अवतार गणेशाचे (प्रदीप रास्ते)

प्रदीप रास्ते
रविवार, 9 सप्टेंबर 2018

गणपती ही केवळ ज्ञान आणि बुद्धीची देवता नाही, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी गणेशानं अनेक अवतार घेतले. या अवतारकार्यांचा उल्लेख मुख्यतः गणेश आणि मुद्‌गल पुराणामध्ये येतो. अशा अवतारांची माहिती.

गणपती ही केवळ ज्ञान आणि बुद्धीची देवता नाही, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी गणेशानं अनेक अवतार घेतले. या अवतारकार्यांचा उल्लेख मुख्यतः गणेश आणि मुद्‌गल पुराणामध्ये येतो. अशा अवतारांची माहिती.

श्रीगणेश हिंदूंचं आद्य दैवत असून सर्व कार्यारंभी त्याचं पूजन अत्यावश्‍यक मानलं गेलं आहे. गणपती ही केवळ ज्ञान व बुद्धीची देवता नाही, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. म्हणूनच सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी गणेशानं अनेक अवतार घेतले. या अवतारकार्यांचा उल्लेख मुख्यतः गणेश आणि मुद्‌गल पुराणामध्ये येतो. पुराणोक्त 21 गणपतीची क्षेत्रं प्रसिद्ध आहेत. या सर्व क्षेत्रांवर एक,तर पंचपरमेश्‍वर (ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य) यांनी उपासना केलेली आहे. काही ठिकाणी असुरांनी, ऋषीमुनींनीसुद्धा गणेशाची उपासना करून त्या त्या उपासनास्थळी गणेशाच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. अशा क्षेत्रस्थळांना "स्वायंभूव क्षेत्र' म्हणतात. यात मोरेश्‍वर (मोरगाव) हे क्षेत्र श्रेष्ठत्वम मानलं जातं. त्याचप्रमाणं त्रिगुणात्मक अशा देवत्रयांच्या अनुग्रहस्थळांना "ब्राह्मक्षेत्र' असं म्हणतात. अशा क्षेत्रांमध्ये काशीतलं श्रीढुंढीराज क्षेत्र श्रेष्ठ मानलं जातं. तसंच त्रिमूर्तींपैकी (ब्रह्मा, विष्णू, महेश) कोणाही एकाच्या अनुग्रहस्थळाला "प्राजापत्य क्षेत्र' म्हणतात आणि त्यात रांजणगाव क्षेत्र श्रेष्ठ मानलं जातं. श्री गणेशराज प्रभूंचे जे मुख्य अवतार वर्णिले आहेत, ते सर्व त्याचं सर्वश्रेष्ठत्व आणि सार्वभौमत्व सिद्ध करणारे आहेत. गणेशाचे सर्वच अवतार केवळ भक्तकार्यासाठी होत असल्यानं भक्ताचं अपेक्षित कार्य होताच तो अवतार समाप्त करतो आणि त्याच्या स्वानंदगृही जातो.

विष्णूचे मुख्य दहा अवतार मृत्यूलोकातच झाले आहेत. दक्षाच्या व हिमाचलाची कन्या पार्वती किंवा समुद्राची व भृगू ऋषींची कन्या लक्ष्मी इत्यादी आदी शक्तीचे अवतारही मृत्यूलोकीच झाले. सूर्याचेही अवतार मृत्यूलोकी झाले. मात्र, गणेश देवतेचे अवतार मात्र तिन्ही लोकांत (पाताळ, मृत्यू, स्वर्ग) झाले आहेत. मधुकैटभ नावाच्या दैत्याच्या नाशासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावं यासाठी भगवान विष्णूंनी सिद्धटेक क्षेत्रात तपश्‍चर्या केली आणि गणेशाला प्रसन्न करून दैत्याचा नाश केला. त्रिपुरासुर दैत्याच्या नाशासाठी भगवान शंकरांनी गणेश-आराधना महागणपती रांजणगाव इथं केली. इंद्रानं गौतमऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी कदंब क्षेत्रात गणेशाची आराधना केली. इंद्रस्थापित गणेशमूर्ती "चिंतामणी' नावानं आजही विद्यमान आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीसामर्थ्य यावं म्हणून थेऊर गावी गणेश-आराधना केली. तारकासुर दैत्य देवादिकांना फारच पीडादायक ठरला होता. त्याचा नाश शिवपुत्र स्कंधाच्या हातूनच होणार हे विधीलिखित होते. मात्र, गणेश-स्मरण न करता युद्ध केल्यानं स्कंद तारकासुराकडून पराजित झाला. तेव्हा देवगुरूंनी त्याला सांगितलं, की तुझ्या हातून या दैत्याचा नाश होणार हे सत्य असलं, तरी श्रीगणेशाच्या कृपेशिवाय ते कठीण आहे. तेव्हा स्कंदानं ऐलापूर (वेरुळ) क्षेत्रात जाऊन गणेशाची कठोर आराधना केली आणि लक्षविनायक गणेशाची स्थापना केली आणि त्याच्या कृपेनंच तारकासुराचा नाश केला.
प्रभू रामचंद्रांनी हंपी इथं श्रीगणेश-आराधना करून हेरंब नामक गणेशमूर्ती स्थापन केली. सूर्यपुत्र शनीनं सूर्याकडून गणेशउपासना घेऊन शापमोचनार्थ आणि श्रीअवधूत दत्तात्रयांनी शांतिप्राप्त्यर्थ राक्षसभुवन इथं गणेश-आराधना करून "विज्ञान गणेश' स्थापन केले. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा पुष्टीपती गणेश-आराधना आणि श्रीसत्यविनायकाचं व्रत केल्याचं सर्वश्रुत आहे. सर्व देवतांनी गणेश-आराधना केलीच आहे; पण त्यांच्या भक्तांनीसुद्धा गणेशाची उपासना केली आहे. उदाहरणार्थ, दैत्यराज बळी, इंद्र इत्यादी. मृत्यूलोकी गणेशाचे अवतार झाले, तसा पाताळामध्ये मुषकग या नावानं अवतार झाला. मुद्‌गल पुराणात विघ्नविनाशक गणेशाच्या अनंत अवताराचं वर्णन आले आहे. त्यापैकी ब्रह्मधारक असे प्रमुख आठ अवतार खालीलप्रमाणं आहेत ः
1. वक्रतुण्डावतारश्‍च देहानां ब्रह्मधारकः। मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः।।
जो देह ब्रह्मधारक आहे, "मत्सरासुराचा' वधकर्ता आहे, ज्याचं वाहन सिंह आहे, असा तो "वक्रतुंड अवतार' मानला जातो.
2. एकदन्तावतारो वै देहिनां ब्रह्मधारकः। मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः।।
देहिब्रह्मधारक, "मदासुराचा' वध करणारा आणि उंदीर ज्याचं वाहन आहे, असा तो "एकदंत अवतार' मानला जातो.
3. महोदर इति ख्यातो ज्ञानब्रम्हप्रकाशकः। मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः।।
ज्ञानब्रह्म प्रकट करणारा, "मोहासुराचा' नाश करणारा आणि उंदीर हे वाहन असणारा तो "महोदर' नावानं प्रसिद्ध आहे.
4. गजाननः स विज्ञेयः सांख्येभ्यः सिद्धिदायकः। लोभारसुरप्रहर्ता वै आखुग्रश्‍च प्रकीर्तितः।।
सांख्ययोग्यांना सिद्धिदायक असणारा, "लाभासुराचा वध करणारा आणि उंदीर वाहन असणारा तो "गजानन' नावानं प्रसिद्ध आहे.
5. लम्बोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हणः। शक्तिब्रह्माखुगः सद्‌यत्‌ तस्य धारक उच्यते।।
"क्रोधासुराचे' पारिपत्य करणारा, उंदीर वाहन असणारा आणि शक्तिब्रह्म धारण करणाऱ्या त्याला "लंबोदर' असं म्हणतात.
6. विकटो नाम विख्यातः कामासुरविदारकः। मयुरवाहनश्‍चायं सौरब्रह्मधरः स्मृतः।।
"विकट' नावानं ख्यात असलेला, "कामासुराला' ठार करणारा आणि मोर हे वाहन असलेला तो सौरब्रह्मधारक समजला जातो.
7. विघ्नराजावतारश्‍च शेषवाहन उच्यते। ममतासुरहन्ता स विष्णुब्रह्मोति वाचकः।।
"विघ्नराज' नावाचा अवतार, नाग ज्याचं वाहन आहे आणि "ममतासुराचा' नाश करणारा असून विष्णूब्रह्मधारक मानला जातो.
8. धूम्रवर्णावतारश्‍चाभिमानासुरनाशकः। आखुवाहन एव असौ शिवात्मा तु स उच्यते।।
"धूम्रवर्ण' अवतार "अभिमानासुराचा' नाश करणारा असून, उंदीर वाहन असणारा आहे. त्याला "शिवात्मा' असंही म्हणतात.
अधर्म, जुलूम बोकाळला, की गणेशाला निरनिराळे अवतार घ्यावे लागतात आणि तो अधर्माचा नाश केल्याशिवाय राहत नाही.

श्रवण भक्तीमध्ये कार्तिकेय, कीर्तन भक्तीमध्ये सूर्य, स्मरण भक्तीमध्ये प्रभू रामचंद्र, पादसेवनामध्ये पार्वती, अर्चनस भक्तीमध्ये महाविष्णू, वंदन भक्तीमध्ये भगवान शंकर, दास्य भक्तीमध्ये परशुराम, सख्य भक्तीमध्ये ब्रह्मदेव आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये शुकमनी हे सर्व गणेशाचे नव भक्तराज आहेत. यांनीही वेळोवेळी गणेशाची उपासना केली आहे. अनेक संतांनी गणेशाचं थोर वर्णन केलेलं आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी गणेशाचं सुंदर आणि परिपूर्ण स्तवन केलं आहे. संत तुकाराम महाराजांनीदेखील अनेक अभंग, पदांमधून गणेशस्तुती केली आहे. संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत सूरदास, संत तुलसीदास या सर्व संतांनी यथायोग्य गणेशाच्या अवतारकार्याचं स्तवन केलं आहे. श्रीवासुदेवानंद सरस्वती, श्रीश्रीधर स्वामी यांनीही गणेशाची स्तवनं आणि स्तोत्रं रचली आहेत. संत तुलसीदास, ज्यांचा अवतार, ते वाल्मिकी ऋषी (ज्यांनी रामायण रचलं) त्यांनी स्वतः गणेशाचं उत्कृष्ट स्तोत्र केलं आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आयुष्यभर रामनामाचा प्रसार केला. त्यांनीही गोंदवले इथं शमीविघ्नेश गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे.

या उदाहरणांवरून आपल्या हे लक्षात येतं, की सर्व देवादिकांनी; तसंच थोर संतांनी त्यांच्यावर आलेल्या दुष्टांचा संहार करून घोर संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी गणेशाचं स्तवन केलं. श्रीगणेशानं मात्र कोणा देवतेची स्तुती केली किंवा कोणा देवतेची स्थापना केली, असं मात्र वेदपुराणांत कुठंही वर्णन नाही. कारण "विघ्नहर', "चिंतामणी' हाच विनायक परमात्मा आहे आणि त्याच्या उपासनेनंच अखंड शांती प्राप्त होते.

Web Title: pradeep raste write ganpati article in saptarang