सोबत कवितेची 

poems and social media viral
poems and social media viral

जरूर 
कोण कसे अन्‌ कोण कसे हे ओळखून घे जरूर आता
खरे चेहरे, खरे मुखवटे चाचपून घे जरूर आता 

मैफलीत तू, पंगतीत तू, रस्त्यावरच्या गर्दीमध्ये...
खणखणणारे अपुले नाणे वाजवून घे जरूर आता 

जगासोबती चालायाचे...जगासोबती रहावयाचे...
सगळ्यांसोबत अपुले घोडे दामटून घे जरूर आता 

धर्म-जात हे खूळ असे, की विनाश व्हावा पार जगाचा
माणुसकीने मन सगळ्यांचे नांगरून घे जरूर आता 

मस्त कलंदर जगण्यासाठी लाव पणाला तुझी जिंदगी
लाट होउनी काठावरती आदळून घे जरूर आता

प्रत्येकाचा रंग वेगळा...रंगामधला रंग वेगळा!
वेगवेगळेपणाच त्यांचा पारखून घे जरूर आता

***

सोबत कवितेची 

मी बोलत असतो सतत माझ्या कवितेशी

सांगत असतो तिला माझी सुख-दुःखं
तिच्यासमवेतच मी हसतो 
तिच्यासमवेतच पाणावतात माझे डोळे

संकटाच्या काळात तिचाच 
कणखर खांदा असतो टेकवायला मान
उदास मनःस्थितीत
माझ्या पाठीवर तिचाच असतो मायाळू हात

खोल जखमेवर 
लावायला मलम
घालायला फुंकर
कविताच येते धावून

मी कवितेतून हसतो-रडतो-गातो-नाचतो
चित्रं रंगवतो-स्वप्नं पाहतो...
सगळं सगळं मी करतो कवितेतूनच! 

मी कवितेतून वाइटाला देतो शिव्या
मी कवितेतून चांगुलपणाच्या गातो ओव्या 

मी जिवंत आहे...जिवंत आहे मी
कविता माझ्यासोबत आहे म्हणून ! 

***

सोशल मीडियावरचं गाजलेलं...

उन्हाळा सुरू झाला आहे. आईसक्रीमवर ताव मारणं सुरू झालं असेल. मुलानांच काय मोठ्यांनाही ते आवडतं. पण एक दहा वर्षापासूनचा जुना भेद माहीत आहे ना?

पूर्वी आइस्क्रीम म्हणजे सरळ आइस्क्रीमच असायचं. आता त्यात ‘फ्रोझन डेझर्ट’ हा प्रकार आलेला आहे. अर्थात परदेशी कंपन्यांनी तो आणला आणि इतरही काही कंपन्या त्या तयार करायला लागल्या. आइस्क्रीम आणि ‘फ्रोझन डेझर्ट’ यात फरक काय?

आईसक्रीम शब्दाची फोड आहे- आइस अधिक क्रीम. यात क्रीम याचा अर्थ मलई म्हणजे दुधापासून बनवलेला पदार्थ. आइस्क्रीम बनवताना त्यात दुधाबरोबरच डेअरी फॅट टाकतात, तर ‘फ्रोझन डेझर्ट’ बनवताना त्यात दुधाबरोबर ‘व्हेजिटेबल फॅट’ टाकतात. हे ‘व्हेजिटेबल फॅट’ सहसा वनस्पती तेलांपासून बनवलेले असते.
अमूल ही दूध विकणारी कंपनी आहे, तेच त्यांचे मुख्य उत्पादन आहे आणि ते दूध आणि त्यासंबंधित घटकांचा वापर करून आइस्क्रीम बनवतात. इतरही काही कंपन्या दूध आणि त्यासंबंधित घटकांचा वापर करून आइस्क्रीम बनवतात. उदाहरणार्थ- हॅवमोर कंपनी; पण काही कंपन्या मात्र ‘फ्रोझन डेझर्ट’ बनवतात. त्या कंपन्यांची उत्पादने बारकाईने बघितल्याशिवाय ते आइस्क्रीम आहे की ‘फ्रोझन डेझर्ट’ कळणार नाही- कारण पॅकिंग, चित्र सर्व आइस्क्रीम उत्पादनासारखेच असते.

आइस्क्रीम बनवत असलेल्या कंपन्या व फ्रोझन डेझर्ट बनवत असलेल्या कंपन्या यांच्यातील वाद जुनाच आहे आणि दोन्ही बाजू आमचेच उत्पादन आरोग्यासाठी अधिक चांगले असा दावा करतात; पण विकत घेताना व खाताना आपण काय विकत घेत आहोत व खात आहोत याची स्पष्ट माहिती हवी. विशेषत: भारतात मुलगा दूध घेत नाही, आईसक्रीमच्या निमित्ताने तरी दूध त्याच्या पोटात जाईल म्हणून पालक त्याला आवडीने आईसक्रीम, कुल्फी देतात- त्यांनी पदार्थावर काय लिहिलेले आहे, काळजीपूर्वक वाचावे व मग निवड करावी. इन्ग्रेडीअंट अर्थात त्यात घटक पदार्थ काय आहेत ते वाचावे, त्यात डेअरी फॅट लिहिलेले आहे की व्हेजिटेबल फॅट ते बघावे आणि त्याप्रमाणे निवड करावी. इंटरनेटचा जे वापर करतात त्यांनी गुगलवरून माहिती मिळवावी. मजेकरता खाण्याचा साधा पदार्थ, त्यात ही कटकट कशाला असा विचार करू नये, कारण आपण काय खात आहोत ते आपल्याला माहीत हवे, निवड करण्याचा आपल्याला हक्क आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com