बस कि दुश्‍वार है... (पराग पेठे)

पराग पेठे parag23464@gmail.com
रविवार, 11 डिसेंबर 2016

गालिब यांच्या काळातल्या दिल्लीत पाच गोष्टी अत्यंत लोकप्रिय होत्या. लाल किल्ला, चांदणी चौक, जामा मशीद, यमुना नदीवरचा पूल आणि फुलांचा मेळा! १८५७ च्या बंडानंतर या पाचही गोष्टींची रया गेली. दिल्लीची वाताहत झाली. गालिब यांच्या काही मित्रांना फासावर लटकवण्यात आलं, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आलं. गालिब त्या स्थितीचं वर्णन करताना म्हणतात ः ‘असे सगे-सवंगडी मरायला लागले, तर मी जेव्हा मरीन तेव्हा मला ओळखणारं कुणीच शिल्लक नसेल!’ त्यातच दिल्लीत महामारीची साथ पसरली होती. या काळात गालिब यांना ख्याली-खुशालीविषयीचं पत्र कुणीतरी पाठवलं. त्याला उत्तर देताना ते म्हणतात ः ‘कसली महामारी आणि काय?

गालिब यांच्या काळातल्या दिल्लीत पाच गोष्टी अत्यंत लोकप्रिय होत्या. लाल किल्ला, चांदणी चौक, जामा मशीद, यमुना नदीवरचा पूल आणि फुलांचा मेळा! १८५७ च्या बंडानंतर या पाचही गोष्टींची रया गेली. दिल्लीची वाताहत झाली. गालिब यांच्या काही मित्रांना फासावर लटकवण्यात आलं, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आलं. गालिब त्या स्थितीचं वर्णन करताना म्हणतात ः ‘असे सगे-सवंगडी मरायला लागले, तर मी जेव्हा मरीन तेव्हा मला ओळखणारं कुणीच शिल्लक नसेल!’ त्यातच दिल्लीत महामारीची साथ पसरली होती. या काळात गालिब यांना ख्याली-खुशालीविषयीचं पत्र कुणीतरी पाठवलं. त्याला उत्तर देताना ते म्हणतात ः ‘कसली महामारी आणि काय? मी म्हातारा आणि तेवढीच म्हातारी माझी बेगम. दोघंही जिवंत आहोत अजून. दोघांपैकी कुणी एक जरी मरण पावलं असतं, तर वाटलं असतं महामारीची साथ आली आहे!’ वय झालं तरी गालिब यांची विनोदबुद्धी शाबूत होती ती अशी ! एका पत्रात मित्राला सल्ला देताना ते म्हणतात ः ‘खाओ, पिओ, मजे उडाओ...मगर यह याद रहे की मिस्री की मख्खी बनो, शहद की मख्खी न बनो!’( खा, पी, मजा कर...मिस्रीवर (खडीसाखरेसारखा एक प्रकार) बसून माशी कशी साखर खाते आणि उडून जाते, तसं कर. मधावरची माशी होऊ नकोस! कारण, धड मध पिता येत नाही की (वेळ आली तर) चटकन उडूनही जाता येत नाही!).गालिब यांनी मित्राला असा सल्ला दिला असला, तरी त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन वेगळाच होता. बघू या या गझलेत..
***
बस कि दुश्‍वार है हर काम का आसां होना।
आदमी को भी मयस्सर नही इन्सां होना...।

अर्थ ः ईश्‍वरानं मनुष्यप्राण्याला जन्म दिला आणि त्याबरोबरच त्याच्या आयुष्यात काही अडचणीही दिल्या. प्रापंचिक अडचणी. त्या सोडवता सोडवता माणूस स्वतःमधली माणुसकी मात्र हरवून बसला. ‘आदमी’ हा ‘इन्सां’ झाला नाही! मानवनिर्मित समस्या, वैर, द्वेष, राग, भांडण, पैसा या सगळ्या गोष्टींत अडकून गेला मनुष्य आणि माणुसकीला मुकला.
(*दुश्‍वार= अवघड, कठीण / *मयस्सर= सोपं, सुलभ)
***
गिरिया चाहे है खराबी मिरे काशाने की
दर-ओ-दीवार से टपके है बयाबाँ होना ।

अर्थ ः माझ्या कमनशिबाला कंटाळून धाय मोकलून रडतोय मी. माझ्या घराच्या भिंती-दरवाजा यावरून कळायला हवं, की किती भकास, किती विराण आहे माझं घर. माझ्या रूदनामुळं दार-खिडक्‍यांनापण पाझर फुटू देत...
(*गिरिया= रूदन/ *काशाना= घर/ *दर-ओ-दिवार= दार व भिंती/ *बयाबाँ= वैराण; जंगल)
***
वा-ए-दीवानगी-ए-शौक कि हर दम मुझको
आप जाना उधर और आपही हैराँ होना।

अर्थ ः तिच्या भेटीच्या आतुरतेत इतका मश्‍गूल होऊन मी तिच्या घरापर्यंत येऊन पोचलो आणि तिथं पोचल्यावरच लक्षात आलं, की अरे, इथं कसे काय येऊन पोचलो आपण? या विचारानंच अचंबित झालो मी...तिच्या विचारांत बुडालेला कसा आलो असेन मी इथपर्यंत?
(*वा=हाय, अरे रे/ *दीवानगी-ए-शौक=अभिलाषेचं वेड/*हैराँ = अचंबित, आश्‍चर्यचकित)
***
जल्वा अज-बस-कि तकाजा-ए-निगह करता है
जौहर-ए-आईना भी चाहे है मिजगां होना।

अर्थ ः माझी प्रेयसी अत्यंत लावण्यवती आहे. पाहतचं राहावं असं सौंदर्य आहे तिचं. प्रत्येक निर्जीव वस्तूसुद्धा तिच्या रूपाला दाद देते. हा आरसासुद्धा तिच्याकडं बघतोय. त्याचे ते काचरूपी डोळे आहेत आणि आरशाच्या बाजूची कडा म्हणजे जणू पापण्याच आहेत!
(*जल्वा = दर्शन/*अज्‌-बस-कि=अत्यंत, अधिक/ *तकाजा-ए-निगह= नजरेची गरज, बघावंसं वाटणं/ *जौहर-ए-आईना=पोलादी आरसा/ * मिजगां=पापण्या)
***
इशरत-ए-कत्ल-गह-ए-अहल-ए-तमन्ना मत पूछ
ईद-ए-नज्जारा है शमशीर का उरियां होना ।

अर्थ ः आमच्यासारख्या प्रेमीजनांचा वध करावा, असा फतवा काढण्यात आला आहे. ‘तलवारीनं शीर उडवावं,’ असा आदेश आला आहे.... मात्र, आम्ही तर आधीच सर्वस्व देऊन बसलेलो आहोत. आता मृत्यूची काय भीती। वधस्तंभाकडं नेल्यावर मारेकऱ्यानं तलवार उपसली. ती तळपती तलवार बघून आम्हा प्रेमीजनांना ईदच्या चंद्राचंच दर्शन घडल्याचा आनंद झाला आहे जणू!
(*इशरत=आनंद/ *कत्लगह=वधस्थळ/ *अहल-ए-तमन्ना=अभिलाषा/ * ईद-ए-नज्जारा=ईदचं दृश्‍य/ *शमशीर = तलवार/*उरियां = नग्न (म्यानरहित तलवार)
***
ले गये खाक में हम, दाग-ए-तमन्ना-ए-निशात
तू हो और आप ब-सद-रंग-ए-गुलिस्ताँ होना ।

अर्थ ः माझ्या सगळ्या इच्छा तर धुळीला मिळाल्या. तुझं व माझं मीलन व्हावं, हे स्वप्नच राहिलं शेवटी. सुळावरसुद्धा आनंदानं चढलो मी. आता तू शेकडो रंगांनी फुलणाऱ्या सुंदर फुलांच्या बागेसारखी (टवटवीत) सुखात राहा!
(*दाग-ए-तमन्ना-ए-निशात=प्रेम असफल झाल्याचा डाग/*तमन्ना = इच्छा/ निशात=आनंद, हर्ष /* ब-सद-रंग=अनेक रंग/ *गुलिस्ताँ= बाग, बगीचा.)
***
इशरत-ए-पारा-ए-दिल जख्म-ए-तमन्ना खाना
लज्जत-ए-रीश-ए-जिगर गर्क-ए-नमक-दां होना ।

अर्थ ः तुझ्यावरच्या असफल प्रेमानं हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि लोक त्यावर मीठ चोळत आहेत...ठीक आहे. मात्र, त्या वेदनेतूनसुद्धा मला आनंदच मिळत आहे, हे त्यांना काय ठाऊक! (*इशरत=आनंद/*पारा=तुकडा/*जख्म-ए-तमन्ना=इच्छांची जखम/*लज्जत-ए-रीश-ए-जिगर=हृदयाच्या जखमेचा आनंद/* गर्क-ए-नमक-दां = गर्क = बुडालेला. नमक-दां=मिठाचा सट, मिठात बुडालेला)
***
की मिरे कत्ल के बाद उस ने जफा से तौबा
हाए उस जूद-पशीमाँ का पशेमाँ होना ।

अर्थ ः माझा जीव घेतला तिनं आणि वर पुन्हा माझ्या शवाजवळ बसून शपथही घेतली ः ‘आता असा छळ कुणाचाही करणार नाही!’ पश्‍चात्तापानं लज्जित झाली लगेचच. मुळात ती ‘लाजरी’ आहेच, त्यात वर हे असं ‘लज्जित’ होणं म्हणजे जरा आर्श्‍चजनकच!
(*जफा=अन्याय, जुलूम/ *तौबा=शपथ घेणं/*जूद=त्वरित/*पशेमाँ = (पश्‍चात्तापानं, केल्या कृत्यानं) लज्जित होणं)
***
हैफ, उस चार गिरह कपडे की किस्मत ‘गालिब’
जिस की किस्मत में हो आशिक का गरेबां होना ।

अर्थ ः प्रेमोन्मादातल्या त्या आशिकाच्या कुडत्याची आता दशा होणार. प्रेमोन्मादात कुडता फाडणार तो. काय नशीब त्या कुडत्याच्या कॉलरचं ! (प्रेमी विरहात वेडा होऊन आपले कपडे फाडतो, असा एक संकेत आहे. तो संदर्भ.)
(*हैफ = पश्‍चात्ताप/ *गिरह=टीचभर; सव्वादोन इंच/* गरेबां = कॉलर)
बासष्ट रुपये आणि आठ आणे, एवढीच पेन्शन गालिब यांना मिळत असे आणि त्यांचा खर्च त्या मानानं बराच होता. त्यांना कर्ज काढूनच जगावं लागत असे. ते व्याजसुद्धा देऊ शकत नसत. कर्जाचा बोजा वाढतच होता. अशा परिस्थितीत ते दिवसभर घरातच बसून असत. लोक भेटायला घरीच येत. त्या वेळी दिल्लीत दंग्यांमुळं अनागोंदी माजलेली होती. कुणाकडं फारसं कामही उरलेलं नव्हतं. सगळी मोठी मंडळी गालिब यांच्याकडं येऊन जुगार खेळत. खात-पीत-मजा करत. त्यातच पकडले जाऊन गालिब यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

Web Title: parag pethe's article in saptarang