
एका पालकांच्या कार्यशाळेत मुलंही आली. त्यांना सांभाळणं पालकांना कठीण जात होतं.
मुलं फुलताना !
एका पालकांच्या कार्यशाळेत मुलंही आली. त्यांना सांभाळणं पालकांना कठीण जात होतं. त्यामुळे ती कार्यशाळा फक्त पालकांसाठी न घेता मुलांनाही सहभागी करून घेण्याचं ठरवलं. मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. मुलं बिनधास्त बोलू लागली. कुठलीही तालीम केली नसताना गाऊ लागली. नाचू लागली.
पालकांच्या कार्यशाळेमधला एक किस्सा... सर्वसाधारणपणे अशा पालक कार्यशाळेला येताना मुलांना आणू नका, असं मी पालकांना नेहमी सांगतो. तरीही काही पालक लहान मुलांना घेऊन येतातच. कदाचित ती त्यांची अपरिहार्यता असते...
त्यादिवशी डे केअर बंद असू शकतं. घरात मुलांना सांभाळणारे कोणी नसावेत. मोठी मुलं सर्वसाधारणपणे घरी थांबतात; पण लहान मुलं आई-बाबांकडे त्यांच्या बरोबर यायचा हट्ट करतात...
स्वाभाविकपणे, त्या दिवशी रविवार होता आणि रविवार असल्यामुळे मुलांना कुठे ठेवायचं, हा प्रश्न असल्यामुळे असेल कदाचित, पण अनेक पालकांनी कार्यशाळेला येताना मुलांना बरोबर आणलं होतं. मुलंच ती! ती थोडीच शांत बसणार?
त्यांची कुजबुज, खेळणं, हालचाली, मोठमोठ्याने बोलणं, एकमेकांशी खेळणं, आपल्या पालकांचं लक्ष वेधून घेणं, खायला मागणं, पाणी प्यायला मागणं, काही मुलांचं मध्येच रडणं असं सगळं सुरू होतं. पालक मुलांना गप्प करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते; पण त्या प्रयत्नांना मुलं दाद देत नव्हती.
पालक अगदी मेटाकुटीला आले होते. मुलांना शांत करण्यासाठी काही पालकांना वारंवार हॉलच्या बाहेर जावं लागत होतं. मी उपस्थित पालकांना म्हटलं, ‘‘आज आपल्याकडे अनेक छोटी-छोटी मुलं आली आहेत. ती शांत बसणार नाहीत, कारण त्यांना आपण काहीच ॲक्टिव्हिटी दिलेली नाही. मुलांना नुसतं शांत बसायला कधीच आवडत नाही.
विशेषतः बाहेर गेल्यावर त्यांना काहीतरी उपक्रम हा लागतोच. आपण आजची कार्यशाळा ही त्यांना सोबत घेऊन करूया का? म्हणजे ही सर्व मुलं आपल्या कार्यशाळेचा एक भाग असतील. त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ.
त्यामुळे कार्यशाळेचे स्वरूप थोडं बदलेल; पण मुलं ते एन्जॉय करतील आणि तुम्हालासुद्धा आनंद मिळेल. थोडं वेगळं अनुभवायला मिळेल...’’ माझी सूचना सर्वच पालकांनी उचलून धरली. मग आम्ही एक वेगळाच उपक्रम सुरू केला...
मी बोलत बोलत स्टेजच्या खाली उतरलो आणि छोट्या-मोठ्या अशा सर्वच वयोगटातल्या मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता त्या सर्वांना पुढच्या रांगेमध्ये एकत्र बसवलं. आपले पालक जवळपास नसल्याने सुरुवातीला काही मुलं बावचळली; पण आपल्या सोबत समवयीन मुलं आहेत, हे पाहून थोड्या वेळाने निश्चिंतही झाली.
मग मी मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली... मुलं हळूहळू बोलू लागली. त्यांच्यात धिटाई आली. मग मी मुलांना म्हटलं की मला खाली कंटाळा आला आहे. आपण स्टेजवर जाऊया का? मुलं तयार झाली आणि एक-दोन अगदी लहान मुलं वगळली तर बाकी सर्व मुलं चक्क माझ्याबरोबर स्टेजवर आली.
मग आम्ही स्टेजवर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांच्यात माईक फिरू लागला. सुरुवातीला मुलं उभी राहून बोलत होती. उभी राहून कंटाळली म्हणून मग आम्ही स्टेजवर बसूनच रिंगण केलं आणि गप्पा मारू लागलो. मुलांच्या गप्पा ऐकता-ऐकता पालक पोट धरून हसत होते. एन्जॉय करत होते. आपापल्या मुलांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होत होते; तर कधी अंतर्मुख होत होते...
मुलांच्या बोलण्याला विषयाचं बंधन नव्हतं. ज्याला जे पाहिजे ते ती बोलत होती. त्याचा गोषवारा गमतीशीर आहे... आवडत्या टीचर, आवडते मित्र-मैत्रिणी, आवडते नातेवाईक, आवडता प्राणी, आवडतं चित्र, आवडता पदार्थ, आवडता रंग, आवडते कपडे या सर्वांवर मुलं खूप मनसोक्त बोललीच; पण आपल्याला काय आवडत नाही, हेही मुलांनी आवर्जून सांगितलं.
घरात आले की बाबा ओरडतात, आई खेळायला सोडत नाही, शाळेतून खूप अभ्यास देतात, अमुक मित्र किंवा मैत्रीण खेळायला घेत नाही, म्हणून तो किंवा ती आवडत नाही, डब्यात रोज अमुक पदार्थ खायचा कंटाळा येतो, हेही मुलांनी सांगितलं.
कुणाला गाता येतं, असं म्हटल्यावर आधी एक-दोघांनी, मग जवळपास सगळ्यांनीच हात वर केले. मग एक-एक करून मुलांना मी गाण्यासाठी हातात माईक देऊ लागलो. मुलांनी गाणी गाऊन, ठेका धरून, टाळ्या वाजवून नुसता दंगा केला...
बऱ्याच मुलांना गाणी तोंडपाठ होती. ती सुरात गात होती. काही मुलं नैसर्गिकपणे नाचू लागली. मग मी विचारलं की, आपण सगळे गाण्यावर नाचूया का! त्यालाही सगळ्यांची तयारी होती. आजचा कार्यक्रम त्यांचा झाला होता. स्टेज त्यांच्या मालकीचं झालं होतं. त्याची ते पुरेपूर वसुली करत होते.
बरं यात काहीच पूर्वनियोजित नव्हतं. पालकांनी तयारी करून घेतलेली नव्हती की पालकांच्या कोणत्याही अपेक्षा व्यक्त झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मुलांवर दबाव नव्हता. जे हवं ते करण्याची मुभा होती. समोर आपले पालक बसले आहेत याची त्यांना किंचितशी जाणीव होती, पण त्याहीपेक्षा आपल्याला हसायला, खेळायला, नाचायला, बागडायला मिळतंय ही भावना जास्त प्रबळ होती... मुलं अगदी रंगात आली होती...
मग मी भीतीचा विषय काढला. तुम्हाला भीती कशाची वाटते? खूप मुलं त्यावर मनापासून बोलली. कुणाला प्राण्यांची भीती वाटते, तर कुणाला पालीची. कुणाला सोसायटीच्या वॉचमनची भीती वाटते तर कुणाला अमुक एका नातेवाईकाची.
कुणाला स्वप्नात काही विचित्र घडलं की रात्री बेडरूममध्ये आपण एकटे झोपलो आहोत याचीही भीती वाटते. घरी एकटे असण्याची भीती वाटते... मुलांनी आपापल्या भीतीच्या वेगवेगळ्या छटा उलगडून दाखवल्या. मुलं स्वतःहून बोलत होती. एकाला बोलतं केलं की दुसरं बोलायचं. मग तिसरं, मग अशा पद्धतीने मुलं बोलत होती...
कार्यक्रमाचा समारोप करता करता मी मुलांना म्हटलं, ‘‘चला, तुम्ही आता आपापल्या पालकांकडे जाऊन बसा...’’ मुलं स्टेजवरून हलायला तयारच नव्हती. नाईलाजाने खाली उतरली. कार्यक्रम संपला! मुलं एकमेकांशी मैदानात खेळत होती आणि मला पालकांनी गराडा घातला...
स्वतःच्याच मुलांबद्दल तिथे कळलेल्या कित्येक गोष्टी पालकांना माहीतच नव्हत्या. उदाहरणार्थ एका मुलीने खूप सुंदर म्हटलेलं गाणं तिच्या पालकांना आश्चर्यचकित करून गेलं. तिने ते गाणं पाठ कधी केलं, त्याची प्रॅक्टिस कधी केली, हेच त्यांना माहिती नव्हतं.
गंमत म्हणजे तिने प्रॅक्टिस केलेलीच नव्हती. तिला ते गाणं सहजपणे येत होतं आणि तिनं ते सहजपणे म्हटलं. मुलं दबावाशिवाय खूप छान फुलतात. दबावाशिवाय ती निरागस आणि आनंदीही असतात. त्या दिवशीच्या कार्यशाळेचा तो पालकांसाठी महत्त्वाचा धडा होता!