भगीरथ... कालचा आणि आजचा! (पोपटराव पवार)

popatrao pawar write water article in saptarang
popatrao pawar write water article in saptarang

भगीरथानं प्रयत्न करून गंगा पृथ्वीवर आणली, ही पौराणिक कथा आपण आजच्या संदर्भांमध्ये पडताळून बघितली पाहिजे. आजची परिस्थिती पाहता आपल्याला तशा प्रयत्नांची गरज आहे. हा भगीरथ राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तयार व्हायला हवा.

राज्यात 2016मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. सर्व जण त्रस्त होते. अशातच नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत होता. या सर्व पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कैलास पर्वतावरच्या मानस सरोवरातून पवित्र जलकलश आणून तो गोदावरीमध्ये अर्पण करून जलसाक्षरतेचा एक नवा संदेश देण्यासाठी एका शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचा मीदेखील एक सदस्य होतो. मला प्रथमतः या कल्पनेनं आश्‍चर्य वाटलं; परंतु केवळ पौराणिक कथांमधल्या श्रद्धा-अंधश्रद्धांच्या पलीकडं जाऊन जलसाक्षरतेसाठी समाजाशी निगडित असणाऱ्या पोथी-पुराणांची आजच्या परिस्थितीची प्रासंगिकता पडताळून ही चळवळ कशी पुढं नेता येईल, याचा मी विचार केला आणि भगीरथाची कथा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली.

राजा सगरच्या कालखंडात उत्तर भारतात मोठा दुष्काळ पडला होता. जनतेचे, पशू-पक्ष्यांचे मोठे हाल सुरू झाले. हतबल झालेल्या राजानं आपल्या सिंहासनावर एक शिलालेख ठेवून खुर्चीचा त्याग केला. पुढं साडेचारशे वर्षांनंतर भगीरथ गादीचा वारस झाल्यानंतर त्यानं तो शिलालेख पाहिला आणि वाचला. "जो कुणी स्वर्गातली गंगा भूमीवर आणून आपल्या पूर्वजांचा उद्धार करील, त्याच्या पुढील पिढ्यांचं कल्याण होईल,' असं त्या शिलालेखावर लिहिलं होतं. भगीरथ आपल्या पूर्वजांचं दुःख पाहून व्यथित झाला. त्यानं गंगा भूलोकावर आणल्याशिवाय गादीवर बसणार नाही, असा संकल्प सोडला आणि उपाययोजना करण्यासाठी हिमालयात जाऊन ध्यानधारणा करून जलनियोजनासाठीचं नियोजन केलं. या कार्यात कपिलमुनींसारख्या ऋषीनं पाण्याचे प्रवाह सांगितले. गंगेची आराधना करायला सुचवलं. गंगा प्रसन्न झाल्यावर तिनं आपण भूलोकावर अवतरल्यास मोठा विध्वंस होईल असं सांगितलं आणि त्यासाठी शंकराची आराधना करायला सांगितलं. शंकराची आराधना केल्यानंतर भगीरथानं शंकरांना गंगा आपल्या जटेमध्ये घेण्याची विनंती केली. भूलोकी ती प्रवाही राहावी, अशी विनंती केली. अशा पद्धतीनं गंगा भारतभूमीवर अवतरली आणि आपला प्रदेश सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला.

ही पौराणिक कथा आजच्या व्यावहारिक युगाशी ताडून बघितली पाहिजे. त्या दृष्टीनं पाहिल्यास कपिलमुनी मोठे भूगर्भशास्त्रज्ञ होते, म्हणजे आजच्या शब्दांत सांगायचं तर भारत सरकारच्या भूगर्भशास्त्र महासंचालकाप्रमाणं काम हाताळत होते. भगवान शंकर यांनी आपल्या जटेमध्ये गंगा घेतली, याचाच अर्थ त्यांनी माथा ते पायथा या सूत्रानुसार संपूर्ण हिमालयात पाणलोटाचं नियोजन केलं. आता आपल्या भाषेमध्ये "डीप सीसीटी', "कंपार्टमेंट बंडिंग', जमिनीचं सपाटीकरण करणं, "एरिया ट्रीटमेंट' अशा अनेक उपाययोजनांद्वारे हिमालयात एक प्रकारे पाणलोटउपचारांच्या जटा निर्माण करण्यात आल्या, असं आपण म्हणू. या प्रक्रियेत भगीरथाची भूमिका मुख्य अभियंत्याप्रमाणं केंद्रस्थानी होती आणि त्यांनी थोडक्‍यात या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला होता. या कामामध्ये मोठा जनसहभाग होता. अनेकांनी प्राण गमावले. या सर्वांच्या संघटनात्मक योगदानातून पाणी उपलब्ध झालं आणि शतकानुशतकं पाण्याचा प्रश्न मिटला.

आजची परिस्थिती पाहता आपल्याला पौराणिक कथेमधल्या भगीरथाची गरज आहे. हा भगीरथ राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तयार होण्याची गरज आहे. आम्ही पौराणिक कथेशी निगडित असणाऱ्या पवित्र जलकलशास सिंहस्थ कुंभमेळ्यात सोडलं आणि पुढं "जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून हा संकल्प सोडवण्यात शासनकर्ते आणि जनता बऱ्यापैकी यशस्वी झाली. त्यामुळं दुष्काळातले प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. यासाठी भगीरथासारख्या नियोजनामुळं राजकीय व्यवस्था, प्रशासकीय नियोजन, समाजव्यवस्था या तिन्ही व्यवस्थांनी प्रामाणिक काम केल्यानं स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य झाल्या. एक गावपातळीवरचा कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टींचं अवलोकन करतो, तेव्हा असं जाणवतं, की राजा भगीरथाला आजच्या काळातल्या निवडणुकांसाठी व्यवस्थेमधून पैसा काढावा लागत नव्हता, किंवा कपिलमुनींसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणं बदली करण्यासाठी पैसा गोळा करण्याची गरज पडत नव्हती. त्यामुळं उत्तम गुणवत्ता जोपासली जात होती. त्या काळात आजच्यासारखा जागतिक बॅंकेकडून पैसा येत नव्हता, तर केवळ लोकांची "श्रम बॅंक' काम करत होती.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या या लोकचळवळीला राज्यकर्त्यांच्या, कार्पोरेट कंपन्याच्या सक्रीय सहभागानं मोठी गती आली आहे, हे आपण नाकारू शकत नाही. यामध्ये सरकारी यंत्रणेबरोबर कार्पोरेट कंपन्या, पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, सीएसआर निधी या सर्वांच्या एकत्रित "भगीरथ'प्रयत्नांतून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला; परंतु या "भगीरथ' प्रयत्नांबरोबरच आपल्याला शाश्‍वत जलसंवर्धन उद्यासाठीसुद्धा करण्याची आवश्‍यकता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हिवरेबाजारमधल्या मायंबा डोंगरांवर "भगीरथाचं गंगावतरण' हा देखावा साकारण्यात येत आहे. आपण सर्वांनी श्रद्धा-अंधश्रद्धाच्या विळख्यात न अडकता आपल्या संस्कृतीमधल्या पौराणिक कथांचा आजच्या संदर्भात विचार करून त्यातल्या योग्य गोष्टींचा बोध घ्यायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com