ईश्‍वर (न्या. पी. बी. सावंत)

न्या. पी. बी. सावंत
रविवार, 1 जुलै 2018

मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती प्रत्येक अणू-रेणूमध्ये भरलेली आहे. ईश्‍वर म्हणजे आदिशक्ती. आपण तिचीच निर्मिती असल्यामुळं ती म्हणजेच ईश्‍वर आपल्यातच वास करत असतो. गरज आहे ती याची जाणीव होण्याची आणि त्याप्रमाणं आपलं वर्तन, आपले विचार आणि कृती ही नेहमीच उच्च कोटीतील ठेवण्याची.

मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती प्रत्येक अणू-रेणूमध्ये भरलेली आहे. ईश्‍वर म्हणजे आदिशक्ती. आपण तिचीच निर्मिती असल्यामुळं ती म्हणजेच ईश्‍वर आपल्यातच वास करत असतो. गरज आहे ती याची जाणीव होण्याची आणि त्याप्रमाणं आपलं वर्तन, आपले विचार आणि कृती ही नेहमीच उच्च कोटीतील ठेवण्याची.

देवाचा जन्म माणसाच्या मनात झाला. या जन्माचं पितृत्व नैसर्गिक आपत्तीजनक घटनांकडे जातं. कडाडणाऱ्या विजा, कोसळणारा पाऊस, पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखी आदी माणसाच्या मनात भीती व दहशत निर्माण करणाऱ्या, असुरक्षितता आणि अनिश्‍चितता यांनी ग्रासून टाकणाऱ्या घडामोडींनी, त्याचं मन, डोळे आणि हात आपोआपच आकाशाकडे वळले. या सर्व घटनांचा कर्ता-करविता बाह्य जगात कुणीतरी आहे, हे त्याच्या मनानं पक्कं केलं आणि तेव्हाच देवाची निर्मिती झाली. मग तो त्याची निरनिराळ्या रूपांत आणि निरनिराळ्या मार्गांनी पूजा-प्रार्थना करू लागला.
माणसाचं जीवन - मग ते अश्‍मयुगातलं असो वा अवकाश युगातलं- नेहमीच बाह्य परिस्थिती आणि घटनांवर अवलंबून राहिलेलं आहे वा त्यांच्याशी केलेल्या प्रतिक्रियांनी घडवलेलं आहे. बाह्य परिस्थिती, नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणानं बनलेली असते. कालमानाप्रमाणं ती बदलत असते. त्यामुळे तिच्याशी करायच्या मुकाबल्यांचे मार्ग आणि साधनंही बदलणं भाग असतं; पण ते बदलले जातातच असं नाही.

पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळे समाज वस्ती करत आले आहेत. प्रत्येक प्रदेशातली नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे तिथल्या नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या असतात. थंड प्रदेशात गोठून टाकणारी थंडी, तर उष्ण प्रदेशात भाजून टाकणारी उष्णता. म्हणून त्यांच्याशी मुकाबला करणारी साधनंही वेगवेगळी. तिथल्या नैसर्गिक आपत्तीही वेगवेगळ्या. तिथं राहणाऱ्या माणसांच्या मनात ईश्‍वराची कल्पनाही निरनिराळ्या रूपांत. थंड प्रदेशातल्या माणसाचा देव ऊब देणारा, तर उष्ण प्रदेशातला देव गारवा निर्माण करणारा. नरकाच्या कल्पनाही अशाच एकमेकांच्या विरुद्ध. थंड प्रदेशातला माणूस नरक हा थिजवून टाकणाऱ्या थंडीत पाहतो, तर उष्ण प्रदेशातील माणूस तो करपून टाकणाऱ्या उष्णतेत. या झाल्या आदिमानवाच्या ईश्‍वर, स्वर्ग (ईश्‍वराचं वस्तीस्थान) व नरकाच्या कल्पना.
जसजशी मानवाची प्रगती झाली आणि त्यानं नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्याचे आणि जीवन जगण्याचे एकापेक्षा एक उत्तम उपाय शोधून काढले, तसतशी मानवाची ईश्‍वराबद्दलची कल्पनाही बदलत गेली. वैज्ञानिक प्रगतीनं हे सिद्ध केलं, की सर्व नैसर्गिक आपत्ती या गूढ वा अज्ञान घटना नसून, त्या निसर्ग-नियमाप्रमाणं घडून येत असतात. प्रत्येक नैसर्गिक घटनेमागं विशिष्ट नैसर्गिक कारण-परंपरा असते आणि ही परंपरा पूर्ण झाली, की ती घटना घडते. उदाहरणार्थ, पृथ्वीवरच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याचे आकाशात पाण्यानं भरलेले ढग निर्माण होतात आणि पाऊस पडतो. वाऱ्यानं हे ढग एकमेकांवर आदळले, तर त्यांचं घर्षण होऊन त्यातून वीज निर्माण होते आणि ती कडाडते. निसर्गाचं हे रहस्य, म्हणजे त्याचा हा नियम लक्षात आल्यानंतर त्याबद्दलची भीती नाहीशी झाली आणि पावसापासून, विजेपासून, पुरापासून रक्षण करण्याचे उपाय मानवानं शोधून काढले. पावसाच्या पाण्याचा उत्तमात उत्तम उपयोग करून घेण्याचं तंत्रही त्यानं शोधून काढलं. तीच गोष्ट वादळ, भूकंप, ज्वालामुखी आदी घटनांची. विज्ञानानं निसर्गाचं गूढ आणि नियम एकामागून एक उकलून काढल्यानंतर मानवाच्या ईश्‍वराविषयीच्या कल्पनाही बदलत गेल्या आणि आज तो नैसर्गिक घटनांचा कर्ताकरविता म्हणून ईश्‍वराकडे पाहत नाही. काही अप्रगत समाज, समूह, आदिवासी, अशिक्षित आदी अजूनही त्या ईश्‍वरीय कृती म्हणूनच त्यांच्याकडे पाहतात.
आज प्रगत माणूस जरी नैसर्गिक घटनांत ईश्‍वर पाहत नसला, तरी ईश्‍वराचे अस्तित्व मानतो. फारच थोडे लोक नास्तिक आहेत. काही धार्मिक समाज ईश्‍वराचं अस्तित्व मानत नसले, तरी ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाह्यशक्तीची आराधना करत असतात. त्या शक्तीला ते ईश्‍वर हे नाव देत नसले, तरी जगण्याकरता तिचा आधार घेत असतात.

माणूस हा कितीही शूर, पराक्रमी आणि धाडसी असला आणि कितीही स्वसंरक्षक आयुधांनी, साधनांनी सज्ज असला, तरी तो पूर्णतः स्वतःच्या शक्तीवर अवलंबून नसतो. स्वशक्तीला पूरक अशा बाह्यशक्तीची त्याला वेळोवेळी गरज भासते. कितीही दूरदृष्टीनं पूर्वनियोजन केलेलं असलं, तरी अपघात, अनिश्‍चितता, आगंतुक आणि अकल्पित घटनांचा संभव आणि त्यामुळे वाटणारी असुरक्षितता, त्यामुळे व अशा घटना घडू नयेत म्हणून तो मनात प्रार्थना करतच असतो. अशा घटना या सर्वस्वी बाह्य परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे, त्याला बाह्य शक्तीचा आधार आणि हमी हवी असते. अशा वेळी तो आपल्या श्रद्धास्थानांकडे वळतो आणि त्याला आपलं कार्य निर्धोकपणे पार पडावं म्हणून मनोमन आळवतो. यावेळी त्याला त्याचं ज्ञान, विज्ञान, विवेक याचा उपयोग होत नाही. माणसांची श्रद्धास्थानं वेगवेगळी असतात. हाती घेतलेलं कार्य, देव, देवता, आई-वडील, गुरू, संत वगैरे. श्रद्धास्थानं ही त्यांची शक्तिस्थानं असतात. कुठलंही संकट निवारणाऱ्या आणि सर्वत्र विजय मिळवून देणाऱ्या सर्वशक्तिमान स्थानाची त्याला नेहमीच गरज भासत असते. असं सर्वश्रेष्ठ स्थान त्याला मूर्त वा अमूर्त स्वरूपात जिथं दिसेल, तिथं तो नतमस्तक होतो.
माणसाच्या या सहज प्रवृत्तीला आणि कृतीला धोपटपणे, मानसिक दौर्बल्य मानणं चुकीचं आहे. जे केवळ आपल्या श्रद्धास्थानांवर अवलंबून राहून फळाची अपेक्षा करतात, ते खचितच मूर्ख असतात. परंतु, जे त्यांच्या श्रद्धास्थानाचं स्फूर्तीस्थान आणि शक्तीस्थान म्हणून उपयोग करून आपले प्रयत्न आणि कृती अधिक पटीनं, निश्‍चयानं आणि जोमानं करतात, ते दुर्बल नसतात. ते अधिक शक्ती आणि धैर्य मिळवून आपलं कार्य तडीस नेणारे ध्येयनिष्ठ कार्यकर्ते असतात. ते अधिक कृती वा प्रयत्न करण्याकरता उत्सुक असतात. ज्ञान, विवेक, तारतम्यता आणि शहाणपणा हे माणसाला योग्य मार्ग दाखवतात; परंतु ते त्या मार्गानं जाण्याला उद्युक्त करत नाहीत. ती शक्ती आणि प्रेरणा माणसाला त्याच्या निश्‍चयातून मिळते आणि निश्‍चय दृढ करण्याकरता वा त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याकरता प्राकृतिक साधनं लागतात वा त्याचबरोबर आंतरिक शक्तीही लागते. ही शक्ती माणूस वेळोवेळी त्याच्या श्रद्धास्थानातून मिळवत असतो.

काही कट्टर विवेकवादी सोडले (आणि आज तरी ते संख्येनं अल्प आहेत), तर बहुसंख्य लोकांचं श्रद्धास्थान हे ते ज्याला देव, देवता वा ईश्‍वर मानतात ते असतं. काहींचा देव हा मूर्त स्वरूपात असतो, तर इतरांचा अमूर्त स्वरूपात असतो. काही मूर्तीपूजक, तर काही ग्रंथपूजक. काही त्यांच्या धर्माच्या संस्थापकांनाच देव वा देवाचा प्रेषित मानतात, तर काही विश्‍वशक्ती वा आदिशक्तीला देव/देवता मानतात. जोपर्यंत निरनिराळ्या देव/देवतांना मानणारे समाज-समूह आपल्या दैवतांची शांतपणे उपासना, प्रचार व प्रसार करतात आणि इतरांचा द्वेष वा अवमान करत नाहीत, इतरांशी सहिष्णुतेनं, आदरानं वागतात, तोपर्यंत त्या त्या ठिकाणी शांतता, स्वास्थ्य आणि सामंजस्य वावरतं.

मात्र, आजपर्यंत जगात जो सर्वांत अधिक रक्तपात झाला आहे, तो देवाधर्माच्या नावानं. त्याचं कारण, प्रत्येक जण आपापल्या देवतांचं, उपासनापद्धतीचं, देवाच्या नावानं निर्माण केलेल्या धर्माचं वर्चस्व इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत असतात. धर्माबद्दल आपण निराळी चर्चा करणार आहोतच. सध्या देवासंदर्भातल्या भांडणाबद्दल विचार करू या.

हा विचार करताना मूलभूत प्रश्‍न उपस्थित होतो तो म्हणजे देव एक आहे की अनेक? जे धर्म देव मानत नाहीत, म्हणजेच देवाचं अस्तित्व नाकारतात, त्यांचे अनुयायी अशा धर्माच्या संस्थापकांनाच देवाच्या स्वरूपात पाहतात आणि त्यांची पूजा-अर्चा करतात, हे आपण वर पाहिलं. उदाहरणार्थ, आपल्याच देशात निर्माण झालेले बौद्ध आणि जैन धर्म. देवाची पूजा त्यांच्या संस्थापकांच्या- बुद्ध आणि महावीर यांच्या- शिकवणुकीविरुद्ध आहे, तरी याचा अर्थ सर्व मानवांना एका बाह्य आधाराची, शक्तीची गरज भासते आणि ती शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात पाहिल्याशिवाय त्याला सुरक्षित वाटत नाही. आपण इथं देवाशी चर्चा करणार आहोत, ती या स्वरूपातील देवाची.

आश्‍चर्य म्हणजे जे धर्म आणि समाज, समूह देव मानतात, ते सर्व धर्म समाज, समूह देव एकच आहे, हेही मानतात. त्याचप्रमाणे सर्व मानव हे त्या एकाच देवाची लेकरं आहेत, असंही मानतात. मात्र, प्रत्येक समाज हेही आवर्जून मांडतो, की त्याचा देवच खरा आणि इतरांचा देव खोटा. देवांबाबतच्या भांडणाला इथून सुरवात होते. खऱ्या आणि खोट्या देवाची पारख कशी करायची? "खोट्या' देवांच्या उपासकांचा "खऱ्या' देवाचे अनुयायी उपहास, तिरस्कार, द्वेष आणि हत्याही करतात. मात्र, सर्व मानवजात जर त्यांच्या खऱ्या देवाची निर्मिती आहे, तर हेही त्यांचेच भाऊ-बहीण आहेत, असा किंचितही विचार ते करत नाहीत. केवळ "चुकीच्या देवा'ची ते उपासना करतात म्हणून ते द्वेषाला आणि हत्येला कसे काय पात्र होतात? एखाद्या कुटुंबाच्या प्रमुखानं, त्याच्या काही मुलांनी त्याच्या दृष्टीनं गैर विचार आणि वागणूक केली, म्हणून त्याचा द्वेष वा हत्या करणं हे जसं रानटी, असंस्कृत, क्रूर, लांच्छनास्पद व दोषास्पद ठरेल, तसाच हा प्रकार नाही का?

हा सर्व अज्ञानाचा आणि क्षुद्र मानसिकतेचा परिणाम असतो. "खऱ्या' देवाचे तथाकथित अनुयायी, भक्त, उपासक हे त्यांच्या देवाचेच गुन्हेगार असतात. त्यांचा देव जर त्यांना मानवता, प्रेम, करुणा, सत्य, अहिंसा, सहिष्णुता आदी सद्‌गुणांची, विचारांची आणि कृतीची दीक्षा देत असेल, तर त्यांचं हे वागणं म्हणजे त्यांच्याच देवाच्या आदेशाविरुद्ध आणि शिकवणीविरुद्ध नाही का? त्यांच्या देवाचे भक्त, अनुयायी वा पुरस्कर्ते होण्यास ते अपात्र ठरत नाहीत का? मग मुळात ईश्‍वरद्रोही कोण? ते तर नास्तिकापेक्षाही अधिक नास्तिक असतात. देव मानून देवाचं न मानणारे.
मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. या आदिशक्तीनंच या पृथ्वीबरोबर इतर अनेक ग्रह व ताऱ्यांना जन्म दिला आहे. आपली पृथ्वी हा एका सूर्यमालिकेतला एक ग्रह आहे. या सूर्यमालिकेत पृथ्वीसारखेच अनेक ग्रह आहेत आणि अनेक तारेही आहेत. अशा बहुग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या अनेक सूर्यमालिका आहेत. त्या किती आहेत याचा अजून शोध लागलेला नाही. या सर्व सूर्यमालिकांना निर्माण करणारी ही आदिशक्ती, या मालिकांतल्या ग्रह- ताऱ्यांवरील प्रत्येक अणू-रेणूमध्ये भरलेली आहे. प्रत्येक वस्तू अणू-रेणूंनी बनलेली आहे. मग ती वस्तू सजीव असो वा निर्जीव. दगड, धोंडे, लाकूड, लोखंड आदी दिसायला निर्जीव असणाऱ्या वस्तूसुद्धा या आदिशक्तीनं भरलेल्या असल्यामुळे त्यांच्या आत या अणू-रेणूचा (proton and neutron) सारखा संघर्ष चालू असतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अणुबॉंब. आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या आणि ज्यांना पाहण्याकरिता सूक्ष्मदर्शकयंत्राचा वापर करावा लागतो, अशा अणूंच्या विभाजनानं जो स्फोट होतो तो अणुबॉंबचा स्फोट असतो. हा स्फोट किती प्रचंड असतो आणि तो भोवतालच्या सृष्टीची किती हानी करतो, हे मानवानं हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या बॉंबस्फोटानं अनुभवलं आहे. अणुबॉंबचा स्फोट करण्याकरता ज्या अणूंचं विभाजन करण्यात आलं, ते अणू दिसायला निर्जीव पदार्थांचे होते. एका अतिसूक्ष्म अणूत ही शक्ती कुठून आली? ती शक्ती म्हणजेच आपल्या पृथ्वीबरोबर सर्व विश्‍वाची निर्मिती करणारी आदिशक्ती होय. या शक्तीलाच कुणी निर्माता वा निर्मिक म्हणतात.

ही शक्ती कशी वा कुणी निर्माण केली? ज्यामुळे वा ज्याच्यामुळे ही शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीला कुणी निर्माण केलं, ही कारणपरंपरा न सांगणारी आहे. म्हणूनच या शक्तीच्या मुळाचा शोध घेणं अशक्‍य आहे. त्यामुळेच तिला अनादी असं म्हणतात. ही शक्ती किती प्रचंड आहे आणि ती कुठवर पसरली आहे, तिचा आकार किती आणि कसा आहे, हेही सांगणं अशक्‍य आहे. म्हणून तिला अनंत आणि निराकार असं संबोधण्यात येतं. परंतु, ती शक्ती सर्व सजीव, निर्जीव आणि वस्तूमात्रात वसत असते, हे निर्विवाद सत्य आहे.

ही शक्ती निराकाराप्रमाणंच निर्गुण, निर्विकारही आहे. तिला माणूस राग, लोभ, प्रेम आदी निरनिराळे गुण चिकटवतो आणि आपल्यासारखी बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या शक्तीत तो स्वतःला पाहतो. स्वतःची सर्व गुण-अवगुणांची प्रतिकृती तिच्यात निर्माण करतो. पाप, पुण्याच्या कल्पना तिच्यावर लादतो. शिक्षा करणारी आणि बक्षीस देणारी, इच्छापूर्ती करणारी वा न करणारी म्हणून तिचा धावा करतो. हा सर्व त्याच्या मनाचा आणि कल्पनेचा खेळ असतो. गरज आहे ती या शक्तीला स्वतःत पाहण्याची, तिची जाणीव व तिचा साक्षात्कार होण्याची. ही जाणीव झाल्यानंतर मनुष्य प्रत्येक क्षेत्रात अत्युच्च कार्य आणि नवनिर्मिती करू शकेल आणि त्या शक्तीच्या निर्मितीक्षमतेचा वारसा पुढं नेऊ शकेल.

मानवासह सर्व सजीवांचा प्राण जातो, तेव्हा त्यांच्यातून ही शक्ती निघून जाते. मानवात वसत असलेल्या वा वसलेल्या या शक्तीलाच आत्मा असं संबोधण्यात येतं. चराचरात वास करणाऱ्या या शक्तीशी संबंध जोडणं, यालाच काही लोक "अध्यात्म' म्हणतात. मात्र, या शक्तीनंच जर मानवाची निर्मिती केली आहे व ती सतत त्याच्यात वास करत असते, तर तिच्याशी निराळा संबंध जोडण्याची गरज काय, असा प्रश्‍न उपस्थित होणं साहजिकच आहे. या प्रश्‍नाची उत्तरं असू शकतात. एक तर अशा जनांना स्वतःत वास करणाऱ्या या शक्तीची जाणीव नसते. म्हणून तिला फक्त बाह्यशक्ती मानून ते तिची आराधना करत असतात किंवा स्वतःत वास करणाऱ्या या शक्तीशी ते तादात्म्य होऊ इच्छितात आणि स्वतःतली शक्ती अपुरी, दुर्बल आणि अविश्‍वसनीय वाटल्यामुळे बाह्यशक्तीची त्यांना आवश्‍यकता वाटते. सर्वसामान्य माणसाला स्वतःत वास करणारी अशी कुठली शक्ती आहे, याची जाणीवच नसते आणि बाह्यशक्तीची जाणीव करून घेण्यास वेळही नसतो. अशा जाणिवेची त्याला गरजच वाटत नाही. त्याला फक्त तिच्या आधाराची वेळोवेळी गरज भासते. म्हणून कारणपरत्वे तो फलप्राप्ती करून घेण्यासाठी तिची प्रार्थना करीत असतो.

ईश्‍वराचा शोध घेण्याची गरज नाही. ईश्‍वर म्हणजे आदिशक्ती. आपण तिचीच निर्मिती असल्यामुळं ती म्हणजेच ईश्‍वर आपल्यातच वास करत असतो. गरज आहे ती याची जाणीव होण्याची आणि त्याप्रमाणं आपलं वर्तन, आपले विचार आणि कृती ही नेहमीच उच्च कोटीतील ठेवण्याची.

Web Title: p b sawant write article in saptarang