राजकारणाची बदललेली ‘भाषा’ चिंताजनक

अनंत बागाईतकर
मंगळवार, 29 मे 2018

स्वपक्षीय समर्थकांनी बेताल, बेमुर्वत आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणाची भाषा वापरून मोदींना अडचणीत आणण्याचे प्रकार घडले. दुसरीकडे प्रवक्‍त्यांना जबाबदारी समर्थपणे पार पाडताना, इतिहासाचा दाखला देताना दमछाक करून घ्यावी लागली.

स्वपक्षीय समर्थकांनी बेताल, बेमुर्वत आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणाची भाषा वापरून मोदींना अडचणीत आणण्याचे प्रकार घडले. दुसरीकडे प्रवक्‍त्यांना जबाबदारी समर्थपणे पार पाडताना, इतिहासाचा दाखला देताना दमछाक करून घ्यावी लागली.

देशातील २०१४ ची लोकसभा निवडणूक, प्रचार आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर सत्तारूढ झालेले भाजप सरकार! त्यानंतर भारतीय राजकारणाची शिष्टसंमत, सभ्य भाषा बदलली. तिची जागा अरेरावी, बेमुर्वत, धमकावणी आणि निखळ सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या भाषेने घेतली. सत्तेत आल्याआल्या खाद्यप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ‘दिल्लीत सरकार रामजाद्यांचे हवे की हरामजाद्यांचे याचा निर्णय मतदारांनी करावा’, असे भाषण केले होते. गिरिराजसिंह यांनी ‘नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि त्यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानला जावे’, असे म्हटले होते. भाजपचे रामपूरचे खासदार नेपाल सिंग यांनी जवानांचा मृत्यू होतो त्यात आश्‍चर्य काय; ते त्यांचे कर्तव्यच आहे, अशा आशयाचे विधान करून वाद निर्माण केला होता. गेल्या चार वर्षांतली अशा वादग्रस्त विधानांची अनेक उदाहरणे आहेत. यातील काहीजणांनी माफी मागून वाद मिटवला. काहींनी मात्र माघार घेण्यास नकार देऊन पक्ष आणि सरकारला अडचणीत आणले.

राष्ट्रीय राजकारणाच्या बदललेल्या भाषेबाबत आणखीही खुलासा करता येईल. वरील वादग्रस्त वक्तव्ये करणारे भाजप नेते जसे आहेत, त्याचप्रमाणे त्यामुळे पेटलेली आग शमविण्यासाठी भाजपचे ठरलेले प्रवक्ते आणि मंत्री यांना नेहमीच तैनात केले गेले व केले जात आहे. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, मीनाक्षी लेखी यांच्यासारख्या प्रवक्‍त्यांवर ही जबाबदारी नेहमीच पडली; परंतु या प्रवक्‍त्यांनीदेखील खुलासे करताना पूर्वी काय झाले, पूर्वीच्या चुकांचा संदर्भ देऊन अप्रत्यक्षपणे समर्थनाचा लटका प्रयत्नही केला. मुस्लिम समाजातील व्यक्तींची हत्या झाल्यावर टीका होताच १९८४ च्या शीख हत्याकांडाचा संदर्भ देऊन समर्थन केले जाऊ लागले. ‘तुमच्या राजवटीतही असे झाले होते’, हा परवलीचा प्रश्‍न करून विरोधी पक्षांना गप्प करण्याची ही नवी भाषा वापरली जात आहे. पूर्वीच्या राजवटीतील चुकांकडे बोट दाखवून स्वतःच्या चुकांचे समर्थन करण्याचा नवा प्रकार समोर येत आहे. विरोधी पक्षांना ‘मी अमुक आहे, सांभाळून राहा’, अशी दमाची भाषा जाहीर प्रचारसभेत वापरली गेल्यानंतर देशाच्या माजी पंतप्रधानांना राष्ट्रपतींकडे पत्र लिहून त्याबद्दल दाद मागावी लागली. राजकारणाची राष्ट्रीय भाषा पूर्वी कधीही एवढी खालावलेली नव्हती!

महात्मा गांधींच्या प्रतिमेचा खादीसाठी काही उपयोग झाला नाही. उलट त्यांच्या (नोटांवरील) प्रतिमेमुळे भारतीय रुपयाची किंमत कमी झाली. 
- अनिल विज, क्रीडामंत्री, हरियाना

भारतातील हिंदूंची संख्या कमी होत आहे, कारण ते इतरांचे हिंदू धर्मात परिवर्तन करीत नाहीत. मात्र अल्पसंख्याकांच्या संख्येत वाढ होताना आढळते.
 - किरण रिजिजु,  केंद्रीय गृहराज्यमंत्री

भाजपचे सरकार घटनेत दुरुस्ती करून प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकेल. 
- अनंतकुमार हेगडे, केंद्रीय राज्यमंत्री

सोनिया गांधी गोऱ्या नसत्या, तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते?
- गिरिराजसिंह, केंद्रीय राज्यमंत्री

Web Title: politics narendra modi