दिल-ए-नादाँ

Parag Pethe
Parag Pethe

गझल या अरबी/फार्सी/उर्दू शब्दाचा एक अर्थ आहे ‘सुखन अज्‌ जनाना गुफ्तन’. म्हणजे स्त्रीशी किंवा स्त्रियांविषयी बोलायची रीत. गझलेचं मूळ प्रणयात आहे, सौंदर्यात आहे, याविषयी काहीच शंका नसावी. वाळवंटात अरबांच्या टोळीच्या सरदाराला खूश करण्यासाठी कसीदा म्हणजे स्तुतिगीत म्हटलं जात असे. त्याच्याआधी त्या रखरखीत वाळवंटात  ही शृंगार, लावण्य याविषयीही दोन दोन ओळींचे तुकडे म्हटले जात असत. तीच गझल होय. अमीर खुस्रो, मीर तकी मीर, महंमद कुली, कुतुबशहा, सौदा, मुसहफी इंशा, शाहिदी ही त्यातली मातब्बर नावं. 

मात्र, खऱ्या अर्थानं गझल पूर्णत्वाला नेली ती मीर, गालिब, मोमिन, जौक, बहादूरशहा जफर यांनीच. जफर यांच्या गझला आयुष्यातलं दुःख-दुर्दैव व्यक्त करणाऱ्या आहेत. जौक यांच्या गझलांमधून सहजता, सोपेपणा, वाक्‍प्रचारांचा वापर आढळतो. मोमिन यांच्या गझला नजाकत, प्रेम, तारुण्य या विषयांना वाहिलेल्या आहेत, तर गालिब यांच्या गझलांची वैशिष्ट्यं सांगायची झाली तर वास्तवता, तत्त्वज्ञान, अफाट कल्पनाशक्ती, टोकाच्या विचारांची अभिव्यक्ती आणि स्वानुभूती, ही ती वैशिष्ट्यं होत. गझलरसिकांना गालिब यांच्या गझलांनी वर्षानुवर्षं भारावून टाकलेलं आहे. गालिब यांच्या गझला आकलनाला अवघड असतात, हे मान्य करूनही असं म्हणता येईल, की  गालिबरूपी खजिन्याचा शोध घ्यायचा ठरवला तर एकेक हिरा हाती आल्याचा आनंद मिळतो! 

आज या लेखमालेची सांगता करताना गालिब यांची अशीच एक - रचनेच्या दृष्टीनं साधी-सोपी; पण अर्थ-आशयदृष्ट्या समृद्ध - गझल पाहू या...

* * *
दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्‍या है?
आखिर इस दर्द की दवा क्‍या है?
अर्थ ः अरे हृदया, तुला झालंय तरी काय? बैचेन का तू एवढा? प्रेम जडलंय! पण मग त्यावर उपाय तरी काय? (*दिल-ए-नादाँ = वेडं हृदय)

* * *
हम हैं मुश्‍ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्‍या है?

अर्थ : मी तिच्या भेटीसाठी अत्यंत आतुर झालो आहे...भेटीची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत आहे...! आणि ती मात्र चिडली आहे... त्रस्त झाली आहे. कंटाळली आहे की ती मला? अरे देवा! हे काय चाललंय? (*मुश्‍ताक=अधीर, आतुर/ *बेजार= रुष्ट, नाराज/ या इलाही = हे ईश्‍वरा/*माजरा= मामला)

* * *
मैं भी मूँह में जुबान रखता हूँ
काश, पूछो कि मुद्दआ क्‍या है?
अर्थ ः मला कुणीच काही विचारत नाहीए... मलासुद्धा तोंड दिलंय देवानं. सगळं माहीत आहे मला; पण कुणी विचारेल तर शपथ ना! (*जुबान, जबाँ = जीभ. इथं ‘मीही बोलू शकतो’ अशा अर्थी /*मुद्दआ= उद्देश, मुद्दा)

* * *
जब कि तुझबिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा, ऐ खुदा, क्‍या है ?
अर्थ ः हे परमेश्‍वरा! जर तू सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहेस...तू सर्वज्ञानी आहेस, तर मग या पृथ्वीतलावर एवढा आक्रोश, दुःख, कोलाहल का आहे? जगात एवढी अशांतता का? आणि तीही तू इथं-तिथं-सगळीकडं असताना? (*हंगामा=  गदारोळ/*ऐ खुदा =  ए देवा)

* * *
ये परीचेहरा लोग कैसे हैं?
गम्जा-ओ-इश्‍वा-ओ-अदा क्‍या है?

अर्थ : या सुंदर ललना...त्यांचं ते लाजणं...ते आव्हानात्मक हावभाव...ते मादक कटाक्ष...ते नेत्रसंकेत...हे सगळं काय आहे नक्की?
(*परीचेहरा= सौंदर्यवती, सुंदर चेहरा असलेली स्त्री/*गमजा= नेत्रसंकेत, इशारा, नखरा/* इश्‍वा-ओ-अदा= प्रणयचेष्टा, हावभाव)

* * *
शिकन-ए-जुल्फ-ए-अंबरी क्‍यूँ है?
निगह-ए-चष्म-ए-सुरमा सा क्‍या है?
अर्थ ः अत्यंत सुगंधित अशा कुरळ्या केसांची ही काय जादू आहे? आणि ती सुरमा घातलेली दिलखेच नजर! हे सगळं काय निर्माण केलं आहेस तू?
(*शिकन-ए-जुल्फ=कुरळे केस, बटा/*अंबरी = एक अत्तर/*निगह=दृष्टी/चष्म=डोळे/*सुरमा ः सुरमा, काजळाचा प्रकार)

* * *
सब्जा-ओ-गुल कहाँ से आए है?
अब्र क्‍या चीज है? हवा क्‍या है?
अर्थ : परमेश्‍वरा, काय काय निर्माण केलं आहेस तू? ही हिरवळ, ही फुलं कुठून आणलीस? हे ढग, ही हवा हे सगळं तूच केलं आहेस ना निर्माण?
(*सब्जा-ओ-गुल= हिरवळ व फुलं/*अब्र= ढग, मेघ) 

* * *
हम को उन से वफा की है उम्मीद
जो नहीं जानते वफा क्‍या है ।
अर्थ : कुणाशीच, कधीच एकनिष्ठ न राहिलेल्या प्रियेकडून निष्ठेची आशा बाळगून आहे मी! ( *वफा= निष्ठा)

* * *
हां, भला कर, तेरा भला होगा
और दरवेश की सदा क्‍या है?
अर्थ : तू लोकांचं भलं कर. देव तुझंही भलंच करेल. एक फकीर याशिवाय दुसरी कुठली प्रार्थना करणार? (*दरवेश  = फकीर /*सदा = हाक. इथं ‘मागणं’ हा अर्थ)

* * *
जान तुमपर निसार करता हूँ
मैं नहीं जानता दुआ क्‍या है।
अर्थ : तुझ्यावर जीव ओवाळून टाकला आहे मी... प्रार्थना, आर्जव, विनवण्या अशा गोष्टींवर विश्‍वास नाही माझा!(निसार ः अर्पण करणं, (जीव)ओवाळून टाकणं/*दुआ = प्रार्थना)

* * *
मैंने माना कि कुछ नहीं ‘गालिब’
मुफ्त हाथ आए तो बुरा क्‍या है?
अर्थ : कशातच काही नसताना, विनासायास काही हाती लागलं तर ते का सोडा? स्वतःच्या प्रतिभेवरच सगळं मिळवशील तू गालिब!

* * *
मिर्झा असदुल्ला बेग खाँ ‘गालिब’ हे वडिलांच्या व काकांच्या मृत्यूनंतर आग्रा इथं वाढले. पतंग उडवणं व बुद्धिबळ खेळणं यात गालिब तरबेज होते. तेराव्या वर्षी त्यांचं उमराव बेगमशी लग्न झालं. त्यांना सात अपत्यं झाली; पण एकही जगलं नाही. वाडवडिलांची पेन्शन मिळायची, त्यावर गुजराण होत असे. मात्र, तीही बंद झाली आणि अपत्यवियोगाबरोबरच कंगालपणाही भेडसावू लागला. पेन्शन मिळावी म्हणून कलकत्तावारी झाली. १८२९ मध्ये दिल्लीला परतावं लागलं. त्यातच जुगाराचं व्यसन लागलं. मदिरापानही सुरूच होतं. १८४७ मध्ये जुगाराबद्दल कारावासाची शिक्षा झाली. नंतर चार जुलै १८५० रोजी बादशहा बहादूरशहा जफर यांच्या दरबारात सन्मान. ‘नज्म-उद्‌-दौला’, ‘दबीर-उल्‌-मुल्क’, ‘निजामजंग’ या पदव्यांनी त्यांना भूषविण्यात आलं. दरम्यान, १८५७ च्या बंडाला सुरवात झाली. त्याच वर्षी धाकटा भाऊ युसूफचं निधन झालं. नंतर १८६२ मध्ये बहादूरशहा जफर यांचं रंगून इथं निधन. १८६५ पासून गालिब यांची प्रकृती ढासळतच गेली. दोन वर्षं अंथरुणाला खिळून राहावं लागलं. या काळात विस्मृतीचा त्रास. ते जवळपास बेशुद्धावस्थेतच असत. अधूनमधून कधीतरी शुद्ध आली, की स्वतःशीच बरळत बसत. अशा वेळी ते एकच वाक्‍य बोलत असत व ते म्हणजे  ः ‘ऐ मर्ग-ए-नागहाँ (आकस्मिक मृत्यू) तुझे क्‍या इंतजार है?’ आणि १५ फेब्रुवारी १८६९ रोजी गालिब अल्लाला प्यारे झाले! लोहारू वंशाची दफनभूमी चौसठखंबा इथं या कविराजांनी कायमची निद्रा घेतलेली आहे! गालिब यांचा एक शेर आहे ः  

हुई मुद्दत कि गालिब मर गया पर याद आता है
वो हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्‍या होता!

अशा या महान कवीचा जन्मदिन परवा दिवशी म्हणजे, २७ डिसेंबरला (१७९७) आहे.

या सदरात समाविष्ट करता येऊ न शकलेल्या गालिब यांच्या पुढील गझलाही गझलप्रेमींनी जरूर अभ्यासाव्यात. त्यांचा रसास्वाद घ्यावा.

  • नक्‍श फरियादी है किसकी 
  • कभी नेकी भी उसके
  • दाइम पडा हुआ है 
  • तस्कीं को हम न रोए 
  • शौक हर रंग 
  • न था कुछ

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com