गोष्ट एका प्रवासाची (गौरी ब्रह्मे)

गोष्ट एका प्रवासाची (गौरी ब्रह्मे)

'आउटलॅंडर' या ब्रिटिश-अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेनं गेली तीन वर्षं वेब सिरीजच्या दुनियेत खूप लोकप्रियता मिळवली आहे. क्‍लेअर आणि फ्रॅंक हे जोडपं स्कॉटलंडमध्ये एका गावी गेलं असताना अचानक क्‍लेअर दोनशे वर्षं मागं जाते आणि सुरू होतो एका प्रेमाचा, साहसाचा, रहस्याचा, ऐतिहासिक घडामोडींचा प्रवास. अतिशय गुंतवून ठेवणारा हा प्रवास अनुभवण्यासारखाच. 

'आउटलॅंडर' या ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड ऑगस्ट 2014 मध्ये नेटफ्लिक्‍सवर आला. पहिल्याच सीझनमध्ये ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. तेव्हापासून 2017 पर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्षं या मालिकेनं तिची लोकप्रियता तसूभरही गमावलेली नाही. सतत दहापैकी नऊ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी बारा ते चौदा भागांचे तीन सीझन झालेले आहेत. आता प्रेक्षक चौथ्या सीझनची आतूरतेनं वाट पाहत आहेत. डायना गाबाल्ड्‌न या लेखिकेच्या 'आउटलॅंडर' या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिरीजचा कल्पनाविस्तार रोनाल्ड मूर यांनी केला आहे. 

दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं आहे. क्‍लेअर आणि फ्रॅंक हे दांपत्य एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवण्याकरता स्कॉटलंडमधल्या इन्व्हेर्नेस या गावी आलेलं आहे. क्‍लेअर नर्स आहे आणि फ्रॅंक युद्धात लढला आहे, त्यामुळं दोघांनाही बऱ्याच विरहानंतर एकमेकांबरोबर काही प्रेमाचे क्षण घालवायला वेळ मिळाला आहे. काही ध्यानीमनी नसताना एके दिवशी क्‍लेअर एकटीच फिरायला गेली असताना अचानक दोनशे वर्षं मागच्या काळात जाते. इथून सुरू होते क्‍लेअरच्या साहसाची गोष्ट. दोनशे वर्षांपूर्वीच्या स्कॉटलंडमधलं आयुष्य, त्या आयुष्याशी जुळवून घेत असताना तिला भेटलेले लोक, तिला निर्माण झालेले शत्रू, तिच्यावर ओढवलेले चांगले-वाईट प्रसंग, जेमी फ्रेजरच्या रूपात तिला भेटलेलं तिचं खरं प्रेम, त्यांना होणारं मूल, त्यांची ताटातूट, परत एकत्र येणं अशा एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळं क्‍लेअरचं संपूर्ण आयुष्य तिला काही समजण्याच्या आत बदलून जातं. जेमी हा स्कॉटलंडच्या मातीतला एक साधा माणूस. लढवय्या, देखणा आणि मायदेशावर अतोनात प्रेम असणारा. क्‍लेअरला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्या येण्यानं त्याचं आयुष्य अत्यंत वेगळी वळणं घेतं. क्‍लेअर आणि जेमीमधलं ओळखीचं, भेटीचं, त्यांच्यात उत्पन्न झालेल्या आकर्षणाचं, त्यांच्या अचानक झालेल्या लग्नाचं, त्यांच्यातल्या प्रणयाचं, रागाचं, भांडणाचं, एकमेकांना सतत सावलीसारखी साथ देण्याचं चित्रण दिग्दर्शकानं अतिशय सुरेख रीतीनं केलं आहे. 

या सिरीजमधलं एक अतिशय महत्त्वाचं पात्र म्हणजे दोनशे वर्षांपूर्वीची स्कॉटलंड आणि इंग्लंडची ऐतिहासिक पार्श्वभूमी. इंग्रजांच्या हुकूमशाहीनं, धाकदपटशाहीनं त्रस्त स्कॉटलंडवासी, निव्वळ शेती आणि जमीनजुमल्याच्या आधारे आयुष्य जगणारे साधे शेतकरी, रोज स्कर्ट (किल्ट) नेसणारे टिपिकल स्कॉटिश पुरुष आणि कॉर्सेटमधल्या स्त्रिया, हुकूमशाहीविरुद्ध जॅकोबाइट्‌सनी केलेले उठाव, त्यांचा पडाव, त्यावेळचं राजकारण हे सर्व अतिशय मनोरंजकरित्या चित्रीत करण्यात आलं आहे. आपल्याला या इतिहासातली फार खोल माहिती नसली, तरी कथानक अतिशय प्रभावी असल्यानं त्यातल्या गोष्टी आपल्याला सहजगत्या समजत जातात. 

क्‍लेअरचं आयुष्य दोनशे वर्षांनी मागं गेल्यावर तिला इथल्या हुकूमशाहीशी, सरंजामशाहीशी, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीशी लढताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. फ्रॅंकवर प्रेम असूनही तिला त्याला विसरावं लागतं. पुढं काय घडणार आहे हे तिला बऱ्याचदा आधीच माहीत असतं; पण इतिहास बदलणं तिच्या हातात नसतं. भविष्यकाळ माहीत असलेली, भूतकाळात जगणारी क्‍लेअर अतिशय हुशारीनं आणि विचारपूर्वक या परिस्थितीशी सामना करते. कॅट्रीओना बाल्फ या अभिनेत्रीनं जबरदस्त अभिनयानं या व्यक्तिरेखेत जान आणली आहे. ती सुंदर, नाजूक, आकर्षक तर दिसतेच; पण तेवढीच बिनधास्त, कणखर आणि शूरही दिसते. क्‍लेअरनं कल्पनाही केलेली नसताना जेमी तिच्या हृदयात महत्त्वाची जागा पटकावतो. जेमीची व्यक्तिरेखा लेखिकेनं अतिशय आकर्षक रंगवली आहे. इतक्‍या जुन्या काळातला पुरुष असूनही तो मुळीच बुरसटलेल्या विचारांचा नाहीये. तो सतत क्‍लेअरला समान वागणूक देतो, तिचं मत विचारतो, चूक केली की त्याबद्दल सुनावतो, स्त्री म्हणून कायम तिचा सन्मान करतो. 1743 मध्ये जगणारा मुक्त विचारांचा सहृदय पुरुष म्हणून त्यालाही अनेक अडचणी येतात. 

दोनशे वर्षांपूर्वीचा काळ पडद्यावर उभा करणं सोपं नाही. आजकाल व्हीएफएक्‍स तंत्रज्ञानामुळं पडद्यावर काहीही साकार करणं सोपं झालं असलं, तरीही त्या काळातलं राहणीमान, बोलीभाषा, खाण्यापिण्याच्या पद्धती, कपडे, संस्कृती, चालीरीती या सगळ्याला खोल संशोधनाशिवाय पर्याय नाही. 'आउटलॅंडर'ची टीम या अभ्यासात कुठंच कमी पडत नाही. अलगदपणे ती आपल्याला जुन्या काळात नेते. स्कॉटलंड, प्राग, चेक रिपब्लिकमध्ये हिरव्यागार जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेलं चित्रीकरण डोळ्यांना अतिशय सुखावह ठरतं. टिपिकल ब्रिटिश आणि स्कॉटिश इंग्लिश ऐकणं हीसुद्धा एक पर्वणी ठरते. 

'आउटलॅंडर'बद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. मालिका प्रसारित व्हायच्या आधी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सोनी प्रोड्युसर्सची मुद्दाम भेट घेऊन मालिका थोडी प्रलंबित करायला सांगितली होती, कारण नेमकं त्याचवेळी स्कॉटलंड ब्रिटनचा भाग होणार की स्वतंत्र देश होणार, यावर ऐतिहासिक मतदान होणार होतं. मालिकेत स्कॉटिश क्रांतिकारक प्रमुख भूमिकेत होते आणि याचा प्रभाव जनमतावर पडला असता, याची कॅमेरून यांना काळजी पडली होती. सोनीनं कॅमेरून यांची मागणी मान्य केली. 

या सिरीजला गोल्डन ग्लोबसकट उत्तम नायिका, उत्तम वेशभूषा, उत्तम स्त्री दिग्दर्शिका यांसारखी अनेक पारितोषिकं आणि नामांकनं मिळाली आहेत. त्यातलं सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'द मोस्ट बिंगवर्दी सिरीज ऑफ द इअर.' म्हणजे वर्षातली सर्वांत खिळवून ठेवणारी मालिका. 'आउटलॅंडर'ची हीच खासियत आहे. या मालिकेला एका ठराविक साच्यात घालता येणार नाही. एकाच वेळी ती रहस्यकथा आहे, प्रेमकथा आहे, शौर्यकथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, मानवी भावभावनांचा ठाव घेणारी भावनिक कथा आहे, 'टाइम ट्रॅव्हल' ही भन्नाट संकल्पना असलेली फॅंटसीकथा आहे आणि एकीकडे अत्यंत वेगानं घडणारी साहसकथा देखील आहे. डोळे, कान आणि मन तृप्त करणारी ही सिरीज नक्कीच बघायला हवी! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com