हम को मालूम है... (पराग पेठे)

पराग पेठे parag23464@gmail.com
रविवार, 18 डिसेंबर 2016

गालिब आता वृद्धत्वाकडं झुकू लागले होते. संकटं आणि म्हातारपण जणू हातात हात घालून चालत होतं. दाढी पांढरी झालेली...दात पडू लागलेले...गाल आत गेलेले...असं हे म्हातारपणातलं त्यांचं रूप. आरशात पाहिल्यानंतर स्वतःचंच हे प्रतिबिंब भयप्रद वाटत असल्याचं त्यांनी नमूद करून ठेवलं आहे. सन १८५८ मधल्या एप्रिल महिन्यापासून त्यांच्या पोटात दुखू लागलं. पोटदुखीमुळं त्यांची स्थिती जखमी, घायाळ पक्ष्यासारखी होऊन जाई. भयंकर वेदनांमुळं ते विव्हळत. उपाय म्हणून एरंडेल तेल पीत. थोडसं कधी खाल्लं, न खाल्लं... अशी त्यांची एकंदर स्थिती असे. प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली की ते पत्र लिहायला बसत.

गालिब आता वृद्धत्वाकडं झुकू लागले होते. संकटं आणि म्हातारपण जणू हातात हात घालून चालत होतं. दाढी पांढरी झालेली...दात पडू लागलेले...गाल आत गेलेले...असं हे म्हातारपणातलं त्यांचं रूप. आरशात पाहिल्यानंतर स्वतःचंच हे प्रतिबिंब भयप्रद वाटत असल्याचं त्यांनी नमूद करून ठेवलं आहे. सन १८५८ मधल्या एप्रिल महिन्यापासून त्यांच्या पोटात दुखू लागलं. पोटदुखीमुळं त्यांची स्थिती जखमी, घायाळ पक्ष्यासारखी होऊन जाई. भयंकर वेदनांमुळं ते विव्हळत. उपाय म्हणून एरंडेल तेल पीत. थोडसं कधी खाल्लं, न खाल्लं... अशी त्यांची एकंदर स्थिती असे. प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली की ते पत्र लिहायला बसत. गप्पा छाटायला येऊन बसणारे आता कुणी फारसे मित्रही त्यांना उरले नव्हते. मुन्शी हरगोपाल तफ्ता यांना लिहिलेल्या पत्रात गालिब म्हणतात ः ‘‘आयुष्याचं कालचक्र सुरूच आहे. मी धड कुठल्या बंधनातही नाही की मोकळाही. खूप आजारीही नाही अन्‌ पूर्णतः निरोगीही नाही. दुःखीही नाही आणि आनंदातही नाही. जिवंतही नाही अन्‌ मृतही ! रोज नियमानुसार जेवतो. कधीतरी मद्य पितो. झोप आली तर झोपतो...नाहीतर छताकडं वा आकाशाकडं बघत बसतो.’’ याच पत्रात गालिब पुढं म्हणतात ः ‘‘बेगमला एकटीला सोडून घराबाहेर पडू शकत नाही...नाहीतर पेन्शनच्या कामासाठी दारोदार फिरलो असतो. आता मृत्यूची वाट बघत बसलोय. मृत्यू आला की संपलं सगळं. ना कुठली तक्रार आहे, ना कसला खेद की ना कसला आनंदही!’’ गालिब यांना आयुष्यात कसलाही आनंद मिळाला नसला तरी गझलप्रेमींना त्यांनी त्यांच्या गझलांमधून केवळ आनंद आणि आनंदच दिला, हे नक्की. अशीच त्यांची एक आनंददायी गझल ः
***
हुस्न-ए-मह गरचे ब-हंगाम-ए-कमाल अच्छा है।
उस से मेरा मह-ए-खुर्शीद जमाल अच्छा है।

अर्थी ः प्रेयसीबद्दल गालिब म्हणतात, की पौर्णिमेचा चंद्र सुरेखच असतो; पण तळपत्या सूर्याची प्रखरता त्यात नसते. मात्र, माझ्या प्रेयसीमध्ये चंद्राची शीतलता आणि तळपत्या सूर्याची प्रखरता असं अद्वितीय मिश्रण आहे.
(*हुस्न-ए-मह=चंद्राचं सौंदर्य/*गरचे=अजूनही/*ब-हंगामा-ए-कमाल=पौर्णिमेचा कालावधी *मह-ए-खुर्शिद-जमाल = सूर्यासारखा प्रकाश ज्यात आहे तो चंद्र)
***
बोसा देते नही और दिल पे है हर लहजा निगाह
जी में कहते हैं कि, मुफ्त आए तो माल अच्छा है।

अर्थ ः मी कुणा दुसरीच्या नादी लागत नाही ना याकडं, तिचं बारीक लक्ष असतं. मात्र, मी कधी प्रेमानं जवळ जाऊन चुंबन मागितलं, तर त्यालासुद्धा नकार देते ती. काही न देताच माझं हृदय जिंकायचा विचार चालला आहे तिचा.
(*बोसा = चुंबन/* हर लहजा = प्रत्येक क्षण/*निगाह = नजर, लक्ष).
***
और बाजार से ले आए अगर टूट गया
सागर-ए-जम से मिरा जाम-ए-सिफाल अच्छा है।

अर्थ ः माझा मदिरापानासाठीचा पेला काचेचा असला तरी तोच मला प्रिय आहे. (कारण, फुटला तरी बाजारात जाऊन नवीन आणता येऊ शकतो). बादशहा जमशेद यांचा हिरेजडित मद्यपेला त्यांचा त्यांनाच लखलाभ. हिरेजडित चषकातून मद्य पिण्यात गालिब यांना स्वारस्य नाही. तो हिरेजडित चषक सांभाळण्यातच मद्यपानाचा सगळा आनंद वाया घालवायचा नाही गालिब यांना!
(*सागर-ए-जम= इराणचा बादशहा जमशेद वापरत असलेला मद्य पिण्याचा हिरेजडित पेला/*जाम = मद्याचा पेला/*सिफाल = काचेचा)
***
बेतलब दें तो मजा उस में सिवा मिलता है
वो गदा, जिसको न हो खू-ए-सवाल, अच्छा है।

अर्थ ः न मागता कुणी काही दिलं तर ते घेण्यात वेगळीच मजा आहे. जो फकीर लोकांकडं मागत फिरतो, जो हात पसरून याचना करतो, तो माझ्या मते वाईटच. मागून मिळवण्यात काय हशील ?
(*बेतलब = न मागता/ * सिवा=अधिक, जास्त/*गदा = भिकारी, याचक/*खू = सवय)
***
उन के देखे से जो आ जाती है मूँह पर रौनक
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है।

अर्थ ः तिला बघूनच माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. प्रफुल्लित होतो चेहरा. अंगावर रोमांच उभे राहतात. ती समोर आल्यामुळं मुखावर तेज येतं माझ्या. त्यामुळं तिला वाटतं, की मी आजारी नाहीच! तिच्या विरहाचंच आजारपण असतं ते; पण तिला वाटतं मी तंदुरुस्त आहे.
(*रौनक = तेज /*बीमार=आजारी)
***
देखिए पाते हैं उश्‍शाक बुतों से क्‍या फैज
इक बिरहमन ने कहा है कि ‘ये साल अच्छा है’।

अर्थ ः  एका ब्राह्मणानं (ज्योतिषी) मला सांगितलंय, की हे वर्ष खूप चांगलं जाईल. बघू या... या वर्षात माझ्यासारख्यांना (प्रेमिकांना) प्रेयसीकडून काय मिळतंय ते!
(*उश्‍शाक = प्रेमीजन/ *बूत = मूर्ती. इथं अर्थ प्रेयसी/* फैज=लाभ मिळणं)
***
हमसुखन तेशा ने फरहाद को शीरीं से किया
जिस तरह का भी किसी में हो कमाल अच्छा है।

अर्थ ः फरहाद हा एक खोदकाम करणारा सामान्य मजूर आणि शीरीं /शिरीन ही एक राजकन्या. मात्र, फरहादच्या कुदळ चालवण्याच्या कौशल्यावर शिरीन भाळली. त्यानं तिचं मन जिंकलं. थोडक्‍यात, काम कोणतंही असो त्यात नैपुण्य हवं, तर ते फायदेशीरच ठरतं. कुठला तरी एक गुण हवाच.
(*हमसुखन = संभाषण होणं, संवाद साधला साधणं/*तेशा = कुदळ, कुऱ्हाड/*शिरीं/शिरीन = एक राजकन्या/*कमाल = कला, कौशल्य).
***
कतरा दरिया में जो मिल जाए तो दरिया हो जाए
काम अच्छा है वो जिस का कि मआल अच्छा है।

अर्थ ः जलबिंदूचं सागरात समर्पण झाल्यानंतर जसं त्याचं जीवन सार्थकी लागतं आणि तो सागरच होऊन जातो, तसंच कुठलंही काम असो, त्याचा शेवट छान झाला की ते काम उत्तमच असतं.
(*कतरा = जलबिंदू, थेंब/ * मआल = उद्देश, अंतिम परिणाम)
***
खिज्र-सुल्ताँ को रखे खालिक-ए-अकबर सरसब्ज
शाह के बाग में ये ताजा निहाल अच्छा है।

अर्थ ः बादशहा बहादूरशहा जफर यांच्या एका मुलाचं नाव खिज्र-सुल्ताँ असं होतं. त्याला आशीर्वाद देताना गालिब म्हणतात, की बादशहाच्या बागेतलं हे नवीन रोप (खिज्र-सुल्ताँ) सदैव टवटवीत राहो. ‘त्याला सुखी ठेव’ अशी प्रार्थना गालिब ईश्‍वरचरणी करतात.
(*खालिक-ए-अकबर= खुदा, ईश्‍वर/*सरसब्ज=तंदुरुस्त, खुशाल/*ताजा निहाल = नवं रोप)
अवांतर ः बहादूरशहा यांच्याकडं गालिब नोकरी करत असत. त्यांना तनखा मिळत असे ती दर सहा महिन्यांनी; त्यामुळं दर महिन्याला अडचणी येत. त्यावर ‘पगार दरमहा मिळावा,’ अशी विनंती गालिब यांनी बादशहाला एका कवितेच्या माध्यमातून केली. ही विनंती नंतर मान्य झाली.
***
हम को मालूम है जन्नत की हकीकत लेकिन
दिल को खुश रखने को ‘गालिब’ ये खयाल अच्छा है।

अर्थ ः स्वर्ग वगैरे असं काहीही नसतं आणि वस्तुस्थिती मला माहीत आहे; पण कल्पनेतल्या स्वर्गाचा मनाला तेवढाच ओलावा, तेवढीच उभारी. स्वर्गात उत्तम मद्य, सोमरस आणि सुंदर अप्सरा असतात, अशी एक कल्पना. मनाच्या समाधानासाठी अशा स्वर्गाची कल्पना उत्तमच!

Web Title: parag pethe's article in saptarang