अशी बोलते माझी कविता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

मास्तर मातीचे

भिजे एकेक ढेकूळ, जीव फुटला दाण्याला
असा निसर्गही साथ देई हिरव्या गाण्याला

मना लाख लाख डोळे, पाही सपान भाबडे
मातीच्या या सुगंधाला घाली कस्तुरी साकडे !

भिजलेली चिंब धरा, ऊन्ह-साउलीचा फेर
शेत सांगते बापाले : ‘मीच हक्काचे माहेर !

तुझ्या एकाच दाण्याची मोठी करीन मी रास
मोप देईल तुला ही तुझी माहेरची आस

मास्तर मातीचे

भिजे एकेक ढेकूळ, जीव फुटला दाण्याला
असा निसर्गही साथ देई हिरव्या गाण्याला

मना लाख लाख डोळे, पाही सपान भाबडे
मातीच्या या सुगंधाला घाली कस्तुरी साकडे !

भिजलेली चिंब धरा, ऊन्ह-साउलीचा फेर
शेत सांगते बापाले : ‘मीच हक्काचे माहेर !

तुझ्या एकाच दाण्याची मोठी करीन मी रास
मोप देईल तुला ही तुझी माहेरची आस

वाया कधी जाऊ नये तुझा मातीतला घाम
तुझ्या काबाडकष्टाला मिळायला हवा दाम’
   
शेत हीच माझी शाळा, तोच फळा अन्‌ खडू
पीक मोतियाचे घेतो; पण डोळां येते रडू

आम्ही ‘मास्तर मातीचे’ अन्‌ निधड्या छातीचे
कधी लागतील घरी दिवे प्रकाशवातीचे?

मातीच्या या मास्तरांचे जेव्हा येतील दिवस
तेव्हा जगही म्हणेल : ‘झाला भारतविकास’!

- डॉ.धनराज खानोरकर

--

 
आयुष्य बदलून मिळालं तर !

चालतेच आहे ती सालोसाल
डोक्‍यावर ओझं
आणि रणरणतं ऊन्ह घेऊन

झेलतेय वैशाखवणवा
आणि श्रावणधारा
दोन्ही तितक्‍याच तटस्थतेनं

आणि हिमतीनं
संसाराचा गाडा हाकताना 
होतेय तिची ससेहोलपट
आणि तारेवरची कसरतही

पण तमा नाहीय तिला
उन्हात काळवंडणाऱ्या कातडीची
आणि ठेचाळल्यावर पायांतून येणाऱ्या रक्ताचीही

घरोघरचे जुने कपडे घेऊन
त्याबदल्यात नवी भांडी देताना
तिला दिसत राहतो त्या भांड्यांच्या
गोल तळाशी...भाकरीचा चंद्र
घरातल्या चिल्यापिल्यांच्या मुखी भरवण्यासाठी 

जुन्या-नव्याच्या या देण्या-घेण्यात, अदलाबदलीत
अनेकदा तिला वाटूनही जात असेल कदाचित
कदाचित...
की आपलंही हे वणवणतं, भटकतं आयुष्य 
एके दिवशी
असंच बदलून मिळालं तर !

- कल्पना मलये 

Web Title: poem saptaranga