फिर मुझे दीदा-ए-तर (पराग पेठे)

फिर मुझे दीदा-ए-तर (पराग पेठे)

ही  माझी अत्यंत आवडती गझल आहे...
फिर मुझे दीदा-ए-तर याद आया
दिल जिगर तश्‍ना-ए-फरियाद आया ।

अर्थ ः आज परत मला तुझे डबडबलेले डोळे आठवले. तुझ्या आठवणी परत ताज्या झाल्या. मला सोडून जाताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना? ते त्या वेळचे डोळे आठवले तुझे!  फार फार आठवण आली तुझी... (दीदा-ए-तर=साश्रुनयन, पाणावलेले डोळे / जिगर तश्‍ना-ए-फरियाद = इच्छाशक्तीची सरलता)
***
दम लिया था न कयामत ने हनोज
फिर तेरा (तिरा) वक्त-ए-सफर याद आया ।

अर्थ ः तुझं जाणं म्हणजे जणू प्रलयच. जराशी मनाला उसंत मिळाली, असं वाटत असतानाच तुझं जाणं डोळ्यासमोर आलं परत ! परत तगमगीला सुरवात झाली...परत सुरू झाली हृदयाची घालमेल!
(हनोज= आता, अजून/कयामत = प्रलय/ वक्त-ए-सफर=जाण्याची, निघण्याची वेळ)
***
सादगी हाए तमन्ना यानी
फिर वो नैरंग-ए-नजर याद आया ।

अर्थ ः तिचं-माझं मीलन होणं शक्‍य नाही, हे माहीत असूनसुद्धा माझ्या इच्छेच्या साधेपणाची कमाल बघा; अजून आशा लावून तिची वाट बघत बसलंय मन माझं !
(सादगी हाए तमन्ना=अत्यंत साधी इच्छा, इच्छेचं भोळेपण/नैरंग-ए-नजर= नैरंग = माया, अद्भुत गोष्ट / नजर = दृष्टी. नेत्रपल्लवीची जादू)
***
उज्रे-वामांदगी ऐ हसरत-ए-दिल
नाला करता था, जिगर याद आया ।

अर्थ ः तुझ्या आठवणींनी विदीर्ण झालंय आधीच माझं हृदय! व्याकुळतेनं तुला हाक मारावीशी वाटतेय...
पण आधीच कमकुवत झालेल्या हृदयाला हा विलाप झेपणार नाही, या कारणास्तव गप्प बसलोय मी प्रिये!
(उज्र=बहाणा, कारण/ वामांदगी =थकवा, असहाय्यता)
(हसरत-ए-दिल = हृदयाची अभिलाषा/नाला = आर्तता, व्याकुळतेचे बोल)
***
जिन्दगी यूं भी गुजर ही जाती
क्‍यूं तेरा राहगुजर याद आया?

अर्थ ः तुझ्याशिवाय आयुष्य रडतखडत, कसंबसं काढलंच असतं मी; पण मग ज्या वाटेवरून तू नेहमी यायची-जायचीस, तीच वाट का आठवावी नेमकी मला?
(राहगुजर = रस्ता, मार्ग, वाट)
***
क्‍या ये रिज्वाँ से लडाई होगी?
गर तेरा खुल्द मे घर याद आया।

अर्थ ः स्वर्गाच्या द्वारपालाला मी जर सांगितलं ना, की स्वर्गापेक्षासुद्धा माझ्या प्रियेचं घर सुंदर आहे, तर मारामारी होईल स्वर्गाच्या दारातच ! प्रिये, तुझं ते टुमदार घर मला स्वर्गाहून प्रिय!
(रिज्वाँ=स्वर्गाचा द्वारपाल/खुल्द= स्वर्ग)
***
आह वो जुरअते फरियाद कहाँ?
दिल से तंग आ के जिगर याद आया।

अर्थ ः ते उसासे, ते निःश्‍वास, त्या तक्रारी करण्याची हिंमत संपली आहे आता. काळीजसुद्धा थकलंय. त्यात तेवढी शक्ती राहिली नाहीय आणखी आघात सोसायची !
(आह=निःश्‍वास/ जुरअते फरियाद= तक्रार करण्याचं धाडस, शक्ती)
***
फिर तेरे कूचे को जाता है खयाल
दिल-ए-गुमगश्‍ता मगर याद आया।

अर्थ ः हरवलेलं हृदय शोधताना तुझ्या घराच्या गल्लीकडं मान वळते! नक्की तिथंच सापडणार ते !
(कूचा = गल्ली/ दिल-ए-गुमगश्‍ता = हरवलेलं हृदय)
***
कोई वीरानी सी वीरानी है
दश्‍त को देख के घर याद आया ।

अर्थ ः तू सोडून गेल्यापासून एक रखरखीत कोरडेपणा आलाय आयुष्यात. कधीतरी उजाड जागा, भकास अशी एखादी जागा दिसली की डोळ्यासमोर माझं घरच येतं ! तू गेल्यामुळं माझं घर काय अन्‌ वाळवंट काय आणि माळरान काय? सगळं एकसारखंच...भकास !
(वीरानी= वैराणपणा/दश्‍त = ओसाड माळरान)
***
‘गालिब’ यांनी मक्‍त्यात काय कमाल केली आहे ते बघा ! ते म्हणतात ः
मैने मजनू पे लडकपन मे ‘असद’
संग उठाया था कि सर याद आया।

अर्थ ः एक दिवस मजनूला मारायला दगड हातात घेतला होता...पोरकटपणाच होता तो माझा! पण त्याच क्षणी मनात विचार आला, की अरे, कधीकाळी प्रेमवेडापोटी आपलीही अवस्था मजनूसारखी झाली तर? (लोक आपल्यालाही असेच दगड मारतील!). मग उचललेला दगड टाकून दिला मी खाली! किती परिणामकारक शेर आहे हा ! संग उठाया था कि सर याद आया !
(मजनू = लैलाचा प्रियकर, प्रेमवेडा म्हणून त्याला ‘मजनू’ असं म्हटलं जाई. मजनूचं खरं नाव होतं कैस.)
मजनू आणि स्वतःमधला ‘प्रेमवेडा’ यांची किती हृद्य जवळीक गालिब यांनी टिपली आहे!
गालिब यांच्याबद्दल एक गोष्ट मात्र मनाला खटकते.
एवढी हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा गालिब यांनी दुय्यम पद, दुय्यम स्थान स्वीकारलं नाही. स्वतःचा (प्रतिभेला साजेसा)अहंभाव, (सार्थ!) स्वाभिमान कायम जपत राहिले ते. आपण ज्याला कॉम्प्रमाईज म्हणतो, तडतोड म्हणतो, ती तडजोड त्यांनी थोडी जरी केली असती, तरी त्यांची हलाखीची स्थिती थोडीशी का होईना नक्कीच सुधारली असती. असो ! मात्र, या प्रतिभावान कवीनं घेतलेलं सगळं कर्ज निधनापूर्वी फेडून टाकलं होतं. २००-३०० रुपये काय ते बाकी राहिले होते.

--------------------------------------------------------------------
पुढच्या आठवड्यात ः
कभी नेकी भी उस के जी मे गर आ जाए है मुझ से।
जफाएं कर के अपनी याद, शर्म आ जाए है मुझ से।

--------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com