत. 

याही आजारांकडं लक्ष द्या
ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डरप्रमाणंच इंटरनेटच्या अतिवापरामुळं किंवा गैरवापरामुळं खालील आजार होऊ शकतात. त्याकडंही लक्ष देणं गरजेचं आहे.

 • गेमिंग ॲडिक्‍शन
 • इंटरनेट पोर्नोग्राफी ॲडिक्‍शन
 • सायबर क्राईम
 • झोपेच्या समस्या 
 • (स्लीप डिसॉर्डर)
 • नैराश्‍य
 • ऑनलाइन जुगार (गॅंबलिंग)
 • ब्लू व्हेलसारख्या 
 • जीवघेणे गेम
 • सायबर रिलेशनशिप ॲडिक्‍शन
 • सायबर सेक्‍स ॲडिक्‍शन
 • सोशल मीडिया ॲडिक्‍शन

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Online shopping is new mental disorder