...अशी जन्मते दंतकथा! (प्रवीण टोकेकर)

...अशी जन्मते दंतकथा! (प्रवीण टोकेकर)

महानायक हा काही शूरवीर नसतो. अन्य सामान्यांपेक्षा तो फक्‍त पाचेक मिनिटं अधिक शौर्य दाखवतो, इतकंच.
- राल्फ वाल्डो इमर्सन, अमेरिकी तत्त्वचिंतक, 
(१८०२-१८८२)

लोकगंगेच्या प्रवाहांमधून अनेक कहाण्यांचे द्रोण वाहत वाहत येतात. काल्पनिकाची चार फुलं आणि भक्‍तिभावाचा दिवा घेऊन आलेले हे लोककथांचे द्रोण नेमकं कोण पाण्यात सोडत असतं? कुठल्या अनामिकाचं हे भावपूजन? कुणास ठाऊक. नदीचं मूळ जसं शोधू नये, तसं लोककथांचं मूळही गुलदस्त्यात राहू द्यावं. बऱ्याचशा लोककथा पोथ्या-पुराणांमधूनच येतात हे खरं आहे; पण काहींचा जन्म अक्षरश: रानमाळावरचा असतो. सांगोवांगीचा हात धरून त्या हिंडत असतात. या लोककथांच्याच पुढं परिकथा होतात ना?

मिथकांची निर्मिती मात्र अस्सल वास्तवाच्या खडकावर होत असते. तुम्हा-आम्हासारख्या सर्वसामान्यांच्यातच कुणीतरी एक असा काही बिजलीसारखा कडकडत जातो आणि अचानक साक्षात्कार होतो... हा आत्ताच मिथकाचा जन्म झाला! पेले नावाचं एक मिथक असंच ७७ वर्षांपूर्वी जन्माला आलं... 

सध्या रशियात फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा डंका वाजू लागला आहे. देशोदेशीचे महानायक तिथं इरेला पडून मैदानात उतरणार आहेत आणि जगभरचे फुटबॉलवेडे हातातली कामंधामं सोडून ते पाहत-ऐकत बसणार आहेत. अशा सळसळत्या काळात फुटबॉलमधलं दैवत म्हणजेच पेलेच्या चरित्राचं पारायण करावं हे इष्टच. २२ वर्षांच्या कारकीर्दीत पेलेनं ब्राझिलला तीनदा जगज्जेतेपदापर्यत नेलं. एकूण ९२ लढतींत ७७ गोल झळकावले. लोक त्याच्या प्रतिमेची अक्षरश: पूजा करत. 

पेले या दंतकथेचा महिमा सांगणाऱ्या काही डॉक्‍युमेंट्रीज्‌ आहेत; पण सन २०१५ मध्ये ‘पेले : बर्थ ऑफ अ लीजंड’ या नावाचा एक चित्रपट येऊन गेला. दिग्दर्शक होते जेफ आणि मायकेल हे झिम्बालिस्टबंधू. हे दोघंही भाऊ फुटबॉलवेडे... आणि थोडेफार खेळाडूही. आपल्या दैवताला एक सलाम करावा, यासाठी त्यांनी हा चित्रपट केला. ब्राझिल सरकारनंही त्यांना सहकार्य केलं. खुद्द पेले आपली कहाणी पडद्यावर बघायला तयार झाला. ब्राझिलमध्ये सन २०१४ मध्ये झालेल्या फिफा विश्‍वचषकाच्या वेळी हा चित्रपट रिलीज करायचा असं ठरलं; पण सत्राशेसाठ कटकटी होऊन अखेर एक वर्ष उशिरा हा चित्रपट अवतरला.

पेलेचं दारिद्य्रातलं बालपण ते ब्राझिलला त्यानं १९५८ मध्ये मिळवून दिलेला पहिला विश्‍वचषक यांमधल्या कालखंडावर हा चित्रपट बेतलेला आहे. सध्याच्या फुटबॉलच्या फणफणलेल्या ज्वरात हा चित्रपट पाहून घ्यावा आणि पुण्य पदरात पाडून घ्यावं. 
* * *
डोंडिन्हो हा तसा अगदी सामान्य माणूस. दक्षिण ब्राझिलमधल्या एका कुग्रामात जन्मलेला. तसा चांगला फुटबॉलपटू होता. रांगडा. डोंडिन्होचा खेळ बघायला गावोगावचे लोक येत. क्‍लबपातळीवरचा तो नावाजलेला खेळाडू होता. ब्राझिलकडून तो फक्‍त सहा लढती खेळला. एका लढतीत त्याचा पाय पार जायबंदी झाला आणि फुटबॉलचं मैदान सुटलं ते सुटलंच. 

नोकरी-धंद्यासाठी त्यानं साव पावलो गाठलं. बौरु नावाच्या रेल्वेलायनीलगतच्या वाडी-वस्तीत तो राहायला लागला. जवळच्या एका इस्पितळात वॉर्डबॉयची नोकरी धरली. हातात बेड पॅन आणि झाडू आला! लोक हळहळायचे. ‘कसला भारी सेंटर फॉर्वर्ड होता राव...दैव आड आलं’ वगैरे कॉमेंट्‌स व्हायच्या. कुणी देशी दारूचा गिलास आदरानं पुढं करी. नकारार्थी मान हलवत डोंडिन्हो कसनुसं हसे. त्याच्या मनात फुटबॉलचा खेळ अहोरात्र चालत असे.

-फुटक्‍या कौलाराच्या दोन खणी घरात डोंडिन्होचं कुटुंब राहत होतं. सेलेस्टेची साथ मिळाली नसती तर त्याच्या संसाराचे धिंडवडेच उडाले असते. कोंड्याचा मांडा करून सेलेस्टे घर सावरत होती. पदरी तीन मुलं. नवरा चांगला असला तरी परिस्थितीच वाईट होती. 

...ब्राझीलमध्ये जरा मोकळी जागा दिसली की चार-सहा मुलं फुटबॉल खेळायला सुरवात करतात. वस्तीतल्या उकिरड्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या बखळीत डिको अनवाणी खेळताना दिसायचा. डिको हा डोंडिन्होचा थोरला. शाळा आटोपून चहाच्या दुकानात तो पोऱ्या म्हणून कामाला जाई. उरलेल्या वेळेत फुटबॉल. फुफिन्हो, तियागो, युरी हे त्याचे सवंगडी होते. तियागो किरकोळ शरीरयष्टीचा, चष्मिष्ट होता; पण डिकोवर त्याचा जीव होता. खेळायला बॉलसुद्धा नसे. मग पायमोज्यात कागदाचे बोळे भरून ‘फुटबॉल’ तयार व्हायचा. पायातले बूट ही तर ऐश होती. स्थानिक ‘किंग्ज क्‍लब’मध्ये थोडी श्रीमंतांची पोरं खेळत. त्यांच्याकडं जोडे होते. ती पोरं या अनवाणी पोरांची हेटाळणी करायची. अल्ताफिनी नावाच्या सावकाराच्या पोराशी तर यावरून डिकोची मारामारी झाली. 

‘‘डिको, ओठाला काय झालं?’’ मम्मा सेलेस्टेनं रक्‍ताळलेला ओठ पाहून विचारलं. ‘भूगोलाच्या टीचरनं मारलं,’ असं खोटंच डिकोनं सांगितलं. मम्मा भडकली. ‘ही बया माझ्या पोरांवर हात उचलतेच कशी? मी बोलते तिच्याशी...’ ती बडबडू लागली. डोंडिन्होनं मध्ये तोंड घालून ‘मी बोलतो त्याच्या टीचरशी’ असं सांगितलं व डिकोला बाहेर नेलं आणि म्हणाला : ‘‘हे बघ, तुला व्यावसायिक फुटबॉलपटू व्हायचंय ना? मग तू स्वत:ला लाजू नकोस...मारामाऱ्या असुरक्षित माणसं करतात!’’
बापानं आपलं गुपित लपवलं, शिवाय फुटबॉल खेळायला मुक्‍तहस्त दिला, हे बघून डिको हरखून गेला.
* * *

‘‘बूट घ्यायला हवेत यार,’’ डिकोनं दोस्तांकडं प्रस्ताव ठेवला. पैसा होता कुणाकडं? शेवटी रेल्वेलायनीलगतच्या गोदामातली शेंगदाण्याची पोती फोडून माल लांबवण्याची योजना ठरली. हे शेंगदाणे विकून आलेल्या पैशात बूट घ्यायचे असं ठरलं. पोरांनी रखवालदारांना हुलकावण्या देत बेत तडीस नेला. सेकंड हॅंड का होईना; पण बूट आले.

‘अनवाणी क्‍लब’ विरुद्ध ‘किंग्ज क्‍लब’ सामना रंगला. बुटाची भानगड नसती तर पेलेचा ‘अनवाणी क्‍लब’ सहज जिंकला असता; पण थोडक्‍यात हरला. लढतीनंतर पोरांनी पाहिलं तर मैदानाच्या कडेला शेंगदाणे-व्यापाऱ्याची माणसं खुनशी नजरेनं बघत होती...

...भर पावसात त्यांचा पाठलाग चुकवताना दरड कोसळून डिकोच्या डोळ्यांदेखत तियागो गाडला गेला. त्याचं कलेवर पाहताना डिकोला अश्रू आवरेनात. आपण बुटांचा हट्ट धरला नसता तर तियागो गेलाच नसता...इथून पुढं डिको खूप अबोल झाला.

* * * 

‘‘ डिको, समोर तुला काय दिसतंय?’’ इस्पितळाच्या पाठीमागल्या झुडपाळ भागात दुपारचा आराम करताना डोडिन्होनं विचारलं.

‘‘आंब्याचं झाड आहे...’’

‘‘ आंबा ही खाण्याची गोष्ट नाही, डिको. आम्ही आंब्यानं फुटबॉल खेळायचो. मी तसाच शिकलो...’’ डोंडिन्हो म्हणाला. सहज उठून त्यानं एक रसरशीत आंबा तोडला. तुटल्यानंतर त्यानं आंब्याला हातदेखील लावला नाही. जमिनीवर पडूही दिला नाही. डोकं, खांदे, छाती, गुडघे, पावलं अशी काही नाचू लागली की आंब्यावर नजर ठरत नव्हती.

‘‘आंब्याला भेगसुद्धा जाता कामा नये...आणि तो नंतर खाताही आला पाहिजे. कळलं?’’ डोंडिन्हो म्हणाला.
* * *

वाल्डेमार दे ब्रिटो हे एक प्रस्थ होतं. स्थानिक गुणवत्ता हेरून खेळाडूंना ‘सांतोस क्‍लब’साठी तयार करायचं हा त्यांचा उद्योग होता. ‘अनवाणी क्‍लब’च्या पोरांचा खेळ त्यांनी पाहिला होता. त्यांनी डिकोला सांतोसच्या शिबिरात यायला सांगितलं. 

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगिजांनी ब्राझिलच्या किनाऱ्यावर पाय ठेवला. त्यांच्यासोबत आफ्रिकी गुलाम होते. चिवट जात...किनाऱ्यावर पाय ठेवल्या ठेवल्या त्यातले काही दूर जंगलात पळाले. तिथंच राहिले, वाढले. रानातलं खडतर जीवन कंठताना त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. जिंगा ही युद्धकला तिथं जन्माला आली. कुंगफू, कराटेसारखीच ही एक युद्धकला आहे. अशा लढवय्यांना ‘कपोइरा’ म्हणायचे. पुढं कालांतरानं गुलामी नष्ट झाल्यानंतर हे ‘कपोइरिस्ता’ उघड्यावर आले; पण त्यांच्या जिंगाचं स्वागत झालं नाही. त्यावर बंदी होतीच; पण जिंगा ही कला जिवंत ठेवण्याचा फुटबॉल हा उत्तम मार्ग आहे, हे त्यांच्यापैकी कुणाच्या तरी ध्यानात आलं. जिंगा ब्राझिलच्या धमन्यांमध्ये शिरला तो असा... 

पेलेचा उदय व्हायचा होता, त्याआधीच युरोपियनांनी ‘जिंगा’ला फालतू लेखणं सुरू केलं होतं. टेक्‍निक, फॉर्मेशन्स, डिफेन्स, टॅक्‍टिक्‍स या शब्दांचं पेव फुटलं होतं. फुटबॉलमध्ये शास्त्र शिरलं. नैसर्गिक खेळापेक्षा कुटिलतेला महत्त्व येऊ लागलं. सांतोसच्या प्रशिक्षण शिबिरात डिकोला त्याचा अनुभव येऊ लागला. संपूर्ण शिबिरात तो एकही गोल नोंदवू शकला नाही. निराश होऊन तो परत निघाला होता; पण सांतोस स्टेशनात वाल्देमार दे ब्रिटोनं त्याला गाठलं. 

‘‘तुझ्यात जिंगा जिवंत आहे, डिको. त्याला मारू नकोस. तुझा नैसर्गिक खेळ कर...’’ ब्रिटो म्हणाला. परतीची गाडी सोडून डिको शिबिराकडं परतला. 

एका लढतीत त्यानं गोल झळकवताना सरळ हवेत गिरकी घेतली. पाडाला आलेला झाडावरचा आंबा पायानं पाडावा, तशी गोलाकार गिरकी घेत चेंडू गोलजाळ्यात धडकवला.

‘‘ए पोरा, हे काय केलंस आत्ता?’’ प्रशिक्षकानं मैदानाच्या कोपऱ्यावर येऊन जाब विचारला.

‘‘क्षमा करा...पुन्हा नाही करणार’’ डिको म्हणाला.

‘‘गधड्या, पुन:पुन्हा कर!’’ टेक्‍निक आणि फॉर्मेशनची टेप लावणारा प्रशिक्षक ती ‘बायसिकल किक’ बघून खलासच झाला होता... 

* * *

सांतोसच्या संघात डिकोचा नंबर लागला. तो मैदान गाजवू लागला होता. त्याला व्यावसायिक खेळाडूचा भत्ता मिळू लागला. त्या भत्त्यात त्यानं मम्मासाठी एक ओव्हन आणि वडिलांसाठी एक छोटा ट्रान्झिस्टर आणला. ‘मी वर्ल्ड कप खेळायला जाईन, तेव्हा कॉमेंट्री ऐकायला तुम्हाला बरं पडेल!’ तो लाजत म्हणाला. डोंडिन्हो काही बोलला नाही. त्याला भरून आलं होतं.

-फुटबॉलच्या काही लढती आटोपून घरी आलेला डिको त्याच ट्रान्झिस्टरवर बातम्या ऐकत होता :

रेडिओ बॅदिरांतेस राष्ट्रीय संघासाठीचा चमू जाहीर करत आहे. सन १९५८ च्या विश्‍वचषकासाठी ब्राझिलच्या २२ जणांच्या चमूत खालील व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या नावांचा समावेश आहे...गिलमार, बेलिनी, याल्मा सांतोस, दिदी, झागालो, गारिंचा, निल्टन सांतोस, ओरलॅंडो, झिटो, वावा...आणि १९ पेक्षाही कमी वय असलेले कास्टिलो आणि माझोला यांचीही निवड झाली आहे. तथापि, सर्वात कमी म्हणजे अवघ्या सोळा वर्षांच्या डिको नॅसिमेंटोचाही समावेश या चमूत झाला आहे...’’

डिको स्तब्ध होऊन ऐकत राहिला...

***

लंगड्या डोंडिन्होनं पोरासमोर आपलं मन उघडं केलं : 

‘‘डिको, हे बघ, १९५० मध्ये आपण वर्ल्डकप गमावला. सगळे मोडून पडले आहेत. ब्राझिलियन स्वाभिमान जागा करणं आता तुझ्या हातात आहे...’’ एवढं बोलून डोंडिन्होनं त्याच्या हातात टी शर्ट दिला. त्यावर लिहिलं होतं : पेले.

‘‘लहानपणी न आवडणारं नाव का घ्यायचं?’’ डिको म्हणाला.

‘‘...कारण डिको, तीच तुझी खरी ओळख आहे. तुझ्या जिंगा स्टाइलच्या खेळाची ओळख...’’ डोंडिन्होनं सांगितलं.

...पुढं घडला तो अक्षरश: इतिहास आहे. नव्हे, ती एक गाथाच आहे. एडसन अरांटेस डो नॅसिमेंटो ऊर्फ डिकोचा अखेर ‘पेले’ झाला, त्याची ही गोष्ट आहे.

* * *

‘पेले : बर्थ ऑफ अ लीजंड’ हा चित्रपट बघताना आपण हिंदी चित्रपटच बघतो आहोत, असा वारंवार भास होतो. अश्रुपाताचे अनेक हमखास प्रसंग पेरलेले आहेत. बहुतेक सारे ढोबळच आहेत. आंब्याच्या फळानिशी केलेला सराव आणि जिंगा स्टाइलचा उगम याची केलेली उकल मात्र मस्त आहे. नवीन काहीतरी बघितल्याचा आनंद होतो. बाकी चित्रपट ठीकठाकच आहे. दिग्दर्शक जेफ आणि मायकेल झिम्बालिस्टबंधूंना फुटबॉल कळत असल्यानं यातली लढतीतली दृश्‍य हास्यास्पद वाटत नाहीत. एका दृश्‍यात तर खराखुरा पेले दिसतो आणि मन वेडावून जातं.

केविन दे पॉला नावाच्या कोवळ्या तरुणानं पेलेची भूमिका इतकी समरसून केली आहे की बस्स. लिओनार्दो लिमा कार्व्हालो नावाच्या पोरानं लहानगा पेले साकारला आहे. दोघेही लाजबाब. पेलेच्या वडिलांची, डोंडिन्होची महत्त्वाची भूमिका स्यू जॉर्ज या जाणत्या अभिनेत्यानं सुरेख रंगवली आहे. दिग्दर्शक झिम्बालिस्टबंधूंना भारतीय सिनेमा जाम आवडतो असं दिसतं. कारण, चित्रपटाची हाताळणी थेट भारतीय वाटते. ‘द ग्रेटेस्ट लव्हस्टोरी एव्हर टोल्ड’ नावाचा एक माहितीपट त्यांनी सन २०११ मध्ये तयार केला होता. तो होता भारतीय सिनेसृष्टीवरच. अनेक 

चित्रपट-महोत्सवांमध्ये तो नावाजला गेला आहे. म्हणूनच बहुधा पेलेच्या जीवनपटाला संगीत देण्यासाठी त्यांनी ए. आर. रहमानला गळ घातली. रहमाननंही चित्रपटाचं संगीत अप्रतिम केलं आहे. प्रसंगांना उठाव देणारं त्याचं संगीत आणि ‘जिंगा, जिंगा’ हे चित्रपटाच्या शेवटी येणारं गाणं तर पायाचा ठेका धरायला लावतं. आपल्या भारतीय मनाला आवडून जाईल, असा हा चित्रपट असला तरी हॉलिवूडवाल्यांनी सिनेमाला झोडपून काढलं. ‘स्वदेशाभिमान आणि जिंगाचं कौतुक करता, मग तुमच्या चित्रपटाची भाषा इंग्लिश का?’ असा सवाल केला गेला. चित्रपट खूप चालला, असं नाही. इटलीत मात्र सुपरहिट गेला.

...दंतकथा कुठल्याही भाषेत सांगितली, कितीही मोडक्‍या-तोडक्‍या पद्धतीनं सांगितली, तरी दंतकथा ही दंतकथाच असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com