तनहा गए क्‍यूँ...? (पराग पेठे)

parag pethe's article in saptarang
parag pethe's article in saptarang

गालिब यांच्यावर संकटांमागोमाग संकटं येतच राहिली. त्यातून त्यांची सुटका मृत्यूपर्यंत झालीच नाही. स्वतःच्या सात अपत्यांचं निधन... मित्र आणि विख्यात कवी-गझलकार मोमीन खाँ मोमीन यांचं देहावसान... मानलेला मुलगा आरिफ याचं तारुण्यात, ३६ व्या वर्षी निधन...अशा अनेक दुःखद प्रसंगांना गालिब यांना सामोरं जावं लागलं. ‘आरिफ’ हा गालिबच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा. त्याचं मूळ  नाव जैनुल आबदीन! आरिफवर गालिब यांचा फार जीव होता. त्याच्या अकाली निधनावर गालिब यांनी अत्यंत कारुण्यपूर्ण काव्य लिहिलं !

***

लाजिम था कि देखो मिरा रस्ता कोई दिन और।
तनहा गए क्‍यूँ, अब रहो तनहा कोई दिन और...।

अर्थ ः मला एकट्याला सोडून का गेलास (आरिफ) ? थोडं थांबायचंस ना? जरा वाट बघायचीस माझी! आता गेलाच आहेस ना, तर मग राहा तिथंच (स्वर्गात) एकटाच आता...थोडे दिवस माझी वाट बघत! (*लाजिम ः आवश्‍यक/*तनहा ः एकाकी, एकटा)

***

मिट जाएगा सर, गर तिरा पत्थर न घिसेगा
हूँ दर पे तिरे नासियाफर्सा कोई दिन और...।

अर्थ ः तुझ्या कबरीवर जाऊन माझं डोकं घासत बसतो मी तुझ्या आठवणीत. दुःखावेगानं आता तो दगड झिजो अथवा माझा कपाळमोक्ष होवो. तेवढंच हाती आहे माझ्या आता. का एकटा टाकून गेलास मला? (*दर ः दरवाजा, चौकट/*नासियाफर्सा ः डोकं घासणारा)

***

आए हो कल और आजही कहते हो कि जाऊँ?
-माना कि हमेशा नही अच्छा, कोई दिन और...

अर्थ ः अरे! (आरिफ) काल तर आलास तू या दुनियेत आणि आज म्हणतोस ः ‘जाऊ?’ आजचाच मुहूर्त का धरलास रे? प्रत्येक दिवशी चांगला मुहूर्त असतोच असं नाही ना? मग जरा पुढच्या मुहूर्तापर्यंत थांबायचंस ना?

***

जाते हुऐ कहते हो, कयामत को मिलेंगे
क्‍या खूब; कयामत का है गोया कोई दिन और...

अर्थ ः जाता-जाता म्हणालास, की प्रलयाच्या दिवशी भेटूच! वा रे...तुझ्या जाण्यापेक्षा आणखी कोणता रे प्रलय वेगळा? तुझं जगातून निघून जाणं हेच माझ्यासाठी प्रलयासारखं! कल्पान्तच. याहून मोठी आणखी कुठली ‘कयामत’ येणार अजून? (*कयामत ः प्रलय. न्याय-निवाड्याचा दिवस, ज्या दिवशी जगाचा अंत होतो, असा समज/*गोया ः जणू काही, जसं काही)

***

हाँ, ऐ फलक-ए-पीर! जवाँ था अभी आरिफ
क्‍या तेरा बिगडता, जो न मरता कोई दिन और...

अर्थ ः आरिफ अद्याप तरुण होता रे देवा...थोडं थांबला असतास तर तुझं काय बिघडलं असतं? काय मिळवलंस तू त्याला एवढ्या लवकर तुझ्याकडं बोलावून! तू एवढा अनुभवी, वृद्ध असूनसुद्धा त्याला तरुणपणीच का नेलंस?
(*फलक-ए-पीर- शब्दशः अर्थ ः म्हातारं आकाश. त्या आकाशातला देवही तितकाच वयोवृद्ध, हा आशय. (आरिफ तरुण...आणि त्याला बोलावून घेणारा देव वयोवृद्ध!)

***

तुम माह-ए-शब-ए-चार दुहूम थे, मिरे घर
फिर क्‍यूँ न रहा घर का वो नक्‍शा कोई दिन और...?

अर्थ ः तू तर माझ्या घरचा दीपक होतास. जणू काही पौर्णिमेचा चंद्र! चौदहवी का चाँद! पण माझ्या घरातलं हे दृश्‍य अजून काही दिवस का नाही तसंच राहिलं? का गेलास तू सोडून?
(*माह-ए-शब-ए-चार दुहूम ः चौदहवी का चाँद, पूर्ण चंद्र/*नक्‍शा ः स्थिती, अवस्था, दृश्‍य)

***

तुम कौन से ऐसे थे खरे दाद-औ-सितद के?
करता मलक-उल्‌-मौत तकाजा कोई दिन और...

अर्थ ः तू कोण एवढा देवाण-घेवाणीच्या बाबतीत चोख होतास? की देवानं बोलावलं आणि लगेच त्याच्या हाकेला ओ देऊन लगेचच निघून गेलास त्याच्याबरोबर? आणि त्यालासुद्धा तगादा करायची एवढी कसली घाई झाली होती? (*दाद-ओ-सितद ः देवाण-घेवाण, व्यवहारी चोखपणा/*मलक-उल्‌-मौत ः यमराज, मृत्युदेवता)

***

मुझ से तुम्हे नफरत सही, नय्यर से लडाई
बच्चो का भी देखा न तमाशा कोई दिन और...

अर्थ ः माझा तिरस्कार होता तुला आणि नैयरकाकाशी तुझं वैर होतं, हे मान्य; पण स्वतःच्या मुलांची दंगा-मस्ती बघायला तरी थांबायचंस ना! का गेलास सगळ्यांना सोडून?
(*नफरत ः द्वेष, तिरस्कार/*नय्यर ः गालिब यांचा एक मित्र. जियाउद्दीन अहमद खाँ)

***

गुजरी न बहरहाल यह मुद्दत खुश-ओ-नाखुश
करना था, जवाँमर्ग! गुजारा कोई दिन और...

अर्थ ः इतके दिवस सुख-दुःखात साथ दिलीस ना? अकाली निधन पावलेल्या मुला, थोडे दिवस अजून हसत-खेळत, एकमेकांबरोबर राहिलो असतो की रे!
(*बहरहाल ः प्रत्येक स्थितीत/*मुद्दत ः काळ, समय, वेळ/ *खुश-ओ-नाखुश ः सुख आणि दुःख/ *जवाँमर्ग ः तरुणपणात मृत्यू झालेला)

***

नादाँ हो जो, कहते हो कि क्‍यूँ जीते है ‘गालिब’
किस्मत में है मरने की तमन्ना कोई दिन और...

अर्थ ः ‘(आरिफच्या मृत्यूनंतरसुद्धा) गालिब जिवंत कसा अजून?’ असं जे विचारत आहेत, ते लोक अज्ञानी आहेत. त्यांना बिचाऱ्यांना काय माहीत, की गालिबची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही एवढ्या सहजासहजी! ‘गालिब’ची मरणाची इच्छासुद्धा अजून काही दिवस अपूर्णच राहणार असं दिसतंय! अतिप्रिय असलेला आरिफ सोडून गेल्यानं आधीच आजारी असलेले गालिब आणखीच खचून गेले! १८५८ पासून त्यांची तब्येत हळूहळू ढासळतच गेली...
-----------------------------------------------

दिल ही तो है न संग-ओ-खिश्‍त, दर्द से भर न आए क्‍यूँ?
रोएंगे हम हजार बार, कोई हमे सताए क्‍यूँ?

गेल्या वेळच्या लेखात वरील शेरातल्या दुसऱ्या ओळीत ‘सताए’ असा शब्द हवा होता. तिथं नजरचुकीनं ‘रुलाए’ असं प्रसिद्ध झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com