परिपूर्ण डबा बनवा असा...

डॉ. सीमा सोनीस आहारतज्ज्ञ
Sunday, 9 June 2019

ज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्‍चित मिळू शकतो. 

ज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्‍चित मिळू शकतो.

शालेय तसेच कॉलेजच्या मुलामुलींचा रोजचा डबा हा गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य, आवड आणि वेळ या सगळ्यांची सांगड घालत रोजच्या रोज टिफीन बनवणे हे मोठ्या कसोटीचे काम असते. आत्ताच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आरोग्याची साथ असणे आवश्‍यक आहे. तेव्हा रोजच्या रोज जेवणाचा डबा अधिक सकस कसा करता येईल, या संदर्भात काही प्रॅक्‍टिकल टिप्स इथे देत आहोत.

१. जेवणाचा डबा - जेवणाचा डबा हा प्रामुख्याने चपाती-भाजीचा असतो. पोळीच्या पिठात एक किलो गव्हामागे ५० ग्रॅम सोयापीठ, १०० ग्रॅम नाचणी पीठ आणि २०० ग्रॅम राजगिरा पीठ मिसळल्यास, रोजच्या चपातीतून प्राकृत स्वरूपाचे कॅल्शियम मिळू शकते. भाजी बनविताना प्रथिनांचा विचार होणे गरजेचे आहे. प्रथिनयुक्त जेवणामुळे शरीर सुडौल राहते. हार्मोन्सदेखील संतुलित राहतात. प्रथिनयुक्त भाजीकरिता मोडाच्या उसळी, पीठ पेरून पालेभाजी, अंड्याची बुर्जी, पनीरची भाजी, सोयाचंक्‍सची भाजी, सांडगे, शेंगदाण्याचा म्हाद्या, झुणका, डाळ-कोबी, डाळ-दोडका असे अनेक उत्तम पर्याय आहेत. बारीक अंगकाठीचे मूल असल्यास भाजीत सुक्‍या खोबऱ्याचा वापर करावा. जेवणाच्या डब्याबरोबर अर्धे लिंबू किंवा आवळ्याचे 
काप द्यावेत. यामुळे प्रतिकार क्षमता शाबूत 
राहते. 

२. खाऊचा डबा - मधल्या वेळातील खाऊच्या डब्यासाठी बऱ्याच वेळा पालक बिस्किटे, वेफर्स, चिवडा, भडंग, फरसाण, मॅगी, जॅम-पोळी, तूप-साखर पोळी, पास्ता, सॉस-ब्रेड, पाकातले लाडू किंवा दुकानात उपलब्ध चकचकीत पाकिटातले पदार्थ मुलांना देतात. यामुळे मुलांमध्ये वजनवाढ, ॲलर्जी, हॉर्मोन्सचे आजार आणि स्मरणशक्तीचा ऱ्हास हे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. खाऊच्या डब्यात चटणी-चपातीचा रोल, घावन, धिरडी, ठेपले, ढोकळा, इडली, आप्पे, घरगुती तिखट वड्या, खारेदाणे, काळे फुटाणे, गुडदाणी, राजगिरा लाडू, भोपळ्याचे घारगे, पालकपुरी, थालीपीठ अशा प्रकारचे घरगुती पौष्टिक पदार्थ द्यावेत. जी मुले-मुली स्थूल प्रकृतीची असतील, अशांना खाऊच्या डब्यात सफरचंद, पेरू, पेअर, करवंद, जांभूळ, अंजीर, डाळिंब दाणे, वाफवलेला मका, हुरडा, मकाना हे कमी उष्मांक असलेले पदार्थ द्या. 

३. स्पोर्टसमनचा डबा - खेळाडूंना अधिकच्या ऊर्जेसाठी वरील दोन डब्यांबरोबर पिकलेली केळी द्यावीत. त्याचबरोबर २०-३० ग्रॅम सुका मेव्याचे मिश्रण द्या. ज्यामध्ये खारेदाणे, बदाम, काजू, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पिवळे मनुके सगळे एकत्र करून द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Perfect Tiffin Box Nutrition Food Health