व्यवसाय उभारला जर्मनीत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prachi Kulkarni writes youth Business set up in Germany...

जर्मनीमधून व्यवसाय सुरू करून त्याचा आता आपल्या देशात विस्तार करतोय...

व्यवसाय उभारला जर्मनीत...

- प्राची कुलकर्णी

नगरमधून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं, मराठी माध्यम, अशा वातावरणातला तरुण आज कोट्यवधीची उलाढाल असलेली कंपनी चालवतोय. जर्मनीमधून व्यवसाय सुरू करून त्याचा आता आपल्या देशात विस्तार करतोय... स्वप्नवत वाटणारा असा हा प्रवास आहे ओंकार कलवडे यांचा. कलवडे मूळचे नगरचे. वडिलांची नोकरी राष्ट्रीयीकृत बॅंकेतली. आई गृहिणी. साधारण अकरावीमध्येच त्यांनी अभियांत्रिकी शाखेला जायचं ठरवलं होतं. शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असलं तरी आठवीपासून शिक्षकांनी इंग्रजीचा पाया पक्का केला होता.

माध्यमिक शाळेत असतानाच कलवडे बास्केट बॉल खेळायचे, त्या संघाचे ते कॅप्टनही होते. याबरोबरच खो खो टीममध्येसुद्धा होते. पण, तरीही खेळ आणि शिक्षण याला एकसारखं महत्त्व देत त्यांनी कधी कमी मार्क मिळवले नाहीत. विखे पाटील महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर पुढे शिकत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं मास्टर्सही पूर्ण केलं.

खरंतर रूढ अर्थाने कधीच ठरावीक असं काही करायचं डोक्यात नव्हतं, असं कलवडे सांगतात. ‘‘सुरुवातील ठरवलं होतं की, ‘एनडीए’मध्ये जाऊन एअर फोर्समध्ये पायलट व्हायचं, त्यासाठी काही परीक्षाही दिल्या. पुढे आयपीएस अधिकारी व्हायचंही माझ्या मनात होतं, त्यामुळे इंजिनिअरिंगला असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी अभ्यास केला; पण इंजिनिअरिंगनंतर नगरबाहेर पडण्याचा पर्याय निवडणं फायद्याचं ठरलं. एका जर्मन कंपनीचं बॅक ऑफिस २००८ च्या सुमारास पुण्यात सुरू झालं, त्यात काम करण्याची संधी मिळाली आणि नगरबाहेरचा प्रवास सुरू झाला.’’

पुढे हे कार्यालय जर्मनीत हलवायचं ठरलं आणि कलवडेंना जर्मनीत येण्याची विचारणा झाली. अर्थातच, परदेशी जाण्याचा पर्याय त्यांनी निवडला. अभियंता म्हणून जॉइन झालेले कलवडे नोकरी सोडली तेव्हा टेक्निकल डायरेक्टर होते. २०१४ मध्ये कंपनी सोडली तेव्हाही परिस्थिती अवघड होती. शंभर इंजिनिअर असणाऱ्या या कंपनीत तेव्हा फक्त ६ जण उरले होते. पुढे काय करायचं, याचा मोठा प्रश्न. यात अनुभवाच्या जोरावर दुसरी नोकरी मिळणं हे खरंतर सोपं; पण कलवडेंनी मात्र ठरवलं, स्वतः झेप घ्यायची आणि आपला व्यवसाय सुरू करायचा.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या जर्मनीतच त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पुढची दोन वर्षं ते मिळेल ती कामं स्वीकारत राहिले आणि यातून ‘मॅट्रिक्स स्ट्रक्चर्स’ची स्थापना झाली. ज्या ठिकाणी व्यवसाय उभारला, त्या गावात कलवडे आणि त्यांच्या पत्नी ही दोनच मराठी माणसं. अशातून व्यवसायाचं स्वप्न साकारलं जात होतं. कलवडे सांगतात, ‘‘जर्मनीत माझी त्रिसूत्री होती. ती म्हणजे, नवं दिसेल ते शिकावं, पडतील ती कामं करावीत, कष्ट आणि धडपड करत रहावं.’’ यातून अगदी कमी वेळेतच या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून कलवडेंनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि पाच वर्षांतच प्रकल्पांचं शतकही पूर्ण केलं. याच कंपनीचं पुढे ‘मॅट एक्स स्ट्रक्चर्स’ असं नामकरण झालं. अर्थातच, हा प्रवास सोपा नव्हता. दिवसाचे १८-१८ तास कलवडे काम करायचे. आठवड्याला होणारा प्रवास किमान अडीच ते तीन हजार किलोमीटर. नोकरी करत असताना इंग्रजीच्या ज्ञानावर भागत असलं, तरी व्यवसाय करताना मात्र परकीय लोकांशी संवाद साधायला त्यांची भाषा यायला हवीच, यातून कलवडे मग जर्मन शिकले.

आता या कंपनीचा पसारा वाढलाय. स्टील स्ट्रक्चर्स, इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टस, फिजिबिलिटी स्टडीज अशा अनेक क्षेत्रांत ही कंपनी काम करते. विमानतळापासून नैसर्गिक वायू उद्योगातील प्रकल्प आणि अगदी व्यायामशाळाही या कंपनीने उभारल्या आहेत. शिर्डीच्या विमानतळाचं कामही कलवडेंच्याच कंपनीने केलं आहे.

अर्थात, जर्मनीत काम सुरू असताना भारतातही काही सुरू करावं ही कलवडेंची भावना होती. यातून त्यांनी नगरला दुसरी कंपनी सुरू केली आणि ज्या महाविद्यालयामधून पदवीधर झाले, त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी दिली. हे सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्यावर त्यांनी कलवडेंना जर्मनीमधल्या तंत्रज्ञानाचा भारतासाठी वापर करता येईल अशी राष्ट्रीय प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचं सुचवलं. यातून ‘परिणत कन्सल्टंट्स’ची स्थापना झाली. या कंपनीत २७ जर्मन, ब्रिटिश आणि भारतीय इंजिनिअर जॉइन झाले. कलवडेंच्याच शब्दांत त्यांच्या यशाचं गमक सांगायचं तर, ‘ झिरो पर्सेंट इमोशन आणि हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन.’