सुरम्य चिंतनशीलतेचा आविष्कार (पं. यशवंत महाले)

book review
book review

अंजली कीर्तने या मराठीतल्या मान्यवर लेखिका आणि लघुपटनिर्मात्या. "अभिजात संगीताचं सुवर्णयुग (1850-1950)' हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे अभिजात हिंदुस्तानी संगीतातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा चित्रदर्शी इतिहास आहे. दोन भिन्न माध्यमांसाठी या विषयाचा वेध घेण्याचं आव्हान कीर्तने यांनी पेललं. त्याचं चित्रांतून आणि शब्दांतून रसिकांना दर्शन घडवलं.

मुळात कीर्तने अभ्यास करत होत्या तो ग्वाल्हेर घराण्याचे सुस्वरकंठी गायक आणि गायनाचार्य विष्णू दिगंबर यांचे चिरंजीव पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या चरित्राचा. चरित्र लिहिताना प्रथम तो काळ समजून घ्यायचा आणि मगच मूळ विषयाकडं वळायचं हा नियम त्यांनी स्वत:ला घालून दिलेला आहे. त्यामुळं पलुस्कर यांचा काळ आणि त्यांच्या पूर्वसूरींचा काळ त्यांनी अभ्यासला. पलुस्कर यांच्या बारा वर्षांच्या रोजनिशांवरून त्यांच्या जीवनातली माणसं शोधण्यासाठी, त्यांनी कुरुंदवाडपासून ते लखनौ, इंदूर, कोलकता, जालंधर, अमृतसरपर्यंत भारतभ्रमण केलं. संगीत-इतिहास, चरित्रग्रंथ, संगीत महोत्सवांच्या दुर्मिळ स्मरणिका, गौरवग्रंथ यांचं परिशीलन केलं. या भ्रमंतीत त्यांना पलुस्कर यांच्याशी संबंधित जवळजवळ शंभर माणसं सापडली. त्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. गतकाळासंबंधी बोलायला उद्युक्त केलं. ग्रंथांचं वाचन-मनन आणि प्रवासातले विविधरंगी अनुभव यांमुळं त्यांना तीव्रतेनं वाटू लागलं, की संगीताचं सुवर्णयुग या विषयावर स्वतंत्रपणे काम करायला हवं. त्यातून हे पुस्तक आकाराला आलं.

या प्रवासात कीर्तने यांनी भारतातल्या सर्वांत जुन्या अशा पंजाब प्रांतातल्या जालंधरच्या बाबा हरिवल्लभ महोत्सवाच्या स्थळाला भेट दिली. त्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी जुनी पुस्तिका मिळवली. त्या महोत्सवाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आणि अतिशय परिश्रमपूर्वक तो सोहळा लघुपटातून आणि पुस्तकातून वाचकांसाठी साक्षात केला. बनारसला जाऊन त्या मातीत भिनलेल्या संगीताच्या कस्तुरीचा सुगंध अनुभवला आणि तिथल्या गणिकांच्या दुर्लक्षित योगदानाची सुजाणपणे दखल घेतली. कोलकत्याला जाऊन तिथल्या संगीत महोत्सवांचं आणि संगीत संस्कृतीचं अवलोकन केलं. आलॅं दानिएल ऊर्फ श्रीशिवशरण या हिंदुस्तानी संगीताच्या विद्वान फ्रेंच अभ्यासकाची लोकविलक्षण जीवनकथाही कीर्तने यांनी उजेडात आणली.

विषयाचा अष्टदिशांनी अभ्यास करत असताना कीर्तने यांना विविध प्रश्‍न पडतात. त्या प्रश्‍नांची उत्तरं शोधत असताना त्यातून त्या विषयाची व्याप्ती विस्तारते. जाण वाढत जाते. अभिजात संगीताच्या इतिहासात महाराष्ट्र ही गायकांची भूमी, बंगाल ही वादकांची भूमी आणि राजस्थान ही नर्तकांची भूमी मानली जाते. हे स्थान महाराष्ट्राला कसं प्राप्त झालं? खरं तर महाराष्ट्र ही मुलूखगिरी करणाऱ्या वीरांची भूमी. महाराष्ट्राला वेड लावणी-पोवाड्याचं, कीर्तन-भजनाचं. इथं अभिजात संगीताची परंपरा नव्हती. मग उत्तरेतले अनेक गायक महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि त्यांनी त्यांची घराणी वसवली ती का? या प्रश्‍नाचं उत्तर शोधताना कीर्तने यांनी तो शतरंगांनी झगमगणारा सुवर्णकाळ मनोमन अनुभवला आणि त्यांच्या सुप्रसन्न, रसाळ, लावण्यमयी आणि प्रवाही शैलीतून शब्दबद्ध केला. त्यांनी प्रकरणांना दिलेल्या "किराण्याचा स्वरप्रकाश', "घराण्यांचा प्रीतिसंगम', "दक्षिणेतील विद्यासुंदरी', "अभिजाताचे नवांकुर' यांसारख्या चपखल शीर्षकांतूनदेखील त्यांचं शब्दवैभव प्रकटतं.
हे पुस्तक सुवर्णयुगाच्या पहाटकाळापाशी सुरू होतं. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेरी गायकीचा मंगलकलश आणला म्हणून बाळकृष्णबुवांच्या गुरुकुलाला कीर्तने "भगीरथाचं आदिपीठ' म्हणतात. मात्र, त्याच वेळी त्यांच्याही पूर्वी इथं स्थापन होऊन नंतर लोप पावलेल्या गोखले घराण्याचा इतिहास कथन करायला त्या विसरत नाहीत. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि विष्णू नारायण भातखंडे या दोन संगीतोद्धारक महापुरुषांच्या कार्याचा त्यांनी तौलनिक विचार केला आहे. त्यांच्या नातेसंबंधातले विरोधी घटक, सूक्ष्म तणाव आणि तरीही एकमेकांविषयी वाटणारा आदर यांचं विचारपूर्वक विष्लेषण केलं आहे. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर, भेंडीबाजार यांसारख्या महाराष्ट्रात स्थिरावलेल्या संगीतातल्या घराण्यांचा इतिहास, त्यांची गानवैशिष्ट्यं, त्या घराण्यांतले कलाकार यांचं सुसूत्र विवेचन हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. ध्वनिमुद्रणचा शोध आणि रेडिओसारखं नवमाध्यम यांच्यामुळं, याच कालखंडात अमूर्त ध्वनीला बद्ध करणं शक्‍य झालं. त्यामुळं संगीताच्या जतनाला चालना मिळाली. या खास पैलूचीही दखल कीर्तने यांनी घेतली आहे.

कुलवतींना गाणं शिकू द्यायचं नाही आणि कलावतींना हीन लेखायचं हा ज्या काळी समाजाचा दंडक होता, त्या काळी कुलवतींनी आणि कलावतींनी याविरुद्ध लढा कसा दिला, आपली स्वतंत्र जागा कशी निर्माण केली याचं विवेचन कीर्तने यांनी अतिशय सहृदयतेनं आणि भावोत्कटतेनं केलं आहे. हे पुस्तक जरी प्रामुख्यानं गायनाच्या संदर्भात लिहिलं असलं, तरी वाद्यसंगीताच्या काही खास पैलूंची नोंदही विस्तारानं घेतली आहे. त्याचप्रमाणं आपल्या वाटेतले अनेक अडथळे दूर करून यश आणि प्रतिष्ठा मिळवणाऱ्या दक्षिणेतल्या देवदासीची रोमहर्षक कथा मनात घर करते. संगीताच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेलच; परंतु संगीतप्रेमी रसिकांची मनंही त्यात रमून जातील. अभिजात संगीताच्या प्राचीन वृक्षाला सुंदर नवांकुर पुन:पुन्हा फुटत राहतील आणि हा वृक्ष बहरत राहील, हा विश्वास या संवेदनशील लेखिकेच्या मनात आहे.

पुस्तकाचं नाव : अभिजात संगीताचं सुवर्णयुग
लेखिका : अंजली कीर्तने
प्रकाशक : नावीन्य प्रकाशन, पुणे.
पानं : 270,
किंमत : 330 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com