esakal | आग आणि बर्फ... एकाच ठिकाणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Iceland Volcano

आग आणि बर्फ... एकाच ठिकाणी!

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

सन २०२० लवकर सरू दे, कोरोनाकाळ संपू दे, अशी प्रार्थना आपण सगळेच करत आलो होतो. तसं ते सरून २०२१ हे नवं वर्षही सुरू झालं. आज त्या नव्या वर्षाचा १०१ वा दिवस. बघता बघता २०२१ चा चौथा महिनाही निम्मा संपत आला. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि या अशा वातावरणात भारतात किंवा जगात प्रवास करणं खूप अवघड झालंय. पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांचं आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळलं आहे. हे सारं पूर्ववत् होण्यासाठी काही महिने किंवा वर्षही जाऊ शकतं. इथून पुढं छोटे-मोठे प्रवास करताना आपण एक ‘जबाबदार प्रवासी’ म्हणून पर्यटनाशी निगडित असणाऱ्या लोकांना, आपलं योगदान कमी की जास्त याचा विचार न करता, जशी जमेल तशी आणि जमेल तेव्हा थोडीफार का होईना मदत केली पाहिजे. ज्या देशात जाऊ तिथं ‘गो लोकल’चा ट्रेंड अवलंबला पाहिजे. त्यामुळे ज्या त्या देशातल्या अर्थकारणाला हातभार लागेल. आपण जिथं कुठं जाऊ तिथल्या स्थानिकांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे. एकाला एक जोडत जर गेलो तर पर्यटनाची मोठी साखळी तयार होईल आणि त्याचा असंख्य लोकांना फायदा होईल. आपण जर ‘जबाबदार प्रवासी’ म्हणून वागलो तर भारताची मौखिक प्रसिद्धी निश्चितच चांगली होईल आणि परदेशी प्रवासी आपल्या देशात येतील. कोरोनाकाळानंतर प्रवासातील असे काही बदल हे व्यक्तिश: आपण ठरवून केले तर त्याचे सुपरिणाम हळूहळू दिसतील असा मला विश्वास वाटतो.

बरं, एक गंमतीदार प्रश्न विचारतो. येत्या काही महिन्यांत कोरोनाशी निगडित सर्व नियम व अटी पाळून तुम्हाला एखाद्या देशात जायचंय; परंतु तिथं कॅमेरा न्यायचा नाहीये, तर तुम्ही कोणत्या देशात जाल? जरा विचार करा...नाहीच नेला कॅमेरा तर काय फरक पडणार आहे? कदाचित, त्या प्रवासातील आनंदानुभव तुमच्या भावविश्वात जास्त काळ टिकेल! कॅलिफोर्निया विद्यापीठानं याबाबत एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार, जास्तीत जास्त फोटो घेतल्यानं तिथलं काहीतरी चांगलं सदैव स्मरणात राहण्यासाठी मदत होईल असं आपल्याला वाटतं. मात्र, प्रत्यक्षात उलटं आहे! प्रवासात किंवा कुठल्याही प्रसंगात जेव्हा जेव्हा तुम्ही फोटो काढता, तेव्हा तेव्हा अशी शक्यता जास्त असते की तुम्ही त्या ठिकाणाचं फक्त निरीक्षण केलेलं असतं व तो क्षण अनुभवायला तुम्ही विसरलेला असता! कारण, आपल्याला खात्री असते ना की आपल्या कॅमेरात तो क्षण आपण टिपलेला आहे म्हणून! पण मग प्रवास करताना तो क्षण आपण खरंच जगलेला असतो का किंवा अनुभवलेला असतो का? असा प्रश्नही स्वत:ला कधीतरी विचारा...

मला जर एखाद्या देशात कॅमेरा घेऊनच जायचा नसेल तर तो देश असेल आईसलँड! उत्तर अटलांटिक महासागरातील नॉर्डिक बेट!

जेव्हा नैसर्गिक स्रोत एकत्रित करण्याची आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा वापरण्याची वेळ येते तेव्हा आईसलँड हा देश ‘पायोनिअर’ असतो हे गेली अनेक वर्षं जग पाहत आलंय. ‘आग आणि बर्फाचा भूभाग’ असणारा देश म्हणून आईसलँड जगभरात ओळखला जातो. आईसलँड इथं सक्रिय ज्वालामुखी, ग्रेट गिझरचे (Geysir) गरम झरे, ग्लेशिअर्स आणि नाट्यमय लँडस्केप आहेत. व्हॅटनाजकुल (Vatnajokull) आणि स्नॅफेल्सजकुल (snaefellsjokull) या राष्ट्रीय उद्यानांत मोठ्या प्रमाणात ग्लेशिअर संरक्षित आहेत. या देशाची लोकसंख्या तीन लाख ४२ हजार ९५१ असून बहुतेक लोक राजधानी, रिक्झविक (Reykjevik) इथं राहतात. हे जगातील सर्वात स्वच्छ, हरित आणि सुरक्षित शहरांपैकी एक आहे.

आईसलॅंड ही ‘प्रकाशाची आणि अंधाराची जमीन’ म्हणूनदेखील ओळखली जाते. युरोपमध्ये सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी याच देशात आहेत, तर दुसरं स्थान इटलीचं आहे. ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’, ‘थॉर: द डार्क वर्ल्ड’, ‘द ट्री ऑफ लाईफ’, ‘फास्ट अँड फ्युरिअस ८’, ‘इंटरस्टेलर’, ‘ऑब्लिव्हियन’, ‘बॅटमॅन बिगिन्स’, ‘टॉम्ब रायडर’ अशा अनेक सुप्रसिद्ध सिनेमांचं चित्रीकरण आईसलॅंडमध्ये झालं आहे. ‘जेम्स बाँड’चे काही सिनेमे, तसंच ‘द गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचं चित्रीकरणही इथं झालेलं आहे.

डोंगर-दऱ्या, ज्वालामुखी, ग्लेशिअर्स, नद्या, तळी, लेण्या आणि इतर काही बाबींसाठी आईसलँड हे खरोखरच ‘आउटडोअर एन्थ्युझियास्ट’साठी (Outdoor Enthusiast) नंदनवन आहे; पण इतर सर्वच प्रवाशांसाठीही ‘इथं भेट दिलीच पाहिजे,’ असं हे एक भन्नाट ठिकाण आहे. प्रत्येक दिवशी आईसलँडमध्ये काही ना काही थरारक असं घडत असतं. ता. १९ मार्च २०२१ रोजी राजधानी रिक्झविकपासून ४० किलोमीटर अंतरावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. देशात सध्या बत्तीस सक्रिय ज्वालामुखी आहेत असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘बऱ्याच काळापासून रिक्झविक भागामध्ये लाव्ह्याचा प्रवाह जाणवत असून सुमारे ८०० वर्षांनंतर असं काही पाहायला मिळालं आहे. ते पुन्हा जागृत होत असल्याची चिन्हं आहेत. शास्त्रज्ञांना भौगोलिक रहस्यांचा अभ्यास करण्याची एक अनोखी संधी प्राप्त झाली आहे.’

सुप्रसिद्ध छायाचित्रकार ल्युरी बेलेगुर्स्ची (Lurie Belegurschi) आईसलॅंडविषयी म्हणतात : ‘‘आईसलँड हा खरं तर आणखी एक ग्रह आहे! आईसलँड मला नेहमी आश्चर्यचकित करत आला आहे. आईसलँड ही धबधब्यांची भूमी आहे. कारण, आमच्याकडे दहा हजारांहून अधिक धबधबे आहेत, तसंच इथं सक्रिय ज्वालामुखी असून त्यांचा उद्रेकही होतो हेही आपण सध्या पाहिलं. मग, तुमच्या इच्छित यादीत ज्वालामुखीचा विस्फोट बघणं हा विषय आहे की नाही? आईसलँडमध्ये आमच्या नवीन भूमीच्या निर्मितीचा मी एक साक्षीदार आहे आणि याबद्दलचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही.’’

आईसलॅंडशिवाय हवाईमध्येही (Hawaii) अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. गेल्या २०-२५ दिवसांपासून आईसलॅंडमधील हा चमकदार उद्रेक पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ‘ज्वालामुखीपर्यटन’ तेजीत आहे; परंतु ते खूप धोकादायक आहे का, असाही प्रश्न ऐरणीवर आलाय. ज्वालामुखीचा उद्रेक जरी धोकादायक असला तरी त्याची क्षणचित्रं म्हणा अथवा व्हिडिओ म्हणा, कोणताही प्रवासी पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. ‘हा विस्फोट प्रत्यक्ष पाहणं हा खरंच मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता,’ असं काही स्थानिकांनी म्हटलं आहे. असे प्रसंग ‘ह्याचि देही, ह्याचि डोळा’ बघणं हे आयुष्यभरासाठी रोमांचकारकही ठरू शकतं आणि जीवघेणंही! तिथं या काळात जाणाऱ्या प्रवाशांना ‘लाव्हा-चेसर्स’ असं म्हटलं जातं. असं काहीतरी थरारक आपल्या आजूबाजूला घडतंच असं नाही; म्हणून मला नक्कीच असं काही तरी भन्नाट बघायला व अनुभवायला आवडेल. कोरोनामहामारीच्या या काळात आपण स्वत:ची सर्वतोपरी काळजी घेऊ या आणि आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं वागू या. शेवटी एवढंच की...जेव्हा काहीतरी चांगलं घडतं तेव्हा ते साजरं/सेलिब्रेट करण्यासाठी प्रवास करा. जर काहीतरी वाईट घडलं असेल तर ते विसरण्यासाठी प्रवास करा...आणि जर या दोहोंपैकी काहीही झालं नाही तर ‘काहीतरी घडेल’ ही आशा ठेवून प्रवास करा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)