राजकारण आणि उद्योगही

दिग्विजय गायकवाड मूळचे बडोद्याचे. शिक्षित कुटुंबातून आलेले. वडील न्यायाधीश. संपूर्ण कुटुंब नोकरी करून जगणारं; पण दिग्विजय गायकवाड यांना मात्र व्यवसाय करायचा होता.
Prachi Kulkarni writes sucess story of business Digvijay Gaikwad politics and industry
Prachi Kulkarni writes sucess story of business Digvijay Gaikwad politics and industry sakal
Summary

दिग्विजय गायकवाड मूळचे बडोद्याचे. शिक्षित कुटुंबातून आलेले. वडील न्यायाधीश. संपूर्ण कुटुंब नोकरी करून जगणारं; पण दिग्विजय गायकवाड यांना मात्र व्यवसाय करायचा होता.

दिग्विजय गायकवाड मूळचे बडोद्याचे. शिक्षित कुटुंबातून आलेले. वडील न्यायाधीश. संपूर्ण कुटुंब नोकरी करून जगणारं; पण दिग्विजय गायकवाड यांना मात्र व्यवसाय करायचा होता. पण, व्यवसाय म्हणजे फसवणूक करणारे लोक, हे गणित त्यांच्या कुटुंबात प्रत्येकाच्या मनात पक्कं, त्यामुळे जेव्हा गायकवाड म्हणाले की, मला नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा आहे, तेव्हा कुटुंबीयांना वाटलं की, अरे हा घरातली सगळी प्रॉपर्टी विकणार. संघर्षाचा पहिला टप्पा होता तो घरातच. पण, आपल्या स्वप्नांवर गायकवाड ठाम होते.

सुरुवात केली ती बडोद्यात वीटभट्टीचा धंदा करून. ‘‘ तुम्ही जेव्हा जगापेक्षा वेगळा विचार करता, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं ’’ इथं घरात वडिलांनाच सिद्ध करून दाखवायचं होतं; पण त्यांना आईचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला.

१९८७ मध्ये ते अमेरिकेत गेले. कुटुंबाला ते बरोबर घेऊन गेले; पण जवळपास आठ महिने त्यांना नोकरी मिळाली नाही. अगदी किराणा दुकानातसुद्धा त्यांना काम मिळेना. पत्नीने साठवलेल्या पैशांवर घर सुरू होतं. पत्नी म्हणाली, ‘‘ इंडिया मे जो शेर है, वो यहा गिधड क्यू बना है? इथं गरजू आहे, नवा आहे, हे लोकांना सांगायची गरज काय?’’ हे ऐकल्यावर गायकवाड यांनी भूमिका बदलली आणि लोकांशी संवाद साधायला, त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली. या चर्चेतून आणि प्रयत्नातून सुरुवात झाली ती त्यांच्या अमेरिकेतल्या पहिल्या व्यवसायाला. पाच हजार डॉलर खर्च करून त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं.

एक व्यवसाय सुरू करायचा आणि यशस्वी करायचा, असं अनेकांचं सुरुवातीला धोरण असतं. पण, गायकवाड यांनी मात्र आजपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे ४२ व्यवसाय सुरू केले आहेत. यांतले काही नीट सुरू राहिले, तर काहींमध्ये त्यांना नुकसान सोसावं लागलं; पण ते थांबले नाहीत. व्यवसायाची संकल्पना त्यांची आणि आर्थिक गणित सांभाळण्याची जबाबदारी मात्र पत्नीची.

एकीकडे व्यवसायात यश मिळत होतंच; पण केवळ व्यवसाय करत राहतील ते गायकवाड कसले. १९९२ पासून ते अमेरिकन राजकारणाशी संबंधित. गायकवाड यांचा तिथल्या राजकारणात प्रवेश झाला तो बिल क्लिंटन यांच्या काळात. त्याला वेगळं कारण घडलं. अमेरिकेतील भारतीयांना आजही वर्णभेदाचा फटका बसतोच. तुम्ही एखाद्या ठिकाणी असलात तर ‘तुम्ही कोण?’ हा प्रश्न विचारला जातोच. वर्ण, भाषा या सगळ्याचाच फरक. मग हे वेगळेपण उठून दिसणारच. रिपब्लिकन पक्षात हे जास्त असल्याचं डॉक्टर गायकवाड सांगतात. हे लक्षात घेऊन मग त्यांनी थेट त्यांच्यामध्ये शिरूनच बदल घडवायचं ठरवलं. ‘‘तुम्ही इन्साइडर असाल तर ते तुमचा दृष्टिकोन समजून घेतील. संधी मिळाली की भूमिका मांडत राहिलो, सतत दहा वर्षं मी हे करत होतो,’’ गायकवाड आवर्जून सांगतात.

अमेरिकन राजकारण मात्र वेगळं असल्याचं गायकवाड सांगतात. ‘‘मी फ्लोरिडामध्ये आलो तेव्हाच ऑफिशियल फंड रेझिंग पाहिलं. हे फंड रेझिंग म्हणजे तुम्ही उमेदवारांना किंवा पक्षाला अधिकृतरीत्या पैसे द्यायचे, त्यांनी त्याची नोंद ठेवायची. यात पारदर्शकता इतकी की, एक रुपया जरी नोंद केला नाही, तरी त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते. अगदी जुन्या गुन्ह्याचीदेखील नोंद असते, त्यामुळे जर तुमची प्रतिमा स्वच्छ नसेल, तर उमेदवारी नाही. हे नगरसेवक पदासाठीसुद्धा लागू होतं.’’ त्यात भारतातल्या प्रचंड आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असण्याच्या काळात तिथलं वेगळं वातावरण त्यांना प्रकर्षाने जाणवतं.

‘‘मागे निवडणुकांपूर्वी तिथल्या गव्हर्नरच्या मुलीला अमली पदार्थ घेताना अटक झाली, तर तिथल्या गव्हर्नरनी तिला सोडवण्यासाठी फोन करणं तर दूरची बात, उलट तिला पुनर्वसन केंद्रात पाठवावं अशी सूचना केली आणि त्या निवडणुकीत इतर उमेदवारांनी हा विषय किंवा यावरून आरोप-प्रत्यारोप करणार नसल्याचं जाहीर केलं. जे उमेदवार वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करतात त्यांना उलट फटका बसतो.’’ डॉ. गायकवाड सांगतात. अमेरिकेचे यापूर्वीचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आजही सुरू आहे. ट्रम्प सत्तेत असताना शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी गायकवाड यांनी काम केलं आहे. त्यांची मुलं आता सेटल झाली आहेत. एक व्यवसायात मदत करतो, तर दुसरा अमेरिकन लष्करामध्ये होता.

या टप्प्यावर आता गायकवाड यांना परतफेड करण्यासाठी त्यांना भारतीयांना मदत करायची इच्छा आहे. त्यांना मोठा प्रयोग करायची इच्छा आहे. म्हणजे धंदा करण्याची संकल्पना चांगली असेल तर पैसा लावायची तयारी; पण त्यात धंदा आणायचा आणि संकल्पना कॉपी करायची नाही, ही त्यांची अट आहे. ‘‘छोट्या गोष्टींचा विचार करू नका. मोठी स्वप्नं पाहा, व्यापक संकल्पनांचा विचार करा. शिकवायला आम्ही आहोत.’’

- प्राची कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com